घोलेश्वर हे गाव जत तालुक्याच्या ईशान्येला 17 किमी अंतरावर आहे . पूर्वेला सनमडी दक्षिणेला काराजनगी, नैऋत्य दिशेला निगडी (खुर्द) , वायव्येला नराळे (ता-सांगोला ) आणि उत्तरेला येळवी अशी गावे आहेत. गावच्या महसूल हद्दीत तांबेवाडी , पाटीलवस्ती, यमगरवस्ती, जाधववस्ती, गायकवाडवस्ती अशा वस्त्या आहेत. घोलेश्वर गावची लोकसंख्या दोन अडीच हजार असेल. पण गावावर राहणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. कोरडवाहू शेती आणि पशुपालन याशिवाय इथे लोकांना जगण्यासाठी इतर व्यवसाय उपलब्ध नाहीत. गावात आठवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. विद्यार्थी पट संख्या मर्यादित आहे . पुढील शिक्षणासाठी नववी दहावीला सनमडीला , निगडीला किंवा जतला जावे लागते.काही पालक आपल्या हुशार पाल्याला पाहुण्यांकडे किंवा शहरात सोय करतात. मध्यम स्वरूपाचे शिक्षण झालेली मुलं शहराकडे जगायला जातात.
तालुक्यापासून घोलेश्वर गावाला जायला बस आणि वडापची सोय आहे. गावात पोस्ट ऑफिस नाही ,त्यामुळे पिनकोड नाही. घोलेश्वर गावाजवळ रेल्वे स्टेशन ,राज्य अथवा राष्ट्रीय महामार्ग नाही. गावात कोणतीही बँक नाही. गावात विकास सोसायटी आहे. आठवडा बाजार आणि दैनिक बाजार देखील भरत नाही. गावात सार्वजनिक वाचनालय नाही परंतु दैनिक वर्तमानपत्र उपलब्ध होतात. भाजीपाला बाजारासाठी शेजारील सनमडी, काराजनगी , निगडी आणि येळवी या गावी जावे लागते. जवळचे जनावर बाजार म्हणजे शेळी मेंढी साठी माडग्याळ तर गाय, म्हैस, बैल बाजारासाठी जत किंवा सांगोले येथे जावे लागते. आता गावातील काही लोक दुग्धव्यवसाय करतात. पण पाण्याअभावी तोही व्यवसाय म्हणजे तारेवरची कसरत आहे. आता कृष्णा नदीवरील म्हैसाळ योजनेचे पाणी घोलेश्वर ला आले आहे. इथून पुढे आता काही तरुण आपलं भविष्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.पोट भरण्यासाठी काही मंडळीनी गाव सोडलं असलं तरी गावाशी इमान राखणारी मंडळी अजूनही आहेत. त्यांनी गावाची परंपरा टिकवून ठेवलेली आहे. घोलेश्वर मध्ये हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात
गावाला घोलेश्वर हे नाव का पडलं ? त्याचं कारण असं की ओढ्याच्या काठी ईश्वरलिंग देवस्थान आहे. ते घोलात आहे. घोलात म्हणजे खोलात. बोलीभाषेत घोल म्हणजे जमिनीतील खोल जागा असाही त्याचा अर्थ होतो. जुना उतारा खोलेश्वर देवस्थान असा आहे.
हे प्राचीन असे शिवलिंग (ईश्वरलिंग) मंदिर आहे.हे शिवलिंग 8 व्या किंवा 9व्या शतकातील असावे असे दिसते. शिवलिंगाच्या अनेक आख्यायिका पौराणिक ग्रंथात आढळतात असे सांगतात. रामायण कालीन एक कथा ऐकवली जाते; ती अशी कि ,प्रभू श्री रामचंद्रानी वनवासात सीता शोधार्थ दक्षिणेकडे जात असताना ज्या ज्या ठिकाणी विश्राम केला. त्या त्या ठिकाणी त्यांना प्रिय असलेले भगवान शंकराचे शिवलिंग स्थापन केले आहे. त्यातीलच त्यांनी स्वतः स्थापन केलेले हे एक अतिप्राचीन जागृत देवस्थान. सदर मंदिराच्या पूर्वेकडून एक झरा ( ओढा) वाहत असून त्याचा दूधनदी (दूधगंगा) असा उल्लेख आहे. पूर्वी बरेच ऋषीमुनी या नदी काठावर जप, यज्ञ करत असत. मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेले पूर्वीचे दगड हे या मंदिराची प्राचीनता दर्शवितात. असे हे स्वयंभू शिवलिंग जमिनीपासून 10 फूट खोल जमिनीत (भूयारात) आहे. या शिवलिंगाच्या खालून भूयारी मार्ग असून तो थेट काशिविश्वेश्वराजवळ जातो असे सांगितले जाते. पण त्याची खुदाई केल्याशिवाय समजणार नाही. पूर्वी गणपत