माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Friday, February 12, 2021

रतनगड - रोमहर्षक ट्रेक

 


ट्रेकर्सनी  आवश्य करावा असा  ट्रेक 


सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर भटकायला सर्वांनाच आवडते. सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील एक गड म्हणजे रतनगड . अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील  कळसुबाई शिखराच्या दक्षिणेकडील दक्षिणोत्तर डोंगर रांगेत भंडारदरा धरणाच्या दक्षिणेला रतनगड आहे .  भंडारदरा धरणाच्या सुरुवातीला शेंडी गावातून अथवा धरणाच्या दक्षिण बाजूकडून म्हणजे भंडारदरा धरणाच्या दोन्ही बाजूने रातनगडकडे जाता येते.

किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्र्यंबक दरवाजा  आणि गणपती दरवाजा या मार्गाने जाता येते . त्र्यंबक दरवाजा, शिवकालीन दरवाजा, कल्याण दरवाजा, गणपती दरवाजा आणि मारुती दरवाजा इत्यादी दरवाजाने  रतनगडावर जाता येते. गणपती दरवाजा आणि मारुती दरवाजा हे दोन दरवाजे आग्नेय बाजूला आहेत. मारुती दरवाजा आणि गणपती दरवाज्यातून आत गेले की डाव्या हाताला कडेलोट पॉईंट आहे.   कडेलोट पॉईंट च्या जवळच एक टेहळणी बुरुज आहे.  टेहळणी बुरुजाच्या पश्चिमेला पाण्याच्या टाक्या आहेत त्यांना  भैरव टाक्या म्हणतात.




त्र्यंबक दरवाज्यातून वर गेल्यास  गडावर एक निसर्गाचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो;  ते म्हणजे डोंगराला पडलेलं भले मोठे  भगदाड.  त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे भगदाडामधून जाता येते. त्याला नेड किंवा नाक  किंवा रेड्याचे नाक असेही म्हणतात. हे  निसर्गनिर्मित आहे.




पश्चिम बाजूला एक अंधार कोठडी आहे अंधार कोठडी मध्ये कोणी गेल्याचे ऐकिवात नाही. आत पाणी असते.  आतील गुहेत वेगवेगळ्या बाजूला अनेक दरवाजे आहेत. 

भुलभुलय्या  प्रकारे आत  भुयार आहे. बाहेरच्या बाजूला एक पाण्याची टाकी आहे. त्यापाण्याचे आउटलेट बाजूला केलेला आहे. हवे तेव्हा ते पाणी साठवता येते. तिथून पुढे चालत गेल्यास  गडाच्या  पश्चिम बाजूला  कल्याण दरवाजा आहे. हा दरवाजा चोर दरवाजा म्हणून वापरात होता, असे सांगतात. सध्या कल्याण दरवाज्याने कोणीही गडावर येऊ शकत नाही . कल्याण दरवाजा मधून गडावर येणारी वाट  अतिशय खडतर आणि अवघड आहे.  त्या वाटेने कोणी गडावर आल्याचे पाहण्यात किंवा ऐकण्यात नाही. 

 किल्ल्याच्या दक्षिण बाजूला भैरव टाके आहेत. भैरव टाक्याच्या पूर्वेला एक नंदी आणि शिवलिंग आहे. भैरव टाक्याच्या दक्षिणेला एक वाघोबा देव आहे.





