मित्रांनो, सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणांपासून कमी खर्चात सायकलिंग करीत चार दोन तासांत पर्यटन करु शकू अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यांची प्रसिद्धी व विकास करण्यात आपण सांगलीकरांनी प्रयत्न करायला हवेत. आपणच एकमेकांचे गाईड व्हावं. "काखेत कळसा आणि गावाला वळसा" असाच काहीसा प्रकार आपल्या बाबतीत घडत आहे .
मला वाचायला मिळालेल्या बातम्या, न्यूज पेपर्स विशेषतः सकाळ आणि पुढारी न्यूज पेपर्स, व्हाट्सएप मेसेज , फेसबुक यावरून उपलब्ध माहितीचे केलेले हे संकलन आहे . हे लेखन पूर्णतः माझे नाही.काही लेखातील किरकोळ दुरुस्त्या करून संपूर्ण सांगली जिल्ह्यातील सायकलिंग करत पर्यटन करता यावं म्हणून माहितीचे संकलन करणे आणि सायकल वरून सांगली पर्यटन करणाऱ्यांना उपयुक्त व्हावं ही अपेक्षा. हे छोटं काम आपल्याला उपयोगी नक्की पडेल यात शंका नाही .
आपल्या सांगली जिल्हाभरातील अनेक मित्रांनी शेअर केलेल्या माहितीवर प्रसिद्ध झालेले लेखन आहे. आपल्याला नक्की आवडेल. शेअर करा. यात भर घालायची असेल तर जरुर कळवा. ही माहिती परीपूर्ण नाही याची मला जाणिव आहे. सांगलीचा परिसर चांगला आहे. इथं दुष्काळ आहे. गुढे पाचगणीचं काससारख्या फुलाचं पठार आहे. अंगाला पाझर लागावा असा पाऊस, गोठवणारी थंडी, महाबळेश्वरची उंची लाभलेलं पळशी गाव. ऊस, द्राक्ष, डाळिंब, सिताफळ, स्ट्रॉबेरी, सफरचंद, जगातल्या सगळ्या भाज्या. सांगलीचा चांगुलपणा, देखणेपणा, अवखळपणा, प्राचिनत्व लोकांसमोर आणूया.सांगलीचा भूगोल पहिला तर सांगलीचा इतिहास कळेल.त्यातून आपण संस्कृती लोकांसमोर ठेऊ शकतो .
सायकलिंग करत
सांगली जिल्हा पाहून घेऊया...
आपणच होऊ आपले गाईड
सांगली जिल्ह्यात सागरेश्वर, चांदोली, बहेचं रामलिंग भेट, दंडोबा, हरीपूरचा संगम, गिरलिंग डोंगर, शुकाचार्य अशी स्थानिक पर्यटनासाठी मोजकी ठिकाणं सांगितली जातात. पण दहाही तालुक्यात अशी शंभरावर छोटी-मोठी ठिकाणे आहेत. जिथे थोड्याफार सोयी केल्या तर स्थानिक पर्यटनाला चांगला वाव मिळू शकतो. अत्यंत कमी खर्च, कमी वेळेत विरंगुळा, व्यायाम म्हणून सायकलिंगद्वारे जाऊन येऊ शकतो.
जत तालुका
दुष्काळी जत तालुक्यात जतपासून 10 किलोमीटरवर बनाळी येथे बनशंकरी देवस्थानला जाऊन वनविहारचा आनंद घेऊ शकतो.
जतच्या पूर्वेला 18 किलोमीटरवर कालभैरव श्री महादेव मंदिराचे देवस्थान कोळगिरी जवळ आहे. मंदिर देखणे हेमाडपंती आहे.
विजापूर रस्त्याला 20 किलोमीटरवर दरेश्वर आहे. कर्नाटक हद्दीत विजापूर रस्त्याला मुचंडी येथे आहे. मंदिर कर्नाटकात तर पायऱ्या महाराष्ट्राच्या हद्दी आहेत. जवळच दरेश्वराची बहिण जकाव्वाचेमंदिर महाराष्ट्र हद्दीत आहे.
