दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी नापासाचा धसका अजिबात घेऊ नये ....
केवळ शाळेच्या सांख्यिकीय गुणावरून म्हणजे दहावी बारावी च्या गुणावरून आयुष्याचा आलेख कुणीही बंधू नये .
दहावी आणि बारावी च्या निकालाची विशेषतः विद्यार्थी , पालक , शिक्षक या सर्वांनाच मोठी उत्सुकता असते .आपण पास होणार की नापास होणार ? आपल्याला किती मार्क्स पडणार ? वर्गात आपला कितवा नंबर येणार? याबद्दल कमालीची उत्सुकता बहुतेक पालक विद्यार्थ्यांमध्ये असते. याच्या बरोबर विरुद्ध नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र प्रचंड मानसिक तणावाचे वातावरण असते .
प्रत्येक वर्षी दहावी आणि बारावीचे निकाल लागतात .आणि कमी मार्क्स पडणारे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली गेलेले दिसतात .याचा परिणाम म्हणजे काही मुलं आत्महत्या करून आपलं जीवन संपवतात . दहावी बारावीचा निकाल लागतो आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होते .सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो. असंख्य विद्यार्थ्यांना भरपूर मार्क मिळतात. 70 ते 98 टक्के अशी मार्क्स मिळवून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात . त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
परंतु बारावी आणि दहावी अनुत्तीर्ण आणि कमी मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांना मात्र कमी लेखले जाते . असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना 65 ते 35 टक्के मार्क्स मिळाले आहेत. अनेक विद्यार्थी नापास देखील होतात, ह्या मुलांनी अजिबात नाराज होऊ नये . आपल्या आयुष्याची नवी सुरुवात या क्षणापासून करायची.. शाळेतील मार्काचा , गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा या जगात काहीही जास्त संबंध नसतो. आपल्याला आज किंवा आजपर्यंत अपयश आले असेल ,मान्य आहे . आज मात्र नव्याने सुरुवात करण्याची वेळ आलेली आहे . आपण शिक्षण आणि अभ्यासापेक्षा इतर क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो , हा आत्मविश्वास ठेवा . जगाचा इतिहास आणि वर्तमान पाहिला तर कमी मार्क पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील अनेक ठिकाणी उज्ज्वल इतिहास घडवलेला आहे. त्यामुळे कमी मार्क पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी निराश व्हायचं काहीही करण नाही.
जागतिक कीर्तीचे विद्वान,भारतीय घटनेचे निर्माते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 37.5 टक्के मार्क मिळवून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. अमेरिकेतील जागतिक धर्म परिषदेमध्ये जाऊन विश्वविख्यात भाषण करणारे स्वामी विवेकानंद 39 टक्के मार्क मिळवून ग्रॅज्यूएट झाले होते. सहावी नापास झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जगविख्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. एक दिवस शाळा शिकलेल्या आण्णा भाऊ साठे यांनी 70 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरची साहित्यनिर्मिती केली. शाळेची पायरीदेखील न चढणारे डेबुजी संत गाडगे बाबा झाले. शालेय जीवनात नापास झालेल्या इंदिरा देशाच्या पंतप्रधान झाल्या . दक्षिण आफ्रिकेत बॅरिस्टर होऊन आलेल्या मोहनदास गांधी यांना एकही केस (खटला ) जिंकता आला नाही, तरीही ते भारताचे राष्ट्रपिता झाले . मतिमंद म्हणून शाळेतून काढलेला एडिसन नावाच्या विद्यार्थ्याने पुढे विजेच्या दिव्याचा शोध लावला अन् मंद मुलाच्या उजेडात जग हुशार झाले .चौथी इयत्ता झालेले वसंतदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर झालेच ,पण आसामचे राज्यपाल देखील झाले, आणि डी.लिट. ही पदवी मिळवली . बहिष्कृत ब्लॅक बॉय म्हणून ओळखणारे अब्राहम लिंकन पंचविसाव्या वर्षांपासून पंचावन्न वर्षापर्यंत अपयश पचवून शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले .......