पाटील आणि रामचंद्र पाटील हे देवस्थान ची देखभाल करत होते. आता यमगर देखभाल करतात. पण देवस्थानची जमीन गणपत पाटलांकडे भोगवटादार म्हणून त्यांच्या कडे आहे. महाशिवरात्रीला पहिल्यापासूनच यात्रा भरते . पूर्वी उत्सवाचे स्वरूप आगदी छोटं होतं. पण आता थोडं स्वरूप बदलत आहे. सध्याचे स्वरूप म्हणजे महाशिवरात्री दिवशी सकाळ पासून संध्याकाळपर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचे संपूर्ण वाचन केले जाते. रात्री भजन कीर्तन आणि पहाटे महाप्रसादाची तयारी केली जाते . सूर्योदयाला शिवलिंगावर पुष्पवृष्टी केली जाते. पुष्पवृष्टी झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप केलं जातं. बारा ज्योतिर्लिंगा प्रमाणे हे शिवलिंग जमिनीच्या खाली दहा फूट खोलीवर आहे. खालचा दगड साधारण तीन बाय तीन फुटाचा आहे. मधले लिंग साधारण एका फूटाच्या व्यासाच्या आकाराचे आहे. "हे स्वयंभू शिवलिंग आहे ."असे मानतात. येथे पूर्वी मंदिर बांधकाम अपूर्ण स्थितीत होते. जमिनीत खाली उतरण्यासाठी शिवलिंगा पर्यंत दगडाच्या पायर्या होत्या. मध्यवर्ती ठिकाणी पिंड होती. वरून सारे मोकळं होतं. आता स्लॅब आणि काँक्रीटमध्ये भिंती आणि छत केले आहे. शिवलिंगाच्या समोरचा नंदी हा देखील भग्न अवस्थेत होता. विजापूरच्या आदिलशाही आक्रमणात तोडले गेले असावे, असे रामचंद्र पाटील यांचे पूर्वज सांगत होते. नंदीचे मुंडके उडवलेले अर्धेमुर्धे नंदी सध्या बेलाच्या झाडा जवळ व्यवस्थित ठेवलेला आहे. ................साली जीर्णोद्धार करताना एक भग्न मूर्ती सापडली. ती देखील अर्धीच होती.
ती द्वारपालाची मूर्ती आहे.मूर्तीच्या डाव्या हातात दंडक आहे. तो दंडक कमरेपासून खाली उभा धरून पायाशेजारी टेकवला आहे .द्वारपालाच्या शेजारी माठा सारखी एक वस्तू आहे. ही वस्तू म्हणजे दगडी जातं. तेही उत्खननात सापडले आहे.मध्यभागी उभे एक आणि आडवी दोन छिद्रे आहेत. ते आडवं जात आहे असं म्हणतात. जातं लालसर रंगाच्या कुरुंदाच्या दगडात घडवलेले आहे. समाज मंदिराचे बांधकाम मंदिराच्या शेजारी केलेले आहे. ग्रामपंचायत ने बांधले आहे. त्याचा उपयोग देवाचे साहित्य ठेवण्यासाठी सध्या केला जातो.
मंदिराच्या समोर दक्षिण बाजूला वेताळ उभे केले आहेत. त्यापैकी एक दोन वेताळावर मूर्ती कोरल्या आहेत. बाकीचे दगड तसेच उभे ठेवले आहेत. त्या सर्व वेताळांमध्ये शिवलिंग ठेवलेले आहे.
महाशिवरात्रि दिवशी सकाळी अभिषेक घातला जातो. अभिषेक ब्राह्मणाला बोलून घातला जातो. अभिषेकानंतर शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन केले जाते. 14 अध्याय एका दिवसात संपवायचे. शिवलीलामृत वाचन झाले की भजन-कीर्तन होते. शिवलीलामृत ग्रंथात याचा उल्लेख आहे असे म्हणतात पण त्याचा उल्लेख आम्हाला सापडलेला नाही काशी खंडात याचा उल्लेख आहे असे पण आम्हाला सापडला नाही ज्यांनी पाहिले ते लोक उल्लेख आहे म्हणून सांगतात. खैराव ,टोणेवाडी , सनमडी, माडग्याळ, कुणिकोणुर , जत येथून भक्त महाशिवरात्रि दिवशी इथे येतात. आम्ही अनुवादित ग्रंथ पाहिला पण त्यामध्ये असा उल्लेख सापडलेला नाही. शिवलीलामृत संपूर्ण 14 अध्याय मध्ये महादेवाचे वर्णन केले आहे. याला ईश्वर लिंग देखील म्हणतात. शिवलिंगाच्या खाली भुयार आहे आणि ते काशीला जातं असं म्हणतात. मात्र मंदिराचे दगड हेमाडपंती आहेत. मंदिर अपूर्ण आहे . मंदिराच्या बांधकामच्या इकडेतिकडे पडलेल्या दगडावरून लक्षात येते. मंदिर अपूर्ण राहण्याची अनेक कारणे असू शकतील.पण शिवलिंग मात्र हे पुरातन आहे.