दक्षिणेला 15 किलोमीटरवर सिद्धेश्वराचे देवस्थान बिळूर येथे आहे.
पूर्वेला जत- उमदी रस्त्याला निगडी (बुद्रुक) जवळ दोडड्नाला प्रकल्प आहे. तिथे पक्षीनिरीक्षण करता येते. हे ठिकाण जतपासून 35 किलोमीटर पूर्वेला आहे.
गुड्डापूर हे जतपासून 24 किमी अंतरावर धानम्मा देवीचे मंदिर आहे.
20 किमी अंतरावर पूर्वेला समाधी गिरजी महाराज यांची समाधी आणि मठ आहे .
जत पासून पूर्वेला 35 किमी अंतरावर संख मध्यम प्रकल्प आहे.
मिरज तालुका
मिरजेपासून पूर्वेला 15 किलोमीटरवर खंडेराजुरी आहे. तिथे गर्द झाडीत ब्रह्मनाथ देवस्थान, तलाव हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
दंडोबा टेकडी सायकलिंग व ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे.
मिरज आरग (15 किलोमीटर) वर शिंदेवाडी, मंगसुळी येथे जाता येते. मंगसुळीला खंडोबाचे देवस्थान आहे.
लक्ष्मीवाडीला यल्लमा मंदिर आहे.
लिंगनूर, खटाव, मदभावी ही सायकलिंगसाठी छोटी पण महत्त्वाची ठिकाणे आहेत. मदभावी येथे कोल्हापुरी चप्पलसाठी लागणारे मटेरिअल तयार केले जातात.
मिरज, एरंडोली, बेळंकी, सलगरे हा तीस किलोमिटरचा सरळ मार्ग सायकलिंगसाठी उत्तम आहे. तर ट्रेकिंगसाठी बेळंकीचा डोंगर नक्कीच आवडेल.
मिरजेपासून जवळच मालगावचा दर्गा आहे.
कुटकोळीजवळ गिरलिंग डोंगर, इतिहासप्रेमींसाठी जुना पन्हाळा आहे. कनकेश्वर हे म्हैसाळचे महादेवाचे देवस्थान चांगले आहे.
म्हैसाळ योजनेचे पंपहाऊस, मधुमक्षिका पालन केंद्र, बोलवाड हद्दीतील जैवविविधता उद्यान आणि
मिरज-मालगाव रस्त्यावर निर्यातक्षम द्राक्षे पिकवणारे मळे लक्षवेधी आहेत. तालुक्यातील खटाव हे गाव एक मजली घरांसाठी प्रसिद्ध आहे.
हौशी, बुलेट स्वारांसाठी बेडग प्रसिद्ध आहे. तिथला राजवाडा मन वेधून घेतो.
मिरज शहरात मिरासाहेब दर्गा, सतारकरमेकर गल्ली, अंबाबाई मंदिर, हैदरखान बावडी, गणेश तलाव, सतीचे देऊळ, मनोहरी कृष्णा घाट, सांगलीकर मळ्यातील गणेश मंदिर, बेडग रस्त्यावर देवी भवन अशी ठिकाणे सायकलिंगने पाहता येण्यासारखी आहेत.
मिरजेपासून कर्नाटकात गेल्यानंतर कागवाडला जमिनीखाली असलेले मंदिर नक्कीच आवडेल.
