माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Monday, March 02, 2026

ग्रहण- समज, गैरसमज, श्रद्धा आणि अंधश्रद्धा

 


ग्रहणे हा तर खगोलीय छाया प्रकाशाचा खेळ .


आज 3  मार्च 2026 ला एक सुंदर खगोलीय घटना अर्थात छाया प्रकाशाचा खेळ घडणार आहे; ती घटना म्हणजे   चंद्रग्रहण. हे चंद्रग्रहण उत्तर भारतातून बहुतांश भागातून दिसणार आहे ,परंतु चंद्राचा प्रवेश पृथ्वीच्या सावलीत झाल्यानंतर. 

आजच्या विज्ञान युगात खगोलीय चमत्कार कसे घडतात हे पाहून , ते का घडतात याचं करण आपण शोधायला लावण्यापेक्षा , ग्रहण पाळून अंधश्रद्धा पसरवण्याचे काम काहीजण करतात. भूगोल आणि विज्ञान शिकवणाऱ्या मुली देखील ग्रहणाबद्दल अंधश्रद्धा पसरवितात याचं दुःख मोठं आहे.

पण सध्या श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे अवडंबर जास्त माजवले जात आहे.सोशल मीडियावर ग्रहण कसे पाहावे ? त्याची शास्त्रीय माहिती देण्यापेक्षा   ग्रहण कसे पाळावे ? याची भीती पसरवणारे मेसेज पसरवले जात आहेत.




या सगळ्या अंधश्रद्धा आपण आपल्या भारतीय संस्कृतीच्या नावाखाली पाळतो.पण आपल्याला एक प्रदीर्घ वैज्ञानिक वारसा आहे.इसवीसनाच्या चौथ्या शतकातील महान खगोल तज्ञ आर्यभट्टानी स्पष्ट पणे सांगितले आहे की ग्रहण ही शुद्ध खगोलीय घटना असून सावल्यामुळे होते.




छादयति शशी सूर्यं शशिनं महती च भूच्छाया
भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी देखील हेच सत्य वारंवार सांगितले आहे.असे असतांना संस्कृतीच्या नावाखाली आपण निरर्थक अंधश्रद्धा पाळत हास्यास्पद कृत्ये करत असू तर आपण वैज्ञानिक वारसा असणाऱ्या आपल्याच भारतीय संस्कृतीचा आपण अपमान करत आहोत.

त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता ग्रहण बघणे, इतरांना बघायला लावणे आणि गैरसमजांचे निराकरण करणे हाच खरा भारतीय संस्कृतीचा सन्मान होय !



ग्रहणाविषयी अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात प्रचलित आहेत. अशाच काही गैरसमजांचे निराकरण करण्याचा हा छोटासा प्रयत्न!



गैरसमज 1:
ग्रहण अशुभ असते. ग्रहणे पाहू नयेत.
ग्रहण ही खगोलीय घटना आहे.जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात तेव्हा चंद्रामुळे  सूर्यबिंब झाकले जाऊन सूर्यग्रहण होते. यात शुभ-अशुभ असे काही नाही.

गैरसमज 2:
ग्रहणात हवा अशुद्ध होते
 चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्राच्या काही भागावर अंशतः किंवा पूर्ण  पडते. सावली ही सावलीच असते.झाडाची सावली,डोंगराची सावली किंवा चंद्राची आणि पृथ्वीची सावली सारखीच असते.जर झाडाच्या सावलीत हवा अशुद्ध होत नसेल तर चंद्राच्या आणि पृथ्वीच्या सावलीत देखील होणार नाही कशावरून ? आणि हो आपण दररोज पृथ्वी च्या सावलीत राहतो ना !


गैरसमज 3:
पाणी अशुद्ध होते -ग्रहण सुटल्यावर घरातील पाणी ओतून टाकून नवीन पाणी भरावे.
ग्रहणात जर घरातील पाणी अशुद्ध होत असेल तर शुद्ध कताफ  
विहिर टाकीतले, नदीतले ,धरणातले पाणी सुद्धा अशुद्ध व्हायला हवे.घरातील पाणी ओतून देऊन टाकीतले पाणी भरणे हे तर्क दृष्ट्या सुद्धा हास्यास्पद आहे.घरातले पाणी झाकून ठेऊ पण संपूर्ण धरण उघड्यावर आहे त्याचे काय करणार??

गैरसमज 4:
ग्रहणात शरीर अशुद्ध होते म्हणून ग्रहण सुटल्यानंतर शरीरशुद्धीसाठी स्नान करावे.
जर चंद्राच्या सावलीत आपले शरीर अशुद्ध होत असेल तर झाडाच्या सावलीत, इमारतीच्या सावलीत पण व्हायला हवे.आणि जर पाणी अशुद्ध होत असेल तर अशुद्ध पाण्याने अंघोळ करून शरीर शुद्ध कसे होणार?
गैरसमज 5:
ग्रहणात अन्न दुषित होते ,ग्रहणात काहीही खाऊ नये. ग्रहणा आधीचे अन्न टाकून द्यावे.
ग्रहणानंतर घरातील अन्न पदार्थ जर फेकून दिले जात असतील तर सगळी शेते उघड्यावर आहेत.त्यांचे काय??शेतातील धान्य, बाजारातील अन्नपदार्थ, हे जर चालत असतील तर घरात शिजवलेल्या अन्नच कस दूषित होते??ग्रहणात जरी काही खाल्ले नाही तरी ग्रहणापूर्वी खाल्लेले अन्न पोटात असणार.ते पण दूषित होऊन विषबाधा व्हायला हवी पण तसे होताना दिसत नाही.
गैरसमज 6:
ग्रहणकालात झोपू नये
खरतर एवढी दुर्मिळ खगोलीय घटना होताना ग्राहणाचे विलोभनीय दृश्य पहायचे सोडून झोपा काढणे हा कपाळकरंटेपणाच म्हणायला हवा.पण ग्रहणात झोप काढली तरी काही फरक पडत नाही.
गैरसमज :7
ग्रहणकालात गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये.
ग्रहणकालात गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये. ग्रहणाचे नियम न पाळल्यास  विकृत शरीराचे मूल जन्माला येते.
एका वर्षात कमीत कमी 4 आणि जास्तीतजास्त 7 ग्रहणे होऊ शकतात. जगात एकाच वेळी लाखो स्त्रिया गर्भवती असतात. तेव्हा  जर असे काही झाले असते, तर जगाची निम्मी लोकसंख्या शारीरिक विकृत असायला हवी होती. ग्रहणाचा परिणाम जपान, अमेरिकन,ऑस्ट्रेलिया, आफ्रिकन, चिनी, पाकिस्तानी गरोदर स्त्रियांवर न होता फक्त भारतीय स्त्रियांवरच कसा काय होतो?