हौशी गिर्यारोहकांना रतनगडाचा ट्रेक अतिशय आनंददायी,  आव्हानात्मक आणि रोमहर्षक आहे.  त्र्यंबक दरवाजातून वर जाणे हा अनुभव अत्यंत धाडशी आहे. भल्याभल्यांना घाम फुटतो.  त्र्यंबक दरवाज्यातून वर गेल्यास आपण किल्ल्यावर येतो . किल्ल्यावर इमारती काही नाहीत .इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात .  गडाच्या मध्यभागी एक उंच टेकडी आहे .त्याला  हेल्याचे नाक म्हणतात तर काहीजण त्याला नेड म्हणतात . नेड्यातून  पश्चिमेला जाणे हे त्याहून रोमहर्षक आहे.  गडाचा मध्यभाग म्हणजे नेड्याचे उंची टोक. या टोकावरचा अनुभव घ्यायला  मन घट्ट करून जावं लागतं. या ठिकाणावर गेल्यास  विलोभनीय आणि अतिशय रोमहर्षक अनुभव आपल्या येतो. तिथली वरची बाजू साधारण दहा फूट रुंदीचीअसून 25 ते 30 फूट इतकी लांब आहे. खेळण्यातील घसरगुंडी प्रमाणे उतार आहे . तिथून पाय घासारल्यास परिणाम शेवट हाच आहे . पण व्यवस्थित वर चालून गेल्यास  ,दोन्ही बाजूला खोल दरी आणि पश्चिमेकडून किंवा  पूर्वेकडून येणारे वारे आणि हेलकावणारी हवा.अंगाला थरकाप उडवते.   पश्चिमेला खोल दरी  पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. नेड्यावरून  खाली उतरले की पश्‍चिम बाजूने चालत गेल्यास पाण्याच्या टाक्या लागतात.  पुढे अंधार कोठडी आहे. अंधार कोटीच्या पुढे कल्याण दरवाजा आहे. कल्याण दरवाजा हा खाली कोकणात उतरतो. हा चोर दरवाजा देखील म्हणून वापरला जातो.  कल्याण दरवाजा  पासून तसेच पुढे दक्षिणेला गेल्यास शेवटी  पाण्याच्या भैरव टाके आणि कडेलोट पॉईंट आहे. भैरव टाक्याच्या पूर्वेला एक मोठा नंदी आणि शिवलिंग आहे. भैरव टाक्याच्या दक्षिणेला वाघोबा हे देवस्थान आहे . भैरव टाकीच्या पूर्वेला एक टेहळणीचा  मनोरा आहे.  तो सध्या अर्धा मोडकळीस आलेला आहे. गडावरील इमारतीचे अवशेष दिसून येतात. पण प्रत्यक्ष इमारती नाहीत. मनोऱ्याच्या पूर्वेकडून एक वाट आहे. तो गणपती दरवाजा आणि हनुमान दरवाजा. रतनगडाची गिर्यारोहण एक रोमहर्षक अनुभव आहे.

   रतनगडावर जाणारा एक मार्ग म्हणजे , गावातून ओढ्याच्या दक्षिण बाजूने पुढे गेल्यास तलावाच्या काठावरून गडाच्या दिशेने चालत जाता येते. या बाजूला तीन ठिकाणी शिडी लावलेल्या आहेत.  त्या शिड्या पार करून पुढे हनुमान दरवाजा लागतो. हनुमान दरवाज्यातून आत गेल्यावर उजवी कडे एक वाट जाते ती रतनदेवीच्या मंदिराकडे जाते. रतन देवीचे मंदिर हे कातळात कोरलेले आहे आणि देवीची मूर्ती देखील कातळावर कोरलेली आहे. 

गडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मारुती दरवाजा आणि गणपती दरवाजा. त्याचबरोबर त्र्यंबक दरवाजा हे गडाचे मुख्य दोन दरवाजे आहेत. बाकीचे चोरवाट आणि कल्याण दरवाजा ह्या चोरवाटा आहेत.



घळीतून वर चढण्याच्या  वर दरवाजा आहे त्याला त्र्यंबक दरवाजा म्हणतात. मेरू पर्वताला  स्थानिक लोक खुंटा देखील म्हणतात. खुंटा म्हणजेच  समुद्रमंथनाच्या वेळी  रवी म्हणून वापरलेला हा मेरू पर्वत आहे असे म्हणतात.  खुंटाच्या उत्तरेकडील डोंगराला दैत्य म्हणतात तसेच त्याला महीषा असे देखील म्हणतात. 