मिरज पश्चिम भागात कवलापूर विरगळांचा संग्रह आहे. बुधगाव संस्थानकालात पालिका असलेलं गाव. इथल्या इमारती, माधवनगर ही काटकोनात वसलेली व्यापारपेठ,
बिसूरला श्री दत्त देवस्थान व विष्णू महाराज समाधी मंदिराचा हिरवाईने नटलेला परिसर, चंद्रकोरीच्या आकाराचा ओढा ही ठिकाणे सांगलीपासून दहा किलोमीटरवर आहे. दक्षिणेला जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सर्वात कमी उंचीवर असलेलं अंकली हे गाव आहे. नदीपलीकडे उदगाव हद्दीत चिंचेच्या सावली रामलिंग आहे. हरीपूरचा कृष्णा वारणा संगम आहे. इथली सकाळ नयनरम्य आहे. नांद्रे येथील दर्गा, तुंगचे हनुमान मंदिर, कवठेपिरानचे सप्तर्षी देवस्थान, समडोळी, दुधगावचा परिसर स्थानिक पर्यटनासाठी उत्तम आहे. दुधगावचे जुने वाडे पाहण्यासारखे आहेत.
पलूस तालुका
पलूस तालुक्यात कुंडलचे गिरी पार्श्वनाथ व विरभद्र चा डोंगर, ब्रह्मनाळचा कृष्णा-येरळा संगम, भिलवडीचा घाट, अंकलखोपचे अंकलेश्वर व खोपेश्वर, औदुंबरचे श्री दत्त देवस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि जतन केले स्मारक, किर्लोस्कर कारखाना, भिलवडी स्टेशनची चितळे दूध डेअरी, भुवनेश्वरवाडीतील भुवनेश्वरी मंदिर, अंकलखोपला बनातील म्हसोबा, महामनव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेले ठिकाण, नागठाणेतील बालगंधर्वांचे घर व स्मारक, पलूस शहरातील धोंडीराज महाराज मंदिर, आमणापूरचे बचाप्पा बन ही ठिकाणे सायकलींद्वारे एक दोन तासात पोहोचून पाहु शकतो. कृष्णाकाठ परिसर देशी-विदेशी पक्षांचा विहार, मगरींचा अधिवास असलेली ठिकाणे पाहणे वनपर्यटनाचा भाग होऊ शकतात. पलूसमधील किमया बायोटेकने विकसित केलेली फुल शेती परदेशातील शेती पाहिल्याचा अनुभव देऊ शकते. अर्थात अशा ठिकाणी जाताना पूर्वपरवानगी घेतली तर अधिक चांगले.
वाळवा तालुका, इस्लामपूर परिसर...
वाळवा तालुक्यात सहकारातला आदर्श हुतात्मा कारखाना, नागनाथअण्णा नायकवडी यांचे वाळवा, पांडू मास्तर यांचे येडेनिपाणी, नाना पाटील यांचे येडेमच्छिंद्र, बर्डे गुरूजी, लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांचं वाटेगाव, लोकनेते राजारामबापूंचे कासेगाव, पठ्ठे बापूराव यांचे रेठरे हरणाक्ष, शिगाव, सवालाखी आष्टा, अडकित्त्याचं बागणी अशी ठिकाणे उत्सुकता म्हणून सायकलिंगने पाहता येतात. किल्ले मच्छिंद्रगड, ताकारी, ताकारी रेल्वे स्टेशनपासून सागरेश्वरच्या डोंगरावर चढाई करणे थरारक अनुभव देते. येडेनिपाणीला मल्लिकार्जुन डोंगर तथा विलासगड, इस्लामपूरपासून जवळ बहेतील रामलिंग बेटाने विभागलेला कृष्णेचा प्रवाह निसर्गरम्य आहे. डोंगरवाडीतील हनुमान मंदिर श्रद्धास्थान आहे. गावात रॉकेलचा दिवा वापरत नाहीत. शिवपुरी गाव तेलाचा दिवा लावणारे शाकाहारी गाव आहे. महादेव मंदिर श्रद्धास्थान आहे.
शिराळा तालुका...
शिराळा येथील भुईकोट किल्ला, अंबामाता मंदिर, रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुती मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, मोरणा धरण, पाडळीला भानुदास पाटील यांचा वाडा, अंत्री खुर्दला नवशा गणपती मंदिर, गिरजवडे येथील ज्योतिर्लिंग मंदिर अशी ठिकाणी सायकलिंग व पर्यटनासाठी निवडता येतात. चांदोली धरण, राष्ट्रीय उद्यान बारमाही पर्यटनासाठी महत्त्वाचे आहेच. वारणावतीचे वीज निर्मिती केंद्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील कांडवण हे ठिकाणी निसर्ग पर्यटनासाठी उत्तम आहे.
खानापूर तालुका, विटा परिसर...
खानापूर तालुक्याचे विटा मध्यवर्ती ठिकाण आहे. आठ -दहा किलोमीटर वर रेणावी, रेवणगाव, पारे, सातारा जिल्ह्यातील मायणी अभयारण्य व तलाव, सुळकाईचा डोंगर, बहिर्जी नाईक यांचे समाधीस्थळ, बाणुरगड, बलवडीचा बळीराजा बंधारा, नवे व जुने क्रांती स्मृती वन, अग्रणी नदीचे उगमस्थान असलेले अगस्ती म्हणजेच तावदरवाडी, म्हसोबाचे देवस्थान असलेला भिवघाट, वाझरचा बंधारा, ऐतिहासिक माहुली अशी ठिकाणे सायकलिंगसाठी चांगली आहेत. खानापूरजवळ शंभूखडी, मेंगाणवाडी, 50 फुटांच्या अरुंद घळ्या; तरस, लांडग्यांनी तयार केलेली घरे, बलवडीचे निसर्गरम्य भवानी मंदिर, वेताळबा, रेवणसिद्धचे मूळस्थान, तामखडी, पारेचा दरगोबा, खरसुंडीचे सिद्धनाथ, खानापूरचा दर्गा, कमानवेस, मातीचा बुरुज, तटबंदी ही ठिकाणे कमी वेळेत पाहता येतात. आनंदही देतात. शुकाचार्य, पळशी ही ठिकाणे भीमाशंकरची आठवण करून देतात. पळशी हे जिल्ह्यातील सर्वात उंच महाबळेश्वरबरोबरीची उंची लाभलेलं ठिकाण आहे.
कवठेमहांकाळ तालुका...
कवठेहांकाळ या तालुक्याच्या ठिकाणापासून बारा किलोमीटरवर दंडोबा, गिरलिंग डोंगर, जुना पन्हाळा ही 12-15 किलोमीटरवर आहेत. आरेवाडी येथे 15 किलोमीटरवर बिरोबा आहे. कुंडलापूरला महादजी शिंदे यांचे वंशज शहाजी शिंदे यांचे समाधीस्थळ आहे. तर रायवाडीला 30 फूट उंच महादेवाची मूर्ती हरणेश्वर मंदिर परिसर आहे. 12 किलोमीटरवर रांजणीला शिवाजी महाराजांचे जिल्ह्यातील एकमेव मंदिर आहे. नांगोळेचा तलाव, इरळीचा बसाप्पावाडी तलाव, नागजच्या पूर्वेला
चोरोची जवळ महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे बेदाणा निर्मिती केंद्र आहे. कोरड्या हवामानात इथे तयार होणारा बेदाणा दर्जेदार मानला जातो.
कडेगाव तालुका...
मोहरम व उंचच उंच ताबुतांसाठी कडेगाव, कडेपुर प्रसिद्ध आहे. सोनसळ, तडसर, नेर्लीचा घाट, शिरसगाव, गणेश खिंड सायकलिंगसाठी उत्तम मार्ग आहे. सागरेश्वरच्या परिसरातील देवराष्ट्रे म्हणजे भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचं जन्मगाव. सागरेश्वर अभयारण्य, डोंगराई, चौरंगीनाथ ही ठिकाणं, तसेच भिकवडी, हिंगणगाव, शिवाजीनगर, कडेगाव, कुंभारगाव येथील तलाव पाहण्यासारखे आहेत. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे सोनसळ जवळच आहे. चौरंगीनाथ नव्याने विकसित झालेले पर्यटनस्थळ आहे. तोंडोलीत अंबिका मंदिर आहे. सुरली घाटाजवळ जानाई मंदिर आहे. थोडीशी वेगळी वाट निवडून सायकलिंग, वनभोजन, तास-दोन तासांची भेट अशा पद्धतीने पाहता येतात.