ग्रहण पाहताना घ्यावयाची काळजी

खंडग्रास सूर्यग्रहण पाहताना ग्रहण पाहण्याकरिता तयार केलेले विशेष चष्मे किंवा काजळी लावलेली काळी काच किंवा सूर्याचे प्रखर किरण डोळ्यांपर्यंत पोचू नयेत याकरिता उपलब्ध साधनांचा वापर करून ग्रहण पाहावे.
परंतु चंद्रग्रहण शक्यतो रात्री असते. तेव्हा पृथ्वीची सावली चंद्राच्या स्क्रीनवर पाहण्याची मजा उघड्या डोळ्यांनी घेता येते.

Solar Eclipse on June 21: Check timings, duration of Solar eclipse ...
या सूर्यग्रहणाचे  विशेष आकर्षण:
      ग्रहण काळात गरोदर माता भाजी चिरणार! जेवण करणार!
आपल्याकडे ढगाळ वातावरण असेल तर चिंता करू नका, फेसबुक लाईव्ह  चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घ्या!
 ग्रहण काळात  काही सामाजिक संस्था   ग्रहणाचे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम दाखवतात. यामध्ये चंद्रग्रहणाचा  विलोभनीय नजराणा पाहता येईल.
  ग्रहणाच्या काळात एक धाडसी गरोदर माता ग्रहणा संबधी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्वत: भाजी चिरणार, जेवण करणार आहे. याचेही लाईव्ह प्रेक्षपण होणार आहे.
उदयाच्या  ग्रहणाचा लाईव्ह  देखील आनंद घ्या.



जपान मध्ये ग्रहण पाळतात का?

खगोलशास्त्रीय घटना: जपानमध्ये ग्रहण सामान्यतः एक शैक्षणिक आणि विज्ञानावर आधारित घटना मानली जाते 
  • निरीक्षण: जपानी लोक चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशिष्ट साधने वापरतात आणि त्याचा आनंद घेतात.
  • नियम: तिथे भारतीय संस्कृतीतील 'ग्रहण पाळणे' (खाणे-पिणे टाळणे किंवा सुतक) यांसारखे नियम पाळले जात नाहीत.
थोडक्यात, जपानमध्ये ग्रहण पाळले जात नाही, तर ते पाहिले जाते.
( हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ  वैज्ञानिक माहिती देणे हा आहे . श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक लक्षात येण्यासाठी हा लेखनप्रपंच...
  धन्यवाद ! )


🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏


 यशस्वी खेळाडूंची पहिली पायरी:

स्थानिक स्पर्धा 


क्रीडा क्षेत्रात जेव्हा आपण राज्यस्तरीय, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा, मोठ्या स्टेडियममधील सामने पाहतो, तेव्हा त्या खेळाडूंच्या यशाने आपले मन अभिमानाने भरून येते. मात्र या यशामागे असते ती एका छोट्याशा स्थानिक स्पर्धेची सुरुवात. प्रत्येक मोठ्या खेळाडूचा प्रवास हा स्थानिक मैदानावरूनच सुरू झालेला असतो. म्हणूनच स्थानिक स्पर्धा या केवळ कार्यक्रम नसून, त्या भविष्यातील यशस्वी खेळाडूची  पहिली पायरी असते. स्थानिक स्पर्धा खेळाडूंना पहिली संधी देतात. स्वतःला सिद्ध करण्याची, आपल्या कौशल्याची चाचणी घेण्याची आणि स्पर्धेचा अनुभव मिळवण्याची. सरावात कितीही चांगली कामगिरी केली तरी, खरी परीक्षा स्पर्धेतच होते.


स्थानिक स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमुळे खेळाडूंना खेळण्याचा अनुभव मिळतो, जो पुढील मोठ्या स्पर्धांसाठी अत्यंत आवश्यक असतो. ग्रामीण आणि लहान शहरांतील अनेक गुणवंत खेळाडूंना थेट राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर संधी मिळणे कठीण असते. अशा वेळी स्थानिक स्पर्धा त्यांच्यासाठी संधीचे दार उघडतात. या स्पर्धांमधूनच त्यांची निवड पुढील स्तरासाठी होते. त्यामुळे स्थानिक स्पर्धा या केवळ सहभागापुरत्या नसून, त्या निवड प्रक्रियेचा आणि प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा असतात. स्थानिक स्पर्धा खेळाडूंच्या आत्मविश्वासाला बळ देतात. आपल्या गावात, आपल्या लोकांसमोर खेळताना खेळाडूला एक वेगळी प्रेरणा मिळते. छोट्या मैदानावर मिळालेला पहिला पुरस्कार, पहिली ट्रॉफी किंवा कौतुकाची थाप हीच पुढे मोठ्या यशाची प्रेरणा ठरते. या अनुभवातून खेळाडू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो. या स्पर्धांचे आणखी एक महत्त्व म्हणजे समाजातील क्रीडा संस्कृती जागृत राहते. स्थानिक स्तरावर जेव्हा स्पर्धा आयोजित केल्या जातात, तेव्हा पालक, शिक्षक, नागरिक यांचा सहभाग वाढतो. उच्च स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडूचे सहभाग होतो.  कौतुक होते गावात किंवा शहरात क्रीडाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होते.


मुलांना खेळाकडे वळण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे स्थानिक स्पर्धा या केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला घडवतात. प्रशिक्षक आणि आयोजकांची भूमिकाही येथे महत्त्वाची असते. स्थानिक स्पर्धा दर्जेदार, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने घेतल्या गेल्या, तर खेळाडूंमध्ये प्रामाणिक स्पर्धेची भावना निर्माण होते. योग्य पंच, योग्य नियोजन आणि प्रोत्साहनात्मक वातावरण असल्यास खेळाडूंचा आत्मविश्वास दुप्पट होतो. आज अनेकदा मोठ्या स्पर्धांच्या मोहात स्थानिक स्पर्धांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र भक्कम पाया नसेल तर इमारत उभी राहत नाही. स्थानिक स्पर्धा हाच त्या भक्कम पायाचा भाग आहे. याच स्पर्धांमधून खेळाडूला शिस्त, संघभावना, विजय-पराभव स्वीकारण्याची तयारी आणि सातत्याची सवय लागते. भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेते घडवायचे असतील, तर स्थानिक स्तरावर क्रीडा स्पर्धांचे जाळे अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक शाळा आणि प्रत्येक क्रीडा संस्था यांनी स्थानिक स्पर्धांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण मोठ्या यशाची बीजे ही नेहमी छोट्या मातीमध्येच पेरली जातात. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, स्थानिक स्पर्धा या छोट्या वाटल्या तरी त्यांचे महत्त्व मोठे असते. त्या केवळ स्पर्धा नसून, त्या भविष्यातील विजेत्यांच्या स्वप्नांची पहिली पायरी असतात. म्हणूनच प्रत्येक स्थानिक स्पर्धेला योग्य सन्मान आणि पाठबळ देणे ही काळाची गरज आहे.

Thursday, December 18, 2025

दीर्घायुषी जगायचंय ?

 *🌿 “दीर्घायुषी कसं जगायचं?”  🌿*

 - जिथे लोक जास्त  वर्षे जगतात तिथल्या अभ्यासातून हे समोर आलंय की, दीर्घायुष्यासाठी काय महत्वाचे आहे ?

❌ आहार मुख्य कारण नाही.

❌ व्यायाम मुख्य  कारण नाही.

❌ अनुवंशिकता (Genetics) सुद्धा मुख्य कारण  नाही.

👉 तर सर्वात महत्त्वाचं कारण काय?

ते म्हणजे ‘कमी ताण’ (Less Chronic Stress). बाकी सगळ्या गोष्टी  या जगात दुय्यम आहेत!

तुम्ही कितीही चांगलं खाल्लं किंवा व्यायाम केला, पण जर तुम्ही सतत तणावात असाल, तर आयुष्य कमी होणारच. हा तणाव फक्त कामाचा नसून, "तुम्ही आतून कोण आहात आणि जगाला काय दाखवता" यातील संघर्षाचा असतो.


दीर्घायुष्याचे ६ साधे नियम: 

*१. 🎭 स्वतःच्या मनाशी खोटं वागू नका*

ज्या गोष्टी तुमच्या मनाला पटत नाहीत, त्या जबरदस्तीने करू नका.

* नावडती नोकरी करताय? 📉 आयुष्य काही वर्षांनी कमी होणारच.

* प्रेम नसलेल्या व्यक्तीसोबत राहताय? 📉 आयुष्य काही वर्षांनी कमी होणारच.

* नकारात्मक लोकांच्या संगतीत आहात? 📉 आयुष्य काही वर्षांनी कमी होणारच.

* तात्पर्य: मनाविरुद्ध जगणं म्हणजे शरीरातील सकारात्मक उर्जेला रोज थोडं थोडं मारण्यासारखं आहे.


*२. ⏳ आयुष्य 'नंतर'वर ढकलू नका*

"रिटायर झाल्यावर मज्जा करू..." असं म्हणू नका.

* बहुतेक  लोक रिटायरमेंटनंतरच्या ४- ५ वर्षांतच जग सोडून जातात.

* कारण शरीराने आयुष्यभर जगण्याची वाट पाहिली, पण जेव्हा वेळ आली, तेव्हा शरीर थकलेलं होतं. त्यामुळे 'आज' जगा!


*३. 🤝 एकटेपणा टाळा, माणसं जोडा*

एकटेपणा हा नकारात्मक विचाराला जवळ करणार असल्याने आनंदी जगण्यासाठी तो धोकादायक आहे! 

* चांगले मित्र आणि चांगले  नातेवाईक असलेल्या लोकांचं आयुष्य खरोखरच जास्त असतं.

* केवळ मित्रांची आणि नातेवाईकांची संख्या महत्त्वाची नाही, तर त्यांचा दर्जा महत्त्वाचा आहे. ❤️


*४. 🎯 जगण्याचं एक 'कारण' शोधा (इकिगाई)*

जपानी लोक याला 'इकिगाई' म्हणतात – म्हणजे "सकाळी उठण्याचं कारण."

* ज्यांच्याकडे आयुष्य जगण्याचा स्पष्ट उद्देश आहे, त्यांचं आयुष्य सरासरी १० वर्षांनी वाढतं.

* हा उद्देश काहीही असू शकतो - नातवंडांना सांभाळणं, बागकाम, समाजसेवा किंवा कला. "माझी कोणाला तरी गरज आहे," ही भावना खूप पॉवरफुल असते. ✨


*५. 🥗 आरोग्याचा अति-विचार टाळा (Over-optimization)*

सतत कॅलरीज मोजणे, डाएटचं टेन्शन घेणे आणि फिटनेसबद्दल अति विचार करणे... हे आयुष्य नाही, ती एक शिक्षा आहे! 🚫

* अति नियंत्रण ठेवल्याने ताण वाढतो आणि कॉर्टिसोल लेव्हल वाढते. त्यापेक्षा अन्नाचा आनंद घ्या.


*६. 🚶‍♂️ जिमला पर्याय? नैसर्गिक हालचाल!*

शंभर वर्षे जगणारे लोक जीममध्ये जाऊन वजन उचलत नाहीत.

* ते नैसर्गिकरित्या active राहतात - चालणे, बागकाम करणे, पायऱ्या चढणे, घरातील कामे करणे. 🧹🌻

* हालचाल हा त्यांच्या जगण्याचा भाग आहे, तो वेगळा 'व्यायाम' नाही.

🌟 निष्कर्ष:

*जास्त जगण्याचं रहस्य सोपं आहे: ताणमुक्त राहा, नैसर्गिक जीवन जगा आणि सर्वात महत्त्वाचं – स्वतःशी प्रामाणिक राहा! 😊*

Tuesday, November 18, 2025

कुमार वयापर्यंत मुलांवर संस्कार करताना

 

कुमार वयापर्यंत मुलांवर पालकांनी संस्कार करताना घ्यावयाची काळजी



प्रस्तावना

मुलं म्हणजे समाजाचं भविष्य. एखाद्या राष्ट्राचं खरं सामर्थ्य त्याच्या बालकांमध्ये दडलेलं असतं. जसं झाडाच्या मुळांवर संपूर्ण झाडाची वाढ अवलंबून असते, तसंच बालकांच्या संस्कारांवर त्यांचं भविष्यातील व्यक्तिमत्त्व, वर्तन, आणि चारित्र्य अवलंबून असतं. कुमारवय म्हणजे बालपणातून किशोरावस्थेकडे जाण्याचा टप्पा — या काळात मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक वाढ झपाट्याने होत असते. या वाढीच्या प्रक्रियेत पालकांचे संस्कार हे मुलांच्या मनावर खोलवर ठसा उमटवतात. त्यामुळे या वयात योग्य संस्कार देताना पालकांनी अत्यंत संवेदनशील, जागरूक आणि संयमी राहणे गरजेचे आहे.

आजच्या युगात ज्या वेगाने सामाजिक, तांत्रिक आणि नैतिक बदल होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर मुलांवर योग्य संस्कार करण्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. मुलं इंटरनेट, सोशल मीडिया, आणि डिजिटल माध्यमांच्या प्रभावाखाली वाढत आहेत. त्यामुळे पालकांची भूमिका केवळ आर्थिक पुरवठादार किंवा शिक्षणाचा भार उचलणारी नसून, ती मार्गदर्शक, प्रेरक आणि मूल्यसंवर्धक अशी बनली पाहिजे.


संस्कार म्हणजे काय?

‘संस्कार’ या शब्दाचा अर्थ केवळ धार्मिक किंवा परंपरागत कृती असा नाही. संस्कार म्हणजे मनावर केलेली योग्य छाप. संस्कार म्हणजे  व्यवहारात एखाद्या कृतीवर प्रतिक्रिया देताना अचूक निर्णय घेऊन केलेली कृती करण्याची क्षमता निर्माण होणे. सावकार हे एक दिवसात किंवा एक तासात किंवा तासिकेत करता येत नाहीत. संस्कार ही निरंतर , अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. संस्कार स्थळ आणि काळ यानुसार बदलू शकतात.त्यासाठी पालकांनी देखील जागरूक राहायला हवे. मुलांमध्ये चांगले विचार, चांगल्या सवयी, नैतिक मूल्ये आणि जबाबदारीची भावना निर्माण करणं म्हणजे संस्कार करणं. संस्कार हे मुलांच्या अंतर्मनात रुजले पाहिजेत. ते शब्दांनी नव्हे तर कृतीतून, अनुभवातून आणि वातावरणातून तयार होतात.

संस्कारांची प्रक्रिया  मानवी जीवनात दीर्घकाळ चालते. ती जन्मापासून सुरू होते आणि वृद्धावस्थेपर्यंत चालते. संस्काराची प्रक्रिया ही कुमारवयापर्यंत सर्वाधिक प्रभावी असते. कारण या काळात मुलं निरीक्षणक्षम, अनुकरणप्रिय आणि प्रभावग्राही असतात. ते  समाजातील तसेच पालकांचे बोलणे, वागणे, वर्तन, अगदी लहान कृतीही अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी दिलेले संस्कार हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवतात.


कुमारवयातील मुलांची वैशिष्ट्ये


कुमारवायतील मुलांना समजून घेण्यासाठी कुमार वयामध्ये जे बदल होतात ते पालकांनी प्रथम समजून घेणे गरजेचे आहे.  कुमारवय म्हणजे मुलांच्या जीवनातील संक्रमणकाळ. या वयात ते बाल्यावस्थेतून किशोरावस्थेकडे प्रवास करतात. त्यांच्या जीवनात  नवनवीन स्वप्ने डोकावत असतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्न, कुतूहल आणि भावनांचे वादळ सुरू असते.
या काळात काही  बदल घडतात त्या बदलांची वैशिष्ट्ये जाणून घेणे गरजेचे असते. खालील प्रमाणे काही वैशिष्ट्ये दिसून येतात:


शारीरिक बदल: उंची वाढणे, आवाजात बदल, हार्मोन्सचे परिणाम — हे बदल मुलांना गोंधळात टाकू शकतात.

भावनिक चढउतार: राग, आनंद, निराशा, असूया, स्पर्धा, स्वाभिमान यासारख्या भावनांचा तीव्र अनुभव येतो.


स्वत:चा शोध: “मी कोण?” “माझं मत काय आहे?” असे प्रश्न मुलं स्वतःला विचारू लागतात.


सामाजिक ओळख: मित्रांचा प्रभाव वाढतो. ते स्वतःला समूहात सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.


स्वातंत्र्याची इच्छा: पालकांपासून काहीसा वेगळेपणा दाखवण्याची प्रवृत्ती निर्माण होते.

या सर्व टप्प्यांत पालकांनी जर संयम, समजूत आणि प्रेमाने मार्गदर्शन केलं, तर मुलं सकारात्मक दिशेने वाढतात. पण जर दुर्लक्ष, राग, किंवा दडपशाही केली गेली, तर मुलं हट्टी, गोंधळलेली किंवा नकारात्मक विचारांची होऊ शकतात.


संस्कार प्रक्रियेत  पालकांची भूमिका

पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. मुलं शाळेत जाण्याआधीच त्यांनी जग पाहण्याचा दृष्टिकोन पालकांकडून घेतलेला असतो. पालकांनी संस्कार करताना खालील गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे:


१. प्रेम आणि सुरक्षिततेचे वातावरण

मुलांना घरी प्रेम, आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना मिळाली पाहिजे. भीतीच्या वातावरणात वाढणारी मुलं कधीच आत्मविश्वासू बनू शकत नाहीत. प्रेम देणे म्हणजे फालतू लाड करणं नाही, तर त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांच्या भावनांचा आदर करणं होय.

२. संवादाचे महत्त्व

पालकांनी मुलांशी नेहमी खुला संवाद ठेवला पाहिजे.त्यांनी ऐकलेल्या काही गोष्टींची सत्यता त्यांना पडताळून पहावीशी वाटते. त्यामुळे कोणत्याही घटनेची एक बाजूने विचार करण्याची शक्यता असते.तेव्हा  आपण पालक म्हणून “काय झालं?” “ तुला कसं वाटतंय?” असे प्रश्न विचारणे, आणि त्यांच्या उत्तरांना गांभीर्याने ऐकणे, हे महत्त्वाचे आहे. संवादातून विश्वास निर्माण होतो, आणि तोच संस्काराचा पाया आहे.


३. आदर्श वर्तन दाखवणे

पालक स्वतः जे बोलतात तेच जर त्यांच्या कृतींमध्ये दिसलं, तर मुलांवर त्याचा खोल परिणाम होतो. उदाहरणार्थ, पालकांनी प्रामाणिक राहून, इतरांचा आदर करून, वेळेचं पालन करून, वाचनाची आवड दाखवून मुलांना प्रेरित करावं.


४. शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा समतोल


अति शिस्त मुलांना बंडखोर बनवते, तर अति स्वातंत्र्य त्यांना दिशाहीन करू शकतं. म्हणून दोन्हींचा समतोल राखणे आवश्यक आहे. नियम असावेत, पण ते का आहेत हे समजावून सांगणेही महत्त्वाचे आहे.


५. तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर शिकवणे

आजच्या काळात मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडियाशिवाय मुलं राहत नाहीत. त्यांना पूर्ण बंदी घालण्यापेक्षा जबाबदारीने वापर कसा करायचा हे शिकवणे हा खरा संस्कार आहे.


