मातृभाषेतील शिक्षण, विकासाचे लक्षण
शिकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भवितव्याची काळजी असते. त्याला व्यवहारी दुनियेत भाषेच्या अडसरामुळे कुचंबणा होऊ नये आणि ती रास्तही आहे. मुद्दा असा आहे की, बालकाच्या शिक्षणाचा श्रीगणेशा हा मातृभाषेतून व्हावा की परिसर भाषेतून की आंतरराष्ट्रीय (इंग्रजी) भाषेतून?
मुळात मातृभाषा म्हणजे काय ? तर ज्या भाषेचा जन्मापासून वापर केला जातो आणि जी बालकाच्या जीवनावर प्रभाव टाकते ती भाषा. मातृभाषेतून शिकताना होणारा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मूल या भाषेतून सहज संवाद साधू शकते आणि आपल्या अडचणीवर सहजरीत्या मार्ग काढू शकते. याउलट इतर भाषेतून शिक्षण सुरू झाले तर अपरिचित भाषा असल्याने समस्या काय आहे ? हेच न समजल्याने ते इतरांशी संवाद तो काय म्हणून साधणार? आणि आपल्या अडचणी कशा सांगू शकणार हाही प्रश्न आहे. आपल्या बालकाला अनोळखी जगात; जेथे त्याच्या जन्मापासून शिकलेले, ऐकलेले आणि बोलता आलेले असे काहीच नसेल अशा ठिकाणी ढकलणे कितपत योग्य आहे? प्रत्येकाने आंतरराष्ट्रीय भाषा अवगत करावी याबद्दल माझे दुमत नाही पण त्यासाठी अपरिचित जगात आणि बालवयात त्याला सोडणे हेही कितपत योग्य आहे? याचा विचार कुणी केला पाहिजे?
शिक्षणात काळानुसार आणि गरजेप्रमाणे होणारे बदल आणि नाविन्यता ही दैनिक वृत्तपत्र आणि मासिकातून प्रसिद्ध केली जाते. मातृभाषेव्यतिरिक्त इतर माध्यमातून दिलेल्या शिक्षणातील फोलपणा आता समाज माध्यमातून आणि प्रत्यक्षरित्या पालकांच्या लक्षात यायला लागला आहे. त्यामुळे सूज्ञ पालक मातृभाषेतून शिक्षणाच्या पर्यायाचा विचार करू लागला आहे. हा काळाचा महिमा म्हणावा की गरज ? शिकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ; ज्याची सुरुवात घरापासून होते आणि त्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते ती मातृभाषा. जी जन्माला येणारे बालक कोणीही न शिकवता सहजसुंदर पद्धतीने त्याचा वापर संवाद साधण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी करत असते आणि पालक मंडळींनाही त्याचे अप्रूप वाटते मग शिक्षणाचा श्रीगणेशा करतानाच हा विसर का पडतो? इतरांनी केले म्हणून की आपली ऐपत आहे म्हणून की आणखी काही. मुळात शिक्षणात संस्कृती, परंपरा आणि मातृभाषा यांचे मिश्रण असेल तर कोणतेही सामान्य बालक शिक्षणातील संकल्पना सहज समजून घेण्याची शक्यता जास्त असते. मातृभाषेतून शिकताना संकल्पना समजल्यामुळे बालकाचा आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन निराश होण्याची शक्यता कमी होते. त्याउलट त्याच्यात आलेला आत्मविश्वास अधिक यशाची भावना आणि शिकण्याकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करू शकतो. मातृभाषेतून शिक्षण घेण्याने बालकांच्या भावनिक, संज्ञानात्मक आणि सामाजिक विकासाला जलद आकार देणे सहज शक्य होते. संज्ञानात्मक शिक्षण म्हणजे मुलांच्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा विकास आणि मातृभाषेतील शिक्षण हे सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षणाचा एक महत्त्वाचा पैलू मानला जातो. मातृभाषेतून शिकल्याने शिकण्याकडे पाहण्याची सकारात्मकता वाढते. प्रभावी संवाद हा भाषेवर अवलंबून असतो आणि तो इतर भाषेतून साधताना चुकण्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होते मग बालकाच्या मनात निर्माण होणार नाही का? यावर इतर हसतील या भीतीने ते अव्यक्त राहते. परिणामी आत्मविश्वास कमी होत जातो आणि न्यूनगंड निर्माण होतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दुसरी भाषा शिकताना आपल्या मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो. पण पालकांकडून शाळा प्रवेशावेळी नेमकी हीच बाब दुर्लक्षिली जाते, त्याचा परिणाम वेळ गेल्यावर निदर्शनास येतो.पण पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेव्हा मातृभाषेचा पाया पक्का असतो तेव्हाच तुम्ही इतर भाषा आत्मविश्वासपूर्वक आत्मसात करू शकता नाहीतर मुलांची अवस्था 'एक ना धड, भाराभर चिंध्या' अशी झाल्याशिवाय राहत नाही.
मुळात मातृभाषेतून शिकणे हे मुलांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते असे म्हणताना इतर भाषांना कमी लेखण्याचा हेतू कोठेच नाही; तर ज्याची जी मातृभाषा आहे त्याने त्याचे शिक्षण त्या भाषेत घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे हा ' आहे. मातृभाषेतील शिक्षण हे प्रगल्भता, आत्मविश्वास आणि स्वसन्मान वाढवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्याचबरोबर शैक्षणिक विकासापलिकडे जाऊन आत्ममूल्य
आणि सांस्कृतिक ओळख वाढवते. जर का भाषेच्या अडसरामुळे मुलाची प्रारंभीच शिक्षणाविषयी नावड निर्माण झाली तर ते फक्त शरिरानेच शाळागृहात असेल पण मनाने तिथे कधीच रमणार नाही. शासनाच्या निर्णयानुसार ते इयत्ता आठवीपर्यंत जाईल पण तेथून पुढे येणाऱ्या महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्याचे काय?
दुसरी महत्त्वाची पालकांना सतावणारी अडचण म्हणजे पाल्याला आंतरराष्ट्रीय भाषा अवगत व्हायला पाहिजे आणि त्यासाठी इंग्रजी शाळा गरजेची आहे परंतु ते हे विसरतात की बहुतेक शिक्षणतज्ज, भाषातज्ज्ञ आणि मानसशास्त्रतज्ञ यांनी प्रारंभिक शिक्षण हे मातृभाषेतून शिक्षण झाले तर मूल स्वयंप्रेरणेने नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहते आणि त्यात सातत्यपूर्ण प्रयत्नाने यशस्वी होते असा संशोधनाअंती निष्कर्ष काढला आहे.
आज ज्या देशांची प्रगत म्हणून गणना केली जाते त्या देशात शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतूनच देण्याकडे कल आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फिनलंडसारख्या उत्कृष्ट शिक्षण - देणाऱ्या देशातही शिक्षण हे मातृभाषेतून दिले जाते आणि तेथील मुले ही जगातील प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत हे आपण मान्य करणार आहोत का? तंत्रज्ञानात जगात अव्वल असणारा जपान देश मातृभाषेतूनच शिक्षण देतो त्यांच्या मुलांना कोणतीच अडचण येत नाही याकडेही कानाडोळा करून चालणार नाही.
शेवटी एकच प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता असते आणि ती असायलाच हवी पण त्यासाठी इतर माध्यमातून पाल्याच्या शिक्षणाचा अट्टाहास नको; कारण मातृभाषेतून शिक्षण घेतलेले अनेक नेते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, अधिकारी, कलाकार हे जागतिक पातळीवर नामांकित म्हणून ओळखले जातात आणि आपल्या पाल्याची ओळख तशीच व्हावी यासाठी त्याची प्रारंभीच समज पक्की व्हावी व यशाचे टप्पे सहज पार करता यावे यासाठी आपल्या पाल्याला मातृभाषेतून शिक्षण देण्याला प्राधान्य द्यावे. ज्यांनी इतर भाषेतून शिक्षण दिले आहे त्यांनी त्यांना आलेल्या अडचणी इतरांना सांगून मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करावे हाच या लेखामागाचा उद्देश आहे आणि आपण तो सर्व मिळून पूर्ण करू याची समज आपल्याकडे नक्कीच आहे.
=============================
श्री. भाऊसाहेब दत्तू महानोर.
=============================
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment