श्री बुवानंद मंदिर , डफळापूर. |
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठा सत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प्राचीन मंदिरात इ.स. ११ व १२ व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात. यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते.
डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी १६८० च्या सुमारास ३,००० मोहरा खंडणीच्या बदल्यात आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. सिद्दी खवासखानकडून आणखी वतने विकत घेऊन त्यांनी जत संस्थान वाढविले. या जत संस्थाना अंतर्गत जत व डफळापूर ही दोन मोठी शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईच्या काळात आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे स्वतंत्र कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता.१८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. डफळ्यांच्या गैरकारभारामुळे १८७४–८५ या काळात एजंटच जवळजवळ सर्व कारभार पाहत असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डफळापूरचा २५ चौ.किमी. प्रदेश राणीची खाजगी जहागीर समजला गेला. संस्थानाला दत्तकाची सनद १८९२ मध्ये मिळाली. त्यानुसार १९०७ मध्ये रामराव अप्पासाहेब या दत्तकपुत्राला अखत्यारी मिळाली. डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांचा भाग्योदय डफळापूर येथुन झाल्याने त्यांनी डफळे हे आडनाव घेतले तर काहींच्या मते डफळे आडनावावरून डफळापूर नाव पडले. परंंतु डफळे हे आडनाव इतर कुठेेही सापडत नाही.
सटवाजी राजे चौव्हाण यांची समाधी
सटवाजी राजे चौव्हाण यांची समाधी आजही आपल्याला डफळापूर येथे पाहायला मिळते. डफळापूर शहर सांगली शहरापासुन ७० कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून १७ कि.मी.अंतरावर आहे. जत संस्थानातील डफळापूर हे एक महत्त्वाचे शहर असल्याने या संपुर्ण शहराभोवती कोट होता. सटवाजीराजे चव्हाण यांच्या काळातच हि तटबंदी बांधली गेली असावी. आजही बहुतांशी डफळापूर हे या कोटातच वसले आहे. आज हि तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असली तरी काही ठिकाणी हि तटबंदी, बुरुज , कोटाचे मुख्य प्रवेशद्वार त्या शेजारील ढासळलेले बुरुज, कोटाचा लाकडी दरवाजा टिकून आहे.
##################################
डफळापूरच्या इतिहासाला डफळे संस्थानच्या वैभवाचा वारसा लाभला आहे. जत संस्थानाच्या विजयाचा वारू डफळापूरमधून सुरू झाला आणि जतमध्ये त्याने आपली पीपलका रोवली. डफळापूर हा डफळे संस्थानचा पाया आहे. तर जत हा त्यावर सोन्याचा कळस आहे. प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेले डफळापूर म्हणजे डफळे संस्थानच्या इतिहासाचा खरा साक्षीदार आहे. आजही साडेतिनशे वर्षांपासून अभेद्यपणे उभा असलेला डफळापूरचा जूना राजवाडा इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभा आहे. याच वाड्यात 'राजे विजयसिंह डफळे हायस्कूल' भरते. डफळापूर नगरीत अनेक ऐतिहासिक इमारती, समाध्या, मंदिरे आहेत. बुवानंद है या नगरीचे ग्रामदैवत आहे.डफळापूर हे गाव पूर्वी डोंगराच्या पायथ्याला रामाटी याठिकाणी होते,
आजही रामाटीत प्राचीन डफळापूरचे अनेक अवशेष आढळतात. सुमारे १२०० वर्षांपूर्वी हे गाव कापूर ओढ्याच्या काठावर वसले होते. त्याचे पूर्वीचे नाव दवनापूर असे होते. राजस्थानच्या दुदावत हाडा चौहान घराण्याचे पूर्वज डफळापूरमध्ये आल्यानंतर या गावास ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले.
डफळापूर ही जत तालुक्याची जूनी राजधानी आहे. डफळे राजांनी सुमारे शंभर वर्षे आपला कारभार डफळापूरमधूनच केला, महाराणी येसूबाई यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या सावत्र दीराच्या चार मुलांना जहागिरीचे वाटप करून दिले.
