आमचं गाव आमची परंपरा - काराजनगी
काराजनगी हे गाव जत तालुक्यात सांगली जिल्ह्यात आहे . तालुक्याच्या ईशान्येला जत पासून पंधरा कि. मी. अंतरावर असून गावाची लोकसंख्या दोन हजार असेल. गावाच्या पूर्वेला कोळगिरी ,दक्षिणेला वळसंग , पश्चिमेला निगडी (खुर्द) , उत्तरेला घोलेश्वर ,ईशान्येला सनमडी ही गावे आहेत. गावात पोस्ट ऑफिस ,आणि कोणतीही बँक नाही. गावात दैनिक बाजार भरत नाही. जत पासून बस ची सोय आहे. गावात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतची जिल्हा परिषद ची शाळा आहे. माध्यमिक शिक्षणासाठी निगडीला आणि उच्च शिक्षणासाठी जत, सांगली येथे जावे लागते. 26 जानेवारी 2020 पासून गावकऱ्यांनी आठवडा बाजार सुरू केला आहे. शेळ्या मेंढ्याच्या बाजारासाठी माडग्याळ, जत या ठिकाणी जावे लागते तर गायी म्हैशीच्या बाजारासाठी जत, सांगोला या ठिकाणी जावे लागते.
स्वातंत्र्यानंतर गावाची पहिली निवडणूक 16 नोव्हेंबर 2012 साली झाली, आणि सौ .सुनीता विष्णू फोंडे या निर्वाचित पहिल्या सरपंच झाल्या.
गावात हिंदू व मुस्लिम या दोन धर्माचे लोक राहतात. गावात लिंगायत ,मराठा,धनगर,मातंग इत्यादी लोक राहतात. गावात धनगर लोक चिंचली मायक्का, आरेवाडी बिरोबा , अदमापूर बाळू मामा , कुलाळवाडी चा खंडोबा या देवाला जातात. मराठा लोक जोतिबा ला जातात . तर बहुतेकजण पंढरपूरच्या वारीला जातात. विशेष म्हणजे शिवजयंती साजरा करणारे मराठा लोक , तेवढ्याच मोठया उत्साहाने
हाजीमलंग व राजेभास्कर चा उरूस साजरा करतात. आणि सामाजिक सलोखा राखतात.
गावात सिद्धेश्वर ,यल्लम्मा , बैलगोंड सिद्ध, मड्डीसिद्ध ,हाजीमलंग व राजे भास्कर दर्गा , हनुमान, जोतिबा व बिरोबा ही मंदिरे आहेत. गावाच्या वायव्य दिशेला डोंगरात यल्लम्मा मंदिर आहे. आषाढ महिन्यात यल्लम्मा देवीची दररोज पूजा केली जाते. आषाढ महिन्यातील दर मंगळवारी आणि शुक्रवारी यल्लम्मा देवीला चोळी पातळ देऊन निवद दिला जातो . यात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. जतमधील यल्लम्मा यात्रेत काराजनगीच्या यल्लम्मा देवीचा जग मानाचा समजला जातो. जत यल्लम्मा देवी यात्रेत कीचाच्या दिवशी काराजनगीचा जग आणि पालखी डफळे सरकारच्या वाड्यावर जातात. वाड्यावरून पालखी व जग आला की मग कीच पडतो.
गावात हनुमान जयंती ही सात दिवस वीणा उभा करून सप्ताह साजरा केला जातो. पूर्वी हा सप्ताह नऊ दिवस साजरा करायचे .काराजनगीचा हनुमान सप्ताह पंचक्रोशीतील महत्त्वाचा मनाला जातो .त्याच बरोबर गावात गणेशोत्सव, नवरात्र , अहिल्या जयंती, पिराचा उरूस आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
साधारण तीनशे वर्षांपूर्वी चा राजवाडा गावात आहे.जत संस्थानातील डफळे सरकार यांचे वास्तव्य काही दिवस होते. वाड्याला आग्नेय बाजूला बुरुजाकडेला लक्ष्मी मंदिर आहे . वायव्य दिशेला असणाऱ्या बुरुजा मध्ये हवेली आहे. मध्यभागी चौसोपा होता . चौसोप्या मध्ये बैठक घर स्वयंपाक घर , शयन गृह ,कोठार होते. मध्य भागी चौथरा होता . मध्येच सदर. ईशान्य बाजूला वाड्यात बारव म्हणजे बांधून काढलेली आडाच्या आकाराची विहीर अजूनही आहे. बारव साधारण 30 फूट खोल असेल. डफळे सरकारची 30 -35 गुरं होती. गुरांवर सनमडीचा गयका (गुराखी) रामू बंडा लवटे होता.
