आम्ही नवरत्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी ही इयत्ता आठवी पर्यंत वर्ग असलेली शाळा. आठ शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असा मिळून आमचा नऊ शिक्षकांचा स्टाफ म्हणजे " आम्ही नवरत्न ". वरिष्ठ मुख्याध्यापक अण्णाराव रुद्राप्पा पाटील , ज्येष्ठ शिक्षक सर्जेराव विठ्ठल साळे, रघुनाथ तुकाराम गडदे , श्रीकांत शंकर सोनार , भाऊसाहेब दत्तू महानोर, चंद्रकांत सुदाम सावंत ,सुहास विलास उत्तरे , रियाज रजाक आतार आणि समाधान
बाबासाहेब यादव हे आम्ही नवरत्न .
या संमेलनाचा उद्देश आपल्या शिक्षकांच्या म्हणजे पुरुषांच्या एकमेकांच्या गाठीभेटी होत राहतात आपण आपलं सुख दुःख कोणत्या ना कोणत्या वेळी आणि एकमेकांशी शेअर करतो पण आपल्या पाठीमागे घर सांभाळणारी आपली सुविद्य पत्नी त्यांनाही आपल्या कार्याची कामाची ओळख व्हावी . आपल्या स्टाफ मेंबर च्या आणि त्यांच्या घरच्यांची ओळख व्हावी या हेतूने सुट्टीत रमजान ईद आल्यामुळे आणि पाटील सर सेवानिवृत्त होत असल्याने एकत्र येण्याचे ठरवले.
या नवरत्न मंडळींचे एक संमेलन रमजान ईदच्या दिवशी
आतार सरांच्या घरी रमजान ईदच्या दिवशी भरले होते.
आम्ही नऊ जण पुरुष मंडळी कायम एकत्र खेळीमेळीने , उत्साहाने आणि गुण्यागोविंदाने काम करत असतो. पण आमचा नवरा कुणाच्या संगतीत असतो, कुठे जातो ,तिथली मंडळी काशी असते हे आपल्या घरच्यांना कळले पाहिजे म्हणून हा अट्टाहास .
एकत्र येण्यासाठी आतार सरांनी यथेच्छ शीरखुर्मा खायला
अन प्यायला द्यायचं ,यासाठी आमंत्रण आधीच दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी गुलगुले आणि भजे (तिखट भजे) हे देखील केले होते.सर्व जणांनी एक दोन एक दोन वाट्या शिरखुर्मा संपवत , खात , गमतीजमती ,चेष्टा- मस्करी करत आम्ही त्या शीरखुर्मा चा आस्वाद घेतला
शेवटी सर्व जण आम्ही पुरुष आणि त्यांच्या सर्व जणांच्या घरची मंडळी ,अर्थात प्रत्येकांच्या बायका एकत्र बसलो .आणि एकमेकांशी ओळख करून द्यायला सुरुवात केली. पाटील सरांनी चंद्रकांत सुदाम सावंत यांच्या पत्नी
वैशाली माने तज्ञ शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांना बोलतं केलं
परंतु त्यांचं मत असं झालं की मी नेमकं काय बोलणार ? कशाविषयी बोलणार ? मला काय सांगायच आहे ? मी एखाद्या दृष्टीने सांगत गेले तर महत्त्वाचा सांगायचा दुवा राहून जाईल. ऍक्च्युली पाटील सरांचा उद्देश असा होता की , मला काय आवडते ?माझा हेतू काय ?मला कसं काम करावं असं वाटतं ? मला काय आवडतं काय ,आवडत नाही? हे प्रत्येकानं सांगावं . आपलं गाव ,आपलं नाव . हा त्या पाठीमागचा उद्देश होता . शेवटी कोणालाही बोलतं करण्यासाठी आमची पाटील सर हे फार दर्दी माणूस.
मग आम्ही पाटील सरांना विनंती केली की पाटील सर तुम्ही प्रत्येक व्यक्तीची ओळख करून द्या. तुम्हाला जे जे भावलं ,जे जे वाटलं ते , जे अनुभवलं ते ते , त्या व्यक्ती बद्दल तुम्ही सांगा . राहिलेलं ती व्यक्ती स्वतःहून सांगेल .