इ.स.१७५२ पासून जत संस्थानची जत ही प्रमुख राजधानी बनली. राणी येसूबाई हयात असताना अनेक महान राजांनी डफळापूरला भेटी दिल्या. त्यामध्ये महाराणी ताराबाई, छत्रपती संभाजीराजे यांचे सुपूत्र छ. शाहूराजे, थोरले माधवराव पेशवे यांचा समावेश आहे. अनेक राजकीय घटना व संघर्षाचे साक्षीदार म्हणून जतच्या इतिहासात डफळापूर उल्लेख करावा लागेल.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या डफळापूर नगरीचे ग्रामदैवत आहेत ,श्री बुवानंद . श्री बुवानंद हेे मानवी देहात आले असले तरी एक अवलीया संत व पीर आहेत. त्यांचे डफळापूरमध्ये वास्तव्य होते. आध्यात्मिक शक्ती लाभलेले ते एक साक्षात्कारी संत होते. आजही त्यांचे लाखो भक्त आहेत. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून त्यांचा लौकीक आहे. त्यांच्या सानिध्याने डफळापूर नगरीची भरभराट झाली आहे.
महान मानवतावादी सूफी संत बुवानंद हे मूळचे आंध्रप्रदेशातील आहेत. हैद्राबाद येथून ते मानवता धर्माचा प्रचार करित, लोकशिक्षण देत जत तालुक्यात आले.
सुरूवातीस खलाटीच्या उत्तरेस असलेल्या डोंगरावर त्यांचे वास्तव्य होते. त्यांचे लोककल्याणकारी विचार व प्रभाव यांच्यामुळे मोठा भक्तवर्ग निर्माण झाला. लोक सुरूवातीस दर्शनासाठी डोंगरावर जात असत. डोंगरातील पुर्वीचा मार्ग खडतर होता. शिवाय डोंगरही उंच असल्याने भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी बाबांना विनंती केली की, आपण डफळापूर गावात येऊन वास्तव्य करावे. त्यामुळे बाबा डफळापूर गावात आले. राजांनी त्यांना राहण्यासाठी जागा दिली.
अनेक वर्षे जनकल्याण, उपदेश केल्यानंतर बाबांनी देहत्याग केला. त्यांची समाधी बांधण्यात आली. समाधीच्या जागेवर लोकांनी भव्य दर्ग्याचे निर्माण केले आहे.बुवानंद यांना घोड्याचा मान आहे. घोड्यासाठी राजवाड्यात खास जागाही आहे. घोड्यावर गलिफ चढवून त्याची दर गुरूवारी दर्ग्यापर्यंत मिरवणुक काढण्याची प्रथा होती.
घोड्याच्या पालन पोषणाची जबाबदारी मुल्ला कुटुंबाकडे होती. खतीब कुटुंबिय हे पूर्वीपासून बुवानंदाचे पुजारी आहेत. सध्या घोड्याची परंपरा खंडीत झाली आहे.
खाऱ्या नैवद्याची परंपरा आहे. प्रतिवर्षी तीन दिवस ऊरूस भरविला जातो. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. बुवानंद यांचा डफळापूर पंचक्रोशी सह जत शहर आणि तालुक्यातही खूप नावलौकीक आहे.
##################################
जत तालुका आदिलशाहीचा एक भाग होता. त्याकाळात डफळापूर हे प्रगत व ऐतिहासिक व वीरांचे गाव म्हणून ओळखले जात होते. गावाला १२०० वर्षापूर्वीचा इतिहास आहे. डफळापूर संस्थानकाळात उप राजधानी म्हणून ओळखले जात होते. पूर्वी येथील कापूर ओढ्यावर दवनापूर म्हणून उल्लेख आढळतो. डफळापुरात चव्हाण (चौहान) हे मूळ असून राजस्थान भागातून युध्द करीत नंतर ते डफळापुरात स्थिरावले. असा इथला इतिहास आहे .
यलदेव या पुरुषाकडून डफळापूर येथील जहागिरीची निर्मिती झाली. त्यांना मानकाबाई व वरमाबाई या दोन राण्या होत्या. त्यापैकी मानकाबाईच्या मुलाकडे मुलखी व पोलीस पाटीलकी आली तर रमाबाईच्या मुलाकडे शासकीय कारभार सोपविला होता. डफळापूरनजिक असणाऱ्या पुलांचे उद्घाटन राणीबाई डफळे यांच्याहस्ते १९४९ मध्ये झाले. एकंदर गावाला ऐतिहासिक वारसा मोठा आहे. आजही डफळापुरातील राजवाडा शौर्य व जहागिरीची साक्ष देत उभा आहे.
जत तालुक्याला प्राचीन इतिहास आहे. शिलाहार, कलचुरी, देवगिरीचे यादव, मोगल, विजापूरची आदिलशाही आणि शिवशाही अशा सर्व राजवटीच्या काळात जत तालुक्याला महत्व होते. डफळापूर जत तालुक्यातील महत्वाचे गाव, कवठे महांकाळ मार्गावर असलेल्या या गावाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. इतिहास काळात या गावातील अनेक शूरवीर योद्धयांनी रणांगण गाजविले आहे.