 


शिवराम सखाराम झडे यांच्याकडे रत्नादेवीची पूजा असते. पूजेच्या मोबदल्यात झडे यांना  गावकऱ्यांकडून काही मोबदला दिला जात नाही.  दिवाळीच्या वेळी देवीची मोठी यात्रा असते.  दसऱ्याच्या दरम्यान देवीला वाट करतात. जून  ते सप्टेंबर पावसाळ्यात भरपूर पाऊस असतो.  चार महिने तेव्हा झाडे वाढलेली असतात. वाटा बंद झालेल्या असतात.   पावसाळा उघडल्यानंतर देवीकडे जाण्यासाठी वाट केली जाते.  वाटेवर येणारी झाडेझुडपे फांद्या तोडून बाजूला केले जातात;  आणि देवीसाठी वाट केली जाते.  ती वाट करण्यासाठी गावातील भक्त लोक,  पै-पाहुणे आसपासच्या गावातील लोक देखील येतात.  त्याला आईची वाट मोकळी करणे असे म्हणतात. ही वाट केल्यानंतर देवी आपल्या घरी चालत येते ;  अशी कोळी  समाजाची  श्रद्धा आहे.  देवीची पालखी नाही .

जेव्हा समुद्रमंथनातून रत्न बाहेर  निघाले ते रत्न निघाल्यानंतर इथं   रतनगडावर आणून ठेवले. म्हणून गडाचे नाव रतनगड  पडले असे सांगतात. समुद्रमंथनातून निघालेले अमृत हे किल्ल्याच्या पायथ्याला  देवांनी वाटून घेतले.  तिथे अमृतेश्वर मंदिर आहे .  नेवासा येथे देवाने अवतार सोडला. देव आपसात अमृत वाटताना एक दैत्य अमृताचा घडा घेऊन पळाला.  तेव्हा देवाने ज्या ठिकाणी दैत्याचे कोपरापासून  हात तोडले त्या ठिकाणाला  कोपरगाव हे नाव पडले.  पूर्वी त्या ठिकाणाला राक्षस कोपरगाव असेही म्हणत. 

 किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या भरपूर आहेत. एका ठिकाणी सलग  सहा पाण्याच्या टाक्या आहेत.  मात्र  एका टाकीमध्ये वेगळ्या रंगाचा पाणी  पाहायला मिळते. त्याचे सविस्तर कारण कोणाला सांगता आलं नाही.

गडावर कोणत्याही प्रकारची वस्ती नाही अथवा कोणी मुक्कामास  राहत नाही. ट्रेकिंगला किंवा गिर्यारोहणासाठी आलेले काही लोक गडावर राहतात, वस्ती करतात, स्वयंपाक करतात. जेवण करतात. दुसऱ्या दिवशी गड उतरून खाली येतात. 

शिवराम झडे हे पुजारी कधीतरी गडावर  मुक्कामाला राहतात ; रात्रीची देवीची पूजा करुन, सकाळी देवीची पूजा करून ते पुन्हा गडाखाली येतात.

हनुमान दरवाजा आणि गणपती दरवाजा यांच्या मधून एक उत्तरेकडे जाणारी वाट आहे. उजव्या हाताला पुढे गेल्यास कातळात कोरलेले छोटे मंदिर आहे. कातळावर देवीची मूर्ती  कोरलेली आहे .  रतन देवीच्या मंदिराच्या उत्तरेला एक घळ आहे. त्या  घळीचा उद्देश कोणालाही सांगता येत  नाही.  किंवा पाहण्यात  किंवा  ऐकण्यात नाही. काहीवेळा पुजारी किल्ल्यावर मुक्कामाला राहतात. शंकराची आणि  देवीची आरती दुर्गे दुर्घट भारी ही आरती म्हटली जाते.  किल्ल्यावर पाणी विकणारे विक्रेते तुरळक असतात. गडावरच्या टाक्यांमध्ये एकदम स्वच्छ आणि नैसर्गिक स्वरूपात पाणी आढळते. गडावर प्रत्यक्ष इमारतीचे अवशेष दिसत नाहीत परंतु इमारती असल्याच्या खुणा दिसतात. कडेलोट आणि चोरदरवाजा यावरून फक्त दोराने चढता  येते  म्हणजे हौशी गिर्यारोहक गिर्यारोहण करतात . कल्याण दरवाजाची दुरुस्ती करणार आहेत असे सांगितले जाते. राघोजी भांगरे नावाचा एक क्रांतिकारक होता.  त्यांच्याकडे हा किल्ला  होता.  किल्ल्याच्या पायथ्याला रतनवाडी हे गाव आहे. रतनवाडी मध्ये अमृतेश्वर नावाचे एक शिवलिंग आणि अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेले अमृतेश्वर नावाचे मंदिर आहे.  मंदिराचा प्रत्येक दगड अगदी बारीक नक्षीने कोरलेला आहे. बाजूलाच भाटघर धरणाच्या पाण्याचे बॅक  वॉटर आहे.  शिवलिंगा जवळ पाणी येते. महाशिवरात्रीला मोठी गर्दी असते. याच डोंगरात प्रवरा नदीचा उगम झालेला आहे.

किल्ल्याच्या पूर्व बाजूकडून टोलारखिंड आणि हरिश्चंद्रगड ला  वाट  जाते. या वाटेने असेच दक्षिणेला गेल्यास  पुढे कुमशेतला मुक्काम करता येतो.  त्यानंतर पुढे पेटाचीवाडी ला देखील मुक्काम करू शकता. 


 छत्रपती शिवराय सुरतेची लूट केल्यानंतर इथूनच कोकणकडा आणि रतनगडाच्या पूर्वबाजूने गेल्याचे सांगतात. या गडावर लूट केलेला माल ठेवायचा हा विचार होता. परंतु सुरतेची लूट करून आणल्यानंतर रतनगडाचा पायथ्यावरून हरिचंद्र गडावरून लोहगडाकडे रावण झाले अशी नोंद आहे .   रत्न ,  ऐवज व  धनसंपत्ती ठेवली असे सांगतात. 

 

रतनवाडी गावात पांडवकालीन मंदिर आहे.  मंदिरात अतिशय सुंदर बारीक अशी नक्षी कोरलेली आहे. एकही दगड नक्षी शिवाय नाही.  कोरीव नक्षीकाम एक अजोड नमुना अमृतेश्वर मंदिरावर पाहायला मिळतो. समुद्रमंथनातून निघालेले अमृतघट ;त्याची वाटणी रतन गडाच्या पायथ्याला देवा देवा मध्ये होत होती असं सांगितलं जातं. अचानक दैत्य आला आणि घडा घेऊन पळाला. दैत्य आणि  देवाची लढाई कोपरगाव येथे झाली .दैत्याचे कोपरापासून हात तोडले म्हणून त्या गावाला राक्षसाचे कोपरगाव असे म्हटले जात होते.

 देवीच्या उत्तरेच्या बाजूला एक मोठी घळ आहे. या घळीमध्ये कोणत्याही प्रकारचे लेख किंवा मूर्ती नाहीत.परंतु कोरून काढलेले खुणा दिसतात.  या घळीपासून पुन्हा गणपती  दरवाजाकडे येऊन गडावर प्रत्यक्ष प्रवेश करता येतो. गडावर प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला कडेलोट पॉईंट आहे. समोरच मनोरा आहे. मनोरच्या पश्चिमेला पाण्याच्या  भैरव टाक्या आहेत. टाक्याच्या उत्तरबाजुला इमारतीचे काही अवशेष पाहायला मिळतात. 