त्यामध्ये सर्वप्रथम साळे सर यांच्यापासून सुरुवात झाली. अण्णाराव पाटील सर म्हणाले ," आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री सर्जेराव विठ्ठलराव साळे . मुळगाव निगडी खुर्द आणि काराजनगी शाळेत ते सर्वात सीनियर शिक्षक आहेत. आता माझ्या नंतर ते मुख्याध्यापक होणार आहेत. शाळेचा जो आर्थिक कणा असतो , तो आर्थिक कण्याचा भार पेलणारे ते आमचे शिक्षक आहेत. कमी बोलतात,पण जे बोलतात ते परफेक्ट बोलतात . कधी राग नाही कधी द्वेषनाही , कधी मत्सर नाही. असं हे व्यक्तिमत्त्व. आम्हा सर्वांना आणि ह्या पोरांना सांभाळून घेणारा एक सुशील व्यक्तिमत्व म्हणजे सर्जेराव साळे सर.
त्यानंतर पुढील पुढे बसले होते श्री समाधान बाबासाहेब यादव . यांचे विषयी बोलताना पाटील सर म्हणाले यांचं गाव वायफळ . त्यांना कलेची आणि चित्रकलेची अतिशय अतिशय आवड आहे . ते प्रत्येक कार्यक्रमाचा फलक यादव सर तनाने, मनाने आणि प्रेरणेने करतात. त्यातील स्वयंप्रेरणेने करतात याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना कोणत्याही अक्षर लेखनाचं काम सांगा , फलक लेखनाचं काम सांगा , ते उत्कृष्ट पद्धतीने तर करतातच . पण स्वतःच्या वर्गाचा वेळ देऊन देखील ते काम करतात. त्याच बरोबर ते खवय्येगिरी मध्ये हौशी आहेत. त्यांना प्रत्येक पदार्थाची चव स्वतःहून घेतल्याशिवाय चाखल्याशिवाय आणि त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय तो पदार्थ ते बाजूला ठेवत नाहीत . ही त्यांची वैयक्तिक खासियत आहे. आमच्या शाळेमध्ये सर्वात जूनियर असले, तरीदेखील बरेचसे निर्णय आम्ही यादव सरांना विचारून घेतो.
त्यानंतर उत्तरे सर. आम्ही आमच्या शाळेतील जेसीबी, डोझर म्हणतो . शाळेच्या मैदानातील किंवा वर्गातील शारीरिक कष्टाचे काम उत्तरे सर आनंदाने करतात. शिक्षक कुणीही नसले तरी दोनशे मुलं एकटे हँडल करतात . कोणतीही वस्तू फेकून न देता शाळेसाठी जपून ठेवतात. परपंचा करावा तसं त्यांचं काम शाळेतही असतं .
त्यानंतर पाटील सरांनी स्वतःविषयी सांगितले मी आण्णाराव रुद्राप्पा पाटील. माझं मूळ गाव सनमडी चालू वर्षी 31 मे 2022 रोजी रिटायर होतोय आणि आज तीन मे आपण आतार सरांच्या घरी खास एवढ्यासाठी आलोय की या नंतर आपण पुन्हा कधी एकत्र बसेल का नाही हे सांगता येत नाही. यासाठी आपण सर्वजण एकमेकांना बोलण्यासाठी , हितगुज करण्यासाठी , सुख दु:खाच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत . कोण कुठल्या गावचा ? कोणाला माहित नाही. जो तो आपल्या कामात व्यस्त असतो. प्रत्येक जण नोकरी करतो .कोण कोणाला कमी नाही. परंतु तरी देखील आपली आंतरिक मन, आपली एकमेकांची सुखदुःखे जाणण्यासाठी, आपणच आपल्याला आधार द्यायचं. पण कधी एकमेकाला भार व्हायचं नाही. हे सांगण्यासाठी आपण एकत्र आलो. मी गेली कित्येक वर्ष म्हणजे तेहतीस वर्ष सेवा केली ; पण काराजनगी शाळे सारखा स्टाफ मलाही कधी भेटला नाही . आम्ही जे नवरत्नाची खाण आहोत त्या प्रत्येक शिक्षकांकडे माझ्यासहित प्रत्येक जण
खरोखरचे केवळ स्वतःसाठी करत नाहीत. प्रत्येकाकडे एक एक कला आहे. ती कला प्रत्येकजण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विकसित करण्यासाठी , आपल्या स्वयंप्रेरणेने ते वापरत असतात ,दाखवत असतात , सांगत असतात. त्याचा उपयोग मला झाला. मी त्यांचा उपयोग करून घेऊ शकलो. या सर्वांचा मी वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून मला यांच्यात काम करायला मिळालं यात मी आनंद आनंद मानतो.
रघुनाथ तुकाराम गडदे . गाव गोलेश्वर . शांत मितभाषी असं हे व्यक्तिमत्व. आहाराने शुद्ध शाकाहारी .
वय वर्ष दोन असताना आई वडिलांचे छत्र हरवलेले असताना जिद्दीने , चिकाटीने आणि एकत्र कुटुंबात राहून हालाखीचे जीवन काढून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. तेव्हा त्यांनी दहावीनंतरच पुढचं शिक्षण घेण्यासाठी दोन माणसापुढे हात पसरले. यांनी नकार दिल्यानंतर त्यांना एक युक्ती सुचवली. तुमच्या जर कुठल्या मामाची मुलगी असेल तर त्यांच्याकडे जा आणि त्यांना म्हणा मला डी एड ला एडमिशन घ्यायचा आहे. मला हजार रुपयाची दोन हजार रुपयाची गरज आहे. कोणीही मामा पळत येईल. तुम्हाला मदत करेल. पण तुम्हाला एक करावं लागेल. ते जे बोलला ते तुम्हाला पण करावं लागेल. गडदे सरांनी ज्या मामाकडून पैसे आणले त्यांचं हे रत्न म्हणजे त्यांच्या पत्नी रंजना.
शाळेपासून सरांचे घर जवळ असल्यामुळे चोवीस तासांपैकी कोणत्याही क्षणी फोन केला तर पाच मिनिटाच्या आत सर शाळेमध्ये हजर असतात. रात्री बारा वाजता तरी त्यांना कोणी हाक मारली तरी देखील ते शाळेपर्यंत शाळेच्या कामासाठी येतात. यादव सर म्हणाले, एकदा आम्ही इलेक्शन ड्युटी करून आलो होतो. वेळ फार झालेला. अंधार झाला ,रात्र झाली . आता जायचं कुठं ? इथेच राहा म्हणाले. मग आम्ही गडडे सरांच्या खोलीत झोपण्यासाठी गेलो. आम्ही बरेच दिवसातून एकत्र आल्यामुळे रात्री दोन तीन वाजेपर्यंत गप्पा चालल्या . केव्हा झोप लागली आम्हाला कळलं नाही. पण त्या भाड्याच्या खोलीत अजुन अंधुक अंधार असताना स्टोव्हचा आवाज येत होता. आम्हाला वाटलं त्यांच्या प्रपंचाचं काहीतरी करीत असतील.
आपण कशाला लक्ष द्यायचं म्हणून आम्ही तसंच मूडपुन झोपलो होतो. फक्त स्टोव्ह च्या फायरिंग चा आवाज यायला लागला. जेव्हा त्यांचं काम झालं ,थोड्या वेळानंतर सरांनी आम्हाला हलवून जागं केलं. सर पाणी तापलंय , आंघोळ करा आणि आंघोळ झाल्यानंतर थोडा नाश्ता करा आणि मग जा. कुणीही , पुरुष तर आपल्या मित्रमंडळी साठी पाणी तापवून देण्याचं काम करेल का नाही हे मला सांगता येत नाही. मी एक वेळ खांद्यावर आणून पाणी देईन पण पाणी तापवाचं माझ्या हातून झालं नसतं. हे यादव सरांनी कबूल केलं.
त्यानंतर नंबर आला माझा. सरांनी सांगितलं भाऊसाहेब दत्तू महानोर गाव सनमडी. ते माझ्याच गावचे आहेत.
भाषेवर प्रभुत्व आहे. सुंदर बोलतात ,सुंदर लेखन करतात. मुलांना शिकवण्याची हातोटी त्यांच्याकडे जबरदस्त आहे. त्यांचा वर्ग कायम हश्शाच्या तुषारामध्ये रंगलेला असतो. सर्वात आनंदी आणि उत्साही मुलं त्यांच्या वर्गात असतात. त्यांचे इंग्रजीचं ज्ञान देखील छान आहे. मी सुद्धा इंग्रजीचा शिक्षक होतो आणि प्रशिक्षक म्हणून काम केलं परंतु माझ्या ग्रामरच्या ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याचं काम मात्र महानोर सर करतात. आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी कन्वर्सेशन करतात ते केवळ हे यादव सरांच्या मुळे आणि महानोर सरांच्या मुळे. यादव सर यांच्याकडे देखील त्या मानाने इंग्लिशचे ज्ञान चांगले आहे. त्याचाही फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होतो. महानोर सरांचे इंग्रजी सुंदरच आहे वादच नाही. त्याचबरोबर मुलांचे बॉंडिंग आहे कनेक्टिव्हिटी आहे , विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची ते म्हटलं तर सर्वात जास्त तयार कनेक्टिव्हिटी महानोर सरांची आहे. एवढेच नाही तर म्हणत सर खोखो मध्ये दर्दी आहेत. ते स्वतः खेळाडू होते. अजूनही खेळतात मुलांच्या मध्ये आणि विद्यार्थ्यांना देखील ते खोखो शिकवतात आणि त्यांनी आम्हाला अभिमान म्हणजे आमची टीम जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकात आणली.
त्यानंतर पुढे बसल्या होत्या गडदे सरांच्या मिसेस. त्यांनी त्यांची ओळख द्यायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या मी रंजना कोळेकर माझं गाव अलकुड. आणि आताची मी रंजना रघुनाथ गडदे.आम्ही गावाकडे राहतो. पण अभिमानाने राहतो. खेड्यात राहतो पण अभिमानाने राहतो. शहरात घर बांधलं तर फक्त आपण आपल्या पुरतच मर्यादित करतो. त्याच्या पुढे जात नाही. परत गावाकडे तर असेल तर माझं कोणीतरी आहे म्हणून येणारी व्यक्ती मला तिथे भेटते.
माझा मुलगा एक डॉक्टर आहे एक बीसीए झालेली माझी मुलगी आहे जावई इंजिनियर आहेत. त्यांचा मोठा व्यवसाय आहे. परंतु कष्टाचं खाऊन अभिमानाने जगण्यात मला गर्व आहे. माझा नवरा प्रामाणिक आहे, साधा आहे.
त्यांना तुम्ही सर्वजण सांभाळून घेता. यात मला अभिमान आहे. तुम्ही सर्वजण मला माझ्या भावासारखे भेटला आहात म्हणून मी घरी निवांत आहे. शाळेत काम कसलं ही असलं तरी मी सरांना कधीही आडवत नाही. मी माझंमी काम करत असते. शेत शेतीचं काम आणि सारा बारदाणा ,पाठीमागचा संसार माझं मी सांभाळत असते. आणि त्यांना शाळेसाठी पाठवून देत असते. हे सांगत असताना गडदे सरांच्या मंडळींना भरून येत होतं ; कारण त्यांच्या त्यांना स्वतःला देखील लहानपणी आईचं प्रेम मिळालं नाही की सरांना देखील लहानपणापासून आई वडिलांचा प्रेम त्यांना मिळालेले नाही. आज एका शिक्षकाची पत्नी आणि गडदे सर स्वतः शिक्षक असं कुटुंब असताना त्यांना अभिमानाने आणि आनंदाने डोळ्यात अश्रू येत होते. आज शिक्षकांना पगार बर्यापैकी असताना कुटुंब व्यवस्थित चालत असताना आपण का काम करावं ही भावना त्यांनी कधीही ठेवली नाही. आपण शेतकरी आहोत आपण शेतात जन्मलो , आपली शेतीची नाळ जोडलेली आहे. आपण शेतीतले काम करायला कशाला लाजयचं ? हा विचार यांचा अजूनही भक्कम आहे.
दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या परंतु सरांनी पुढे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी ,कार्यानुभव व हस्तकला शिक्षक हा कोर्स पूर्ण केला. मला तीन वर्ष शाळेमध्ये काम करायला संधी मिळाली ती केवळ माझ्या नवऱ्या मुळे , त्या अभिमानाने सांगतात. आता त्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य आहेत तर त्या ग्रामपंचायत सदस्य असताना ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कामासाठी नेहमी आवाज उठवणाऱ्या म्हणून त्यांचं नाव आहे. तर चांगल्या कामासाठी भांडणाऱ्या म्हणून गडदे मॅडम आहेत . दहावीनंतर सरांनी अक्कलकोट येथे डीएड केलं .
त्यानी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मध्ये पार्ट टाइम काम करून डीएड पूर्ण केलं आणि आज ते स्वामींच्या आशीर्वादाने ते सेवेत रुजू झाले आहेत . त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बदलली म्हणून ते काय फार फरक मानत नाहीत . मला स्वामी समर्थांच्या कृपेने नोकरी मिळाली, मी त्यांना विसरू शकत नाही. म्हणून आज हे सर प्रत्येक पगार झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ अक्कल्कोट ट्रस्ट ला देणगी देतात. 2022 या वर्षामध्ये आज प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये पगार झाल्या झाल्या अक्कलकोट येथील ट्रस्ट ला MO पाठवून देतात. ज्या स्वामींच्या कृपेने आम्ही अभिमानाने जगतो आहोत . स्वामी साठी दिलं म्हणून आम्हाला काही कमी नाही ,असं म्हणून ते देत असतात . जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळी माझ्या नंदा ह्या दहा बारा वर्षाच्या होत्या.
तेव्हापासून मी त्यांना सांभाळून मोठ्या केलं. मोठा मी केलं नाही परंतु त्यांना अंतरही दिलेला नाही. मी फक्त त्यांना आम्ही जे घरात करून खाते ते माझ्यासोबत त्याला मी जेवू घातले आणि त्यांना चांगलं घर बघून, चांगलं स्थळ बघून त्यांना मी लग्न लावून दिले. आज त्यांचा आहेर माहेर मीच करते. नंदा याच माझ्या मुली मानते. आता या मुली माझ्याकडे येतात , बसतात , माझ्याशी गप्पा गोष्टी करतात , यात मला फार आनंद आहे. आमच्या सरांना चांगली माणसं फार आवडतात तर त्यांच्याशी आम्ही सुखदुःखाच्या गोष्टी करतो .
सौ . वैशाली सावंत अर्थात वैशाली माने बीआरसी च्या विषय शिक्षक यांनी आपली ओळख करून दिली. त्या सांगताना म्हणाल्या की माझे आमच्या रथाच्या दोन चाका पैकी एक चाक अगदी घट्ट आहे. आमच्या सरांनी परवानगी दिल्यामुळे मी घरातून बाहेर पडले. समाज पाहिला , जवळून निरखला आणि त्यात निरखत असताना वेगळ्या प्रकारचे अनुभव मला मिळाले. स्त्री बाहेर पडल्यानंतर वेगळे जे अनुभव आले या अनुभवांना फेसिंग करत, तोंड देत आज मी समर्थपणे उभी आहे. पंधरा वर्षाच्या अनुभवानंतर मला जे बोलायला मिळालं, ऐकायला मिळालं , समाज न्याहाळायला मिळाला, पाहायला मिळाला ते सर्व श्रेय माझ्या मिस्टरांच्या कडे जातं. त्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर स्पष्टपणे बोलू शकते आणि माझं मत प्रखरतेने मांडू शकते. बीआरसी मध्ये विषय तज्ञ आणि विशेष शिक्षक म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या सभा , मीटिंग घेणे फार अवघड असतं. शिक्षकांना सांभाळणे या गोष्टी देखील फार महत्वाच्या असतात. हे करत असताना वेगळ्या , विखारी नजरा , कोण काम करत असताना कसातरी संकोचल्यासारखं वाटतं पण आता मी त्यातून चार हात प्रत्येका पासून लांब राहत असल्यामुळे मी ठाम पणे बोलते . सांगू इच्छिते की मला माझ्या कामात आनंद आहे.