##################################
महाभारतातील भीम-बकासूर यांची गोष्ट प्रसिध्द आहे. त्या गोष्टीतील एक चक्रानगरी आणि एकवीरादेवीचा संदर्भ डफळापूरच्या बाबतीत सांगितला जातो. तो खरा असावा वाटतो, कारणही तसेच आहे. डफळापुरात एकविरा आईचे मंदिर आहे. डफळापूर या गावाशी चव्हाण घराणेच नव्हे तर जत संस्थानाचाही इतिहास निगडीत आहे. चव्हाणांच्या पराक्रमाची गाथा आजही येथे वाचली जाते. सटवाजीराव चव्हाण (चौहान) या वीर पुरुषामुळे हे घराणे इतिहासात अधिकच प्रसिध्दीच्या झोतात आले. चव्हाण घराण्याचा इतिहासाचा धागा राजपूत राजापर्यंत जातो. दुधावत हाडा चौहान हे राजस्थानातील लढाऊ आणि देशभक्त घराणे म्हणून प्रसिध्द होते. महाराणा प्रतापसिंहाप्रमाणेच या हाडा चौहान घराण्यांने मोगल साम्राज्यांशी सतत दोन हात केले. या लढाईत अनेक वीर रणभुमीवर धारातीर्थी पडले होते. मोगल सम्राटांशी होणारी सततची लढाई, संघर्ष यामुळे दुधावत चौहान घराण्यांनी दक्षिणेकडे कूच केले. राव सर्जनसिंह, दुधासिंह यांची परंपरा शामलसिंह आणि त्यानंतर शार्दुलसिंह यांनी पुढे चालविली आहे.
१६७२ ची गोष्ट सांगितली जाते. विजापूरच्या आदिलशाहने राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज पाठविली. डफळापूर ते कोकळे या दरम्यान आदिलशाही फौजेचा तळ होता. गावाजवळ फौज असल्याने काही तरूण फौजेच्या छावणीजवळ गेले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की ही फौज शिवाजी महाराज यांना पकडण्यासाठी चालली आहे. या फौजेवर सटवाजीराव व त्यांचे भाऊ धोंडजी ( बुवाजीसह) अन्य साहसी युवकांनी अचानक हल्ला करून फौजेची दैना उडवून दिली. आदिलशाही फौजेतील १५० हुन अधिक सैन्याला ठार केले यामुळे घाबरलेली उरलेली फौज वाट दिसेल तिकडे पळत सुटली व त्यांनी विजापूर गाठले. बादशाहला ही बाब कळल्यानंतर डफळपूरच्या या तरुणांचे त्यांना कौतुक वाटले. असे शूर आपल्या फौजेत असावेत असे त्याला वाटले व त्यांनी पंचवीस जणांची एक तुकडी सटवाजीराव व बुवाजी यांना बोलावून आणण्यासाठी पाठविली. सटवाजीराव व बुवाजी यांना आणण्यासाठी तुकडीने डफळापूरच्या दिशेने कूच केले. आडव्या डोंगराजवळ ही तुकडी येताच तरूणांना तुकडीचा संशय आला. आदिलशाहने आपणास पकडण्यासाठीच फौज पाठविल्याचे त्यांना वाटले व त्यांनी बादशाहच्या या फौजेवर जोरदार हल्ला केला व साताऱ्याच्या दिशेने पळायला सुरूवात केली. स्वार व तरूण यांच्यातला पाठलाग साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्यापर्यंत सुरू होता. या लढाईत सटवाजीराव व बुवाजी हे जखमी झाले. जखमी झालेला बुवाजी बादशाहच्या स्वारींच्या हाती लागला. त्याला घेवून फौज विजापूरला गेली. बुवाजीला सोडवून आणण्याचा संकल्प बंधू सटवाजीराव यांनी केला व निवडक मित्रासह विजापूर गाठले.
