माझ्या दुष्काळी भागात
माझ्या दुष्काळी भागात
दिसतात दगड गोटे
पासरल्यात छोटे मोठे
माझ्या दुष्काळी भागात
ज्वारी बाजरीची कूस
वाट पाहती वरूणा
सांडली ना तुझी मूस
माझ्या दुष्काळी भागात
वारा सुटतो भरारा
सहा ऋतू मधी
धुळीचा भारी थारा
माझ्या दुष्काळी भागात
फुलला करंज फाल्गुनी
व्याकुळाल्या गड्याला
असा बसला बिलगुनी
माझ्या दुष्काळी भागात
लवंगीचा केला ठेचा
भुकेल्या आतड्यात
ठोरं भरती कचाचा
माझ्या दुष्काळी भागात
फुफाट्यात नाही पाणी
खोल पिंगट डोळ्यात
आलं पाण्यासाठी पाणी
माझ्या दुष्काळी भागात
कृष्णा येईल अंगणी
आजोबा पासुनी सारे
आम्ही चाललो झिंगुनी
माझ्या दुष्काळी भागात
कष्टाले नाही सीमा
किती राबलो राबलो
पोट हात रिकामा
No comments:
Post a Comment