माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Saturday, November 27, 2021

मच्छिंद्र ऐनापुरे , ब्लॉगर जत न्यूज.

 


मच्छिंद्र गोरखनाथ ऐनापुरे यांना जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर 

मच्छिंद्र  गोरखनाथ ऐनापुरे, पात्र पदवीधर शिक्षक  शाळा एकुंडी, ता- जत   यांना सांगली जिल्ह्याचा सन 2021 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर   झाला.   केवळ जत तालुक्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून त्यांचे  कौतुक होत आहे. 

मच्छिंद्र  ऐनापुरे, हे प्रसिद्ध लेखक आहेत . त्यांचा 'जंगल एक्सप्रेस' हा बाल कथासंग्रह, 'हसत जगावे' हा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांच्या 'किशोर', 'छावा-केसरी' आदी बालमासिके यांमधून  अनेक बालकथा प्रसिद्ध आहेत. त्यांनी  सांगली जिल्ह्यातील अनेक  वृत्तपत्रांमधून विविध विषयांवरील लेखन केले आहे. मच्छिंद्र ऐनापुरे सर हे प्रसिद्ध ब्लॉग लेखक म्हणजे  ब्लॉगर आहेत. ब्लॉगवर त्यांचे आजवर जवळजवळ  १५०० लेख प्रसिद्ध आहेत. मच्छिंद्र  ऐनापुरे, सर लिखित धाडसी कॅप्टन राधिका मेनन यांच्या जीवनावर आधारित चरित्र पाठ इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये निवडला गेला आहे. जत न्यूज हा ब्लॉग त्यांचा वाचकप्रिय आहे. तसेच त्यांनी जनरल नॉलेज नावाचा शैक्षणिक ब्लॉगवर देखील लेखन केले आहे . त्यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणून सांगली जिल्ह्याचा सन 2021 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .....




       श्री . मच्छिंद्र  ऐनापुरे,सर यांना यापूर्वी काही सामाजिक संस्था आणि  इतर काही पुरस्कार मिळालेले आहेत ते  खालील प्रमाणे .........(संस्थेचे नाव , पुरस्काराचे नाव, वर्ष)

१. महाराष्ट्र राज्य फुले, शाहू, आंबेडकर विचार परिषद, जत (आदर्श शिक्षक पुरस्कार 2004) 

२. अभिनव विद्यापीठ, विटा.(शिक्षक पुरस्कार,२००७) 

३. वृत्तपत्र लेखक संघ, इचलकरंजी ( आदर्श पत्र लेखन-२०११) 

४. सत्यम फाउंडेशन, रावळगुंडवाडी .(साहित्यिक पुरस्कार- २०१७)

५  सहारा कला, क्रीडा, व्यायाम व सांस्कृतिक  मंडळ, बोर्गी . (आदर्श शिक्षक पुरस्कार-२०१८)

६. कास्ट्राइब कर्मचारी महासंघ, सांगली. ( समाजरत्न पुरस्कार -२०१८)

७.सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल सांगली .(सांगली साहित्यरत्न पुरस्कार २०१८)

८. सी. आर. सांगलीकर फाउंडेशन जत. (आदर्श शिक्षक पुरस्कार - २०१९ ) 

९.मराठी पत्रकार परिषद(साहित्य गौर पुरस्कार -२०२०)



आणि  आत्ताचा सांगली जिल्हा परिषद ,सांगली चा जिल्हा पुरस्कार. आजपर्यंत त्यांची आठ पेक्षा जास्त पुस्तके प्रसिध्द आहेत . 

मच्छिंद्र ऐनापुरे सरांची साहित्य संपदा 





जतचे  जेष्ठ पत्रकार मा.श्री.  दिनराज वाघमारे यांनी ऐनापुरे सरांचे सुंदर कौतुक केले आहे. ऐनापुरे सरांच्या  आठव्या पुस्तक  प्रकाशन समयी ते म्हणतात...