वाटेत रात्र लागल्याने सटवाजीराव व त्याचे मित्र एका ठिकाणी थांबले तेव्हा त्यांना एका झाडाखाली एक फकीर दिसला. सटवाजीराव यांनी फकिराला सर्व घडलेली घटना कथन केली. त्यावेळी फकिराने त्यांना मदतीचे आश्वासन दिले सटवाजीराव व बादशाह यांची भेट दिली. या भेटी दरम्यान बादशाहने 'बादशाही फौजेची चाकरी करा' असे सांगितले पण सटवाजीरावने त्यास नकार दिला. उलट 'आमच्यामध्ये हिंमत आहे, आम्ही कुणाचीही चाकरी करणार नाही, भावाला सोडा व जहागिरी द्या. त्या बदल्यात तुम्हाला गरज भासेल तेव्हा सैन्यासह मदतीला येवू' असे सुनावले. बादशाहला सटवाजीराव यांच्यासारख्या शूरवीर, पराक्रमी सरदारहवा असल्याने त्यांनी सटवाजीराव यांची अट मान्य केली व बुवाजीला तर सोडून दिले त्यानंतर 'त्या' फकिराची या दोन्ही भावांनी भेट घेतली व आभार मानत आशीर्वाद मागितला. आशीर्वाद म्हणून फकिराने त्यांना धुनीतील राख (अंगारा) दिला. हा चिनगीसाहेबाचा अंगारा आहे. तो घ्या व त्याची पूजा करा, तेथे वाडा बांधा असा आदेश फकिराने दिला.भावासह सटवाजीराव डफळापूरला आले व फकिराने सांगितल्याप्रमाणे तेथे त्यांनी चिनगीबाबाच्या अंगाऱ्याची भक्तीभावाने पुजा केली. तसेच वाडाही बांधला. आजही तो वाडा इतिहासाची, सटवाजीराव यांच्या शौर्याची गाथा गात उभा आहे.
जत, बारडोल, करजगी व होनवाड अशा प्रांताची जहागिरी आदिलशाहने त्यांना देवू केली. ही जहागिरी स्वतंत्र होती. त्याकाळी सटवाजीराव यांच्याकडे सहा हजाराचे घोडदळ, पाच हजार पायदळ, हत्ती, उंट याचा ताफा होता. सटवाजीराव यांना 'वझीर' हा किताब देण्यात आला होता. सटवाजीराव यांना मूळची मनसबदारी विजापूरच्या आदिलशाहने दिली होती. नंतर मोगल बादशाह औरंगजेबने इ. स. १७०१ रोजी जारी केलेल्या सनदेने सटवाजीराव यांना कायम करत स्वतंत्र दर्जा दिला.
सटवाजीराव यांनी नंतर छत्रपती राजाराम महाराज यांना मदत केली. त्यावेळी संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या समवेत स्वराज्याच्या मोहिमेसाठी मदत केली. एका मोहिमेवर असताना इस्लामपूर येथे सटवाजीराव यांच्यावर काळाने झडप घातली.
पुण्यवान चिनगीसाहेब
चिनगीसाहेब हे एक अवलिया व पुण्यवान फकीर होते. त्यांचा अंगारा एका पांढऱ्या कपड्यात बांधल्यानंतर त्याला वेगळाच रंग येत असे, तेच रंग 'डफळा' म्हणून ओळखला जातो. दसऱ्याला चव्हाण घराण्याला महत्व आहे. दसऱ्या दिवशी गावात पुजा व बंदुकीची सलामीही दिली जाते. ही परंपरा वर्षानुवर्षे अशीच सुरू आहे.
नंदिवाली समाजाचे मरगुबाई मंदिर
मरगुबाई मंदिरासाठी 50 गुंठे जमीन दान दिली आहे. श्री बाळकृष्ण रामचंद्र पवार सध्या राहणार जत यांनी ही जमीन देवीला दिली आहे. बाळकृष्ण पवार यांच्या आईंची ही वडिलार्जित जमीन.बाळकृष्ण पवार यांचे मामा वारल्यामुळे बहिणीच्या वारसाने श्री बाळकृष्ण रामचंद्र पवार यांच्याकडे जमीन आली आहे. ही मूळची जमीन डफळापुर गावातील चव्हाण यांची आहे.बाळकृष्ण रामचंद्र पवार यांच्या आजीच्या कारकिर्दीत हे देवस्थान तयार झाले. जवळ-जवळ 125 वर्षांपूर्वीचे हे देवस्थान असल्याचं सांगितलं जातं.