जीर्णोद्धारासाठी आवाहन
अशा या महान व प्राचीन शिवलिंग मंदिराची खूप पडझड झाली आहे. सदर देवस्थान हे सध्या उघडयावर आहे. शिवलिंग मंदिर समोरील पुर्वीची, नंदीची मुर्तीही भंग झालेली आहे. बांधकामासाठी वापरलेले मोठमोठे दगड इतस्ततः आणि अस्ताव्यस्त पडलेले आहेत. असे हे प्राचीन व जागृत असणारे शिवलिंग मंदिर पडझड झाल्यामुळे दुर्लक्षीत झाले आहे. तरीही दरवर्षी महाशिवरात्रीला आजुबाजूच्या परिसरातील हजारो शिवभक्त दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री व प्रत्येक सोमवारी परिसरातील भाविक आणि भक्त दर्शन व अभिषेक करण्यासाठी लांबून येतात. पण येथे पिण्याचे पाणी व अन्य व्यवस्था नसल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे दैनंदिन पुजेसाठी मंदिर बांधकामासाठी व भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचेही मंडळाने योजले आहे. त्यामुळे परिसरातील शिव भक्तांनी सदर मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे दैवी कार्य हाती घेतले आहे. मंदिराचे बांधकाम भव्यदिव्य करण्याचा मंडळाचा संकल्प आहे.
या वर्षी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करायचा नव्याने ठरवले होते. नव्याने नोकरीला लागलेले त्याचबरोबर राजकीय नेते यांचाही सत्कार करायचं होतं.
गो शाळा ------
गोमुत्र व गोमय( गायीचे शेण ) हे शेतीसाठी सर्वोत्तम नैसर्गिक खत आहे. त्यामुळे गाय ही पशु नसून चालते फिरते इंडस्ट्रीज आहे. आजच्या युगात समाजामध्ये म्हणावी तितकी सामाजिक जागृती नसल्यामुळे गायी कसाबाला विकल्या जातात. या माध्यमातून समाजजागृती व्हावी यासाठी गो-शाळा उभारण्याचा मंडळचा संकल्प आहे.
महान शिवभक्त अहिल्यादेवी स्मारक
आपल्या भारत देशात अहिल्यादेवी होळकर या एक महान शिवभक्त होऊन गेल्या. त्यांनी समाज जागृती करून देशातील अनेक ज्योतिर्लिंगाचा जिर्णोध्दार केला आहे. अशा या महानशिवभक्ताचे स्मारक उभारण्याचे नियोजन केले आहे.तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण करून बालोदयान तयार करण्याचेही नियोजन केले आहे.
पिर गैबीसाहेब
पिर गैबीसाहेब मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथुन घोलेश्वर येथे आलेले आहेत. घोलेश्वर गावचा सात पिढ्यांपूर्वी पूर्वी एक भक्त मंगळवेढ्याला गैबी पीराला वारंवार जात होता. बापूसाहेब साहेब नाईक हे त्यांचं नाव. बापूसाहेबांना एकदा साक्षात्कार झाला. पीर गैबीसाहेब बापूसाहेबांना म्हणाले," तुला काय मागायचं ते माग".
यावर बापूसाहेब म्हणले ,"माझ्यासंग तू येशील का?"
असं म्हटल्यावर पीर गैबीसाहेब बापूसाहेब यांच्या बरोबर निघाले .
चल ..! कुठे सांगशील तिथे येतो.
पण इथून निघालास की कुठं विसावा घेशील तिथं मी पण बसणार. त्याठिकाणी माझं तुला ठाणकं करावं लागेल.
त्यावर बापूसाहेबांनी पीर गैबीसाहेबाला होकार दिला आणि त्यांच्यासोबत चालू लागले. बापूसाहेब यांना चुट्टा ( चिलमीचा एक प्रकार ) ओढायचा नाद होता. रुईचं झुडूप बघून ते विसाव्याला थांबायचे . घोलेश्वरला येताना नंदेश्वर , हुन्नूर, येळवी या तिन्ही गावात पीरसाहेबांच्या विश्रांतीच्या ठिकाणी पादुका आहेत. पीरसाहेबांना आवडलेली ही जागा. संपूर्ण जागा सनमडी शीव, गडानी जंगल , वरची मुसलमानवस्ती वरतं नऱ्याळ शीव, हा सारा भाग हिंडून झाल्यावर या सध्याच्या ठिकाणी ते स्थिर झाले.