पत्रकार, लेखक, शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे हे आमच्या मित्रमंडळींत 'मास्तर' या नावाने सुपरिचित आहेत. जतसारख्या दुष्काळी भागात शब्दांवर हुकूमत गाजविणारे ते खरेखुरे 'मास्टर' आहेत. त्यांनी अनेक दैनिके, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून विपुल लेखन केले आहे. मुलांसाठी त्यांची विविध पुस्तके प्रकाशित आहेत. युवकांना प्रेरणादायी ठरणारी व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली आहेत. कष्टाळू, जिद्दी आणि सुसंस्कारित पिढी घडावी अशी त्यांच्या लेखनाची जिद्द आहे. श्री. ऐनापुरे सर स्वतः अत्यंत खडतर परिस्थितीतून वर आले आहेत. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले असतानाही सांगली येथे बोर्डिंगमध्ये शिकले. वाचन, लेखनाचा छंद त्यांना याच दरम्यान जडला. नवनिर्मितीला बळ देण्याचे कार्य त्यांनी आपल्या लेखनीतून केले आहे. साहित्य सेवा मंचच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहनबळ देण्याचं कार्यही सुरूच आहे.

      हाडाचे शिक्षक असल्यामुळे त्यांचे जवळ जवळ सर्व साहित्य बालकांसाठी समर्पित आहे. बाल साहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. फारच थोड्या लेखकांच्या साहित्यकृतींना पाठ्यपुस्तकात स्थान मिळते. ते भाग्य मच्छिंद्र ऐनापुरे सर यांना लाभले आहे. अर्थात त्यांनी त्या दर्जाची साहित्य निर्मिती केली आहे. आता त्यांचा आणखी एक बालकथासंग्रह आपल्या भेटीला आला आहे. या पुस्तकात मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी सहज, सोप्या भाषेतल्या छान गोष्टी आहेत. 

 साहित्यिक मा.श्री.  दयासागर बन्ने म्हणतात ,'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' हा प्रथितयश साहित्यिक श्री. मच्छिंद्र ऐनापुरे यांचा बालकथा संग्रह बाल-किशोरवयीन मुलांच्या समजुती, संवेदना, सकारात्मकता मूल्यभावासह भावविश्वाचा गोष्टीरूप नजराणा आहे. सुसंस्कारातून आलेली जीवनमूल्ये जपत, संकटकालीन परिस्थितीशी संघर्ष करीत समजूतदारपणे आपल्या कृतीतून समकालीन मुलांपुढे आदर्श घालून देणारे या कथांचे नायक-नायिका आहेत.

        रंजक, अद्भूत, काल्पनिक, शाळकरी मुलांच्या अनुभवकक्षेबाहेरचं लिहून बालसाहित्य मुलांना कधीच आपलंसं करू शकणार नाही, हे एक हाडाचे शिक्षक असल्याने मच्छिंद्र ऐनापुरे यांना माहीत आहे. त्यामुळे मुलांच्या जगात आणि त्यांच्या परिसरात घडणाऱ्या प्रसंग-घटितांतूनच त्यांची गोष्ट पूर्ण होते, म्हणून या संग्रहातील बालचमू 'स्मार्ट' आहेत आणि या गोष्टीही 'स्मार्ट' आहेत.

             इतर काही पुस्तके 








मच्छिंद्र ऐनापुरे  सर आपल्या यशाचा प्रवास सांगताना  म्हणतात........

'स्वभावयक्ष' नावाची माझी पहिली बालकथा 'दैनिक पुढारी'मध्ये 1994 मध्ये छापून आली होती. माझं नुकतंच डी एड पूर्ण झालं होतं. एके रविवारी माझी चुलती "बाळू, तुझी गोष्ट छापून आलीय."  म्हणत पेपर घेऊन आली. मला पेपरमध्ये गोष्ट आलेली पाहून साहजिकच खूप आनंद झाला. खरं तर ती गोष्ट पेपरला पाठवून मी ती विसरूनही गेलो होतो. कारण काही रविवार वाट पाहिल्यानंतर त्याची आशा सोडली होती. पण वेळाने का असेना गोष्ट छापून आल्यानंतर मला पुन्हा हुरूप आला. मी पुन्हा गोष्टी लिहिण्याकडे वळलो. काही दिवसांनी दैनिक सकाळमध्ये 'मौलिक धन' नावाची कथा प्रसिद्ध झाली. तिथून कथा लिहिण्याचा सपाटा सुरू झाला. 'बेळगाव तरुण भारत'च्या 'अक्षरयात्रा' मध्ये काही बालकथा प्रसिद्ध झाल्या. या दरम्यान मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो होतो. माझ्यासमोर आता विद्यार्थी होते आणि त्यांना गोष्टी सांगून त्यांचे ध्यान अभ्यासाकडे वळवण्याचा माझा प्रयत्न यशस्वी होत होता. मी वर्गात गेल्यावर मुले पहिल्यांदा गोष्ट सांगा म्हणू लागले. मलाही आनंद व्हायचा. पण माझ्याकडे गोष्टींचा 'स्टॉक' नव्हता. मग इतरांच्या वाचलेल्या गोष्टी मुलांना सांगू लागलो. विनोदी आणि मनोरंजन कथा शोधून त्या सांगू लागल्याने मुलांनाही गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण झाली. 