त्याची आख्यायिका अशी की डफळापुर मधल्या नंदीवाले समाजाचा एक माणूस मागतगिरी साठी कोकणात घोड्यावरुन जायचा. त्याला एकदा एक स्वप्न पडलं. तेव्हा देवी स्वप्नात येऊन म्हणाली की , " मी तुझ्यासोबत येईन. तू जिथं बसवशील तिथे मी बसेन ." तेव्हा त्या नंदी वाल्याने देवीला सांगितले, " चल माझ्याबरोबर. तुला कुठे राहावं वाटतं तेथे रहा." नंदीवाला चिंध्यापिराच्या माळ्यावर आला. घोड्यावरून खाली उतरला. लघवी करण्यासाठी थांबला. तेव्हा देवी देखील या माळावर उतरली. पुन्हा उठायला तयार झाली नाही. घोडा देखील इथेच थांबला, पुढे जायला तयार नव्हता. तेव्हा देवी म्हणाली , "मला या फोंडया माळावर थांबायचं आहे." कोकणातून देवी ज्याच्या सोबत आली त्या नंदीवाले माणसाचं नाव माहित नाही.
पूर्वी मंदिराजवळ पाण्याची कसलीही सोय नव्हती. तरीदेखील देवी इथून हालली नाही. आता या परिसराला मरगुबाईचे माळ म्हणून ओळखतात. मरगुबाई देवळाचा सभामंडप 2014 / 15 या वर्षात बांधलेला आहे. गाभारा साधारण दोन हजार साली कुरुंदाच्या दगडात बांधलेला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार आतापर्यंत तीन वेळा झालेला आहे. सभामंडपाचे बांधकाम आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या आमदार फंडातून झालेले आहे. हा सभामंडप मंजूर झाला तेव्हा देवस्थानला स्वतःची जमीन नव्हती. तेव्हा पवार यांनी दोन गुंठे ऐवजी 50 गुंठे जमीन देवस्थानाला दिली. सध्या मरगुबाई च्या देवस्थानाची 15 लोकांची ट्रस्ट आहे. पैकी 13 जण हे नंदीवाले समाजाचे आहेत. इतर दोघेजण जमीन मालक मराठा समाजाचे आहेत. मरगुबाईची यात्रा आषाढ महिन्या मध्ये असते. आषाढी एकादशी नंतर येणार्या पहिल्या रविवारी मरगुबाईची यात्रा भरवतात. पूर्वी लोक केव्हाही यात्रा भरवायचे. पण डफळापुर गावात माळकरी लोकांमुळे एकादशीला लोक पंढरपूरला जात असतात. त्यामुळे यात्रा सर्वानुमते आषाढ एकादशी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी भरवतात. जत्रा दोन दिवस भरवतात. आदल्या दिवशी गोडवी बोनी म्हणजे गोडा नैवैद्य केला जातो ; तर दुसऱ्या दिवशी बोकड कापून देवीला खारा नैवेद्य केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल आहे. नवसाने कोळी शेतकऱ्याने एक हौद बांधून दिला आहे.
मंदिरात छोट्या लाकडी मुर्त्या आहेत. आधी केवळ एक दगड देवी म्हणून होता . सध्या संगमरवरी तीन ते चार फुटाची मूर्ती आहे . बाजूला लाकडी मूर्ती देखील साडी नेसून ठेवल्या जातात. उजव्या हाताला मरगुबाई चा लाकडी गाडा आहे. तो वर्षाला यात्रेच्या वेळी बदलतात. मानाचे बोकड नंदीवाले समाजाचे सर्वांचं मिळीत म्हणजे सामायिक बोकड कापतात. देवीचा गाडा सोडल्या नंतर पालावरची जत्रा नंदीवाले समाजामध्ये करतात. नवीन गाडा आणायचा . नवीन ठेवायचा . जुना सोडून द्यायचा. मग सामायिक बोकड कापून सर्वांसाठी जेऊ घालायचं. त्यानंतर पालावरची जत्रा करायला नंदीवाले समाजाचे लोक आपापल्या घरी जातात.
पूर्वी नंदिवाली लोक पालात राहत असल्यामुळे या यात्रेचे नाव पालावरची जत्रा असं होतं. आताही पालावरची जत्रा हा शब्दप्रयोग वापरला जातो. बोण्याच्या दिवशी देवाला अभिषेक करून गाडा सजवला जातो. दासऱ्याच्या पालावर जत्रा करतात. आधी गोडवा निवद . नंतर दुसऱ्या दिवशी कोंबडा , बकरा कापतात. वर्षभरात मंगळवार, शुक्रवार या दिवशी देखील काही लोक जत्रा करतात. या मंदिराच्या लगत महादेवाचे मंदिर हे 2018/ 19 सालात बांधले आहे.
एकमेव मंदिर डफळापूरची एकवीरादेवी
श्री नाना रामकृष्ण गुरव यांच्याकडे सध्या एकविरा देवीची पूजा आहे. मंदिर केव्हा बांधले याची माहिती त्यांना नाही. ग्रामपंचायतला माहिती उपलब्ध आहे की नाही याचीही कल्पना त्यांना नाही. देवस्थान साठी 30 ते 35 एकर जमीन आहे. देवीची यात्रा चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भरते. एक दिवस गोडवा नैवद्य भात शेवया यांचा असतो. देवीची पालखी गावात नेऊन धुतात. सजवतात. पोलीस पाटलाचा प्रथम मान असतो. त्यानंतर नवस बोलणारे पालखीला खांदा देतात. पालखीला खंड देत पालखी मंदिरात आणली जाते. मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी लोक देवीला येतात. सभामंडप बांधून 25 वर्षे झाली ; म्हणजे साधारण 1995/ 96 ला सभामंडप बांधलेले असावे.
एकविरा देवीची पूजा दररोज सकाळी केली जाते. पूजेमध्ये देवीला आंघोळ घालायची , साडी चोळी नेसवायची, विभूती लावायची, चोळी साडी नेसवून हळद-कुंकू लावल्यानंतर फुलांचा हार घालायचा. फुलं जास्त उपलब्ध नसतील तर ते केवळ दोन-चार फुले हातावर , मस्तकावर, चरणावर चढवायची . तीन फुटी दोन समई आहेत. भक्त लोक आरतीला तेल अर्पण करतात.
सनमडीचे लोहार समाजाचे पवार डफळापूरच्या या एकविरा देवीला आणि बुवा नंदाला नवसाने अजूनही येतात .
गुरु लिंगेश्वर मंदिर
गुरु लिंगेश्वर मंदिर अर्थात चौकीचं देऊळ. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या सोमवारी गुरु लिंगेश्वर ची यात्रा असते. श्रावणात प्रत्येक सोमवारी छोटेखानी यात्रा भरवतात व शेवटच्या सोमवारी महाप्रसाद केला जातो.
डफळापूर गावची लोकसंख्या साधारण पंधरा ते सतरा हजार पर्यंत असेल. जायवगळ, काळे शिवार, चव्हाणवस्ती 1 व 2 , कोळीवस्ती , शिंदेसवदेवस्ती, नंदीवाले वस्ती गडदेवस्ती, गायकवाडवस्ती, माळीवाडी, कामाटी इत्यादी वस्त्या गावाच्या भोवताली आहेत. डफळापुर बाजारपेठेची उलाढाल मोठी आहे . वाषाण, खलाटी , मिरवाड , कुडणुर, जिरग्याळ, शिंगणापूर, बेळंकी, बागेवाडी , कंठी या पंचक्रोशीतील ही मोठी बाजारपेठ आहे. आठवडी बाजार गुरुवारी असतो. शेरडा-करडांचा बाजार देखील आता गुरुवारी सकाळी भरवला जातो. गावात जिल्हा परिषदेची मुलींची शाळा व मुलांची शाळा इयत्ता सातवी पर्यंत स्वतंत्र आहेत. राजे विजयसिंह डफळे या नावाने एक हायस्कूल पाचवी ते बररावी पर्यंत आहे. दोन इंग्लिश मिडीयम शाळा आहेत .
( सदरची माहिती ही वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या, ऐकलेल्या आणि डफळापूर गावातील काही लोकांच्या कडून ऐकीव स्वरूपात उपलब्ध झालेली माहिती आहे . अधिक ऐतिहासिक माहिती 'वैभवशाली जत' लेखक दिनराज वाघमारे" यांच्या पुस्तकात सविस्तर वाचायला मिळेल .)
धन्यवाद...........!
(या लेखाचा उद्देश अंधश्रद्धा पसरविणे किंवा कोणत्याही जाती अगर धर्माचा प्रसार करणे तसेच विशिष्ट लोकांप्रती आकस नसून , आज मितीच्या गावच्या परंपरा समाजासमोर ठेवणे हा आहे. सदरचे लेखन करण्यापूर्वी स्थानिक चौकशी आणि मुलाखत घेऊन माहिती घेतली आहे. याशिवाय आणखी काही अधिक माहिती अगर फोटो उपलब्ध असेल तर 9421181224 या व्हाट्सअप्प नंबरवर आपल्या नावासाहित सेंड करावे. ती माहिती योग्य वाटल्यास ब्लॉगमध्ये ऍड केली जाईल. )
🙏🙏🙏🙏🙏
##################################
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
##################################
No comments:
Post a Comment