माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, November 16, 2021

आमचं गाव आमच्या परंपरा - व्हसपेठ




व्हसपेठ हे गाव पश्चिम महाराष्ट्र या प्रदेशात येते.  व्हसपेठ गाव जत या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 22 किमी पूर्वेला आहे . गाव छोटेशेच आहे. व्हसपेठ व राजोबाचीवाडी या दोन गावांची एकत्रीत ग्रामपंचायत आहे.
जत - सोलापूर या मार्गाने जत मधून वळसंग- कोळगीरी- व्हसपेठ असे जावे लागते. गावची लोकसंख्या 2500 इतकी असेल.गावाला नॅशनल हायवे नाही.परंतु राज्यमार्ग आहे. गावाला स्वतंत्र पिन 416413  आहे. गावात सातवी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी माडग्याळ ,गुड्डापुर येथे जावे लागते. पूर्वेला जत तालुक्यातील राजोबाचीवाडी , अंकलगी, दक्षिणेला गुड्डापुर, पश्चिमेला  कोळगीरी, वायव्येला सनमडी तर उत्तरेला मायथळ ही  गावे आहेत.  गावाला बसची सोय आहे. गावात कोणतीही बँक नाही.तसेच दैनिकबजार किंवा आठवडा बाजार नाही.  माडग्याळ ही जवळची बाजारपेठ आहे . गावात हिंदू मुस्लिम आणि बौद्ध धर्माचे लोक एकोप्याने राहतात.

अनोखी परंपरा 


गावाने दावल मलिक दर्ग्याची आणि उरुसाची परंपरा गेली अनेक वर्षे झाली जपली आहे. 

दावल मलिक हे दर्ग्याचे ठिकाण गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर पश्चिमेला आहे. पूर्व बाजू वगळता सर्व बाजुंनी डोंगर रांगांनी हे ठिकाण वेढलेले आहे . मध्यभागी डोंगराच्या एका टेकडीवर  दर्ग्याचे स्थान  आहे .पूर्वी दर्ग्याचे बांधकाम छोटेखानी होते. 2009 साली  दर्ग्याचे बांधकाम विस्ताराने केले आहे. समोर सभामंडप आहे. आतील भाग टाईल्स आणि कबरीचा भाग  पूर्णपणे संगमरवरी बसवून  मध्यभागी त्यांच्या कबरीचे  स्थान केले आहे .




 डोंगराच्या आजूबाजूचा परिसर सुंदर , देखणा आणि निसर्गरम्य आहे. जत तालुका हा दुष्काळी असला तरी पावसाळ्यात नयनरम्य वातावरण दिसते.निसर्गाचे मनोहारी रूप मनाला भावते . सभोवताली काही डोंगर रांगा 
आणि दक्षिणेला व्हसपेठ चा डोंगर अशा डोंगर रांगा आहेत. दर्ग्याच्या समोर व्हसपेठ तलावाचे  सुंदर रूप पाहायला मिळते. 





अशा या सुंदर ठिकाणी आता पर्यटक आणि भक्तांसाठी  पाण्याची सोय केली आहे.  गुलमोहर  ,वड , पिपर्णी चिंच  इत्यादी झाडे लावून  परिसर हिरवा गार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बोर आणि विहीर आहे.








आलेल्या भक्तांना निवारा म्हणून भक्तनिवास आहे.सदरचे बांधकाम  भक्तांनी दिलेल्या देणगीवर आधारित बांधलेले आहे.  लोक देवाला नवसाने घोडा ,खेळणे , गाडा, पाळणा असे घालतात. पूर्वी  लाकडी गाडी , घोडा , खेळणी घालत होते. बैल ,घोडा आणि गाडी हे नवसाने दावल मालकाच्या चरणी अर्पण केले जात होते. आताचे भक्त चांदीचा घोडा आणि चांदीचा पाळणा आणि खेळणे हे दावल  मालकाला श्रद्धेने अर्पण करतात.
दावल मलिक दर्गाच्या पाठीमागील टेकडीवरून विजापूरचा गोल घुमट दिसतो  असे सांगितले जात होते परंतु सदरच्या डोंगरावरून विजापूर अथवा गोल घुमट यापैकी काहीही  दिसत नाही.
          