माझ्याच शाळेतल्या एका खोडकर मुलाची कथा लिहिली. त्यात शेवटी त्याच्या वागण्यात परिवर्तन झाल्याचे लिहिले होते. ती 'सकाळ' मध्ये प्रसिध्द झाली. त्या मुलाला आणि वर्गातल्या मुलांना फार आनंद झाला. गोष्ट वाचून खरोखरच त्याच्या वागण्यात बदल झाला. आता तो शांत राहू लागला आणि अभ्यासही करू लागला. अशाप्रकारे माझा बालकथा लेखनाचा प्रवास  सुरू राहिला. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये माझ्या कथा येऊ लागल्या. याशिवाय किशोर, केसरी-छावा, मुलांचे मासिक या बाल नियातकालिकांमधूनही कथा प्रसिद्ध होत आहेत. माझ्या कथांसाठी मार्गदर्शक वृत्तपत्रेच होती. 

        हा लेखन प्रवास सुरू असताना माझ्यासाठी आणखी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट घडली. ती म्हणजे 2017 मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व संशोधन मंडळाने आठवी इयत्तेच्या बालभारती पुस्तकात 'धाडसी कॅप्टन:राधिका मेनन' या मी लिहिलेल्या व्यक्तिचित्र लेखाचा समावेश केला. प्रत्येक लेखकाचं पाठ्यपुस्तकात आपल्या लेखनाचा समावेश व्हावा, हे स्वप्न असतं. तसं स्वप्न माझंही होतं आणि ते पाठ्यपुस्तक मंडळानं पूर्ण केलं. आपल्या लेखनाची दखल घेण्यात आली,यापेक्षा मोठा आनंद कोणता असेल? यामुळे माझ्या लिखानाला आणखी बळ मिळालं आहे.

2013 मध्ये माझा पहिला बालकथा संग्रह प्रसिद्ध झाला. आतापर्यंत दोन बालकथासंग्रह (जंगल एक्सप्रेस, मौलिक धन) , विनोदी कथासंग्रह (हसत जगावे) आणि व्यक्तिचित्रे असलेले 'सामान्यातील असामान्य' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. आता हे पाचवे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. 'डीएड'ला असताना माझ्या लिखाणाला माझे त्यावेळचे सहकारी आणि आताचे प्रथितयश कवी दयासागर बन्ने यांचे सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत राहिले आहे. आता हे पुस्तकदेखील त्यांच्याच पुढाकाराने प्रसिद्ध होत आहे.अक्षरदीप प्रकाशनाचे प्रकाशक वसंत खोत यांनीही पुस्तक तात्काळ प्रसिद्ध करण्याची तयारी दाखवली. चित्रकार सुमेध संजीव कुलकर्णी यानेही  चित्रे आणि मुखपृष्ठ लवकर उपलब्ध करून दिले. या सर्वांचे मनापासून आभार.

या कथासंग्रहातल्या कथांमधील मुलं-मुली ही आपल्या आजूबाजूच्या परिसरातील शाळेत जाणारी आहेत. ही मुलं समजूतदार, स्मार्ट आहेत. दुसऱयांना मदत करणारी, आपल्या चुकांतून सावरणारी, वाचनाची गोडी लावणारी, असणारी आहेत. विज्ञानाची कास धरणारी, निसर्गावर प्रेम करणारी  आहेत. या कथा तुम्हाला नक्कीच आवडतील, यात शंका नाही. असे मच्छिंद्र ऐनापुरे सर मनापासून सांगतात.