बापू नाईक यांची समाधी पीर गैबीसाहेबांच्या दर्ग्या समोर आहे. पश्चिमे कडील कबर ही बापूसाहेब, मध्ये बायको आणि पूर्वेला भाऊ अशा तीन समाधी दर्ग्याच्या समोर आहेत. दर्ग्याच्या सभोवताली मोकळी भिंत बांधलेली आहे. सभामंडपाचे बांधकाम पन्नास वर्षांपूर्वी मुंबईतल्या लोकांना नोकरदारांनी केले आहे. सुसुरूद्दीन यांच्या कारकिर्दीत तो दर्गा झाडून पुन्हा बांधला असे सांगतात. त्यांच्या हाताखाली दोन लाडजी नामक गवंडी काम करत होते. भक्तासाठी भक्त निवास बांधले आहे. सध्या ट्रस्ट स्थापन केलेले आहे. उर्दू शाबान च्या पहिल्या दिवशी देवाचा गंध असतो. गंध म्हणजे चंदनाचा संपूर्ण कबरीला लेप देतात. मौलाना असतात.ते मंत्र उच्चारून करतात. रात्री आठ ते दहा वाजण्याच्या वेळेत हे कबरीला लेपन होते. दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता बकरी असतात. पाच वाजता नैवेद्य असतो. रात्री आठ नऊच्या दरम्यान सबीना म्हणजे मिरवणूक असते. सबिना गावातून पुजाऱ्याच्या घरातून निघतो. पुजाऱ्याचा मान परंपरेने दिलेला आहे. जो मोठा भाऊ त्याला ह्या पूजा करण्याचा त्यांचा मान. सबिना मध्ये नेमकं गलिब असतात . दोन तुरबद (दोन कबर )वर गलिब घातला जातो. गलिब म्हणजे तुरबदवर घालायची चादर (वस्त्र ) . ज्या ज्या भक्तांनी नवस बोलले असेल त्यांनी पुजाऱ्याच्या घरी गलिब आणून द्यायचे. ते घोड्यावर सर्व गलिब घोड्यावर घालून वाजवत जाऊन घालून यायचं. प्रत्येकाने म्हणजे सर्वांनी दिलेलं गलिब तुरबदवर चढवायचं. नंतर अत्तर मारून फुलांची चादर चढवतात. शेवटी दुवा सलाम करून सर्वजण तिथून निघतात. दुवा सलाम कोणी मौलवी आले तर ते करतात नसेल तर पुजारी मुख्य करतात. दुवा सलाम मध्ये फात्या- कलमा बोलल्या जातात. त्यानंतर रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. गंधाच्या तिसऱ्या दिवशी कुस्त्या असायच्या.आता कुठे त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने कुस्त्या सध्या बंद आहेत.
प्रत्येक गुरुवारी अमावस्या आणि पौर्णिमेला देवाला प्रसाद म्हणजे कवल ( कौल) लावायला पंचक्रोशीतील अनेक लोक येतात. मुस्लिम सोडून इतर जातीचे लोक कवल लावायला अधिक येतात. सध्या संतोष यमगर हे कौल लावून बघतात. पूर्वी संतोषचे आजोबा कौल लावून बघायचे. त्याला तारक पाळायला लागते. ज्यांना हे जमतं, ते कौल लावून बघायचे. 2015 पासून संतोष यमगर कडे आहे. देवस्थान मुस्लिम असले तरी मानाचा प्रसाद आणि कौल लावणारा माणूस धनगर आहे. गावात मोहरम देखील साजरा केला जातो. पंजा डोला ठेवलेला आहे. सजावट करून मिरवणूक काढतात. पूर्वी ढोली लाकडाची होती , पण आता लोखंडी परमनंट बनवलेले आहे.
पूर्वी घोलेश्वर गावात घुळी सोडण्याची पद्धत होती. ते पिराला लोकं नवस बोलायचे. माझी गाय गाब जात नाही. वासरं जगत नाहीत, गाय दूध देत नाही, जनावर टिकत नाहीत. तेव्हा लोक घुळी सोडायचे.घुळी म्हणजे खोंड लहान असताना देवाच्या नावानं पिराच्या दारात आणून सोडायचं. त्याला कोणी अडवायचं नाही. ते कुठेही फिरणार. कुठेही खाणार. त्यावर मालकी हक्क फक्त पिराच्या पुजाऱ्याचा. विकून पैसे घ्यायचे की देवाला द्यायचे तो ठरवायचा. आता घुळी कोणी सोडत नाही. घुळी नुकसान करायला लागला. बैलांना मारायचा. फक्त गाडीला जुंपलेल्या बैलाला मारायचा. त्यामुळे ही परंपरा गावकऱ्यांनी बंद केली .
म्हातारदेव - खंडोबा
म्हातारदेव - खंडोबा देवाचे देवस्थान गावाच्या ईशान्येला गावापासून दोन किमी अंतरावर तांबेवस्तीवर आहे. वस्ती धनगर समाजाची आहे . म्हातारदेव- खंडोबाची यात्रा प्रत्येकवर्षी पौष पौर्णिमेला भरते . यात्रेचे स्वरूप म्हणजे म्हातारदेव- खंडोबा आणि बानुबाई यांचा लग्न सोहळा. ही जत्रा तांबेवस्ती , घोलेश्वर गाव आणि पंचक्रोशीत मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. काहींचं मत आहे की खड्ग म्हणजे खंडोबा. हा देव भक्तीने इथं आलेला आहे. साधू तांबे यांनी देव प्रथम इथं आणला. साधू तांबे यांनीच देव्हाऱ्याचा देऊळ बनवला असे म्हणतात. म्हणजे खंडोबा आधी इथं घरात देव्हाऱ्यावर पूजला जायचा. साधू तांबे यांच्या अतीव प्रेमाने आणि भक्तीने देव मंदिरात ठेवण्याच्या आत्यंतिक प्रेमामुळे येथे खंडोबाचे देऊळ बांधण्यात आले. साधारण 1871 साली आधी लहानसे देऊळ बांधले होते. आज दीडशे पेक्षा जास्त वर्षांची परंपरा या जत्रेला आहे .
आधी जत्रा वालुग डोंगरावर भरायचा. देवापुढची भाकणूकिची जागा विकास कामातून कोबा केला आहे . सध्या देवाची पूजा भावबंदकीत बारा महिने वाटून आहे. प्रथम गुंडा आणि धोंडीबा तांबे हे दोघे भाऊ दोघे पूजा करत होते. देवाचे भक्त देवाला आले की भंडारा लावायचं. काही दान देणगी जमा व्हायची. ती रुपया आठाणी गोळा करायचे. वारी मागत गावोगावी जायचे. बाहेर कमवायला गेलेले गावकरी, मेंढके , पै-पाहुणे यांच्याकडून देणगी गोळा करायचे. आणि देवाच्या मिळकतीत मिळवायची.
मंदिरात म्हातारा देव मध्यभागी . देवाच्या दोन बायका. डाव्या बाजूला म्हाळसा व उजव्या बाजूला बानुबाई असते. खंडोबाच्या शेजारी आणखी एक मुखवटा तो म्हणजे खंडोबाचा हेगडे प्रधान आहे. परधानजी देवाच्या डाव्या बाजूला मागे असतो. देवाच्या समोर छोटे छोटे घोडे, छोट्या मुर्त्या नवसाने घातलेल्या आहेत. बाकीचे देवाला लागणारे साहित्य वेळोवेळी घेतलेले आहे. मंदिरात ढोल, शिंग, घंटा, घंटी , धुपआरती, आरती ,समई , पाण्याची घागर , घडा ,इत्यादी वस्तू देवासाठी खरेदी केलेले आहेत. देवाचे मनाचे तुरे घोंगडीवर पूजतात. ते तुरे चांदीचे किंवा इतर धातूंचे असतात. देवाच्या उजव्या हाताला देवाचे शस्त्र मांडलेले असते. शस्त्र म्हणजे जाड वेळूची काठी असते, ते हत्यार भक्त नवसाने घालतात . त्या शस्त्राचं एक टोक लोखंडी अणकुचीदार असते तर दुसऱ्या बाजूला दुधारी पातेरि भाला; असे असते. देवाची वीस-पंचवीस हत्यारे आहेत. ज्यांच्या अंगात स्वारी येते म्हणजे ज्याच्या अंगात देव भरतो , देव येतो ; ते हातात काठी ( शस्त्र)घेऊन नाचतात, खेळतात.
यात्रा पौष पौर्णिमेला असते. देवाचं लग्न विधिवत लावलं जातं. आपल्या माणसाचं लग्न लावतात अगदी तसंच देवाचं लग्न लावलं जातं. पूर्वी पाच दिवस लग्न चालायचे ; पण आता देवाचं लग्न दोन दिवस चालतं. रोहिणी नक्षत्राला हळदी लागतात आणि मृग नक्षत्रावर देवाच्या अक्षता पडतात.
यात्रेच्या वेळी देव पाण्याला जाताना सनई आणि ढोल वाजवत घेऊन जातात. सनई वादकाला मानपान दिला जातो. यात्रेची पूर्वतयारी म्हणून विजापूरच्या तासबावडीला पाणी आणि फुलं आणण्यासाठी इथले लोक जातात. वर्षभर लागणारा भंडारा, गुलाल, उद ,पानं , कुणाचे नवसाचे तुरं इत्यादीचा बाजार तिथे केला जातो. पाणी आणायला चार-पाच भालेकरी हातात शस्त्र घेऊन जातात. आधी चालत जात होते. आता वाहनाने जातात. नवसाने काहीजण वाहन पुरवठा करतात. निघताना मरगुबाईच्या देवळापर्यंत ढोल, शिंग, सनई वाजवत देवाच्या नावानं चांगभलं आणि देवाचा घोष करत निघतात. साऱ्यांना सुखाचा प्रवास घडू दे म्हणून कपाळावर भंडारा लावायचा आणि मग निघायचं. गेलेल्या दिवशी रातोरात तिथंच मुक्काम करायचा. सकाळी उठून आंघोळ करायची. बावडीत आंघोळ आता करू देत नाहीत. बाहेर चावीला आंघोळ करायची. इथून जाताना भक्तांनी दिलेली देणगी आणि सोबत आलेल्या भक्ताकडून पन्नास-शंभर रुपये गोळा करून वर्षाचा बाजार घ्यायचा. काही रक्कम उरते. माघारी येताना राजोबाचीवाडी, व्हसपेठ , सनमडी या वाटेने येताना भक्त वालग्यांना जेवण देतात.
ताज बावडी च्या पाण्याने ते देव धुतले जातात म्हणजे त्या पाण्याने हळदीची अंघोळ घातली जाते . विजापूरची पानं आणलेली त्यांच्यावर देव ठेवायचं. नंतर चंद्रभागा आणि कृष्णा नदीचे आणलेल्या पाण्याची देवाला तांदळाची (अक्षता ची) अंघोळ घातली जाते . चंद्रभागेचे पाणी उचेठाण बटाण (जि- सोलापूर) येथून आणि कृष्णा नदीचे पाणी अथणी (कर्नाटक) येथून आणलं जातं. नदीला जायचं. नारळ फोडायचा. पूजा करून पाणी कळशी भरून आणायचं. देवाची उरलेली देणगी बँकेत सुरक्षित ठेवली जाते. देवाला भक्त नवसाने सोने-चांदीचे दागिने घालतात सध्या चार तोळे सोने देवाचे आहे, असे म्हणतात. खंडोबाला बकरी कापत नाहीत. कारण खंडोबा शंकराचा अवतार.
म्हाताऱ्या देवाची यात्रा म्हणजे खंडोबाचं लगीन लावलं जातं पण या खंडोबाला म्हातारदेव का म्हणतात? त्याची आख्यायिका अशी, की देवानं बानुसाठी म्हाताऱ्याचं रूप घेतलं होतं. असं ओव्यामध्ये गायलं जातं. म्हाळसा आणि बानूबाई या दोन बायका. पण बानूबाई साठी देव म्हातारा झाला होता. खंडोबा हा शंकराचा अवतार. तो लिंगधारी. मटण वर्ज्य. त्याचं असं झालं ,की भगवान शंकर तीर्थाटन करताना सोबत पार्वती ला घेऊन जात होते, भगवान शंकराला पार्वती डोईजड झाली. तेव्हा शंकराने तिला सोडून जाण्याचा विचार केला. तेव्हां पार्वती शंकराला म्हणाली, " देवा महादेवा, मला इथे या नगरात प्रामाणिक माणसाच्या घरी सोडा, तुम्ही माघारी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन या .त्यानंतर मी तुमच्यासोबत येते. तुम्ही माघारी आला की आपण पुन्हा एकत्र राहू .
जेव्हा देव जेजुरी खंडात आले आणि म्हाळसाईशी लग्न झालं. पण तीर्थाटन मध्ये आपण सोडून गेलेलो ती पत्नी आपल्याला पुन्हा मिळवायव्ही आहे.शिकारीचा बहाणा करून देव आणि परधान दररोज जायचे . म्हाळसा देवाला सांगत होती की तुम्ही शिकारीला जाऊ नका.देव कोणाची शिकार करणार ? हे म्हाळसाला अगदी उमगलं होतं. खंडोबा आणि प्रधानजी दोघे एका बनात शिकारीला जातात. देवाला तहान लागलेली असते. बानू मेंढरं राखत असताना , एका भांड्यात पाणी घेऊन येत होती. देवाने म्हातारा माणसांच रूप घेऊन देव धनगराच्या वाड्याला गेला. बानुच्या बाबाच्या घरी म्हातारा देव चाकरी राहिला. पडतील ती कामं करू लागला. मेंढरं धरायची, धुवायची , कतारायची . पण हा म्हातारा मेंढरं राखायची , त्यांना सांभाळायचं , वाद स्वच्छ करायचा . पुन्हा हा म्हातारा मेंढरं धरायचा आणि आपटायचा , मेंढरं मारायचा. बानुला वाईट वाटू लागलं. बानू म्हातार्याला म म्हणाली तुम्ही काहीही करा पण माझ्या बाबांची मेंढरं होती तशी जिवंत करून द्या. म्हाताऱ्यानं शब्द घेतला बानू कडून. तू मला वर. माझ्या गळ्यात माळ घाल. मग सारी मेंढरं जिवंत करतो. बानुला जिंकण्यासाठी मेंढर मारली होती. बानूला जिंकल्यावर म्हाताऱ्याने तारुण्य रूप घेतले आणि बानूला घोड्यावर बसवून गडावर आणली . तेव्हापासून हा दोघांचा लग्नसोहळा प्रत्येकवर्षी उत्साहाने साजरा केला जातो .
विजापूर ताजबावडीचं पाणी पालखीत कळस मांडून हळदीचे पाणी घालतात. तांदळाचे पाणी कृष्णा आणि चंद्रभागा नदीचे पाणी देवाला घालून अंघोळ घालतात. आंघोळ पाणी तापवून घालतात. नंतर देवाला आहेर केला जातो. पुजाऱ्याच्या हस्ते देवाला अंघोळ घालतात. बाकीची भावभावकी धरू लागतात. थोरल्या भावाच्या अंगात देवाचा प्रवेश होतो. देव घुमायला लागतो. पाणी घेऊन येताना पावित्र्य राखले जाते. शौचमूत्र विसर्जनाला कोणी थांबणार असेल तर तो पाण्याचा कलश दुसऱ्याच्या हाती द्यावा लागतो. मलमूत्र विसर्जन केल्यास हात पाय स्वच्छ धुऊन मग त्या घागरीला धरायचं. हे पाणी डोक्यावर ठेवून आणलं जात. आंघोळ करूनच पाणी धरायचं म्हणजे पाण्याच्या कलशाला पुन्हा हात लावायचा . देव अंगात आला तरच त्या आंघोळीचं पाणी स्वीकारले जाते. तेही त्याचं टाइमिंग आहे. त्या वेळी पुजारी अंगात येऊन देव सांगतो. हळदी किती वाजता लावायच्या. अक्षदा किती वाजता टाकायच्या. भाकणूक कधी होणार? या साऱ्याची वेळ सांगितली जाते. रात्रभर धनगरी ओव्या गायिल्या जातात. वालगी गजी खेळतात. गजी म्हणजे धनगर लोकांचे गजनृत्य. या वालग्यांना आसपासच्या पंचक्रोशीत लग्नविधी ,सवासनी ,वास्तुशांती ,बारसं, जावळ इ. कार्यक्रमात मनानं बोलावलं जातं.
तांदळाच्या आंघोळीनंतर देवाला आहेर चढवला जातो . मूर्तीला फेटा , शाल ,दोन झंपर पीस, दोन्ही बायकांना साडी , ओटी सामान असलं . नंतर देव गादीवर बसवला जातो. देवाच्या समोर दीपमाळ आहे. दीपमाळ पर्यंत माणसं बसलेली असतात. तांदळाच्या अक्षदा मंगलाष्टके म्हणून टाकतात. पाच मंगलाष्टके म्हणून पाचवेळा अक्षता टाकतात. मग महाप्रसाद होतो. त्यानंतर सांगितलेल्या वेळेवर भाकणूक सुरू होते. भाकणूक सांगायच्या आधी ढोल वाजवून सवारी चढवली जाते. मोठ्याने देवाचा घोष केला जातो .चांगभलं बोलतात. वेळेवर भाकणूक होते . भकाणूकी साठी दोन घडे पाण्याने भरून ठेवली जातात . दोन पिकासाठी दोन घडे वेगवेगळे वापरले जातात. बाजरी (खरीप) आणि ज्वारी (रब्बी) पिकाचा दाखला दिला जातो. घड्यावरून पावसाचा अंदाज वर्तवला जातो. जिकडे पाणी लवंडलं जाईल तिकडे पाऊस पाणी आबादानी असेल असं समजून घ्यायचं. ज्या बाजूला घड्यात पाणी वतलं जात नाही; ती बाजू पाऊस काळ कमी होण्याचा अनुभव लोकांनी घेतला आहे. वाचा बदल करून चालत नाही. पुजाऱ्याला पाळणूक कट्टर करावी लागते. भाकणूकी नंतर भक्त आपापल्या घरी जातात. त्या रात्री देवाची वरात काढली जाते. वरतीनंतर देव व्यवस्थित गादीवर ठेवतात. पाच दिवस देवाचं बाशिंग तसंच ठेवलं जातं. पाचव्या दिवसानंतर देवाच बाशिंग नैवैद्य तयार करून दाखवून देवाला जेवू घालून नारळ फोडून मग कार्यक्रम संपवला जातो.
मणी मल्ल्या हे दोन दैत्य. देवाला भ्या घालत होते. पण बानूनं आणि खंडोबानं त्याला घोड्याच्या पायाखाली घालून खडगाने मारलं. तेव्हा मरताना मणी मल्ल्या नं वगमान (उ:शाप) मागून घेतला. त्याला वर मागायला सांगितले. तेव्हा मणी मल्ल्या यांनी " चार घरं मागून आम्हाला जेऊ घाल "असा वर मागून घेतला. तेव्हा पासून खंडोबा मल खणाची वारी मागून त्याला जेवू घालतो. तशीच वारी आम्ही आजही मागतो.
खंडोबा देवाचं मूळ ठिकाण जेजुरी ,पाली . साधू तांबे हा आमचा अज्जा. साधू तांब्याची भक्ती होती जेजुरीच्या खंडोबावर . तांबेवस्ती वरून पुढे देव कुलाळवाडी ला जाऊन विसावला असं सांगतात. आमची भावकी म्हणजे तांबे काही लोक कुलाळवाडी ला आहेत. साधू तांबे कुलाळवाडीला भाकणूकीला जात असत. साधू आज्या पासून आजही जत्रेला भाकणूक प्रत्येक वर्षी चालू आहे.
देवाच्या विकासासाठी मा. आ. प्रकाश आण्णा शेंडगे यांनी सात लाख रुपये देणगी देवस्थानला विकासासाठी योजना आणली होती. पण देवस्थानाला जागा नसल्यामुळे ती स्कीम माघारी गेली, म्हणतात. देवाच्या मनात येईल तेव्हा हुईल की ,असा विश्वास भक्तांना आहे . आटपाडकर वस्तीजवळ बाळूमामाचे देऊळ देखील आहे. त्यांचे ठाणकं केले आहे.
याशिवाय गावात हनुमान मंदिर आहे . हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला भजन करतात . तसेच मुस्लिम लोकांसाठी नमाज पठण करण्यासाठी आधुनिक मस्जिद गावच्या मध्यभागी आहे .
चिंचली मायक्का देवस्थान , घोलेश्वर. |
गावाच्या पश्चिम बाजूला गायरानात चिंचली मायाक्का चे देऊळ आहे . याची स्थापना कोणी केली नेमकं कुणाला माहीत नाही . धनगर जातीतील लोक मायाक्काला सवासनी जेऊ घालतात. मायक्का चं दूध , पौष पौर्णिमा देवीची यात्रा, वास्तुशांती तसेच धनगर जमतीमधील कुणाचं लग्न असेल तर मायक्का च्या सवासनी जेऊ घालतात. सवासनी दिवशी दिवसभर देवीचा महिमा सांगणारी गाणी गायली जातात. रात्री ओव्या गायिल्या जातात. कुणी सवासनी घरी जेऊ घालतं तर कुणी घरी स्वयंपाक करून आणून देवाच्या दारात सवासनी जेऊ घालतात . या कार्यक्रमाला मायककच्या सवासनी असं म्हणतात.सवासनी च्या वेळेला बायका मायक्का देवीची गाणी म्हणतात.
अलीकडची तरुण मंडळी कमाईच्या आणि पोटापाण्याच्या सोयीसाठी शहराकडे वळले आहेत . शाळेत शिकणारी मुलं , पशुपालन आणि शेती करणारे ,तसेच वयस्क नागरिक गावावर आहेत . बाहेरची मंडळी सण , उत्सव, आणि कारणा मरणाला तेवढंच गावी येतात .
गावातील काही तरुण मंडळी शिवाजी महाराज जयंती ,अहिल्यादेवी जयंती , गणेशोत्सव साजरा करतात.
महापुरुषांच्या जयंती सार्वजनिक ठिकाणी आणि एकत्रित व्हायला हव्यात असं प्रत्येकाला वाटतं..................!
धन्यवाद..............!
(या लेखाचा उद्देश अंधश्रद्धा पसरविणे किंवा कोणत्याही जाती अगर धर्माचा प्रसार करणे तसेच विशिष्ट लोकांप्रती आकस नसून , आज मितीच्या गावच्या परंपरा समाजासमोर ठेवणे हा आहे. सदरचे लेखन करण्यापूर्वी स्थानिक चौकशी आणि मुलाखत घेऊन माहिती घेतली आहे. याशिवाय आणखी काही अधिक माहिती अगर फोटो उपलब्ध असेल तर 9421181224 या व्हाट्सअप्प नंबरवर आपल्या नावासाहित सेंड करावे.)
🙏🙏🙏🙏🙏
#####################################
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#####################################
खूप अभ्यासपूर्ण लेख सर
ReplyDeleteNice collection .our villege ,our proud
ReplyDelete👌
ReplyDeleteखूप जुनी माहिती आपण संकलन केली आहे ,कदाचित पुढच्या पिडीसाठी हि माहिती सांस्कृतिक ठेवा म्हणून राहील
ReplyDelete