माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Monday, May 25, 2020

स्व.नानासाहेब कोरे यांना ऑस्ट्रेलियाहून पत्र



लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या छोट्या भावाने पाठवले whatsapp वरून पत्र


प्रिय दादा,
हॅलो s....s
दादा ?
“कसा आहेस?”..............?
दादा...........!
  आपल्या प्रत्येक कॉलची सुरूवात अशीच व्हायची अन् शेवट व्हायचा तो “काळजी घे” या शब्दांने.
  तू फोनवर बोलताना म्हणयाचास अरे......
इथे रात्रीचे  बारा  वाजलेत .बाहेर  काळाकुट्ट   अंधार झालाय .
     फोन करायला थोडा जरी उशीर झाला, तर तू ओरडायचास माझ्यावर .म्हणायचास , “ इंडिया वाल्यांची झोपायची वेळ झाली अन् तु Australia मधे आजून जागा कसा ?”
त्यावेळचा अंधार आणि दादा आजचा अंधार यात  युगायुगांचा फरक वाटाय लागलाय .

सकाळपासुन खूप साऱ्या  नातेवाईकांचे मित्र मैत्रिणींचे फोन येऊन गेले . काहींशी बोललो,   अन् काही जणांचा    फोन उचलण्याचं धाडस झालं नाही . खूप सारे आधार देणारे  मेसेज आले............!
 पण ते ओपन करून थँक यु म्हणायचं  पण धाडस   होत नाहीये रे. खरं  सांगायचं म्हणलं तर तुझ्या   अकस्मात जाण्याने   झालेले दुःख हे त्यांच्याशी  बोलून  कमी होईल?
 , त्यांना कसं सांगू  की माझा दादा असा होता, माझा दादा तसा होता . त्यामुळे माझं दुःख कमी  होण्यासारखं  नाहीं.  म्हणून  विचार केला की , सारं  तुझ्याशीचं बोलावं.   म्हणून दादा तुला हे पत्र लिहितोय . हे पत्र तुला नक्की पोहोचेल माझी खात्री आहे.
  जसं तू पलूस नवोदय school ला होतास तेव्हा लिहायचो अगदी तसं.  त्यावेळी तुझं  पत्ररूपी उत्तर यायचे, आज माहित आहे की तुझं उत्तर येणार नाही, पण  माझी भोळी श्रद्धा का असेंना ?  मी आज तुला पत्र लिहितोय .असे  म्हणतात  की  मृत्यू नंतर देखील आत्मा तीन दिवस  भूलोकावर असतो . म्हणूनच लिहायची घाई केली . या भोळ्या  आशेने की , तु हे जग  सोडून जाण्याआधी  हे पत्र वाचशील.  नाहीतरी तुझा माझ्याभेटीसाठी अतृप्त आत्मा हे पत्र वाचल्याशिवाय जाणार नाही .

दादा अरे , खूप  काही बोलायचं होत रे तुझ्याशी . तुला संगायच होतं की, तुझा  मला किती  आधार वाटतो ! अरे अभिमान देखील  वाटतो तुझा , पण काळजी  वाटते .  बोलायचं  पण राहूनच गेलं .  खरं सांगायचं तर आजपर्यंत वाटायचं , ”दादा तर आहे ! कुठे जातोय?  बोलू नंतर कधीतरी .” पण हे असं होईल , असं  स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवतं !  " दादा ,का रे असा सोडून  गेलास आम्हा सगळ्यांना ?" अण्णांचा  लाडका तू अन्  बाकी सर्वांचा मी लाडका. हे आपल्या घरातलं  गणित.
        मी ८ वी मधे  असताना आण्णा आपल्याला सोडून  गेले. त्यावेळी  , मला आता होतंय एवढं  दुःख झालं  नाहीं.  कदाचित कोणी जायचं दुःख काय असतं हे समजण्या इतकं माझं वय नव्हतं. पण आता वाटतंय  अरे , कदाचित  अण्णांच्या जाण्याने  तुझ्या मनात निर्माण  झालेली पोकळी आम्ही सर्व जण मिळून देखील भरू शकलो नाही. म्हणून की काय तू आम्हा सगळ्यांना सोडून अण्णांकडे निघून गेलास .

इकडे  सकाळ पर्यंत सगळं नीट चालू होतं. अमोल दादांचा फोन आला ,अन् तुझ्या ऽऽ अपघाताचं समजलं. क्षणात डोक्यात वीज कडाडून गेली.  ऐकल्या वर एकदम धक्का बसला, त्यानंतर दिवसभर फक्त काय काय  घडत  होत्या, पण समजत मात्र काहीच   नव्हतं .
   वाटायचं आता जाग येईल अन् मी म्हणेन  थँक्स god . पण हे  केवळ वाईट स्वप्न होतं. जसजसा दिवस मावळत गेला , तसा माझा धीर पार  सूटत गेला, मावळत्या  सूर्याबरोबर मनाला वाटायला लागलं की आज जे काही घडलं  ते एक भयावह सत्य होतं. अन्  उरलेलं  आयुष्य मला या सत्याबरोबर काढायचंय.

चार वर्षांपूर्वी  मला Australia ला जायची  ऑफर  आली अन् मी क्षणात हो बोलून टाकले, त्यावेळी मला असा विचार करावा  वाटला की मी एवढ्या   दूर असताना घरच्यांची काळजी कोण घेईल ?" असं काही वाटलंच नाही,  माहित होतं , तू आहेस ,तात्या आहेत, त्यामुळे  गावाकडची  चिंता मी कधी केलीच नाही. इतकंच काय, इकडे  येतेवेळी  पण मी घरची सर्व जबाबदारी  निश्चिन्तपणे तुझ्यावर टाकून     आलो अन्   तूही ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडलीस. दूर असूनही मला  कधी याची  जाणीव होऊ दिली नाहींस, अगदी कोणत्या शेतात   काय पेरलंय पासुन  द्राक्षांची quality कशी आहे  ? "  इथपर्यंत. इतकंच काय, नवीन घरामधे कोणत्या टाईल्स  बसवायचंय ,हा देखील निर्णय video call वर मला दाखवून घेतलास.

परवाचंच सांगायचं झालं तर, मला  जेव्हा आपल्या  family whatsapp ग्रूप वर नोटीफिकेशन आलं की “ Dada Left”  तेव्हा नकळत  मनात विचार आला “की दादा आमच्यावर रागवला की काय?” पण तो विचार  जास्तवेळ राहिला  नाहीं , कारण थोड्या वेळाने   तुझा  मेसेज आला अन् संगीतलस की whatsapp uninstall झाल्यामुळे  ते notification आलेल अन् मी तुझा number परत ग्रूप मधे add केला. आता तर तू आपली  family च सोडून  गेलास ! इतकंच काय सारे नातेवाईक देखील सोडून गेलास . " किती बरं झालं असतं  ना ?" जर  मी तुला परत family मधे add करू शकलो असतो तर?"

हे सगळं  वाचून तु म्हणत असशील  की “ हा कधी  मोठा होणाराय  काय माहीत ?” खरं  तर मला आपल्या घरात लहानच बणून रहायचं होतं, लहान असलेलं बरं असतं ,, काही चूका झाल्याच तर घरचे अजून तो लहान आहे,  म्हणून संभाळून  घेतात .पण आज जाता जाता नकळत तू माझ्यावर मोठं  होण्याची ची जबाबदारी टाकून गेलास.

श्रद्धा , मला  धीर देण्यासाठी  बोलून गेली  की “COVID-19 परिस्थिती  नसती तर आपण आजच इंडिया ला गेलो असतो .” हे ऐकताच माझ्या तोंडून आपसुक निघून गेलं , “COVID परिस्थिति नसती तर आज इंडिया ला जायची गरजच लागली नसती. ना ही परिस्थिती  उद्भवली असती , ना तुला duty वर जावं लागलं असतं, ना हा अपघात झाला असता, कोविड 19 ची परिस्थिती नसती ना   !  तर किती बरं झालं असतं ?"

 असे खूप  सारे विचार येतायेत मनामध्ये ; पण लगेच ही देखील  जाणीव होते की जे झालंय ते आता बदलणार नाहीय, समाधान एकाच गोष्टीचं वाटतं  की कोरोना परिस्थितित आपल्या   गावचं ,जिल्ह्याचं ,राज्याचं, तसंच देशाचं रक्षण करताना तू धारातीर्थी   पडलास ! दादा,  तुझा सार्थ  अभिमान वाटतोय रे ........!

 तुझ्याशी बोलताना शब्द कधी  कमी पडलेच    नाहीत, आताही वाटतंय खूप काही  तुझ्याशी बोलायचं रहिलंय , काय बोलू अन् किती बोलू हेच कळत नाही.  पण आता थांबतो , नाहींतर परत तूच  म्हणयाचास  किती उशीर  पर्यन्त जागत बसतोस.

आता तु हे जग सोडून देवाकडे जात आहेस ,तर तुला एकच सांगु इच्छितो  “अगदी निष्काळजी होऊन जा, सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून, जसा  मी सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकून  Australia ला आलो होतो . अन्  आता  मात्र देवाकडे एकच प्रार्थना आहे “ देवा माझ्या  दादाला तुझ्याजवळ  सुखात ठेव .”

"दादा काळजी घे."

तुझा,
बंडू.




( सदरचे पत्र स्व.नानासाहेब सादाशिव कोरे यांचे बंधू बंडू यांनी लिहिलेले आहे . जागतिक लॉकडाऊन मुळे ऑस्ट्रेलियाहुन त्यांना अंत्यसंस्कारसाठी भारतात येता आले नाही .त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची क्षमा  मागून )



🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏


No comments:

Post a Comment