त्यानंतर चंद्रकांत सुदाम सावंत , माने मॅडम चे मिस्टर. त्यांचं गाव निगडी आणि आता ते स्वतः जत मध्ये राहायला आहेत. त्यांची पहिली अपॉइंटमेंट काराजनगी शाळेची होती. काराजनगी शाळेत यांनी पहिल्यांदा यापूर्वी ते काम केलेलं होतं तरी देखील काराजनगी शाळा त्यांच्यासाठी लकी ठरलेले आहे. ते पुन्हा काराजनगी शाळेत आले आहेत . विषय शिक्षक म्हणून प्रमोशन घेऊन गेले होते त्यानंतर निगडीतून ते प्रशासकीय बदली मधून टोणेवाडीला गेले आणि टोणेवाडी डिमोशन घेऊन ते पुन्हा शिक्षक या पदावर काराजनगी शाळेत आले. काराजनगी शाळेबद्दल त्यांना सार्थ अभिमान आहे ; कारण की गावामध्ये काम करण्यासाठी ते नेहमी उत्सुक आहेत, आनंदी आहेत. त्यांचे देखील वक्तृत्व छान आहे. वर्ग सांभाळण्याची त्यांची हातोटी सुंदर आहे. एवढे करुन देखील समाजामध्ये कोणाचं ते वाकड आणि वाईट नजरेने पाहिलेले सहन करून घेत नाहीत.
आमच्या सोबत आलेली , आमच्या संमेलनात सामील झालेली, आमची कन्या कुमारी सिल्वाना भाऊसाहेब महानोर . तिने तिची ओळख करून द्यायला सुरुवात केली. ती प्रथम घाबरत बोलत होती. घाबरत घाबरत तिनं सांगितलं की, मी जे आहे ते मी आमच्या पप्पा आणि मम्मी मुळे आहे. सुरुवातीला मला खेळायला बाहेर जाऊ देत नव्हते, त्यावेळी मला राग यायचा ,त्याचं करण मी मोठी झाल्यावर कळलं . परंतु आज माझे आई आणि वडील म्हणजे मम्मी पप्पा हे दोघे मला क्रिकेट खेळायला ठराविक वेळ देतात . मी काही तरी करून दाखवणार , ही माझी जिद्द आहे एक वेळ अशी आली पाहिजे , की हे सिल्वाना चे पप्पा आहेत. अशी त्यांची ओळख झाली पाहिजे. आमच्या घरामध्ये मला प्रत्येकाकडून मार्गदर्शन मिळतं. पप्पा कडून तर मिळतच राहतात, मम्मी कडून वागावं कसं याचं मिळतं, त्याचबरोबर माझे भावाकडून ही मिळतं . आम्ही एकमेकाशी कितीही भांडलो तरी एकमेकांचे हसत खेळत पुन्हा पंधरा एक मिनिटांनी आम्ही हसत-खेळत एकत्र येतो. एकमेकाशी आमच्या ज्ञानाची आणि एकमेकांचे अनुभव आम्ही एकमेकाला शेअर करतो.
माझ्याकडे जे शब्दांचं भांडार आहे ते केवळ माझ्या पप्पा मुळे आहे आणि त्यांच्यामुळे मला वाचायला चांगलं यायला लागलं. शाळेत केवळ अक्षरज्ञान झाले, शिकले. परंतु अर्थपूर्ण वाचन करते ते त्यांच्यामुळे. मी चांगले वाचायला शिकले चांगले बोलायला शिकले समाजात राहायचं तेही माझ्या पप्पांच्या मुळे आणि मम्मी ज्यामुळे शिकले. माझ्या मम्मीला आणि पप्पांना कोणी तुमची मुलगी अशी आहे तशी आहे. ती वाईट आहे असं म्हणणार नाहीत ,याची काळजी मी निश्चित घेईन आणि सध्याही घेतेच त्याला कुठेही गालबोट लागू देणार नाही. माझी ओळख मी स्वतंत्र निर्माण करणार आहे.
त्यानंतर अण्णाराव पाटील सरांचा मिसेस , सौ सुलोचना अण्णाराव पाटील यांचे माहेर पुळूज जिल्हा सोलापूर. सध्याच्या गृहिणी म्हणून काम करतात. पण त्या आनंदाने आणि अभिमानाने करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत . एक मुलगा इंजिनियर, एक बीडीएस ,एक मुलगी इंजिनिअर आणि एक मुलगी बीसीए. दोन जावई पैकी एक एचडीएफसी मध्ये; तर दुसरे जावई इंजिनियर आहेत - त्यांचा रोपवाटिकेचा व्यवसाय मोठा आहे. हे सगळं करत असताना - बाहेर , शाळा , मीटिंग , कार्यक्रम आणि पर्यटन हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सर पाठीमागे जिथल्या तिथं सोडून टाकून जात असत , त्यावेळी
खंबीरपणे मला जितकं जमते तेवढा प्रामाणिकपणे काम करणे हे माझे काम . म्हैशी राखली , जनावर राखणे शेळ्या संभाळणे ह्या सर्व गोष्टी आणि सासूबाईंच्या बरोबर शेतात जाणे या सर्व गोष्टी करत असताना मला कधीही दुःख वाटलं नाही; हेवा वाटला नाही. आपण शिक्षकाची बायको आहोत आणि आपण हे कसं काम करावं असं मला कधीही विचार शिवला नाही आणि त्यांनी तो विचारही माझ्या मनात आणून दिला नाही. आमचं घर असं होतं की घरासमोर रस्ता , रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शाळा . घरासमोर गायी, म्हैशी बांधलेल्या असायच्या. तिथेच समोर मराठी शाळा. शाळेच्या पाठीमागच्या बाजूला उकिरडा होता. तरी देखील जनावरांचे भरलेली, शेणाची पाटी डोक्यावर घ्यायची आणि शाळेच्या कडेने चालत जात होती . शेणाची पाटी डोक्यावर घ्यायची मला कधीही लाज वाटली नाही. इथे आम्ही अभिमानानं आणि धैर्याने करते . मी सरांच्या मुळे आहे हे ठामपणे सांगू शकते.
त्यानंतर माझ्या मिसेस सौ सुचिता महानोर. यांनी त्यांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. सौ सुचिता मारुती हजारे , गाव -आलेगाव, तालुका- सांगोला,जिल्हा - सोलापूर .माहेरची परिस्थिती फारशी मोठी नसली तरी बेताची बिकट नाही हे मी मान्य करते. सध्या व्यवस्थित आहे. आमचे सर त्यांनी मला कधी दुखावलं नाही , मी आनंदात आहे . परंतु ते स्ट्रिक्ट आहेत. त्यांच्या मनासारखं नाही झालं तर ते रागाला येतात. असं वागावं व्यवस्थित राहावे हा त्यांचा कायम अट्टाहास असतो. मला काही गोष्टी जमत नसल्या तरी त्या समजावून सांगतात.
मला चारचौघात वावरण्याचा अनुभव कमी असल्यामुळे माझ्या इतरांशी संपर्क कमी, या गोष्टीत मी म्हणावे तितके त्यात समरस होत नाही किंवा त्या लवकर उतरत नाहीत, तर त्यासाठी त्यांचा कायम अट्टाहास असतो आणि ते मला कायम मदत करतात.
त्यानंतर आतार सरांच्या मिसेस, अंजुम अत्तार यांनी सांगताना सांगितले की माझे सर माझ्यासाठी महात्मा फुले आहेत कारण मी दहावीपर्यंत शिकलेल्या असताना माझा डी एम एल टी डिप्लोमा कोर्स पूर्ण करून त्यानंतर बारावी आणि ग्रॅज्युएशन आज पूर्ण करून मला शिक्षणासाठी पुढील दारं मोकळी करून देणारे माझ्यासाठी महात्मा फुले आहेत. कधीही मी त्यांना त्यांचा पगार किती आहे? हा शब्द मी त्यांना कधीही विचारलेला नाही ,कारण जे आपल्याला मिळतं ते त्यांच्यामुळेच मिळते. ते खुश तर आपण खुश. ही भावना मी मनात कायम ठेऊन आम्ही
आनंदानं आणि सुखात राहतो .
त्यानंतर रियाज आतार यांनी
बोलताना सांगितलं कि , मी जरी उपळाई बुद्रूक तालुका माढा जिल्हा सोलापुर येथील असलो तरी मला तिकडचा आहे अस मला अजिबात वाटत नाही. सुरुवातीला काही दिवस वाटलं . आम्ही तिकडे येळवीला राहायचं. बॅचलर होतो. नोकरीसाठी आलो आहे ऍडजस्ट करायला पाहिजे. पण जेव्हा मी त्यानंतर जतला राहायला आलो माझ्या फॅमिली सहित राहतो तेव्हा पासून एकमेकांचं प्रेमाने राहण्याचा खेळीमेळीचं वातावरण पाहून मी भारावून गेलो आहे . मला माझ्या गावाकडच्या मित्रमंडळी पाहुणे त्यांच्याइतका आपला यातील एक भाऊ म्हणून आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला जो आधार दिला तो खूप लाख मोलाचा आहे ; आणि तो मी विसरणार नाही. असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू द्या आणि मला तुमची सेवा करण्याची संधी मिळू द्या असं मत आतार सरांनी व्यक्त केले.
शेवटी जगन्नाथ मारूती वायदंडे गाव निगडी खुर्द आणि सध्याची शाळा खैराव. उदारमतवादी , रोखठोक , पालकांच्या मध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व आणि पालकांकडून मायेने गोडीगुलाबीने शाळेसाठी लोकवर्गणी जमा करण्याचं काम करायला धावणारे शिक्षक म्हणजे आपले वायदंडे बापू. खिशात पैसे असताना कोणी दोन माणसं जेऊ घालेल; पण खिशात रुपया नसला तरीदेखील ते प्रेमापोटी चार लोकांना जेऊ घालतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे . बापू स्वतः खेळाडू आहेत .
आज आपल्यात एक रत्न उपस्थित झाले नाही कारण त्यांच्यात सुतक आहे . ते म्हणजे सोनार सर , त्यांचा गणित विषयात आणि विज्ञान मध्ये हातखंडा आहे . स्कॉलरशिप NMMS या परीक्षेसाठी अहोरात्र झटतात. शाळेत BALA पेंटिंग्ज सोनार सरांनी केले आहे . कुठेही प्रवास करावयास लागू दे स्वतःची फोरव्हीलर काढतात आणि पुढे असतात . सरांचा विद्यार्थ्याविषयी खूप जिव्हाळा आहे . सर माझ्या कार्यक्रमाला नव्हते ही खंत कायम मला राहील . कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी हुन्नूर (जमखंडी) येथे जाऊन रात्री नऊ वाजता माघारी आले. पण दुर्दैव ............
त्यांचे भाऊ हे जग सोडून गेले ...
आज आम्हालाही त्यांना ट्रेस करता आलं नाही . पुन्हा आपण आमच्या मळ्यात एकत्र येऊ असे पाटील आर म्हणाले ...आणि आमी थांबलो .....
सकाळी दहा पासून दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो .गप्पांच्या गर्दीत आम्ही सर्वजण घरदार विसरलो होतो . सर्वजण जोडीनं यायचं ठरवलं असताना यादव सर सिंगल आले होते . जाताजाता पाटील सरांनी यफाव सरांना दंड द्यायचं कबूल करून सर्वांनी रजा घेतली ...
No comments:
Post a Comment