।। श्री सिद्धनाथ देवस्थान, आलेगांव ।।
(१) श्री सिद्धनाथाचे प्रगट होणे :
साधारणपणे अंदाजे इसवी सन १६०० नंतर घडलेली घटना असावी. एक मूर्तीसारखी दिसणारी दगडाची शिळा या ठिकाणी म्हणजे आलेगावात होती. त्यावेळी आलेगांव हे गांव नसून फक्त घनदाट जंगल होते. सद्या आलेगांव व वाकी यांच्या सरहद्दीवर गवळीवाडी नावाचे लहानसे गांव होते. त्या गवळीवाडीतील चांभार समाजाची व सोबत इतर समाजातील लहान- मोठी मुले आपापली गुरेढोरे, शेळ्या मेंढ्या राखण्यासाठी व चारण्यासाठी या जंगलात येत असत. फिरता फिरता त्या गुराखी मुलांच्या नजरेला ही शिळा आली. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या शिळेलाच ती मुले देव मानू लागली. दररोज दुपारच्या जेवणापूर्वी या मानलेल्या देवाला नैवेद्य दाखवूनच ही मुले भोजन करीत असत. कुणावर काही संकट आले की ही मुले या मानलेल्या देवाला सांगत आणि त्यांची संकटे दूर होत असत. अशा अनेक चमत्कारामूळे त्या गुराखी मुलांचा भक्तीभाव वाढून या देवावर त्यांची श्रद्धा बसली व दिवसेंदिवस ती वाढू लागली. तेच हे श्री सिद्धनाथ होय.
(२) देवाला श्री सिद्धनाथ हे नांव कसे पडले ?
देवाला श्री सिद्धनाथ हे नांव कसे पडले ? या विषयीची एक दंतकथा आहे. पुराणामध्ये सोनासूर नावाचा राक्षस होता. तो खूप माजला होता. तो सामान्य लोकांना आणि देवादिकांना सर्वांना त्रास देत असे. काशी विश्वनाथाने जगाच्या कल्याणासाठी यज्ञ सुरु केला. त्या यज्ञात देखील सोनासूर राक्षसाने (दैत्याने) अडथळे आणल्याने काशी विश्वनाथांचा यज्ञ बंद पडला. काशी विश्वनाथाला (भगवान शंकराला) राग आला व आपल्या तिसऱ्या डोळ्यातून श्री काळभैरवाची उत्पत्ती केली. त्या काळभैरवाने सोनासूर दैत्याचा वध केला. ते ठिकाण म्हणजे परांडा तालुक्यातील सोनारी हे गांव होय. त्यामूळे काळभैरवाला 'सोनारसिद्ध' असे नांव पडले. तेच हे श्री सिद्धनाथ होय.
(३) आदिलशाही सरदारांच्या नवसाला देव पावला :
एके दिवशी गवळीवाडीतील गुराखी मुले जेवण करुन देवापूढे भजन म्हणत बसली होती. दगडांच्या टाळाच्या नादावर एक चांभाराचा मुलगा टीरीवर चापट्या मारुन आवाज करीत नाचत भजन म्हणत होता. त्याचवेळी विजापूरच्या आदिलशहाचा खजीना पाच ऊंटावर लादून कल्याणहून विजापूरकडे निघाला होता. त्या खजिन्याच्या रक्षणार्थ काही मोगल सरदार व सैनिक सोबत होते. चालत चालत या जंगलाच्या वाटेने येत असता दमल्यामुळे प्रवासाचा शीण घालवण्यासाठी ते सरदार व सैनिक एका झाडाखाली हुक्का पित बसले व ऊंटांना जवळच चरावयास सोडले. ते ऊंट चरत चरत आपरुपा नदीच्या सद्याची कोरडा नदीच्या कडेकडेने भलतीकडेच गेले व दिसेनासे झाले. काही वेळाने सैनिक उठून पहातात तो ऊंट गायब झालेले. सरदारांनी सगळीकडे शोध घेतला पण ऊंट काही सापडेनात. फिरता फिरता त्या सरदारांची नजर एका झाडाखाली बसलेल्या गुराखी मुलांकडे गेली व हरवलेल्या ऊंटांबद्दल विचारले. पण मुलांनाही काही सांगता येईना. शेवटी सर्व सरदार व सैनिक हताश होऊन खाली बसले व आदिलशहा आपल्याला कठोर शिक्षा करणार म्हणून रडू लागले. त्यांची ती केविलवाणी अवस्था पाहून गुराखी मुले म्हणाली, आमचा एक देव सिद्ध आहे. त्याला जर नवस बोललात तर तुमचे ऊंट परत मिळतील. फक्त आमच्या देवाला सावली करा. लगेच ते सरदार शिळेजवळ येऊन नवस बोलले की, "आम्ही तुमचे मंदिर बांधू, पण आमचे ऊंट परत मिळू द्या. नवस बोलताच ते सर्व ऊंट चरत चरत त्या ठिकाणी आले. त्या सरदारांनी देवापुढे मस्तक झुकवून ऊंटांना घेऊन विजापूरला निघून गेले. इकडे गुराखी मुलांना मात्र खुप आनंद झाला. हा देव मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सिद्ध आहे, तयार आहे. म्हणून सर्व लोक त्यास "सिद्धनाथ" असे म्हणू लागले.
विजापूरच्या आदिलशहाला, हरवलेले ऊंट एका हिंदू देवाच्या कृपेने परत मिळाले ही कहाणी विजापूरच्या आदिलशहाला समजली व त्वरीत तेथे मंदिर बांधा असा आदिलशहाने
हुकूम केला. त्यानुसार त्या शिळेवर मुसलमानी पद्धतीप्रमाणे घुमटे (शिखर) असलेले मंदिर बांधण्यात आले. त्यानंतरच्या काळात मोगलराजे हिंदुंची मंदिरे तोडून तेथे मस्जिद बांधीत असत. पण या मंदिराचा घुमट पाहून ती मस्जिद आहे असे समजून मोगलराजांनी या मंदिराला हात लावला नाही. आपला सिद्धनाथ व मंदिर त्या काळात सुरक्षित राहिले.
(४) गावाला आलेगाव नांव कसे पडले ?
श्री सिद्धनाथ हे नवसाला पावतात अशी सगळीकडे ख्याती झाल्याने गवळीवाडीतून काही चांभार मंडळी व इतर वाड्या-वस्त्यावरुन इतर समाजाची गावकरी मंडळी या मंदिराच्या जवळ आली व स्थायिक झाली म्हणून हे आले, ते आले व सिद्धनाथही आले यावरुन गावाला आलेगाव असे नाव इतर लोकांनी व आदिलशाही सरदारांनी दिले.
दुसऱ्या दंतकथेनुसार पूर्वी सद्याचे हतीद, सोनंद, डोंगरगांव इ. गावे म्हणजे लहान लहान वाड्या-वस्त्या होत्या. एकदा प्लेगसारख्या रोगाची साथ या पंचक्रोशीत आली. या आजारात माणसाचा मृत्यु हा ठरलेलाच असायचा. त्यामुळे घाबरून लोकांनी वाड्या-वस्त्या सोडल्या व श्री सिद्धनाथाच्या आश्रयाला या जंगल भागात आले. येथे घनदाट जंगल होते. निवडूंगाचे रान होते. या आलेल्या लोकांनी निवडूंग जाळून, जंगल हटवून वस्त्या केल्या. बाहेर गावाहून लोक या सिद्धनायाजवळ आले. म्हणून या गावाला आलेगाव असे नांव पडले.
श्री सिद्धनाथाच्या सत्वामुळे याच भागाला "नाथांची पंढरी" असेही लोक म्हणत असत. पण काही काळानंतर अपभ्रंश होऊन "नाथांची पांढरी" असे लोक म्हणू लागले.
(५) बाबरांचे गांव - आलेगांव :
१६०० व्या शतकाच्या सुमारास श्रीमंत शहाजी राजांनी श्री. महिपतराव बाबर व श्री. हैबतराव बाबर या सख्या भावांना आलेगांव, डोंगरगांव, सोनंद, खुपसंगी या चार गावांची सरंजामी दिली होती. तेच आलेगावचे बाबर वंशज होत.
सद्या गावात बाबर, लवटे,सलगर, वाघमोडे, हजारे, अनुसे,
कांबळे, वाघमारे, वाळके (यादव), मेटकरी, नाईक, दिवशे, मोरे, राऊत, गायकवाड, पाटील, माने, गडहिरे, नवघरे, जाधव, स्वामी (जंगम), शिंदे, कुंभार, फुलारी, दोडकुले, मुलाणी, डवरी आणि गुरव इ. सर्व समाजातील व सर्व धर्मातील लोक भांडणतंटा न करता "श्री सिद्धनाथाची" सेवा करीत गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
(६) रावसाहेब बाबर यांच्याकडून चांदीची पालखी अर्पण :
पूर्वी देवासाठी सागवानी लाकडाची पालखी होती. परंतु आता श्री. रावसाहेब माधवराव बाबर यांनी खास चांदीची पालखी करुन घेऊन श्री सिद्धनाथ चरणी अर्पण केली आहे. याच पालखीतून श्री सिद्धनाथ सोहळ्यासाठी निघतात.
श्री सिद्धनाथ हे चामड्याचे जोडे घालतात व हातात कोरडा (चाबुक) घेऊन घोड्यावरुन क्षेत्ररक्षण व भक्तांचे रक्षण करतात. भक्तांची अशी श्रद्धा आहे की वर्षभरामध्ये वापरल्याने देवाचे जोडे झिजतात म्हणून कांबळे (चांभार) समाज परंपरेप्रमाणे दरवर्षी देवाला नविन जोडा व कोरडा (चाबुक) तयार करुन देवाला अर्पण करुन धन्य होतात.
सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील सिद्धनाथ, परांडा तालुक्यातील सोनारसिद्ध, माण तालुक्यातील म्हसवडासिद्ध व मोहोळ तालुक्यातील अंकोलीसिद्ध हे सर्व बरोबरीने असून हे सर्व भैरवनाथ एकच सिद्ध आहेत. या सर्व सिद्धनाथांची यात्रा एकाच दिवशी म्हणजे चैत्र वद्य अष्टमीला सुरु होऊन चैत्र वद्य द्वादशीला पालखी सोहळा होऊन यात्रेची समाप्ती होते.
श्री सिद्धनाथ मंदिराविषयी
आलेगांवचे श्री सिद्धनाथ मंदिर हे दक्षिणाभिमूख असून परसदार पूर्वाभिमुख आहे. चारही बाजुंनी दगडी बांधकाम असून कमानीयुक्त ओवऱ्या आहेत. गाभाऱ्याचे द्वार हे लहान असून वाकून नतमस्तक होऊनच गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. सद्या फक्त पुजारी (गुरव) समाजच फक्त गाभाऱ्यात जातात. पुजाअर्चा करतात. दैनंदिन पूजाअर्चा गुरव समाजाकडे आहे. श्री सिद्धनाथ मंदिराच्या आजुबाजुला श्री बिरोबा, श्री सोनार सिद्ध, श्री विठ्ठल, श्री हनुमान, श्री महादेव यांची सुद्धा मंदिरे आहेत. त्यामुळे या परीसरात आल्यानंतर मनाला एकप्रकारचा सात्विक आनंद मिळतो.
(७) मंदिरातील नित्यनेमाचे कार्यक्रम :
मंदिरात घोड्यावर बसलेली श्री सिद्धनाथाची मूर्ती असून, मूर्तीसमोर देवाचा मुगुट (मुखवटा) आहे. देवाच्या मुर्तीच्या डाव्याबाजुला आईसाहेब जोगेश्वरी देवीची मुर्ती आहे. देवाच्या झेंड्याची काठी ही कर्नाटकाढून बांबूच्या बनातून सर्वात उंच व भरीव बांबूची आणतात. श्री सिद्धनाथाला पुरणपोळी, खीर, पेढे, बर्फी, भाजी-भाकरी असा गोडा नैवेद्यच दाखविला जातो. तर यात्रेमध्ये मंदिराच्या बाहेर दैत्यासाठी बकऱ्याचा बळी दिला जातो. प्रसाद म्हणून भांग वाटली जाते.
भांग बनविण्याची रीत :-
१) खसखस, २) खारीक, ३) खोबरे, ४) वेलची, ५) सुंठ, ६) बडीशेप, ७) काळी मीरी ८) जायफळ ९) गूळ
वरील सर्व वस्तु प्रत्येकी १० ग्रॅम घेऊन बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करतात. ती पेस्ट एक लिटर पाण्यात मिसळतात. त्यात जरुरीपुरता गूळ बारीक करून टाकतात. सर्व वस्तु पाण्यात पूर्ण मिसळल्यावर भांग तयार होते. यातील द्रवयुक्त भाग वस्त्रगाळ करतात.आणि घन भाग प्रसाद म्हणून वाटतात. या या वस्त्रगाळ करून घेतलेल्या द्रवरूप भागाला भांग म्हणतात.भांगेचा सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर प्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात येते. भक्तजन नवसाने सिद्धनाथाला भांग घालतात.
आजची नवीन पिढी ही शिक्षणाने सुशिक्षित व सुसंस्कृत झाल्याने बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा कमी होत चालली आहे. "देव हा भावाचा भुकेलेला आहे. त्याला फक्त तुम्ही तुमच्या मनातला सात्विक भाव द्या. रोज भक्तीने नामस्मरण करा, पूजा करा. देव तुमच्या संकटाला धावून आलाच पाहिजे. कारण तो तुमच्या हृदयात आहे." हीच आजच्या नवयुवक व नवयुवतींची धारणा आहे.
मंदिरामध्ये दररोज पहाटे चार वाजता नगारे, ढोल, ताशे वाजवून काकड आरती केली जाते. नंतर मंदिराचा पुजारी (गुरव) देवाची षडशोपचार पूजा करतो. या षडशोपचार पूजा विधीत चर्मकार (कांबळे) समाजाचा मान असतो. शिवाय डवरी, घडशी या समाजाबरोबरच इतरही सर्व समाजाचे लोक आस्थेने येतात व पूजाविधी सोहळा अनुभवतात.
(८) मंदिराचा कळस व सभामंडप :
चाळीस वर्षापूर्वी मंदिरासमोर २५ फूट रुंद व ३० फूट लांबीचा सभामंडप बांधण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या भक्तांची चांगली सोय झाली आहे. तसेच २३ वर्षापूर्वी मंदिरावरील घुमटावरच भव्य शिखराचे (कळसाचे) बांधकाम केले आहे. हे सभामंडप, कळस शिखराचे काम हे कांबळे, बाबर इ. सर्व समाजाच्या लोकवर्गणीतून निर्माण करण्यात आले आहे. देवावर श्रद्धा व भक्ती असल्यानेच लोकवर्गणीतून ही कामे झालेली आहेत.
आदिलशहाच्या काळांत श्री सिद्धनाथाच्या मंदिर बांधकामाला परवानगी व बांधकामाचा खर्च आदिलशहाकडून करण्यात आला. त्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांत, पेशव्यांच्या काळांत किंवा आताच्या राज्य शासन व केंद्र शासनाकडून मंदिराला कोणतेही अनुदान मिळाले नाही. यात्रेचा सर्व खर्च व पूजाअर्चा, दिवाबत्तीचा खर्च हा लोकवर्गणीतूनच केला जातो. म्हणूनच भक्तांना देव हा आपला वाटतो.
(९) श्री सिद्धनाथाच्या यात्रेचे स्वरुप :
चैत्र शुद्ध द्वादशीला देवाला हळद लावण्यात येते, त्याला तेल लावणे असे म्हणतात. त्यावेळी चवरी ढाळण्यासाठी नाईक, जाधव हे मानकरी येतात. म्हेत्रे (माळी) हे हळदीचे बाशिंग व फुलांचे हार घेऊन येतात. मानाच्या सासनकाठ्या घेऊन मेटकरी येतात. देवाच्या संपूर्ण अंगाला तेल लावले जाते. त्यावेळी चर्मकार (कांबळे) समाजाच्या सुवासिनी देवाला पंचारती घेऊन ओवाळतात व नंतर घुगऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो.
चैत्री पौर्णिमेला देवाची घटस्थापना केली जाते. चैत्र वद्य अष्टमीला देवाला सिंहासनावर बसविले जाते. त्या दिवशी संपूर्ण आलेगावात देवाचा उपवास केला जातो. याच दिवशी देवाच्या पायात नविन जोडा घातला जातो.
आलेगांवच्या श्री सिद्धनाथ यात्रेचा कालावधी चैत्र वद्य अष्टमी ते चैत्र वद्य द्वादशी असा पाच दिवस असतो. अष्टमीच्या दिवशी सिद्धनाथाचा विवाह आंबेजोगाई, जि.बीड येथील जोगेश्वरी देवीबरोबर सायंकाळी ५.०० वा. लावण्यात येतो. यावेळी सर्व गांवकरी देवावर अक्षता टाकण्यासाठी हजर असतात.
अष्टमीला देवाला नागावर बसवून पूजा बांधली जाते. नवमीला घोड्यावर, दशमीला नंदीवर, एकादशी दिवशी हत्तीवर पूजा बांधली जाते. द्वादशीला सकाळी रथामध्ये बसविले जाते व संध्याकाळी चांदीच्या पालखीत बसवून मिरवणूक निघते. पाच दिवस दररोज सकाळ-संध्याकाळ छबीना फिरतो. पाचव्या दिवशी म्हणजे चैत्र वद्य द्वादशीला आरेवाडीचा श्री बिरोबा देव व आलेगावचा श्री सिद्धोबा देव (श्री सिद्धनाथ) यांच्या पालख्यांची रात्री १२ वाजता भेट होते. नंतर पालख्या मिरवून देवळात आणतात व यात्रेची सांगता होते.
या यात्रेसाठी घेरडी, रड्डे, आंधळगांव, मेथवडे, डोंगरगांव व सोनंद येथुन मानाच्या काठ्या व नगारे येतात. या यात्रेला महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकं व आंध्रप्रदेश राज्यांतूनही भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
(१०) श्री सिद्धनाथाला चर्मकार समाजाचा मान :
श्री सिद्धनाथ यात्रेसाठी चर्मकार (कांबळे) समाजाचा मान खूप मोठा आहे. चर्मकार (कांबळे) समाजाच्या वतीने सासनकाठ्या घेऊन निघाल्याशिवाय यात्रा सुरु होत नाही. प्रथम मान त्यांचा आहे. चांदीची काठी हाती घेऊन चोपदाराचे काम लवटे यांच्याकडे आहे. तर देवावर चवरी ढाळण्याचे काम जाधव व नाईक यांच्याकडे आहे. अशा प्रकारे सर्व समाजाकडे वेगवेगळया स्वरुपाची कामे सोपवून देवाची सेवा करण्याचा अधिकार दिला आहे. पालखीच्या दिवशी रात्री देवाच्या पालखीला मार्ग दाखविण्याचे काम हाती दिवट्या घेऊन कांबळे समाज व माळी, दिवसे, सुतार समाज इमाने इतबारे करीत आहेत. शिवाय पालखी जाताना रस्त्यावर पालखी खाली कांबळे (घोंगडी) अंथरण्याचे काम सुद्धा कांबळे समाजच करतो.
(११) श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेचे मानकरी :
श्री सिद्धनाथाच्या यात्रेचे मानकरी बाबर, कांबळे, पाटील, दिवसे, बुरजे, लवटे, वाघमारे (माळी), म्हेत्रे (माळी) वाळके, जाधव व नाईक हे आहेत. श्री सिद्धनाथाच्या प्रेरणेने व या सर्वांच्या सहकार्याने यात्रेचा उत्सव सोहळा आनंदाने होतो.
पालखीच्या वेळी शोभेचे दारुकाम होते. फटाके वाजतात व वाजत गाजत गुलाल-खोबरे उधळत "श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं" असा गजर करीत पालखी सोहळा पूर्ण होतो.
यात्रा काळात भक्तांसाठी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीतर्फे शुद्ध पाणी, दिवाबत्ती यांची सोय करण्यात येते. अनेक दुकाने, पाले येतात. गरमागरम भजी, वडा व चहा बरोबरच शेवगाठी, पेढे यांची दुकाने येतात. मुलांची खेळणी व इतर जीवनोपयोगी वस्तुंचे स्टॉल लागतात. पूर्वी यात्रा संपल्यानंतर रात्री भक्तांच्या मनोरंजनासाठी तमाशाचा फड असायचा. आता यात लोकांना इंटरेस्ट दिसत नाही.
(१२) समारोप :
असे आपले श्री सिद्धनाथ देवस्थान सांगोला या तालुक्याच्या ठिकाणापासून रस्त्याने १५ कि.मी. अंतरावर आहे. तसेच सिध्दनाथाचे पवित्र ठिकाण पंढरपूर पासून २९ कि.मी., सोलापूर पासून ९६ कि.मी., पूण्यापासून २०५ कि.मी. व मुंबईपासून ३०४ कि.मी. अंतरावर आपरुपा नदीकाठी वसलेल्या आलेगावात आहे. सिद्धनाथ हा संकटाला धावणारा आहे. म्हणून 'सिद्धनाथा धाव" अशी भक्तगण हाक देतात. देव हाकेला ओ देतो व भक्तांची संकटे दूर करुन त्यांना शांती व सुखाची बरसात करतो. म्हणून गुलाल खोबरे उधळीत सर्वांनी म्हणा....
श्री सिद्धनाथाचं चांगभलं !
देवाच्या पालखीचं चांगभलं !
देवाच्या छबीन्याचं चांगभलं !
देवाच्या घोड्याचं चांगभलं !
देवाच्या काठीचं चांगभलं !
No comments:
Post a Comment