रतनगडावर जाणारा दुसरा मार्ग म्हणजे रतनवाडीच्या उत्तर बाजूने डांबरी रस्त्याने जाऊन डोंगराच्या बाजूने पठारावरून चालत जाता येते . हा मार्ग म्हणजे लांब असला तरी कमी चढणीचा आहे . या मार्गाने लांब चालत जावे लागते . पठारावरून पूर्वेकडे भंडारदरा धरणाचे पाणी दिसते तर पश्चिमेला सांदन दारीचे  साम्रद गाव दिसते . रतनगडावर या बाजूने जाताना मध्ये तीन  उंच डोंगर लागतात त्यातल्या पहिल्या टेकडीला रेडकू म्हणतात, दुसऱ्या पर्वताला म्हैस म्हणतात आणि तिसऱ्या पर्वताला खुंटा म्हणतात. हा खुंटा म्हणजे  समुद्रमंथनाच्या वेळी    वापरला गेलेला मेरू पर्वत होय. मेरू पर्वत आणि रतनगड हे दोन डोंगर ज्या ठिकाणी जोडतात तिथून खाली सांदन दरी(सांदन व्हॅली) कडे जाता येते.  सांदन व्हॅली चे कोकणात उतरणारे मुख इथून ओझरते पाहायला मिळते; पण स्पष्ट लक्षात येत नाही. इथूनच कोकणकड्याचा पूर्वेकडचा भाग पाहायला मिळतो. पलीकडे भाटघर धरण भंडारदरा धरण आणि  भंडारदराच्या  उत्तरेला कळसूबाई शिखर स्पष्टपणे दिसते. हौशी गिर्यारोहकांना पुर्ण एका दिवसाचा म्हणजे पाच ते सहा तासाचा हा गिर्यारोहणाचा आनंद रतनगडावर घेता येतो. रतन गडाच्या पायथ्याला काही हॉटेल्स आहेत. तेथे राहण्याची जेवणाची सोय आहे. घरगुती पद्धतीचे जेवण हॉटेल्समध्ये मिळते. रात्री मुक्कामाला गेल्यास सकाळी पाच- सहाच्या दरम्यान गिर्यारोहणाला सुरुवात करता येते. साधारणपणे अडीच- तीन तास रतनगडावर  जायला लागतात. दीड ते दोन तास गडाला चौफेर पाहण्यासाठी लागतात. आणि पुन्हा दीड ते दोन तासात गडावरून खाली यायला लागतात . 

पाहण्याची ठिकाणे 


येथून समोरच खाली भंडारदरा धरणाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे  पंद्याड, औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.

पोहोचण्याच्या वाटा 

या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्‍यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्‍याला जाणार्‍या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात. वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते.

प्रवास 

स्वतःचे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी (खुर्द) गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्‍याला गेल्यानंतर धरणाच्या दक्षिण बाजूने रतनगड मार्गाने रतनवाडीमध्ये जाते.

त्याचबरोबर पुणे-अहमदनगर रोडने आळे फाट्यावरून राजूर वरून भंडारदरा रस्त्याने शेंडीपर्यंत येता येते .

राहाण्याची सोय

येथे  गडावर राहण्याची सोय नाही. गडा खालील काही  हॉटेल्समध्ये किंवा भंडारदर्‍याला किंवा शेंडी गावात राहण्याची सोय होऊ शकते. गडाच्या  पायथ्याला रतनवाडी गावात काही हॉटेल्स आहेत .तिथे राहण्याची चांगली सोय होऊ शकते . शिवाय रतनवाडी गावात घरगुती राहण्याची सोय करतात. 

जेवणाची सोय

रतनवाडी  गावात/ भंडारदर्‍याला जेवणाची सोय होते. तसेच विकेंड ला वाटेत किरकोळ  सरबत विक्रेते असतात.एरवी कोणी नसते .

पाण्याची सोय

गड चढाई करताना वाटेत कुठेही पाणी नाही. गडावर पाण्याच्या टाक्या आहेत पाणी नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध आहे स्वच्छआहे, परंतु टाक्यातील पाणी पिणे स्वतःच्या प्रकृतीवर अवलंबून आहे  .पहाटे किंवा शिरवाळात चढाई केली तर पाणी कमी लागते. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत चढाई केली तर पाणी अधिक लागते. वाटेत पाणी मिळत नसल्याने रतनवाडी गावातूनच पाणी भरून घ्यावे लागते.