देशाचे लोकप्रिय नेते मा. शरद पवार यांना मॅट्रिकला 35 टक्के मार्क्स होते. अभिनयाचा बादशहा अमिताभ बच्चन हे अलाहाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तनिवेदक परीक्षेत आवाज श्रवणीय नाही म्हणून नापास झाले होते. मास्टर ब्लास्टर , वंडर बॉय म्हणून कौतुक झालेले सचिन तेंडुलकर भारतरत्न म्हणून गौरवले ते ही बारावीत नापास झाले होते .सैराटसारखा रेकॉर्डब्रेक चित्रपट देणारे निर्माता नागराज मंजुळे दहावीच्या परीक्षेत नापास झाले होते. हिंदकेसरी मारुती माने, गायिका लता मंगेशकर, कुस्तीपट्टू खाशाबा जाधव, महान कलाकार मंगलाबाई बनसोडे ,विठाबाई नारायणगावकर आपली सर्वांची माय सिंधुताई सपकाळ, यांचे शिक्षण किती? पण त्यांचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. अशी खूप मोठी यादी आहे की ज्यांना शिकता आलं नाही, पास होता आले नाही, किंवा जास्त मार्क मिळाले नाहीत, पण कला,साहित्य, संगीत, क्रीडा, नाट्य, अभिनय, कृषी, उद्योग,संशोधन आणि राजकारण इत्यादी क्षेत्रात कार्य करून दाखवले. त्यामुळे केवळ दहावी बारावीचे मार्क्स म्हणजे गुणवत्ता किंवा यश नव्हे.
स्वामी विवेकानंद म्हणतात "मनुष्याच्या ठायी असणाऱ्या पूर्णत्वाचा विकास म्हणजे शिक्षण होय". " थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात "मेंदू मन आणि मनगट याचा समतोल विकास म्हणजे शिक्षण होय". गांधीजी म्हणतात 3H बलवान असावेत .म्हणजे Hand , Head, & Heart .
स्वामी विवेकानंद म्हणतात माणसाला असं शिक्षण द्या की जे त्याच्याजवळ आधीच आहे ...म्हणजे माणसाला शिक्षण देताना त्याच्याजवळ असलेल्या गुणांचा अभ्यास आधी करा .
परंतु दुर्दैवाने आजच्या काळात शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी मार्कांच्या पाठीमागे लागलेले आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. नवनिर्मितीची क्षमता म्हणजे शिक्षण होय, असे देखील विवेकानंद म्हणाले होते, याचा सर्वानीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. 90%, 95% मार्क मिळविणारे विद्यार्थी केपलर, न्यूटन,आईन्स्टाईन, कोपर्निकस का होत नाहीत? जास्त मार्क पडणारे बहुतांश विध्यार्थी नोकर होतात, तर कमी मार्क असणारे किंवा नापास होणारे विद्यार्थी उद्योजक,व्यावसायिक होतात. ही आजची वस्तुस्थिती आहे .
आज शाळेत आपल्याला कमी मार्क पडले तर लगेच निराश होऊ नका, जगाच्या स्पर्धेत स्थान मिळवायचे असेल किंवा टिकायचे असेल तर मार्क्स पाहिजेत. परंतु यशस्वी व्हायला मार्क्स हा एकच पर्याय नाही . आपण एकदा नापास झालात म्हणून आपण आयुष्यभर अपयशी किंवा पराभूत झालो, असे समजू नका. हे जग खूप सुंदर आहे, आणि जीवन त्याहूनही सुंदर आहे .....................!
पण खरंच एका परीक्षेतील यश-अपयश काय आयुष्य ठरवतं का? आपण मुलांच यशापयश आणि पालकांचं यशापयश किंवा आर्थिक उत्पन्न याचा सहसंबंध लावतो, पण त्याचा काही प्रत्येकवेळी संबंध नसतो. डोळे उघडून व्यवस्थित पहिल तर जगभरात तेच लोक यशस्वी झालेत ज्यांनी अपयश पाहिलंय आणि आणि घडाभर अपयश देखील त्यांनी पचवलंय. नंतर त्यांनी स्वत:ला घडवलंय. 'बऱ्याचवेळा अपयश तुम्हाला खूप काही शिकवून जाते. तुम्हाला तुमची न दिसणारी शक्तीस्थळे, तुमच्या सुप्त आवडी ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी अपयश आले तर खचून न जाता ते खूप संयमाने स्वीकारा, त्यातून शिका, चुका सुधारा आणि स्वत:च्या आवडी-निवडीने नवे मार्ग शोधत स्वतःचं आयुष्य स्वत:च आनंदी घडवा.
म्हणून शाळेतील अपयश म्हणजे आयुष्यातील अपयश नव्हे ....
#####################################
( हा लेख लिहिण्याचा उद्देश म्हणजे नापास किंवा कमी मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांना नवीन आव्हाने पेलण्यास सज्ज होण्यासाठी एक ऊर्जा म्हणून आहे . या लेखात लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत . धन्यवाद ! )
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
एखादा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏
Nirashechya gartetun baher kadhnara lekh👌
ReplyDeleteखूप छान लेख अपयशातून जिद्दीने पुढे जाण्याची क्षमता निश्चितच जागृत होईल
ReplyDelete