६. मूल्यसंस्कार आणि नैतिक शिक्षण

सत्य, प्रामाणिकपणा, आदर, सहकार्य, आणि पर्यावरणाची काळजी — ही मूल्यं बालपणात रुजली पाहिजेत. मुलांना दैनंदिन जीवनात या मूल्यांचा उपयोग कसा होतो, हे अनुभवातून शिकवावे.


७. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे

पालकांनी आपल्या रागावर, तणावावर नियंत्रण ठेवावं. कारण मुलं पालकांची मनःस्थिती ओळखतात आणि त्यावरून वागतात. रागाऐवजी समजावून सांगणं अधिक परिणामकारक असतं.


संस्कार करताना घ्यावयाची काळजी

संस्कार देताना पालकांनी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घ्यावी, अन्यथा चांगल्या हेतूने दिलेले संस्कारही विपरीत परिणाम करू शकतात.

१. दडपशाही टाळा

अति नियंत्रण, ओरड, किंवा शिक्षा मुलांच्या मनात भीती आणि विरोध निर्माण करते. मुलं मग खोटं बोलू लागतात किंवा स्वतःला दडपून टाकतात.

२. तुलना करू नका

“पाहा, शेजारचा मुलगा किती अभ्यास करतो!” अशा तुलना मुलांच्या आत्मसन्मानावर घाव करतात. प्रत्येक मुलं वेगळी असतात. त्यांची गती, आवड, आणि क्षमता ओळखणं हे पालकांचं काम आहे.

३. ऐकण्याची सवय लावा

संस्कार म्हणजे फक्त शिकवणं नव्हे, तर ऐकणंही आहे. मुलं काय विचार करतात, त्यांना कोणती अडचण आहे, हे जाणून घेतल्याशिवाय योग्य संस्कार होऊ शकत नाहीत.

४. अति अपेक्षा टाळा

पालकांनी आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता मुलांमार्फत करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी मुलांना त्यांच्या आवडीनुसार वाढण्याची मुभा द्यावी.

५. समाज आणि शाळेच्या वातावरणाशी समन्वय

मुलं घराबाहेर जाऊन इतर प्रभावात येतात. त्यामुळे पालकांनी शिक्षकांशी आणि मित्रपरिवाराशी संवाद ठेवावा, जेणेकरून मुलांबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.


मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काही उपयुक्त मार्ग

संवेदनशील वाचन आणि गोष्टी सांगणे – गोष्टींमधून मुलांना मूल्यसंस्कार सहज रुजवता येतात.

सामाजिक कार्यात सहभाग – गरजू लोकांना मदत करणे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा यामध्ये सहभाग घेऊ द्या.

कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे – जेवणावेळी, प्रवासात किंवा खेळताना संवाद साधा.

क्रीडा आणि सर्जनशीलता वाढवणे – शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी हे आवश्यक आहे.

धार्मिक/आध्यात्मिक वातावरण – प्रार्थना, ध्यान, किंवा चांगल्या विचारांची चर्चा यामुळे मन स्थिर होते.


आजच्या काळातील आव्हाने

आजच्या डिजिटल युगात संस्कार देणं सोपं नाही. सोशल मीडिया, जाहिराती, स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्था — या सर्व गोष्टी मुलांवर प्रचंड दबाव आणतात. अशा वेळी पालकांनी “संस्कार” म्हणजे बंधन नव्हे, तर दिशा हे मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे.

तसेच, दोन्ही पालक नोकरीत असतील तर वेळेअभावी मुलांशी संवाद कमी होतो. पण “गुणवत्ता” असलेला थोडा वेळही पुरेसा ठरू शकतो — जर तो मनापासून दिला गेला, तर.


संस्कारांचा परिणाम

योग्य संस्कार मिळालेली मुलं पुढे आत्मविश्वासू, जबाबदार, सहानुभूतिशील आणि समाजाभिमुख नागरिक बनतात. ते यश आणि अपयश दोन्हीला समतोलाने स्वीकारतात. उलट, चुकीच्या संस्कारांनी वाढलेली मुलं आक्रमक, अस्थिर किंवा स्वार्थी बनू शकतात. म्हणूनच संस्कार हे समाजाच्या पाया आहेत.


निष्कर्ष

कुमारवय हे मुलांच्या आयुष्यातील सर्वात नाजूक आणि निर्णायक टप्पा आहे. या काळात दिलेले संस्कार हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा घडवतात. म्हणूनच पालकांनी प्रेम, संयम, संवाद, आदर्श आणि समजूत या पाच स्तंभांवर आपले पालकत्व उभे करावे. संस्कार म्हणजे शिकवण नव्हे — तर जपणूक आहे. योग्य संस्कार हे फक्त मुलांचेच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे भविष्य उज्ज्वल करतात.



Monday, August 25, 2025

विटा ते जत - व्हाया करगणी (तळेवाडी ) खो खो ची आठवण.

विटा ते जत - व्हाया करगणी

( तळेवाडी )

मी श्री भाऊसाहेब दत्तू महानोर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काराजनगी, तालुका -  जत, जिल्हा -  सांगली.

 दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी देविखिंडी तालुका- खानापूर जिल्हा  - सांगली या ठिकाणी  द अम्युचर खो खो असोसिएशन सांगली आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने  स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मा.श्री. अमोल (भैया) बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवीखिंडी  ता - खानापूर या शाळेच्या विकास कामाच्या आणि खो खो क्रीडांगणाच्या उद्घाटन समारंभ बद्दल या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

 14 वर्षे वयोगटाखालील किशोरी गटातील मुलींच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी सुळकाई प्रतिष्ठान विटा या संघातून आम्ही जत तालुक्यातून सहा मुलींचा समावेश केला होता.  सांगली जिल्ह्यात प्रथमच सहा पाट्यामध्ये हा खो खो चा खेळ रंगणार होता.  त्यामुळे आयोजक खेळाडू आणि संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक या सर्वांनाच उत्सुकता होती. अलटीमेट पद्धतीने हे सामने प्रथमच होत होते.  ह्या स्पर्धेसाठी मागील वर्षाच्या जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी मध्ये असलेल्या क्रमवारीतील संघांनाच  निमंत्रित केले होते. या निमंत्रित संघांमध्ये किशोरी गटाच्या सामना हा देवीखिंडीमध्ये मा. सुहास (भैया) बाबर , खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आमदार यांच्या शुभहस्ते उद्घाटनाने झाला.  