शिक्षक ते पाठ्यपुस्तक लेखक

            मनमिळाऊ ,उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित असलेले  मच्छिंद्र ऐनापुरे यांचा शिक्षक ते पाठ्यपुस्तक लेखक असा प्रवास थक्क करणारा आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी डी.एड.पूर्ण करून जत तालुक्यातच शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांच्या विद्यार्थी सेवेची सुरुवात जून 1995 मध्ये उंटवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतून झाली. सुंदर अक्षरांची देणगी लाभलेल्या ऐनापुरे यांनी तिथल्या शाळेच्या भिंती बोलक्या करून टाकल्या. अभ्यासक्रमाबरोबरच मुलांना गोष्टींमध्ये रमवुन त्यांना अवांतर वाचनाची गोडी लावली. त्यांचा तिथल्या रोजच्या परिपाठाचा फलक  लिहिण्याचा शिरस्ता होता. क्रीडास्पर्धा,वक्तृत्व,भाषण ,सांस्कृतिक स्पर्धांमध्ये आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये अगदी जिल्हा स्तरापर्यंत मुले त्यांच्या प्रयत्नाने चमकली. त्यांच्या तिथल्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत आदर्श ग्रामीण शाळा, स्वच्छ सुंदर शाळा यासह अनेक पुरस्कार पटकावले.लोकवर्गणीतून शाळेचे बाह्यरूप बदलून टाकले. 

             जत शहरातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक 3 ही शाळादेखील त्यांनी 2009 मध्ये सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत स्पर्धेत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आणून पारितोषिक खेचून आणले. शाळा परिसरात जी हिरवीगार झाडं आहेत ती ऐनापुरे यांच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. मुलांचे अक्षर लेखन सुधारावे म्हणून त्यांनी जाईल त्या शाळेत अक्षर सुधार प्रकल्प राबवला आहे. शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धांमध्ये मुले चमकावीत यासाठी त्यांचे सतत प्रयत्न राहिले आहेत. शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेतही त्यांनी आपला सहभाग नोंदवून पारितोषिके पटकावली आहेत. गेल्या पंचवीस-सव्वीस वर्षात त्यांची उंटवाडी,जत क्र.3, अमृतवाडी, लमाणतांडा(निगडी बुद्रुक) येथील शाळांमध्ये सेवा झाली आहे.सध्या ते एकुंडी येथील शाळेत पात्र पदवीधर म्हणून कार्यरत आहेत. 

               एकीकडे शाळांमध्ये विद्यार्थी व शाळेची गुणवत्ता वाढवण्याचा ध्यास सुरू असताना त्यांनी  बालकथा व समाज सुधारणासंबंधी विविध लेखनाचा छंदही जोपासला आहे. आतापर्यंत त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून यात व्यक्तिचित्रे,बालकथा आणि हास्यकथा संग्रहांचा समावेश आहे. त्याचबरोबर किशोर, मुलांचे मासिक, केसरी-छावा, दैनिक दिव्यमराठीमधील किड्स कॉर्नरमध्ये त्यांचे सातत्याने लिखाण सुरू आहे. जवळपास ते वीस-पंचवीस वर्षांपासून लिखाण सुरू आहे. त्यांनी लिहिलेले  'धाडसी कॅप्टन:राधिका मेनन' हे व्यक्तिचित्रण बालभारती आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेशीत असून गेल्या चार वर्षांपासून हा पाठ मुलांना अभ्यासाला उपलब्ध आहे. पाठ्यपुस्तकात समावेशीत झालेले ते जत तालुक्यातील पहिले लेखक आहेत. त्यामुळे जत तालुक्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे. मराठी साहित्य सेवा मंचच्या माध्यमातून त्यांची अन्य साहित्यिक मित्रांच्या सोबतीने  जत तालुक्यात साहित्य चळवळ सुरू आहे. साहित्य संमेलने, कथा-काव्यलेखन कार्यशाळा, कवी संमेलने, पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन असे  अनेक उपक्रम जत तालुक्यात राबवली जातात.

     प्रत्येक शिक्षक विद्यार्थीप्रिय असतात परंतु शिक्षक आपले  आसू आणि हसू  यात फरक न करता , समाजात देणं लागतो आणि हे देणं विचाराच्या रूपाने फेडत असतो . त्याची प्रचिती मच्छिंद्र ऐनापुरे सर यांच्या कार्यावरून ध्यानात येते......

त्यांच्या भावी आयुष्यात अनेक यशाची  शिखरे सर करावीत . त्यासाठी त्यांना आम्हा सकल शिक्षक बांधवांकडून लाख लाख शुभेच्छा .... 



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


No comments:

Post a Comment