इतर पाहण्याची ठिकाणे 

जवळच आशियाखंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी ,सांदन व्हॅली  आहे. पश्चिमेला घाटघर धरण आहे.तिथेच कोकणकडा आहे ..भंडारदरा-हरिश्चंद्र  अभयारण्य  देखील आहे .

आमचे नियोजन 

उषःकाल  ट्रेक अँड टूर्सच्या वतीने  कळसुबाई व रतनगड हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला .29 जानेवारी 2021 ला वसंत नारायण माने सर काराजनगी शाळेत आले आणि कळसुबाई शिखर गिर्यारोहण नियोजन असल्याचे सांगितले. राहुल टकले  सरांनी चांगले नियोजन केले होते .या आधी त्यांनी वासोटा किल्ला  ट्रेकिंग केले होते. सर्व ट्रेकर्सना राहुल सरांनी आधीच माहिती दिली . 

सर्व ट्रेकर्सचे भटकंती एक्सप्रेस अंतर्गत उषःकाल ट्रेकर्स ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत. 

आपण सर्वजण कळसुबाई  या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर आणि शेजारी असलेल्या रतनगडावर ट्रेकिंग करण्यासाठी  जाणार आहोत .

सदर प्रोग्राम खालील प्रमाणे राहील 

🛑शनिवारी दुपारी ठीक चार वाजता सांगोला (जि-सोलापूर)  येथून आपण कळसुबाई कडे प्रस्थान करू. 

🌍साधारणपणे नऊ तासाचा प्रवास करून आपण कळसूबाईच्या पायथ्याशी बारी या गावात पोहोचू. 

🎪  तंबूमध्ये  पहाटे पाच वाजेपर्यंत मुक्काम करू.

   पाच वाजता कळसुबाई शिखर सर करण्यासाठी निघू. शिखरावरती बघण्यासारखे काही नाही परंतु आपण पण

 🌄  जर सूर्योदयापूर्वी शिखरावर दाखल झालो तर शिखरावर वरून दिसणारा सूर्योदय हा विलोभनीय आहे.

 धबधबा पॉईंट , दरी विव्ह पॉईंट आणि सह्याद्रीच्या इतर रांगा इत्यादी नजरेखाली घालता येतात. 

🛑एक तासाच्या विश्रांतीनंतर आपण शिखरावरून खाली उतरू. 

🛑शिखराच्या पायथ्याशी घरगुती जेवणाचा आस्वाद घेऊ.

 आपण येथूनच सहा किमी अंतरावर भंडारदरा धरण पाहू. 

 🛑 पुढे 12 किमी असणाऱ्या सांदन व्हॅली या निसर्गरम्य दरीकडे प्रस्थान करू.सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत व्हॅलीमध्ये  मध्ये फिरु. 

 🛑  पुढे 5-6 किमी असणाऱ्या   रतनगडाच्या पायथ्याशी मुक्काम ला जाऊ. 

🌍 मुक्काम झाल्यावर सोमवारी सकाळी आपण रतनगड ट्रेकला जाऊ. सायंकाळी पाच वाजता परतीच्या प्रवासाला लागू. 

    🛑🛑🛑🛑 महत्त्वाचे 🛑🛑🛑🛑

  आपण ट्रेकिंगसाठी जाणार आहोत, हे लक्षात घेऊन आपले कपडे हे  सैल, आरामदायी असावेत. पायांमध्ये बूट असावेत.

🛑कळसूबाई ला थंडी असल्याने थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे असावेत.

🛑 सोबत एक बॅटरी असावी. चालताना त्रास होऊ नये म्हणून काठी असावी ..

एनर्जी वाढवणारे खाद्यपदार्थ घ्यावेत ,जसे गुळ ,लेमन गोळ्या, ड्रायफ्रूट, तिळाच्या पोळ्या इत्यादी .

शनिवारी संध्याकाळचे  भोजन  घरून सोबत घ्यायचे आहे .

जेवण सोबत घेताना आपणाला जेवढे लागते  तेवढेच घ्यावे. शिळे राहील इतके जेवण घेऊ नये..

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

#####################################


2 comments: