संविधान जागृती अनिवार्य
भारतीय संविधानाचा समावेश अनिवार्य अभ्यासक्रमात व्हायला हवा .
प्रत्येक वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती , महापरिनिर्वाण दिन आणि भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो. भारतीय संविधानात नागरिकाचे मुलभूत हक्क, अधिकार, कर्तव्य याचा समावेश आहेच, पण त्या शिवाय देशाचा आदर्श राज्य कारभार कसा चालावा याचे नियम घालून दिले आहेत. समता, बंधुता याची शिकवणही संविधानात आहे. कोणत्या गोष्टी संवैधानिक व कोणत्या असंवैधानिक आहेत हे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कळणे महत्त्वाचे आहे. आजच्या शिक्षणात पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले तरी विद्यार्थ्यांना आपल्या संविधानाचा अभ्यास अतिशय कमी असल्याचे चित्र आहे. हे अज्ञान दूर करण्याचा निर्णय म्हणजे भारतीय संविधानाचा समावेश अनिवार्य अभ्यासक्रमात करणे हे होय. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम अनिवार्य करायला हवा आहे.
शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र हा विषय असला तरी त्यामध्ये अतिशय कमी म्हणजे फारच त्रोटक अभ्यासक्रम आहे. उच्च शिक्षणात देखील हा विषय शिकवला जात नाही. त्यामुळे भारतीय संविधान नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असताना देखील त्याची फारशी माहिती विद्यार्थ्यांना आणि सुजाण म्हणवणाऱ्या नागरिकांना नाही. शिक्षणात संविधानाचा समावेश नसल्याने विद्यार्थ्यांना किंबहुना उद्याच्या नागरिकांना याची जाणीव होताना दिसत नाही.
भारतीय संविधान विषय विद्यार्थ्यांना शिकवताना तो कशा पद्धतीने शिकवला गेला पाहिजे? त्याची पद्धत कशी असेल? अभ्यासक्रम, महाविद्यालयांना त्यासाठी देण्यात येणाऱ्या सूचना इत्यादींची सर्व जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे.तशा सूचना शिक्षण विभागाला द्यायला हव्यात.
"विद्यार्थ्यांना राज्यघटनेतील साध्या गोष्टी सुद्धा माहिती नसतात. त्यामुळे त्यांना राज्यघटनेची ओळख होणे आणि ते सुजाण नागरिक बनावेत हा उद्देश समोर ठेवून 'भारतीय संविधान' अभ्यासक्रम शिकणे अनिवार्य आहे."
" विद्यार्थ्यांना भारतीय संविधान महत्वाच्या तरतूदी कोणत्या आहेत?, राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया कशी होती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व घटकांचा विचार करून भारतीय समाज एक संघ कसा राहिल याचा विचार कसा केला? यासह इतर गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जाव्यात."
काही विद्यापीठाने संविधानाचा परिचय करून देण्यासाठी त्याचा अभ्यासक्रमात समावेश केला हा निर्णय महत्वाचा आहे. उद्याचा भारत कसा घडला पाहिजे? याचे स्वप्न संविधानाने दिले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो तपशिलात समजून घ्यावा. शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र विषयात संविधानातील आणखी अभ्यास वाढवावा यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवायला हवा.,
खरंतर संविधान हा विषय इयत्ता नववी पासून असायला हवा. आणि तो देखील अनिवार्य विषय असायला हवा.
शासनाने आठवी पर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले आहे .त्यामध्ये "जबाबदार नागरिक बनण्यासाठी आपण काय करायला हवे?" याची जण विद्यार्थ्याला येईल असा विषय प्रचलीत अभ्यासक्रमात नाही . किमान नवावीपासून अभ्यासक्रमात संविधान हा विषय अनिवार्य असायला काय हरकत आहे .
उच्च शिक्षण म्हणून महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भारतीय संविधान समाविष्ट केले पाहिजेच. केवळ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्याचा फार फायदा होईल असं वाटत नाही . संविधानाचा फक्त इतिहास वाचून शांत बसू नये, तर स्वरूप समजले पाहिजे. भविष्यात जुने संविधान आणि नवे संविधान असा अभ्यास करण्यापेक्षा सध्या मूळ संविधान समजून घेणे गरजेचे आहे ....
याशिवाय भारतीय संविधानाची खरी गरज आहे ती म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये . संविधान दिनाच्या दिवशी कुणीतरी प्रास्ताविक वाचून पाठीमागे म्हणून संविधान दिन साजरा होणार नाही आणि संविधान कळणार ही नाही .संविधान दैनंदिन जीवनात उपयोगात आणणे म्हणजे संविधानाचा आदर करणे होय.
प्रत्येक वर्षी गणपती/दसरा/दिवाळी ला दहा-पंधरा दिवस सुट्टी असते , तशीच सुट्टी संविधानाच्या परायणासाठी द्यावी किंवा संविधानाचे पारायण गावोगावी घ्यावे ...........
संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे , "प्रत्येक नागरिकाने कसे वागावे?" हे त्या ग्रंथात नमूद केले आहे .जर संविधानाच्या या पारायणामुळे संविधान लवकर कळत असेल तर पारायण घ्यायला काय हरकत आहे ?
मुळात संविधानाचा उद्देश तो काय आहे? प्रत्येक भारतीयाला आपले अधिकार आणि कर्तव्य कळायला हवेत .देशाची स्थिती कळायला हवी .
मी तर म्हणतो ग्रामपंचायतीच्या ,पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मासिक मिटिंग च्या वेळी (प्रत्येक मिटिंग वेळी ) पहिली 15 -20 मिनिटे संविधानाचे वाचन करायला हवे . एका दिवशी सारं काही शक्य नाही , परंतु प्रत्येकवेळी थोडा थोडा भाग वाचत गेले तर भविष्यातील काही दिवसात सर्व जबाबदार व्यक्तींना(सदस्य/ सभासद यांना) तरी संविधान कळेल की नाही ?
.jpeg)
No comments:
Post a Comment