वटपौर्णिमा ,विधवा प्रथा आणि प्रगत महाराष्ट्र यावर केवळ चर्चा करून उपयोग नाही ; तर समाजमन बदलणे गरजेचे आहे ......
विधवा प्रथा बंद व्हायला पाहिजे , ही इच्छा तमाम महाराष्ट्रातील विधवा आईच्या प्रत्येक बाळाला वाटत असावं. महाराष्ट्रात सतीची चाल बंद झाली आणि विधवांना कमी दर्जाची वागणूक समाजाकडून मिळू लागली . समानतेची वागणूक देण्यासाठी पाहिलं पाऊल कोण उचलायचं? यात अनेक वर्षे गेली . पण मे 2022 कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ठराव करून एक व्यक्तीस्वातंत्र्याची नवी वाट मोकळी करून दिली. सोशल मीडियावर अंगठे दाखवण्यात आले. सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या . महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढला . आता महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती हळूहळू ठराव घेतील ; आणि विधवा प्रथा बंद झाली म्हणून आकडे देतील .विधवांसाठीची सनातनी परंपरा मोडीत काढून महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक प्रगतीशील पाऊल उचलले हे खरे . परंतु हे केवळ वाचक वर्ग , उच्चशिक्षित, आणि श्रीमंत तसेच पुढारलेले राजकीय नेते यांच्यापुरते मर्यादित आहे , असे मला वाटते.
समानता आणि व्यक्तिस्वातंत्र्य जपण्यासाठी मानवी समूहाने वेळोवेळी योग्य बदल स्वीकारायला हवेत, जागतिक मानवता जपण्यासाठी योग्य बदल तमाम भारतीयांनी एकमनाने अंगिकारले पाहिजेत. अशा परिस्थितीत बदल सहजतेने स्वीकारले पाहिजेत. घटनेत स्त्री -पुरुषांना समानता आहे. दोघांनाही समान अधिकार दिले आहेत, असे असतानाही आजही समाजात धार्मिक, सामाजिक आणि जातीय प्रथांच्या नावाखाली विधवा आणि सधवा महिलांवर विविध बंधने आहेत. ती बंधने प्रथा म्हणून अस्तित्वात आहेत. काळानुसार त्या प्रथा संपवायला हव्यात किंवा त्यात मानवतावादी बदल करायला हवेत . स्त्री विवाहित असो वा विधवा, तिचे समाजातील स्थान मानाचे असलेच पाहिजे . तिला तिचे घटनेने दिलेले अधिकार द्यायलाच हवेत. यासाठी समाजाने तिचा मान राखला पाहिजे. सर्वांनी मनापासून बदल स्वीकारला पाहिजे .
या वर्षा पासून पुढील वटपौर्णिमा विधवा प्रथांना मूठमाती देऊन व्हायला हव्यात....... सधवा/ सुहासिनी स्त्रिया सात जन्मी हाच पती मिळू दे !अशी मागणी करत असतील ; तर विधवांनी " या एका जन्मात तरी पतीची संपूर्ण साथ द्यायला हवी होती. ती का दिली नाहीस ? म्हणून वाटवृक्षाला विचारले पाहिजे". सवाष्णी स्त्रियांनी आपल्या विधवा बहिणी, जावा, नंदा, आई, सासू , मैत्रिणी यांचे मागणे वाटवृक्षाला सांगायला हवे. केवळ स्वार्थ म्हणून एकटीला मागण्यात काय अर्थ ?
गौरी गणपती असो , नागपंचमी असो वा मकरसंक्रांत असो वा कोणतेही हळदी कुंकवाचे कार्यक्रम असोत, हे सर्व कार्यक्रम विधवांना सोबत घेऊन व्हायला हवेत .
ग्रामपंचायत सदस्या, महिला कार्यकर्त्या यांनी योग्य आयोजन करायला हवे . ग्रामपंचायत मधील स्त्री सदस्यांना एक नामी संधी आहे की जेणे करून विधवा प्रथा बंद करणे , का गरजेचे आहे हे सांगता येईल .
धनगर समाजात सवाष्णी जेऊ घालण्याची एक प्रथा आहे . चिंचली मायक्का देवीच्या नावाने सवाष्णी जेऊ घालतात . त्यात सवाष्णींना मान असतो . या ठिकाणी आणखी एक-दोन संख्या वाढवून पाच च्या ऐवजी विधवांना सोबत घेऊन, सात जेऊ घातल्यास चालणार नाही का ? हा विचार आपण शिक्षित लोकांनी करायला नको का ?
आज आपण हे विसरलो आहोत की आपण कायम चांगल्याची कर्माची पूजा करत आलो आहोत. एखादी स्त्री विधवा असो की सधवा त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक आपण नेहमी करत आलेलो आहोत . त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती . राजे छ.मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवीना सती जाण्यापासून रोखले ; म्हणून इंदौरचे संस्थान आणि तिथली संस्कृती आजही दिमाखात आहे .हे विचार समाजात रुजले पाहिजेत. पचवले पाहिजेत. आज एका अर्थाने जिजामाता, सावित्रीमाई या विधवा आहेत म्हणून त्यांचे कार्य कमी लेखत नाही. हे आपण पुरोगामी विचार म्हणून समाजात का मांडत नाही .
आजचा महाराष्ट्रीयन आणि भारतीय समाज बहुतांशी शिकलेला आहे , सोशल मीडिया व्हास्ट आहे. आज चांगल्या प्रथा स्वीकारायला समाज तयार आहे . वाईट प्रथा संपवायच्या मानसिकतेत आहे. यावर धर्माचा आणि जातीचा पगडा आहे ,तो महात्मा फुलेंनी जुगारला आहे . त्यांच्या विचाराने आज आपण जगले पाहिजे .
विधवा प्रथा बंद होण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे ती अल्पशिक्षित आणि मागासलेल्या कुटुंबामध्ये जाणीव होण्याची . अल्पशिक्षित आणि मागासलेल्या कुटुंबामध्ये कार्यक्रम असताना समाजसेवक , समाजसेवी संस्था ,नेते, पुढारी, पदाधिकारी , अधिकारी आणि शिक्षित वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे ...........
एखादया कार्यक्रमाचे उदघाटन किमान वयस्कर विधवा आजीच्या हस्ते व्हायला हवे. घरगुती कार्यक्रमामध्ये विधवा स्त्रियांना देखील हळदी कुंकवाला आवर्जून बोलावले पाहिजे . मंगळसूत्र आणि जोडवी ही सुवासनीचे अलंकार आहेत असे मानतात. तेव्हा एका वर्षातच ही प्रथा संपेल असे नाही . मागील काही वर्षात एखाद्या स्त्रीचा पती वारला असेल तर त्या स्त्रीला आग्रह करणे हे ही काही अंशी विसंगत वाटेल. आपण कायदा केला, ठराव केला, आता खरी गरज आहे जनजागृतीची . आणि ही जनजागृती ग्रामपंचायत आणि लोकल कार्यक्रम मध्ये दिसायला हवी .................
अजूनही विधवांचे दर्शन अशुभ मानले जाते . पण स्वतःच्या घरातील विधवा आई सकाळी सकाळी दिसते त्याचा अपशकुन किंवा अशुभ घटना घडत नाहीत , हे कसे काय ? एकूण काय तर 1848 साली महात्मा फुलेंनी समाज सुधारावा म्हणून शाळा सुरू केल्या , तेव्हा आता मुली आणि मागास समाजातील इतके लोक शिकू लागले. आपणही ही विधवाप्रथा आज बंद करण्याची सुरुवात केली तर पन्नासेक वर्षांनी विधवा प्रथा कमी झाल्याचे दिसून येईल. केवळ एका राज्यात किंवा एका क्षेत्रातील विधवांविषयीचा विचार बदलून समाजातील ही परंपरा पूर्णपणे बदलणार नाही. त्यासाठी संपूर्ण देशात राजकीय आणि सामाजिक जाणीव जागृत करण्याची गरज आहे. त्याच बरोबर प्रत्येक जातीने अनिष्ट , वाईट, अपमानित करणाऱ्या रूढी परंपरांना संपवून टाकण्याची आता गरज आहे.
आपण हेही लक्षात घ्यायला हवे की,आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. या मागील इतिहास म्हणजे या दिवशी सावित्रीने यमदेवाकडून आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले. यमदेवाने सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले आणि तिथेच सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. असा समज असल्यामुळे हे व्रत आजच्या विज्ञान युगातही केले जाते.
खरंतर आपल्या गतप्राण झालेल्या पतीसाठी सावित्रीने प्रार्थना केली . म्हणजे सावित्रीने आपल्या पतीसाठी वडाच्या झाडाखाली प्रार्थना केली तेव्हा सावित्री विधवा होती. सवाष्णी स्त्रिया आपला नवरा दीर्घायुषी रहावा म्हणून जातात.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा . या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर जाऊन आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.किंवा आपल्याला आलेली लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment