गावाच्या इतिहासाशी गावातील वेगवेगळ्या जातीधर्माच्या परंपरा निगडित आहेत .
अचकनहळ्ळी गावाला श्री बिसल सिद्धेश्वर या देवस्थानची परंपरा फार वर्षांपासून आहे. दोन्ही देवाची पूजा म्हणजे श्री बिसल सिद्धेश्वर आणि गावातील श्री महालिंगेश्वर देवाची पूजा प्रत्येक वर्षी आलटून पालटून कोरे आणि पुजारी यांच्याकडे एकाच पुजाऱ्याकडे असते. श्री बिसल सिद्धेश्वर मंदिर जवळ श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. बिसल सिद्धेश्वर मंदिरच्या दक्षिण बाजूला एक एकदीड किमी अंतरावर एक विहीर आहे. त्याला देवाचा स्नानकुंड म्हणतात. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रथम विहीर म्हणजे कुंड धुवून काढतात. स्वामी आणि पुजारी गावात वेगवेगळे आहेत. काराजनगी चे रामण्णा पुजारी यांचे कडे देखील श्री सिद्धेश्वराची पूजा असते. कुंड धुवून काढल्यानंतर गावातून महालिंगेश्वर मंदिरातून पालखी निघते. विहीर स्वच्छ केल्यानंतर शेवटी विहिरीत स्वामी आणि पुजारी थांबतात. बाकीचे सर्वजण बाहेर येतात. देवाला कुंडात आंघोळ घातली जाते. पाच आरत्या म्हटल्या जातात. तिथून पालखी बाहेर निघते. त्या दिवसापासून श्री सिद्धेश्वर यांची पालखी श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर बाहेर भक्तांच्या घरी फिरत असते. अचकनहळ्ळी गावात एक आठवडा, म्हणजे पहिला आठवडा असते. दुसऱ्या आठवड्यात अनंतपुर (ता-अथणी ,कर्नाटक ) कडे जाते. तिसऱ्या गुरुवारी पालखी हल्लाळ येथे नदीवर असते ; तर चौथ्या गुरुवारी पालखी श्री सिद्धेश्वर च्या मंदिरात परत येते. चौथ्या सोमवारच्या आदल्या रविवारी रात्री पालखी मुक्कामाला श्री सिद्धेश्वर मंदिर येथे येते. तर चौथ्या सोमवारी श्री सिद्धेश्वर ची यात्रा भरते . हल्लाळ येथे कृष्णा नदीवर 11 अंघोळी घातल्या जातात. 11 अंघोळ करणे म्हणजे : देव आणि पुजारी ,भक्त पहिल्यांदा पाण्यात उतरायचं. देवाला अंघोळ घालायची बाहेर यायचं. विभूती लावायचे. आरती म्हणायची. पाचेक मिनिटे थांबायचं. पुन्हा देवाला पाण्यात घेऊन उतरायचं . सर्वजण सोवळ्याने पाण्याच्या बाहेर पडायचं. विभूती लावायची. पुन्हा आरती म्हणायची. पुन्हा पाच एक मिनिट थांबायचं. अशा 11 अंघोळी होतात. पालखी रात्री बारा एक च्या दरम्यान हल्लाळला पोहोचते. पहाटे पाच वाजेपर्यंत अकरा अंघोळी होतात. देवांच्या आणि भक्ताच्या अकरा अंघोळी होतात. त्या रात्री जवळजवळ शंभर एक पालख्या हल्लाळ येथे मुक्कामाला आलेल्या असतात. सिद्धेश्वराची 11 अंघोळ झाल्यानंतर मग बाकीच्या पालख्या पहाटे पाचच्या दरम्यान पाण्यात उतरतात. श्रावण महिना असतो. थंड वारे असतात.. पण देवा सोबत येणाऱ्या भाविकांना रात्रभर शेकोटीची सोय केलेली असते. गोवऱ्या आणि जळाऊ लाकडाचा ट्रॅक्टर भरून ठेवलेले असतात. 11 अंघोळी, 11 पूजा आणि 11 वेळा आरती होते. आथणी मध्ये श्री बिसल सिद्धेश्वर देवाचे एक निस्सीम भक्त व्यवसायाने वकील आहेत . तिथे पालख्यांच्या जेवणाची सोय करतात. रात्री अकराच्या सुमारास तिथून पालखी पुढे हल्लाळ गावाकडे निघते. रात्री साडे बारा-एक च्या दरम्यान गावात पोहोचते. हल्लाळ गावात एक मठ आहे. त्या मठामध्ये साऱ्या पालख्या मुक्कामाला असतात. श्री सिद्धेश्वराची पालखी हल्लाळ गावात न थांबता मुक्कामाला पुढे नदीवर जाते. पालखीसोबत गेलेली माणसे आणि अचकनहळळी मधून थेट आंघोळीला आलेले भक्त हल्लाळ येथे उपस्थित होतात. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी कुंड पुजातात. दुसऱ्या सोमवारी पालखी जत मध्ये भक्तांच्या घरी असते; तिसऱ्या सोमवारी पालखी हल्लाळ येथे कृष्णा नदीवर असते आणि चौथ्या सोमवारी यात्रा भरते .
|
श्री बिसलसिद्धेश्वर आणि श्री रेवणसिद्धेश्वर |
श्री सिद्धेश्वर मंदिरात श्री बिसल सिद्धेश्वर स्वामी हे झोपलेले आहेत ; तर बसलेले हे मात्र श्री रेवणसिद्धेश्वर स्वामी श्री बिसल सिद्धेश्वर स्वामी यांचे शिष्य (परिचारक )आहेत. ही गुरुशिष्यांची जोडी सध्या सिद्धेश्वर मंदिरात आहे. मंदिरात मुखवटे आहेत .विजापूरचा एक मोठा सावकार भक्त होता . त्याने रेवण सिद्धेश्वर चा मुखवटा बनवून घेतला; पण तो बसला नाही, मापाने दोन वेळा बनवला. पण एकदा लहान झाला आणि एकदा मोठा झाला. मुखवटा बसला नाही आता तो मुखवटा बाजूला काढून ठेवलेला आहे.
श्री बिसल सिद्धेश्वर स्वामी यांचे भक्त श्री महालिंगेश्वर हे मूळचे मिरवाड (ता.-जत, जि-सांगली ) येथील होत. श्री बिसल सिद्धेश्वर स्वामींच्या शोधार्थ कल्याण पट्टण ( कर्नाटक ) येथे जाऊन आले. जेव्हा श्री बिसल सिद्धेश्वर स्वामीच्या आपल्या लाडक्या शिष्याच्या शोधार्थ मिरवाड ला जात होते तेव्हा अच्युतपुरच्या निर्जन माळावर तरटीच्या म्हणजे रेवडीच्या सावली ला बसलेले ठिकाण म्हणजे सध्याचे श्री बिसलसिद्धेश्वर मंदिर परिसर होय.