गावातील कोणीही व्यक्ती डफळे सरकार च्या पदरी सुभेदार अगर कोणत्याही प्रकारचा अंमल अधिकारी नव्हता.डफळे
सरकारच्या काळात गावात पाच मानकरी राहायचे. ते पाच मानकरी म्हणजे कुलकर्णी, पुजारी, गावडे,पाटील आणि चौगुले.
गोदुबाई तुकाराम कुलकर्णी ही आजी मानकऱ्याच्या घरापैकी एक बुजुर्ग व्यक्ती. त्या आजींना विशेष असा मान होता.आजींना विचारल्याशिवाय सरकारचा अंमलदार / अधिकारी गावात शिरायचा नाही. वेशीत पाय देखील ठेवत नव्हता. गोदू आजीच्या घरी भरपूर म्हैशी होत्या. घरापुढे तुळशी कट्टा. कट्टया लागून जमिनीत सात रांजण रोवलेले. म्हैशीच्या दुधाचं ताक करून त्या रांजणात ओतले जायचे . गावातील कुणाला किती ताक पाहिजे तितकं घेऊन जायचं. मी ताक घेतलं न्हाय किंवा तू जादा घेतलं असं कोण कुणाला म्हणायचं न्हाय. सुभाष शिंदे यांच्या वडिलांनी देवाची आरती रचली आहे त्यात आहे देवाची महती.
संस्थान काळा नंतर पुढे हा वाडा डफळे सरकाने गावाच्या पाटलांना राहायला दिला. पाटलांकडे वाडा आला ,तेव्हा 16 बैल, दहा बारा म्हैशी, वीसेक गायी होत्या.
सन 2020 मध्ये देखील सध्या गावात एक विशेष अशी परंपरा चालू आहे. ती म्हणजे गावातील कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती दही दूध विक्रीचा व्यवसाय करत नाही . गावात कुणीही दूध विकत नाही अन दुधाचे पैसे घेत नाही. लागलंच तर तसंच देतात . अतिरीक्त दुधापासून दही, ताक,लोणी ,तूप तयार करतात ,काही लोक तूप विकतात. मग हे काय म्हणायचं ? तर दूध ,दही आणि लोणी विकायचं नाही असं सांगितलं जातं. याची लेखी माहिती अगर फर्मान उपलब्ध नाही . परंतु गावातील 85 -90 वर्षाचे रामण्णा पुजारी आणि गुंडोपंत कुलकर्णी यांच्याकडून आख्यायिका ऐकायला मिळाली .
पूर्वीच्या काळी दूध विक्री बंद नव्हती .पण एक घटना घडली. संस्थान काळाच्या दरम्यान किंवा आधी गावात शिवभक्त जटाधारी सिद्धेश्वर स्वामी राहत होते.भर उन्हात साधनेला ,तपाला बसायचे. बारामहिने अठरा काळ दुपारी निवाऱ्या शिवाय तप करायचे. सिद्धेश्वर स्वामी म्हणजे एकदम कडक स्वारी होती . आजन्म संन्याशी . योगी पुरुष होते. साधी राहणी . भगवी लुंगी ,गळ्यात रूद्राक्ष माळ,गळ्याभोवती आणि पाठीमागून कमरे पर्यंत जटा. दररोज सकाळी केवळ भिक्षा मागून राहायचे. भिक्षा फक्त लोण्याची मागायचे. तेही मानकऱ्याच्या पाच घरात. भिक्षा फक्त सकाळी सूर्योदयाच्या दरम्यान भिक्षा मागायचे.
एक वर्षी पाटलांची मुलगी सासुरवाशीण मुलगी नागपंचमीला माहेरी आली होती . सकाळी सकाळी पाटील चावडीवर जाऊन बसलेले. पाटलीण दररोज ताक करताना देवाला नैवद्य म्हणून पहिला लोण्याचा गोळा बाजूला काढून ठेवायची .त्यादिवशी मात्र पाटलांची बायको हाळात भाजीपाला आणायला गेलेली. दरम्यान स्वामी भिक्षा मागायला घरी आले. पण सासुरवाशीण मुलगी स्वामींना म्हणाली, " अजून ताक केलं नाही". स्वामी परत फिरले. थोड्या वेळाने स्वामी पुन्हा आले. मुलगी म्हणाली महाराज, "लोणी अजून आलं नाही". तिसऱ्या वेळेस स्वामी आले तेव्हा ती मुलगी नुसता ताकाच्या गाडग्यात हात घालून लोणी काढण्याचा बहाणा करत होती. स्वामींच्या लक्षात आलं कि, ती मुलगी खोटं बोलली . स्वामींनी तेव्हा " काराजनगीची बाराजनगी होउ दे". असा शाप दिला.
