" अति राग अन् भीक माग " अशी एक म्हण आहे .
आपल्याला हेही माहीत हवे.....
क्रोधे जाई तोल बुद्धीचा , स्मृतीभ्रंश होई तेव्हा.
सांभाळा स्वतःला रागात जाल तेव्हा .
मानवी मनाला चुकीच्या मार्गाने येणारी आणि चुकीच्या मार्गावर नेणारी राग/ क्रोध ही एक प्रबळ अशी प्रवृत्ती आहे. यशस्वी जीवनासाठी मन अत्यंत शांत असणे आवश्यक असते. राग/ क्रोध ही प्रवृत्ती मनाचा क्षोभ वाढविते. त्यामुळे रागावलेली व्यक्ती आपल्या विहित मार्गापासून विचलित होते. जी व्यक्ती क्रोधित होते ती व्यक्ती इतरांवर अन्याय करण्यास मागेपुढे पाहत नाही. तसेच रागावलेल्या अवस्थेत अमानवीय कृत्य करण्यास सहजपणे धजावते. भल्या भल्या व्यक्तींना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नाही, हे आपण व्यवहारात अनुभवतो. अशा व्यक्तीपासून माणसं लांब राहतात.
श्रीमद् भगवद्गीतेत म्हटले आहे,-
'क्रोधाभवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।'
याचा अर्थ 'क्रोधामुळे अत्यंत मूढ भाव (मुर्खपणा) निर्माण होतो आणि या मूढ भावाने स्मृतीमध्ये भ्रम निर्माण होतो. त्यामुळे बुद्धी अर्थात ज्ञानशक्तीचा नाश होतो व बुद्धिनाश झाल्यावर मनुष्य आपल्या स्थितीपासून पतित होतो, घसरतो, त्याचा सर्वनाश होतो. क्रोधामुळे इतकी हानी होत असते. जो मनुष्य क्रोध करतो म्हणजेच रागावतो त्याच्या शरीरावरही त्याचे विपरित परिणाम होत असतात. मनुष्य जेव्हा रागाला येतो तेव्हा त्याचे हृदयाचे ठोके वाढतात. श्वासोच्छ्वास गतीने व्हायला लागतो. म्हणजे त्याच्या फुफ्फुसावर, हृदयावर आणि मेंदूवर एकाचवेळी परिणाम होतो. त्याच्या शरीराला ऑक्सिजनची अधिक गरज भासायला लागते. तो अगदी 'इमर्जन्सी'च्या पातळीपर्यंतही जाऊ शकतो. दीर्घकाळ अशीच स्थिती राहिली तर मृत्यूही झालेली काही उदाहरणे आहेत. राग हा आपल्या हृदयापासून नर्व्हस सिस्टीमपर्यंत म्हणजेच हृदयापासून ते मज्जासंस्थेपर्यंत सर्वत्र दुष्परिणाम करतो.
रागामुळे हृदयावर होणारे परिणाम :
रागामुळे धमन्या आकुंचित होतात आणि रक्तप्रवाह वेगाने सुरू होतात. जर आधीच एखाद्या व्यक्तीला हृदयाचा आजार असेल म्हणजे बीपी किंवा हाय कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. रागात बीपी वाढणे, नसा आकुंचित होणे याबरोबरच रोगप्रतिकारक यंत्रणेतून काही पेशीही निसटून जातात. हे सर्व एकाच वेळी होते. त्यामुळे धमन्या ब्लॉक होण्याचे चान्सेस वाढतात.
रागामुळे निर्णयक्षमतेवर होणारे परिणाम :
रागावलेल्या अवस्थेत मेंदू योग्य निर्णय घेऊ शकत नाही. एखाद्या विशिष्ट कारणामुळे उत्तेजित झाल्यावर मेंदू काही तरी करून दाखवण्यासाठीही प्रेरित होतो. त्यामुळे रागात मनुष्य अशाही गोष्टी बोलतो किंवा करतो, की ज्या त्याला स्वतःलाही आवडत नाहीत. रागामध्ये स्मृती कमजोर होते. तसेच लक्ष एखाद्या गोष्टीवर संपूर्ण केंद्रीत होऊ शकत नाही. व्यक्तीच्या मेंदूवर जेव्हा रागाचा अंमल असतो तेव्हा नशेप्रमाणे त्या व्यक्तीची मूळ बुद्धी अचूक आणि योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
रागामुळे पोटाची समस्येवर होणारे परिणाम :
भावना आणि पोटाचा जवळचा संबंध आहे. रागामुळे पोटात गोळा येऊन पोटाच्या समस्या होऊ लागते. रागामुळे पोटाचे स्नायू अधिक सक्रिय किंवा निष्क्रिय देखील होऊ शकतात. भांडणानंतर किंवा अति रागाला आल्याने पोटात गोळा येऊन हागावणीवर बसलेली माणसं आपण पहिली आहेत. याचा परिणाम म्हणून रागामुळे पोटात मुरड येते व कधीकधी भूक लागणेही बंद होते.
राग येण्याची काही कारणे :
अपेक्षापूर्ती झाली नाही की राग येतो. राग येण्याची अनेक कारणे आहेत. वेळेत काम न होणे. मनासारखे काम न होणे. योग्य आदर न मिळणे . आदराची अपेक्षा करणे. खोटे बोलणे. प्राप्त परिस्थिती आकलन न होणे . आणि इतर अनेक कारणामुळे देखील राग येतो. या प्रत्येक वेळी राग आवरावा लागतो.
राग रोखण्यासाठी काही उपाय :
राग रोखणे हे प्रत्येकाला नेहमीच शक्य होते असे नाही.राग रोखणे जमणार नाही, परंतु स्वप्रयत्नाने रागावर नियंत्रण मात्र ठेवता येईल. यासाठी मात्र मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो की ध्यान, प्राणायाम , अनापान आणि विपश्यना इत्यादी मार्गाने आपण रागावर नियंत्रण मिळवू शकतो. योगासनांच्या सहाय्याने आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवावे व चांगली, शांत झोप घ्यावी. योगासने आणि प्राणायामाचे सर्व प्रकार राग नियंत्रण करण्यास उपयुक्त ठरतात. राग कमी होण्यासाठी वेळेत काम करणे, वेळेआधीच निघणे, वेळेत पोहोचणे, आणि दैनंदिन कामात कमीतकमी चुका करणे इत्यादी गोष्टी जमल्या तर राग ही कमी येतो आणि मनावर ताण देखील कमी येतो. मनावर ताण कमी झाला तरीही राग कमी येतो. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा जास्त विचार करू नये. मनावरील ताण कमी करणे हा देखील राग कमी करण्याचा उपाय होऊ शकतो. वरील प्रयत्नामुळे राग लगेच नष्ट होणार नाही, राग येईल पण त्यावर नियंत्रित करता येईल.
यामुळे राग कमी होतो. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राप्त परिस्थितीची संपूर्ण जाणीव असावी लागते. शिवाय परिणामाची चांगली जाण असावी लागते. रागाऐवजी ठामनिश्चयी असावे लागते. चांगल्या गोष्टींचा नेहमी आग्रह असावा. संयम प्रत्येकवेळी जागृत असावा लागतो. अपेक्षापूर्ती आधी पूर्वानुभव लक्षात घ्यायला हवा. समोरच्या व्यक्तीच्या अनुभवाचे अनुमान करता आले पाहिजे. असे वागले तर विनाकारण राग येत नाही.
No comments:
Post a Comment