श्री महालिंगेश्वर स्वामी यांचे मंदिर जिरग्याळ आणि मिरवाड येथे आहे. तेथे त्यांची पूजा, पाठ, यात्रा नित्यनेमाने केली जाते. पूर्वी अचकनहळ्ळी गावची माणसं पालखी घेऊन जिरग्याळ आणि मिरवाडला जात होते. पण सध्या कोणीही जात नाही असा त्याचा इतिहास सांगितला जातो.श्रावण महिन्यात महालिंगेश्वर देवाला प्रसाद करतात. महालिंगेश्वर मंदिरात शिवलिंग आहे. श्री बिसल सिद्धेश्वर मंदिर सेम टू सेम मल्लाळ (ता- जत. जि-सांगली ) येथे आहे. गावात ओढ्याकाठी मंदिर आहे. झोपलेले श्री बिसल सिद्धेश्वर स्वामी आणि बसलेले श्री रेवणसिद्धेश्वर स्वामी आहेत. मंदिर परिसर बांधकाम सेम टू सेम आहे. आज देखील श्री बीसल सिद्धेश्वर स्वामी मुळे काराजनगी येथे दुधाची विक्री आणि व्यवसाय केला जात नाही याची आख्यायिका काराजनगी गावातील लोक अजूनही सांगतात . अधिक माहिती या ब्लॉगवर " आमचं गाव आमची परंपरा - काराजनगी " या पेजवर आपल्याला वाचायला मिळते. काराजनगी येथून शाप देऊन श्री बिसल सिद्धेश्वर स्वामी गावा बाहेर निघाले आणि जत ,अच्युतपूर काराजनगी, वळसंग मधील निर्जन ठिकाणी रेवडी वृक्षाखाली विश्रांतीला बसले. त्याच निर्जन ठिकाणी आज बिसल सिद्धेश्वर स्वामींचे मंदिर आहे . अचकन हळ्ळी, , काराजनगी ,जत आणि मल्लाळ या गावातच श्री बिसल सिद्धेश्वर यांची कर्मभूमी आहे आणि येथे त्यांचे मंदिर आहेत. कल्याणपट्टण (कर्नाटक ) येथे जाऊन श्री महालिंगेश्वर हे श्री सिद्धेश्वर यांच्या शोधार्थ आलेले भक्त आहेत. महालिंगेश्वर हे बिसल सिद्धेश्वर यांच्या शिष्या पैकी एक उच्चतम पातळीचे आणि निस्सीम शिष्य.श्री महालिंगेश्वर हे मिरवाड मधून दररोज श्री बिसल सिद्धेश्वर यांना भेटण्यासाठी दूध, तूप यांची कावड घेऊन येत असत; असा उल्लेख श्री बिसल सिद्धेश्वर महात्म्य या पुस्तकामध्ये आढळतो. अचकनहळ्ळी गावात महालिंगेश्वर यात्रा श्रावण मध्ये करतात.
|
अचकनहळ्ळी गावातील मध्यवर्ती शिंदे सरकार यांचा वाडा |
अचकनहळ्ळी गावचे पूर्वीचे नाव अच्युतपूर असे होते. एखाद्या सुभेदाराच्या सुभेदारी वरून नाव पडले असावे असा अंदाज आहे .गावात शाळेच्या मैदानावर सलग तीन पूर्वाभिमुख घुमट आहेत. कदाचित त्या वीर सरदारांच्या समाधी असाव्यात असा अंदाज आहे. मराठा समाजाचे लोक त्यात मृत व्यक्तीच्या अस्थी आणून ठेवतात म्हणे. बांधकाम इतिहास कालीन आहे. दगडी घडीव चौथरा , दहा बाय दहा फूट असेल. वरचे बांधकाम मंदिर वजा आहे. घुमट देखील म्हणतात ; पण आत कोणत्याही देवाची मूर्ती नाही. कदाचित या वीर पुरुषांच्या समाधी असाव्यात. त्या तीन समाधीच्यासमोर जमिनीपासून साधारण चार फूट उंच असा हा चौथरा पूर्ण आणि भक्कम बांधकाम असे हेमाडपंती दगडाचे आहे. दगड फार मोठे आहेत.
|
अचकनहळ्ळी मधील वीर पुरुषांच्या समाधी |
गावात मध्यवर्ती ठिकाणी श्री शिंदे ( सरकार) यांचा दुहेरी भव्य वाडा आहे. खरंतर हे दोन वाडे आहेत .सहा बुरुजांच्या मध्ये हे बांधकाम आहे . वाड्याला सहा बुरूज होते. सध्या चार बुरुज राहिलेले आहेत. उत्तरेकडील दोन बुरुज जवळजवळ नामशेष झाले आहेत .वाड्यात वेगळ्या सदर होत्या. पांडुरंग शिंदे सध्याचे डेपोटी सरपंच यांचे पूर्वज या वाड्यात राहत होते असे सांगतात. वाड्याच्या समोर देखील दोन हुडे म्हणजे बुरूज होते. ते बैठे बुरूज होते. दोन्ही बुरुजाच्या मधून गावात यायला वाट होती. आता ते वेशीवरचे दोन्ही बुरुज राहिलेले नाहीत. ढासळलेल्या बुरुजांची दगड-माती अनेकांनी घर बांधण्यासाठी नेली आहेत. हरिजन समाज पुढच्या म्हणजे गावाच्या बाहेरच्या बाजूला पूर्वेला राहत होता. वेशीपासून वरच्या बाजूला शिंदे, मोहिते ,सावंत हा मराठा समाज राहत होता. दक्षिण आणि पूर्व बाजूला हरिजन समाज राहत असे. जगन्नाथ शिंदे माजी सरपंच समाधान शिंदे यांची नावे उताऱ्यावर अजूनही येतात. त्यांची कागदपत्रे पूर्वज यांच्याकडे असावेत पण असे कागद कोणाकडे असल्याचे ऐकिवात नाही.
|
श्री हनुमान मंदिरासमोरील वीरगळ आणि नाग देवतांचे शिल्प |
|
हनुमान मंदिर |
गावात हिंदुधर्माचे लोक अधिक असून देखील धनगर जमातीचे लोक आपल्या परंपरा टिकवून आहेत. चिंचली मायक्का ,आरेवाडी बिरोबा , आदमापूर बाळू मामा ,पाली जेजुरी खंडोबा खलाटी लक्ष्मी , मुचंडी दरीदेव, खरसुंडी सिद्धनाथ येथे जातात. बिरोबा ,म्हसोबा , यांना बकरी कोंबडी कापतात. मायक्का देवीचे दूध घालतात. सवाष्णी जेऊ घालतात. आपल्या धनगर आदिवासी पद्धतीनेच लग्न लावतात .
बदलत्या जीवन शैलीनुसार लोकांचे राहणीमान बदलत आहे. घरांच्या स्टाईल्स देखील बदलत आहेत . प्रत्येक जातीधर्माचे लोक शिक्षण घेत आहेत .पारंपरिक व्यवसायसोबत इतर व्यवसाय देखील करत आहेत .
काही फोटो
|
श्री बिसलसिद्धेश्वर आणि श्री रेवणसिद्धेश्वर |
|
श्री बिसलसिद्धेश्वर मंदिरासमोरील नंदी आणि हत्ती. |
|
श्री बिसलसिद्धेश्वर मंदिरासमोरील नंदी आणि हत्ती. |
जत- येळवी रस्त्यावर निर्जन स्थळी योगेश्वर श्री बिसल सिध्देश्वर यांचे असलेले समाधीस्थळ जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर ओळखले जाते. जतसह कर्नाटकातील भाविकांचे शक्तीपीठ, भक्तीपीठ म्हणून उदयास येत आहे. श्री बिसल सिध्देश्वरांचे जीवन चरित्र ९०० वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते.