तेव्हा त्या पाटलाच्या मुलीचा हात गाडग्यातून बाहेर निघेना, चिकटून बसला. डोळ्याला अंधारी आली . गावात चावडीवर वार्ता गेली. पाटलाच्या पोरीचे डोळे गेले. पुढं मग दही दूध लोणी विकणाऱ्या ची म्हसरं मरायला लागली. स्वामी गावाला शाप देऊन निघून चालले. सारा गाव माळावर आडवा झाला. पण स्वामीं म्हणाले ," मी पुढे टाकलेले पाउल मागे घेणार नाही" ,म्हणून स्वामी निघून चालले . माळावर ज्या ठिकाणी गाव स्वामींच्या आडवा झाला ,तिथं आज मड्डीसिद्ध चे मंदिर आहे. शेवटी जाताना काराजनगी सुखी राहू दे असे म्हणून
स्वामी काराजनगीतून निघून गेले.
पुढे स्वामी अकचकन हळ्ळी येथे डोण मध्ये राहू लागले. अचकन हळ्ळी हद्दीत तिथे आज बिसल सिद्धेश्वर मंदिर आहे. म्हणजे ते देवस्थान मुळचे काराजनगी गावचे.
स्वामींनी शाप दिला आणि काराजनगी गावात दही ,दूध आणि लोणी विक्री बंद झाली. पुढे काही दिवसांनी मंजुळा माने हिने दूध विकायला सुरुवात केली ,पण एक एक करत जनावरं मेली .शेवटी दावणी चा खुंटा उपसला. पाटलांच्या घराची देखील सारी जनावरं मेली होती, पुढे दूध विकायचं बंद केल्यावर दावण स्थिर झाली.
आता गावात श्रावण महिन्याचा पहिल्या सोमवारी सिद्धेश्वराला अभिषेक घालतात. महाशिवरात्री ला भजन कीर्तन करतात. पण आज अखेर दूध, दही आणि लोणी विक्री बंद आहे.
ही प्रथा मोडून काढण्यासाठी अनेकजणांनी प्रयत्न केले आहेत. यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या सीमेवर मनाची द्विधा अवस्था होते. गावात श्री संजय चौगुले यांनी ही अंधश्रद्धा मानून ......... साली डेअरी सुरू केली होती .सहा महिने चालली असेल. देवाचं ऐकलं नाही म्हणून जनावरं दूध द्यायची कमी झाली .अशी वाणवा उठली . अखेर त्यांनी डेअरी बंद केली.
पूर्वी जे लोक स्थलांतरीत झालेले आहेत त्यांच्याबद्दल माहीत नाही. दुधाचा व्यवसाय केला तर जनावर दूध कमी देते. काहीतरी विपरीत घडते. असे सांगतात. काहीजणांनी म्हणजे अगतराव सोपान पवार या शिक्षकांनी हा व्यवसाय करण्याचे ठरवले, तर वडिलांनी प्रथम विरोध केला. नुसता विरोधच नाही तर वडील सरळ म्हणाले की तुला दुधाचा धंदा करायचा आहे तर , माझ्या शेतात जनावरं पाळून/ बांधून करायचा नाही. तुझं तू नवीन शेत घे ,घर बांध अन मग खुशाल असलं धंदे करत बस. मग मात्र आहेत ती जनावरं घरीच ठेवली आणि दुग्धव्यवसायाचा निर्णय बंद केला . या गावात आजही दूध पावडर चा चहा विकत मिळतो.
आजही गावातील कोणत्याच जातीचे लोक दूध व्यवसाय आजही करत नाहीत, ही परंपरा अजून टिकून आहे. संस्कृती म्हणून टिकवायची की विज्ञानाची कास धरायची ? याचा संभ्रम पडतो .
(या लेखाचा उद्देश अंधश्रद्धा पसरविणे किंवा कोणत्याही जाती अगर धर्माचा प्रसार तसेच विशिष्ट लोकांप्रती आकस नसून , गावच्या परंपरा समाजासमोर ठेवणे हा आहे.)
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
सुंदर वर्णन केले आहे सर.
ReplyDeleteNice onebsir.. Just like A novel...
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteThnx all of U
ReplyDeleteVery nice blog sir.
ReplyDeleteNice one explanation about my village very good sir .
ReplyDeletePlz forward to more n more people
Delete