तासगाव तालुका
तासगाव तालुक्यात तासगाव - आरवडे रस्त्यावर इस्कॉनचे श्री कृष्ण मंदिर आहे. तासगाव भिवघाट सायकलिंगसाठी चांगला मार्ग आहे. तासगाव - हातनूर मार्गावर होनाई मंदिर व परिसर पाहण्यासारखा आहे. तासगाव- गोटेवाडी - हातनूर मार्ग 20 कि.मी. आहे. तासगाव - कवठेमहांकाळ रस्त्यावर 17 किमी अंतरावर कोड्याचे माळ माळ आहे. याला कलावंतिणीचं कोडंही म्हणतात. तासगाव-भिवघाट रोडवर-सिद्धेवाडी तलाव हाही सायकलिंगसाठी चांगला मार्ग आहे. तासगाव- कवठेमहांकाळ रसत्यावर सावर्डे-मणेराजुरी हद्दीवर भवानी डोंगर कच्च्या रस्त्याचा व ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. तासगावपासून हे अंतर 14 कि.मी. आहे. तासगावमधून भिवघाट मार्गे बाणूरगडलाही जाता येते. तासगाव - पेड तलाव हा 25 कि.मी. चा मार्ग पावसाळ्यात आनंद देणारा आहे. तासगावपासून सहा, तर सांगलीपासून 18 किलोमिटरवर सिद्धराज तथा बिऱ्हाडसिद्ध देवस्थान मंदिराच्या शिल्पशैलीसाठी प्रसिद्ध आहे. मंदिर परिसराची रचना किल्ल्यासारखी, तर गाभाऱ्यातील फरशा सोन्याचांदीच्या नाण्यांनी मढल्या आहेत. समोर पुष्कर्णी आहे. दसऱ्याला होणार कवठेएकंदचे शोभेची दारू (दारूकाम / दारू रोषणाई)
राज्यात प्रसिद्ध आहे.
आटपाडी तालुका...
आटपाडी तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळात केलेला एक प्रयोग म्हणजे कैद्यांची मुक्त वसाहत आहे. नाव स्वतंत्रपूर. आटपाडीपासून चार किलोमीटरवर. तीस किलोमीटरवर आहे शुकाचार्य. करगणी येथील श्रीराम मंदिर, खरसुंडीचे सिद्धनाथ, राजेवाडीचा तलाव, सरहिंद बोगदा, उंबरगाव(20 कि.मी.), इटकी डोंगर(25 किं.मी.), भोजलिंग डोंगर(30 कि.मी.) अशी ठिकाणे 25-30 किलोमीटरच्या टप्प्यात सायकलिंगसाठी उत्तम आहेत. सोनारसिद्ध मंदिर पाहण्यासारखे आहे. राजेवाडी तलाव आटपाडी आणि सातारा हद्दीत आणि लाभक्षेत्र सोलापूर जिलह्यात आहे. कधी काळी प्रसिद्ध दिघंचीची कापसाची बाजारपेठ पाहण्यासारखे गाव आहे. गावापासून सोलापूर हद्द जवळ असल्याने तिकडेही जाता येते. मुंडेवाडी येथील उंच डोंगर ट्रेकिंगसाठी चांगला आहे. आटपाडीचे बडे प्रस्थ श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे कौठुळी गाव ऐतिहासिक म्हणून महत्त्वाचे आहे.
No comments:
Post a Comment