श्री बिसल सिध्देश्वर जतच्या या भुमीत आले कसे? यांची आख्यायिका प्रसिद्ध आहे. जतचा हा भाग पूर्वी मिरवाड हे छोटेसे राज्य होते . मिरवाड नावाने ओळखला जाणारा हा भाग होता. सुंदरतेने नटलेल्या या गावावर नंदेआप्पा गोंड यांचे राज्य होते. राजा नंदेआप्पा गौंड व महाराणी गंगादेवी यांना अनेक वर्षापासून पुत्ररत्न नसल्याने जोडपे दुःखी होते. अनेक वर्षानंतर महालिंगरायाच्या रूपाने राजा नंदेआप्पा व महाराणी गंगादेवी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. पण महालिंगरायाला महारोग झाल्याने ते चिंतेत होते. एके दिवशी दारी आलेल्या साधूने श्री बिसल महालिंगरायाला कल्याणपट्टण येथे एक साधू गावाबाहेर तपश्चर्या करत आहे. असे सांगितले व महालिंगरायाला आशीर्वाद देवून साधू निघून गेला. साधू निघून जाताच अंथरुणावर खिळून पडलेला महालिंगराया चालू फिरू लागला. साधूच्या या चमत्कारामुळे आनंदी झालेल्या महालिंगरायाने रोगमुक्त होण्यासाठी आईला परत येण्याचे वचन देवून थेट कल्याणपट्टण गाठले. कल्याणपट्टण येथे आल्यानंतर त्याला गावाबाहेर श्री बिसल सिध्देश्वर तपश्चर्या करत असल्याचे दिसले. त्यांनी श्री बिसल सिध्देश्वर यांची मनापासून सेवा सुरू केली. भक्तीवर प्रसन्न झालेल्या श्री बिसल सिध्देश्वर यांनी महालिंगरायास लवकरच रोगमुक्त केले व आईला दिलेले वचन पाळण्याचा आदेश देत परत जाण्यास सांगितले. भक्तीत रमलेल्या महालिंगरायास श्री बिसल सिध्देश्वर यांना सोडून जाण्यास मन धजेना, त्यांची इच्छा होईना. आदेश व वचन या चक्रव्यूहात अडकलेल्या महालिंगरायाने श्री बिसल सिध्देश्वर यांना कोडे घातले. मी परत जातो पण तुम्ही जेथे असाल तेथे तेथ येथून दररोज आपली दूध तुप व लोण्याने पूजा करू इच्छितो तेव्हा आपणास दररोज दर्शन यावे, अशी इच्छा प्रकट केली.
महालिंगरायाला मनाप्रमाणे श्री विसल सिध्देश्वर यांनी वर दिल्याने महालिंगराय मिरवाड नगरीत परतले व श्री बिसल सिध्देश्वर यांची मनोभावे भक्ती करू लागले दरम्यान श्री बिसल सिध्देश्वर यांनी भक्त महालिगरायाची कठोर परीक्षा घेतली. प्रत्येक परीक्षेत महालिगराया उत्तीर्ण झाले. महालिंगरायाच्या भक्तीने प्रसन्न झालेले श्री बिसल सिध्देश्वर स्वतःच मक्त महालिंगराय यास मेटण्यास मिरवाड नगरीत आले व तथेच कायमचे वास्तव्य केले.
सध्याच्या जत शहरापासून पाच किलोमीटरवर श्री बिसल सिध्देश्वर यांचे मंदिर आहे. हे मंदिर भक्त चोळ्ळी यांनी बांधले आहे. मंदिरात श्री सिध्देश्वर डिकमळ, नंदी आहे. या मंदिरासारखेच दुसरे हुबेहुब मंदिर अचकनहळळी हद्दीत मल्ल्याळ येथे आहे. जतकर व मल्ल्याळच्या लोकांनी या मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरापासूच जवळच असलेल्या काराजनगी येथे श्री बिसल सिध्देश्वर यांच्या आदेशापासून आजही दुधाची विक्री केली जात नाही हे विशेष! मिरवाडच्या महालिंगरायाच्या जीवनात घडलेल्या अनेक घटना, चोळ्याच्या जीवनातील प्रसंग, बालविधवा निलगंगाची कहाणी, परमभक्तः हुच्चवाची अमर कहाणी सर्वत्र प्रसिद्ध आहे. भक्तांच्या हाकेला ओ देणारा म्हणून श्री बिसल सिध्देश्वर यांना ओळखले जाते. आठवड्यातील रविवार, सोमवार, गुरुवार व श्रावण महिन्यात महिनाभर तसेच श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते.
श्री हनुमान मंदिरासमोरील वीरगळ आणि नाग देवतांचे शिल्प
No comments:
Post a Comment