   सुरज पैगंबर पाटील यांच्याकडे दावल मलिक दर्ग्याची देखभाल, पूजा अर्चा आणि व्यवस्था असते. सुरज यांच्याकडे वंशपरंपरागत व्यवस्था आलेली आहे. दर्ग्याची  देखभाल करणे म्हणजे  झाडून स्वच्छता करणे ,फुले घालणे, फुलांची चादर चढवणे , गालिब चढवणे, दिवा लावणे ,भक्तांची सोय करणे   इत्यादी कामे असतात.  दावल मालकाचे देवस्थान किती सालापासून आहे हे त्यांना नक्की सांगता येत  नाही. परंतु मागील किमान गेल्या चारशे-पाचशे वर्षापूर्वीचे हे देवस्थान असू शकेल असे सांगतात.  दावल मलिक हे इस्लामी संत होते. त्यांचे वास्तव्य  काही काळ या ठिकाणी होते असे सांगितले जाते. 
 त्यांचे ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्या त्या ठिकाणी त्यांचा दर्गा वसलेला आहे. देवस्थानासाठी 50 एकर जमीन आहे.जत तालुक्यात दावलमलिक व्हसपेठ  हे एकच ठिकाण आहे.  इथून जवळच्या  म्हणजे अनंतपुर तालुका अथणी येथे एक दावल मलिक दर्गा आहे.   वर्षातून एकदा  दावल मालिकांचा उरूस असतो. व्हसपेठमधील  उरूस हा रंगपंचमीच्या आसपास असतो. दावल मलिक यांचा उरूस 
हिंदू पंचांग प्रमाणे असतो.  इस्लामिक पंचांगाप्रमाणे किंवा
इस्लामिक कालगणनेनुसार दावल मलिक उरूस साजरा केला जात नाही. या उरुसाची तारीख किंवा तिथी कशामुळे ठरवली गेली हे त्यांना सांगता येत नाही. 
                 दर्ग्यात मांसाहारी नैवेद्य भक्तलोक घेऊन जातात. पुजारी कुराणातील काही ओळी म्हणतात. मोरपिसाने समोर  बसलेल्या भक्तांना आशीर्वाद देतात. धुनीतील भस्म अंगारा म्हणून दिला जातो.ज्यांना ताविज हवी त्यांना ताविज दिली जाते. यासाठी कोणतीही फी किंवा देणगी सक्तीने घेतली जात नाही. स्थानिक भक्त नवीन कपड्याच्या गलीब घालतात. 

        व्हसपेठ पंचक्रोशीतील  गावचे भक्त दावल मलिकाला नियमित स्वरूपात येतात.  गुरुवार हा दावलमलिक  देवाचा वार. परंतु बकरी, बोकड किंवा कोंबडे  कोणत्याही दिवशी कापतात. त्यांचा ठरलेला वार नाही. किंवा अमुक तमुक तारखेला कापले जात नाहीत असेही काही नाही.  वर्षभरात 365 दिवसांमध्ये पूर्ण दिवस  कोंबडी-बोकड-बकरी कापले जातात. हिंदू धर्मातील लोक श्रावण आणि अश्विन मधील नवरात्र मध्ये , त्याचबरोबर बुधवार आणि शनिवार या दिवशी बोकड बकरी कोंबडी कापत नाहीत. अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी भरपूर गर्दी असते.उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत भक्त  भरपूर येतात. त्यावेळी गुरुवारच्या दिवशी जवळजवळ शंभर ते सव्वाशे बकरी, बोकड आपले जातात. 
   वन डे फॅमिली ट्रिप 
सदरचे ठिकाण हे एका दिवसाच्या फॅमिली ट्रिपसाठी छान आहे. दावल मलिक ठिकाणापासून दक्षिणेला पाच किमी अंतरावर गुड्डापूर  आहे, तर आठ किमी अंतरावर सोरडी चे श्री दत्त भुयार आहे. पश्चिमेला श्री भैरवनाथ मंदिर कोळगीरी आहे.

शाही मस्जिद -आदिलशाही ओळख 




गावात आदीलशाही काळात बांधलेली ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण मश्जिद आहे. गावातील शाही मशिदीचा घुमट पूर्वीचा गूळ, चुना आणि वाळू या मिश्रणाने तयार केला होता. त्याला तडे गेल्यामुळे फक्त घुमट नव्याने केले आहे. 




व्हसपेठ या छोट्याशा गावास खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
इस्लाम अवलीया संत दावल मलिक यांच्या वास्तव्याने पावन झालेले हे गाव आदिलशाहीतील बादशहाने वसविले आहे. धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारदृष्ट्या हे गाव आजही समृध्द आहे. या गावात शाही मस्जिद, दावल मलिक दर्गा आणि जोग दरी ही  प्राचीन  अद्भूत ठिकाणे आहेत. दावल मलिक या सुप्रसिध्द दर्ग्याला  दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. दावल मलिक हे तालुक्यातील बहुतांशी लोकांचे  दैवत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ते प्रतिक आहे.

दावल मलिक यांच्यामुळे या गावास एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अगदी अलीकडच्या काळात हे गाव प्रसिध्दीस आले आहे, ते पवन ऊर्जा प्रकल्पामुळे.

 व्हसपेठ हे गाव विजापूरच्या आदीलशाह बादशहांनी वसविले आहे. याठिकाणी आदीलशहाला राजधानीचे शहर वसवायचे होते, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे व आजही गावचे काही  लोक सांगतात. 

व्हसपेठ गावाचे सुरूवातीचे नाव मुबारक पेठ असे होते. गावाची निर्मिती करताना सर्वात आधी आदीलशहाने एका भव्य मश्जिदीची  या ठिकाणी निर्मिती केली. इ.स. १५५७ साली मश्जिदीची उभारणी करण्यात आल्याचे याठिकाणचे लोक सांगतात. आजही ही मश्जिद सुस्थितीत आहे. बहामनी वास्तुशिल्प कलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे.
संपूर्ण दगडात मश्जिदीचे बांधकाम करण्यात आले आहे. भव्य घुमट, घुमटाच्या बाजूस दगडी बांधकामातील सुंदर मिनार, कमानी असे हे बांधकाम आहे. दूरून पाहताच ही वास्तू मनास भुरळ घालते. आदीलशहाने मुबारक पेठ या शहराच्या विकासाला सुरूवात केली, प्रारंभी व्यापार पेठेचे निर्माण सुरू झाले. गावात अनेक कामगार, शाही नोकर, अधिकारी यांचे वास्तव्य होते. मात्र त्याकाळी गावात व परिसरात भयंकर साथ आली. साथीने अनेक लोकांचा मृत्यू झाला. हाह:कार उड़ाला, लोकांनी गाव सोडून पलायन केले.  त्यामुळे मुबारक पेठच्या उभारणीचे काम आदीलशहास  अर्ध्यावरच सोडावे लागले. मुबारक पेठ हे संपूर्ण गाव ओसाड पडले. त्यामुळे लोक या  ठिकाणाला /  गावास वसाड पेठ म्हणू लागले. कालांतराने गावस  वसाडपेठ नंतर अपभ्रंश होऊन  व्हसपेठ असे नाव पडले. 

         वसाड पेठेच्या पश्चिमेस असलेल्या उंच डोंगरावर अवलीया संत दावल मलिक यांनी काही दिवस  वास्तव्य केले होते. हे संत लोकांना काही मार्गदर्शन करीत . माणुसकीची शिकवण  देत असत . या कारणाने अनेक  लोक दावल मलिक बाबांकडे येत असत.  त्यामुळे गावात पुन्हा  हळूहळू लोकवस्ती निर्माण झाली. दावल मलिक हे साक्षात्कारी महापुरूष होते. त्यांचे वास्तव्य असलेल्या डोंगरावर त्यांचा भव्य दर्गा उभारण्यात आला आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या दर्ग्यास तालुक्यातील लाखो भक्त येतात. हिंदू-मुस्लिमांसह अठरा पगड जातींचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून दावल मलिकबाबांचा दर्गाह  जत तालुक्यात प्रसिद्ध आहे. 

नवासाला पावणारे पीर अशी त्यांची ख्याती आहे. सर्वधर्मसमतेचे ते प्रतिक आहेत. मुस्लीम धर्मियांपेक्षाही हिंदू धर्मातील लोक मोठ्याप्रमाणात पिरसाहेब यांचे भक्त आहेत. विशेषत: गुरूवार, शुक्रवार व रविवारी भाविकांची विशेष गर्दी असते.

नवस बोललेले भक्त येथे बकऱ्याचा बळी देतात. व्हसपेठची    कंदुरी पंचक्रोशीत  सर्वत्र प्रसिध्द आहे. याठिकाणी केलेले अन्न अतिशय रूचकर असते, अशी त्याची ख्याती आहे.
" गुड्डापूरची पोळी अन् व्हसपेठची नळी" अशी म्हण आजही  पंचक्रोशीत प्रचलित आहे . 


काही लोक सांगतात की, कन्नड भाषेत व्हसा याचा अर्थ नवीन असा होता. बादशहाने याठिकाणी नवीन व्यापारी शहर उभारणीस सुरूवात केली होती. त्याचे नाव त्यांनी व्हसा पेठ असे दिले त्यावरून  व्हसपेठ नाव पडले असावे .  त्याचा मराठी अर्थ नवी पेठ असा होतो. या गावाची निर्मिती पूर्ण झाली असती तर कदाचित  आज ते जत तालुक्याच्या राजधानीचे ठिकाण बनले असते. 

लोकरीचे जेन बनवण्याचा व्यवसाय 
व्हसपेठ गावात लोकरीपासून जेन बनविण्याचा उद्योग प्रसिध्द आहे. ही हस्तकला  इथल्या पिंजारी समाजाने जिवंत ठेवली असून व्हसपेठच्या जेनास खूप मागणी आहे.  गावातील अनेक कुटुंबांचा तो प्रमुख व्यवसाय आहे. परिसरात ,तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यातील अनेक भागात व्हसपेठचे जेन प्रसिद्ध आहेत. इतकेच नाही तर शेजारील सोलापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील विजयपूर येथे देखील जेनास मागणी आहे. 

व्हसपेठला मोठे वनक्षेत्र ( forest area) आहे. याच परिसरात जोगी दरी हे सुप्रसिध्द प्राचीन गुफांचे ठिकाण आहे. व्हसपेठच्या पश्चिमेस नामशेष झालेली  गवळीवाडी  हे निर्जन गाव जंगलात आहे. असे हे व्हसपेठ गाव  छोटेशे  असले तरीही विविधतेने नटलेले गाव खूप प्रसिध्द आहे.

आधुनिकता
गावात विविध सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.तसेच काही सामाजिक संस्था दावल मलिक दर्गा परिसरात वृक्षारोपण करतात. निसर्ग प्रेमी , पर्यावरणप्रेमी ,सामाजिक संघटना आणि भक्त लोक आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने वृक्ष लागवड करतात. आता या परिसराला वेगळे रूप प्राप्त होत आहे . 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏






No comments:

Post a Comment