पहिला सलामीचा सामना राजमाता अहिल्यादेवी क्रीडा मंडळ  भिकवडी आणि  सुळकाई प्रतिष्ठान  विटा यांच्यामध्ये हा सामना झाला. मा.  सुहास (भैया)  बाबर आमदार यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक  करून या खो-खो च्या सामन्याची सुरुवात झाली.  

 राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी च्या मुली सहजच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या असल्यामुळे त्यांना सामान्य संघा बरोबर खेळणे फार कठीण जात नव्हतं.   तरी देखील जतच्या काराजनगी शाळेतून दुष्काळी भागातून आम्ही सुळकाई प्रतिष्ठान विटा या संघामार्फत खेळलो. 

सुळकाई संघाने प्रथम आक्रमण करत राजमाता संघाचे चार संरक्षक  बाद केले.दुसऱ्या पाळीत राजमाता संघाने आक्रमण करत 14 गुण मिळवले. दुसऱ्या आक्रमणाच्या पाळीत सुळकाई संघाने सहा  गुण मिळवले.

 हा सामना राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी यांनी एक डाव चार गुणांनी  जिंकला. 


 सुळकाई प्रतिष्ठान  विटाने  संघाने हा सामना जरी हरला असला तरी देखील खेळाडूंनी चांगली चिकाटी दाखवली.  आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. मी माझ्या  खेळाडूंवर खुश होतो. माझे मित्र श्री .अशोक काळे आणि लक्ष्मण बोत्रे उर्फ टायसन भैय्या यांनी  देखील खेळाडूंचे कौतुक केले. खेळामध्ये झालेली प्रगती ,आणि कमी फाऊल्स याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यानंतर पुढील सामने सुरू झाले. परंतु राजमाता क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक माननीय समीर माने  सर जेव्हा  पुन्हा  आम्हाला भेटल्यावर म्हणाले की  सुळकाई बरोबर झालेल्या सामन्याप्रमाणे आम्हाला पुढचा कोणताही सामना कठीण  गेला नाही.  यावरून सुळकाई प्रतिष्ठान  संघाच्या मुलींची  जिद्द,  चिकाटी आणि सातत्य हे लक्षात येते. 

 सामन्याच्या ठिकाणी आयोजकाकडून सर्व खेळाडूंना आणि कोच यांना  खेळाचे किट देण्यात आले होते.  त्यामुळे सामन्याची दिखावट (लूक)  उत्कृष्ट झाली होती. शाळेचे क्रीडांगण एकदम सुंदर रित्या तयार केले होते. शिवाय शाळेत या व्यतिरिक्त बाला पेंटिंग (BALA PAINTING) आणि वर्गातील फर्निचर हे देणगीदारांकडून केले होते.  अमोल शेठ माने यांच्या दातृत्वाने शाळेच्या विकासाचा हा पाया चांगल्या पद्धतीने रचला होता. शाळेचे मुख्याध्यापक श्री धनाजी घाटगे यांच्या प्रत्नातून साकार झाले होते.  कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  किट वाटून झाले.  सर्व सहभागी खेळाडूंना आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना देखील किटचे वाटप करण्यात आले होते.  दुपारी विद्यार्थ्यांना जेवणाची सोय देखील केली होती.  त्याचबरोबर स्वीट म्हणून बर्फी वाटप केले होते.

पुरी , भात आणि भाजी असं रुचकर जेवणाचा हे आनंद विद्यार्थिनींनी घेतला. 

 सुळकाई  प्रतिष्ठान  विटाच्या संघामध्ये आम्ही जतहून सहभागी झालेल्या खेळाडूंना परत जतला यायचे असल्यामुळे आम्ही दुपारी तीन वाजताच पुढचे सामने पाहणे सोडून आम्ही जतला निघण्यासाठी निघालो. 

प्रियांका माने आणि राजेश निकम सर यांनी आम्हाला विटेपर्यंत येण्यासाठी सहकार्य केले. त्याचबरोबर मंडले सर आणि मंडले मॅडम यांनी आमच्या खेळाडुंना  विटा स्टॅन्ड पर्यंत लवकर पोहोचवण्यास मदत केली.  त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. मंडले मॅडमनी सर्व मुलींना कॅडबरी दिली.  आम्हाला विटा मधून साडेचार वाजताची सातारा विजापूर ही बस मिळाली आणि आम्ही बसमध्ये बसलो. बस साताराहून फुल्ल आली होती.  त्यामुळे बसमध्ये चढल्यानंतर आमच्या खेळाडूंना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. मी खेळाडूंना बोललेलो की जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही ऍडजेस्ट व्हा.  मी सर्वप्रथम  चढून एक शीट पकडली आणि इतर मुलीला एक जागा, एवढी जागा आम्हाला  मिळाली.  बाकीच्या पाच उभे राहिल्या. मी माझ्या सीटवर बसल्यानंतर जेव्हा बस सुरू झाली तेव्हा आमच्या खेळाडूंना जवळ बोलावलं आणि तीन मुलींना माझ्या सीटवर बसवून मी उभा राहिलो.  माझ्या शेजारी  बसलेल्या गृहस्थांनी  विचारले  " कुठे गेला होता?"  आम्ही सविस्तर सांगितले. त्यांना  आनंद झाला.  "तुम्ही जतहून आलात का , खो खो खेळायला ?"  कसं काय ? या प्रश्नाचे उत्तर मी स्पष्टपणे देऊ शकलो नाही.  परंतु त्यांना विशेष वाटलं.  

जत मधून खानापूर तालुक्यात या  मुली खेळायला येतात.  आणि माघारी जातात याचं त्यांना विशेष कौतुक वाटलं असावं.  त्यानंतर त्या गृहस्थांनी उठून उरलेल्या दोन मुलींसाठी जागा दिली.  आम्ही दोघेही उभे राहिलो.  चार मुली त्या सीटवर बसल्या.  पुढे दोन मुली एका ठिकाणी ऍडजेस्ट झाल्या.  माझे पाय दुखत असल्यामुळे मी एका मुलीला उठवलं आणि सीटवर बसलो. चौथ्या मुलीला पुन्हा मी मांडीवर घेऊन बसलो.  सफिया नदाफ चॉकलेट खात होती. मी  तिला म्हटलं की , या साहेबांनी आपणाला जागा दिलेली आहे. तर यांच्यासाठी एक चॉकलेट दे.  सफियाने त्या साहेबांना एक चॉकलेट दिले.  

सफिया मला म्हणाली, " सर तुम्हाला देऊ का?"  

मी म्हणालो, "नको, तेही त्यांनाच दे."

ते दुसरेही चॉकलेट त्या साहेबांना दिले.  इतके होईपर्यंत विट्यातून बस रेणावी पार करून खानापूर बस स्थानकावर आली.

 कंडक्टरने येथे बस 25 मिनिटे थांबेल अशी सर्व प्रवाशांना सूचना दिली.  काही प्रवासी चहा नाश्ता साठी खाली उतरले. तेव्हा आम्हाला जागा दिलेले प्रवासी  त्यांची बॅग त्यांनी घेतली आणि उतरून ते खाली गेले.  बस सुरू झाली.

आम्ही सर्वजण आमच्या सीटवर आणि मोकळ्या झालेल्या सीटवर जागा पकडून मुली निवांत बसल्या होत्या.  

 बेणापूर सुलतानगादे आले तेव्हा ते गृहस्थ पुन्हा बस मध्ये आम्हाला दिसले. ते आले तेव्हा त्या ग्रहस्थानी मुलींच्या हातात एकेक पाकीट दिले.  त्यामध्ये वडापाव होता. शिवाय   चार पाण्याच्या बॉटल ही होत्या. त्यांनी प्रत्येक मुलींच्या हातामध्ये एक एक पाकीट दिले आणि दोन मुलींमध्ये एक पाण्याची बॉटल दिली. 

 आम्ही "हे कशासाठी ? का असं?" विचारपर्यंत पुढे भिवघाट हा स्टॉप आला. ते म्हणाले, मी इथं उतरणार आहे. आम्हाला इतकंच कळले की, ते इंजिनियर होते. आखाती देशामध्ये की सौदीमध्ये इंजिनिअरचं  काम करतात. त्यांचं मूळ गाव तळेवाडी.  करगणी जवळ आहे.  त्यांचे वडील घरी एकटेच असतात.  वय वर्ष 80  वर्षे. प्रत्येक दोन महिन्यातून पंधरा दिवसांची रजा काढून ते आपल्या वडिलांकडे भेटायला येतात.  ते स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करतात.  त्यांना मुलींच्या आणि खेळाडूंच्या बद्दल आस्था  वाटली म्हणून त्यांना एक  फुलाची पाकळी किंवा एक सहानुभूतीची जाणीव म्हणून त्यांनी खेळणाऱ्या मुलींचे साठी एक नाष्टा आणि पाण्याची बॉटल हे मनापासून  मुलींना दिले. परंतु आम्ही या गदारोळामध्ये त्यांचं नाव विचारायचं  विसरून गेलो.  इतक्यात  स्टॉप आला.  कंडक्टरने बस थांबण्याची बेल वाजवली.  ते ग्रहस्थ आधीच उभे राहिले असल्यामुळे पटकन बसमधून खाली उतरले आणि निघून गेले.


 पुन्हा बस सुरू झाली आणि माझ्या डोक्यामध्ये विचार चक्र सुरू झाले.  माझ्या नजरेमध्ये फक्त त्यांचा पिवळा शर्ट आणि  जीन पॅन्ट,  स्वच्छ चेहरा आणि पाठीला अडकवलेली सॅक  इतकच मी त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे बघत राहिलो.  मी विचारात मग्न  झालो. त्या गृहस्थाला  असं का वाटलं  असेल?  त्यांनी आमची किरकोळ चौकशी केली.  फक्त जत मध्ये कोणत्या शाळेच्या आहात इतकच विचारलं. कधीपासून खेळता ?  कसं खेळता? तुम्हाला कोण शिकवतं?  ह्या गोष्टींची आम्हाला कोणतीही चौकशी न करता त्यांनी सर्व मुलींना नाष्टा आणि पाण्याची सोय त्यांच्या मनापासून केली.  का केले असेल?  आणि पुन्हा मनाला वाटलं की अशा अनेक दानशूर व्यक्तींच्या मुळे असे अनेक विविध खेळ जिवंत आहेत.  आपली ही काला देखील जिवंत आहे.  मी त्यांचा फोन नंबर घेऊ शकलो नाही .  त्यांचं नावही विचारू शकलो नाही ही माझ्या मनामध्ये खंत अजूनही कायम राहून गेली आहे. या लेखाच्या द्वारे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा आणि त्यांच्या भावनिक बंधनातून मुक्त व्हावं ही माझी इच्छा. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या मनातील भावना लेखाद्वारे प्रसिद्ध करायचे असल्यास तरीही संपर्क करा तुमच्या भावनांना कथांना लेखाद्वारे प्रसिद्धी देऊ  .......!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संपर्क 9421181224
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



Tuesday, July 08, 2025

आमचं गाव आमची परंपरा - खैराव

 आमचं गाव आमची परंपरा - खैराव


सकारात्मक ऊर्जेचे गाव खैराव


शिवकालीन काळात या गावच्या परिसरामध्ये खैराची झाडे भरपूर होती. खैराची झाडे प्रचंड प्रमाणात असल्याने हे गाव प्राचीन काळात "खैरवन" म्हणून परिचित होते.खैरवन या शब्दाचा अपभ्रंश होऊन खैराव हे नाव पडलेले आहे..!!

परिसरातील खैराच्या झाडा पासून कातनिर्मिती, औजारे व शस्त्राला वापरण्यात येणाऱ्या मूठी बनवण्यासाठी खैराच्या झाडाचा वापर होत असे.

        महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगली जिल्हयातील जत तालुक्याच्या ईशान्य दिशेला चोवीस कि.मी.अंतरावर हे गाव वसले आहे. गावचा स्थान कोड क्रमांक ५६८८५३असा आहे.

गावामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. या गावचे क्षेत्रफळ "२२९१" हेक्टर असून २०११च्या जनगणनेनुसार या गावात ३४७ कुटुंबे राहत आहेत. गावची एकूण लोकसंख्या सुमारे १९६३ इतकी आहे. गावच्या नैऋत्य- ईशान्य दिशेने एक पाण्याचा ओढा वाहत आहे.

तर गावच्या वायव्य दिशेला एक छोटे पाझर तलाव आहे. खैराव गावचा पिन कोड नंबर ४१६४०४असा आहे.



ग्रामपंचायत 







खैराव गावची ग्रामपंचायत स्थापना १९५६ साली झाली असून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या मदतीने गावचा विकास केला जात आहे.


महालिंगराया मंदिर 









पुरातन काळापासून खैराव गावचे ग्रामदैवत म्हणून महालिंगराया देवाला लोक आपले आराध्य दैवत मानतात.  या देवस्थानची जमीन १८ हेक्टर असून येथील पुजारी देखभाल करतात. महालिंगराया देवाची यात्रा वर्षातून दोनवेळा भरते.  गावातील भाविक देवाची पालखी घरी नेऊन आपल्या दारात जत्रा साजरी करतात. महालिंगराया हा भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा देव आहे. अशी लोकभावना व आख्यायिका आहे. 


हनुमान मंदिर 


खैराव गावच्या वेशीतच भव्यदिव्य असे हनुमान मंदिर आहे. मंदिराचा अलीकडेच जिर्णोद्धार ग्रामस्थांनी केला असून मंदिरावर ४१ फूट उंचीचे नेत्रदीपक असे शिखर बांधले आहे. मंदिरासमोरच नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलीचा अखंड हरिनाम सप्ताह गेली २४ वर्ष सुरू आहे. गावातील मुंबई, पुणे, नाशिक  शिवाय महाराष्ट्रात जिथे जिथे नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेर असणारी सर्व लोक या सप्ताहास येतात. प्रवचन, हरिपाठ, किर्तन व भजन इत्यादी कार्यक्रमामुळे गावातील वातावरण आध्यात्मिक होऊन जाते. काल्याच्या सुश्राव्य किर्तनाने सप्ताहाची सांगता होते.






मरी माता मंदिर 


 

मरीमाता देवीची यात्रा आषाढ महिन्यात भरते. या यात्रेत पालखीची मिरवणूक भक्तगण काढतात. पालखीच्या समोर पोतराज देवीची गाणी हलगीच्या तालावर म्हणून नाचतात. देवीला आंबील बोण्याचे नैवेद्य दाखवतात. 


मज्जिद

खैराव गावामध्ये भव्यदिव्य अशी मुस्लिम धर्मांची मज्जिद एक प्रार्थना स्थळ आहे. मोहरम हा इस्लामिक धर्माचा  कार्यक्रम गावामध्ये साजरा केला जातो. धाकली खतल व थोरली खतल असे दोन ते तीन दिवस कार्यक्रम चालतो. सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन खैराव गावामध्ये मोहरम व रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी अनेक भागातून मौलवी येत असतात. हिंदू मुस्लिम ऐक्याची खूप मोठी परंपरा खैराव गावाला लाभली आहे.





लोककला 










खैराव गावात भजनी मंडळ आहे. त्याचबरोबर धनगरी ओवीकार मंडळ व वालगीमंडळ ही या गावात आहे. महालिंगराया देवाच्या यात्रे दिवशी ओविकार मंडळ आपल्या वाद्यासह गजी नृत्य हे पारंपारिक नृत्य ढोल कैताळ  आणि सनईच्या  मधुर आवाजात सादर करतात. 


शैक्षणिक, क्रीडा व आरोग्य सुविधा.










खैराव गावामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन शाळा असून घुटुकडेवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. तर गावामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत.  गावातच श्री संत भिमदास करांडे महाराज माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग आहेत. गावांमध्ये सर्व शाळा गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत आहेत.


आरोग्य










आरोग्य सेवा गावात खाजगी दवाखाना असून मेडिकल देखील आहे. आरोग्य सेविका व आशा वर्कर्स यांच्यामार्फत आरोग्याची सेवा दिली जाते. 


क्रीडा








क्रीडा क्षेत्रामध्ये खैराव गावातील अनेक तरुणाने प्राविण्य मिळवले आहे. त्यामुळे ते सैन्य व पोलीस दलामध्ये सेवा बजावत आहे. 




प्रमुख पिके 









येथील जमीन काळी कसदार व माळरान आहे. येथील शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, मका, मटकी , तुर,हरभरा,उडीद इत्यादी पिके घेतात. अलीकडे म्हैसाळ जलसिंचनाचे स्रोत निर्माण झाल्यामुळे शेतकरी ऊस , आंबा , केळी, द्राक्ष व डाळींब लागवड करू लागले आहेत.

           

             

           लोक जीवन

खैराव गावचे लोक बहुदा शेतकरी व कष्टकरी वर्गातील आहेत.दुष्काळी पट्ट्यातील गाव असल्याने सहा सहा महिने ऊस तोड मजूर म्हणून वाळवा, इस्लामपूर व कोल्हापूर या ठिकाणी ऊसतोड कामगार व शेतमजूर म्हणून काम करतात. येथील लोकांचे साधे जीवन असून जेवणामध्ये ज्वारी, बाजरी व गहू इत्यादीचा वापर करतात. भाजीपाला व मटकी, मूग व तूर यांचा वापर करतात. राहणीमान सर्वसाधारण आहे. कष्टाने शेती करतात. शेतीला जोडधंदा म्हणून पशु पालन व कुक्कुटपालन करतात. गावात  सहा दुध डेअरी असून पशुखाद्य डेअरी मार्फत शेतकऱ्यांना  उपलब्ध केले जाते. आठवड्याला दुधाचे पैसे मिळतात. गावात आठवडा बाजार मंगळवारी भरतो.भाजीपाला, माळवे इतर संसार उपयोगी साहित्य लोक बाजारात खरेदी करतात. सण समारंभात लोक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम येथील लोक करतात.अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे .


अधिकारी व कर्मचारी यांचे गाव





येथील अनेक तरुण महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले आहेत. तर अनेक तरुण सरळ सेवेची परीक्षा देऊन कर्मचारी म्हणून भरती झाले आहेत.

यामध्ये सहाय्यकआयुक्त, मुंबई. महानगरपालिका १. व सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका. १ उपसंचालक आरोग्य मंत्रालय मुंबई. १पोलीस निरीक्षक सीबीआय पुणे .१ पोलीस उपनिरीक्षक .मुंबई २. मंत्रालय कक्षअधिकारी २ .आयटी इंजिनियर २. बँक शाखाअधिकारी १. पोलीस कर्मचारी १५. महसूल कर्मचारी १. सार्वजनिक बांधकाम विभाग १. वनरक्षक २. सैन्यदल २०. शिक्षक १४. आरोग्य सेवक २. होमगार्ड २. खाजगी ड्रायव्हर१२५ इत्यादी अधिकारी कर्मचारी गावच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास मोठे योगदान देतात त्यांची प्रेरणा घेऊन अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत व शासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्नवादी आहेत. *

सकारात्मक ऊर्जेची व ज्ञानाची खाण, संस्कृतीचा मान, विचाराची आण, श्रधेच ध्यान, लोकभावनेचा प्राण, अस आमचं खैराव! आमची आण, बाण, शान!! 

माझे सुंदर, टुमदार खैराव गाव सांगली जिल्हामध्ये प्रसिद्ध आहे.

धन्यवाद!

         

ऋणनिर्देश आणि संकलन 


श्री. भारत सखाराम क्षिरसागर                                                             

(सहायक शिक्षक)       

यांच्या सौजन्याने.....!


#####################################

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

#####################################