जेठी वाटणी- मोठ्या भावाचा हक्क ....
परवा माझ्या शेजारच्या घराची वाटणी आहे असं कळलं . पंच म्हणून मला बोलावलं. पंच म्हणून मला काही अनुभव नव्हता .पण नुसतं हजर तरी राहा म्हणाले शेजारी .आम्ही शिकलेली पोरं. गावकीचं अन् भावकीचं तिढं आम्हाला लवकर कळत नव्हतं.पण वाटणी करताना किती अडचणी येत्यात ते मात्र प्रत्यक्ष वाटणी करताना कळलं.
वाटणीत एक मात्र नक्की समजलं ,की कारभारी हा भारी काराचा असतो , म्हणजे कारभाऱ्याचा कार भारी . काही ठिकाणी कारभारी त्यांच्या इतर भावांना म्हणतो ,घेऊ दे त्यांना जे हवंय ते. मात्र त्यांनी आपल्या बुडाखाली भरपूर माया गोळा केलेली असते. ती मात्र इतरांना दिसत नसते.
काही ठिकाणि बँक खात्यात रक्कम असते .काही ठिकाणी विमा काढलेला असतो. काही ठिकाणी व्याजाने पैसे दिलेले असतात.काही ठिकाणी उसने पैसे दिलेले असतात. काही ठिकाणी उसने पैसे आहेत म्हणून सांगितले जाते. काही ठिकाणी उदारी दाखवली जाते . काही ठिकाणी तर प्रत्यक्ष वाटणीच्या दिवशी चक्क कर्ज आहे म्हणून सांगितले जाते. घाम फुटतो असलं ऐकून .कसं माणसं सहन करत असतील कुणास ठाऊक ?
आमच्यातल्या एका ठिकाणी मी जमीन मोजून द्यायला गेलो. तेव्हा मला खरंच फार आवडलं .कारण वाटणी करताना आम्ही केवळ तिघेजण होतो . एक म्हणजे मी आणि ते दोघेजण भाऊ .मी म्हंटलं आहो पंच कोण बोलावलं नाहीत का ? त्यातले थोरले बंधू म्हणाले , कशाला उगीच भांडणाला कार ? त्रास वाढवायचा तर पंच बोलवायचं .
मी म्हणालो अहो उद्या तुमच्यात भांडण झालं तर दोन माणसांना माहीत असावं . दोन साक्षीदार असावेत................
माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले .कदाचित मोठा भाऊ सांगेल तसं आपणाला करावे लागणार की काय ? माझ्या मनात चिंता वाढली . मापं टाकून शेत वाटून दिले. मोठ्या भावापेक्षा लहान भावाला क्षेत्र जास्त ठेवले होते. तरीही माझ्या मनातील शंका वाढू लागली . समजा इथं शेतात सांगेल तसं केलं . हे बरोबर आहे .पण कागदावर छक्केपंजे केले तर ? सध्यातरी माझ्याकडे उत्तर नव्हते . उद्याचा काळ मला उत्तर देणार होता .पण सहा महिन्यांनी मी त्या लहान भावाला विचारलं," अहो तुमची परवा वाटणी झाली ते सगळं व्यवस्थित झालं का ? " तर ते म्हणाले झालं व्यवस्थित .कसं ठरवलं तसं केलं. उतारा देखील मिळाला . मला फार आनंद वाटला. अशी वाटणी झाली पाहिजे .
एका ठिकाणी तर वेगळीच वाटणी चाललेली . चौघे भाऊ . एक कारभारी, दुसरा बैलका ,तिसरा मेंढका आणि चौथा नोकरदार. नोकरदाराने दहा वर्षे नोकरी गावात राहून केलेली .माझे भाऊ मागे राहू नयेत म्हणून स्वतः त्यांच्या सोबत राबत होता .त्यांच्या सोबत वाळलं ,वलं खात होता. चटणी भाकरीला पंचपक्वान्न मानलं. कधीही त्यानं स्वतः नोकरीला लागला म्हणून हॉटेलात, बाजारात जाऊन चैनी केली नव्हती . स्वतःला कधी त्यानं चड्डी देखील खरेदी केलेली नव्हती. सारं काही कारभारी बघायचा . नोकरदार भावाला मित्र ,पाहुणे गावकरी उसने पैसे मागायचे .तर म्हणायचा , " कारभाऱ्याला विचारा !"
पण वाटणीच्या वेळी मात्र भावांनी पंचांना सांगून तीन वाटण्या केल्या . नोकरदार आहे , त्याला कशाला पाहिजेत जनावरं ? जनावरं पाहिजे हुती तर राखायची हुती त्यानं ! तिघा भावांनी हट्ट धरला की चौथ्याला जनावरं आणि धान्यात वाटणी द्यायची नाही .शेवटी तेच झालं. जनावरं आणि धान्य वाटप करताना तीन वाटण्या केल्या . पंच म्हणत होते , वाडवडिलांपासून मेंढरं हायती .एखादं रोडकं करडू द्या. बाकीच्या तिघांनी अजिबात ऐकलं नाही. भावकीतला चुलता म्हणाला " नोकरीला हाय म्हणून काय झालं ? वाडवडिलांची लक्ष्मी आहे रे, एखादं पाटरू तरी द्या .पण बाकीचे तिघेजण त्या नोकरदाराला काही द्यायला तयार नव्हते.आणि त्याला रेडकू , वासरुच काय ? तर मेंढीचं कोकरू देखील दिलं नाही.
काही ठिकाणी जेठ्या वाटणीचा एक फार मोठा इश्यू केला जातो .जेठी वाटणी म्हणून कुणाला अर्धा- एक एकर जमीन दिली जाते. काही ठिकाणी एखादं दुसरं मोठं जनावर ठेवलं जातं. काही ठिकाणी शेरडू , मेंढरू ठेवलं जातं. आम्ही म्हणायचो जेठी वाटणी का ठिवयाची ? तेची काय गरज आहे ? सरळ नियमाने काय असेल ते समान वाटून द्यायचं .
मध्ये काय बोलायला गेलं तर म्हणतात, " रिवाज आहे ,द्यायला पाहिजे." रिवाजाच्या बाहेर कसं वागायचं? मला देखील प्रश्न पडला. ही जेठी वाटणी असती तर काय?...…...........
माझ्या लहानपणी माझ्या वडिलांच्या मावसभावांनी जेठ्या वाटणीसाठी चार वर्षे जमीन पडीक पाडली होती.पण लहान भावांनी जेठ्या वाटणीला कायमच विरोध केला. पण जेठी वाटणी होऊ दिली नाही. माझ्या चुलत मामाने देखील जेठ्या वाटणीचा हट्ट केला होता. सात जण भाऊ आणि तीन बहिणी होत्या. मोठा मामा कुणाचं काही एक ऐकायला तयार नव्हता ,तेव्हा नाविलाजने पंचांनी शेवटी एक चांगली दोन येताची दांडगी म्हैस जेठी वाटणी म्हणून ठेवली हुती.
सुतार सरांच्या घरी केवळ एक आंब्याचं झाड आपल्या हिश्यात यावं म्हणून मोठ्या भावानं जेठ्या वाटणीचा हट्ट धरला. जमीन देखील चांगली हवी होती अन् जादा देखील हवी होती. सरांनी भांडणाचा पाया नको म्हणून पाच गुंठे जमीन दिली .तरीही अजून जमीन पाहिजे म्हणून हट्ट धरला. दहा गुंठे वाढवली तरीही मोठ्या भावाचं मन शांत होईना . मोठा भाऊ मात्र ताकाला जाऊन भांडं लपवत होता . जमीन वाढवून दिली ,तरीही मोठ्या आंब्याचं झाड मात्र सरांच्या शिष्यातच येऊ लागलं . वाटप पत्राच्या दिवशी शेवटी आणखी दहा गुंठे जमीन वाढवली . कुठं पर्यंत येतंय ते बघितलं. आंब्याचं झाड आपल्यात येतंय असं दिसलं तेव्हा , " बर असू द्या म्हणून मोठा भाऊ तयार झाला . मोठ्या आंब्याच झाड आपल्या हिश्यात आल्यावर जमीन वाढवून मागायचं बंद केलं. त्या वर्षी चार पाच हजार आंबे लागले असतील . मोठ्या भावांनी एक पिकलेली कुय देखील सरांना दाखवली नाही. सरांना काय वाटलं असेल?
कायदा सांगतो एका बापाची जितकी लेकरं त्यांचा बापाच्या संपत्तीत त्यांचा समान वाटा असतो .मग ही जेठी वाटणी भानगड काय असते? मी काही मुरम्मी मंडळींना विचारलं की , का हो ? " ही जेठी वाटणी काय असते ? " त्यावेळी मला कळलं की , पूर्वी जेठी वाटणी गरजेची होती .
त्याचं कारण असं की , पूर्वी एका बापाला आठ दहा पोरं व्हायची .शेंडफळ करतुकीला येउपर्यंत मोठ्या भावाच्या पोरांची लग्न व्हायची . तेव्हा आईवडिलांबरोबर मोठा भाऊ लहान भावाच्या पालन पोषणात भागीदार व्हायचा . लहान भावाचा सांभाळ आई वाडीलांप्रमाणे मोठा भाऊ करायचा . पूर्वी मोठ्या भावाला आई वडील, लहान भाऊ आणि स्वतःची पोरं सांभाळावी लागायची . तेव्हा पूर्वी रिवाज होता .जेठी वाटणी ठेवायची . पूर्वी आई वडिलांच्या पाठीमागे लहान भावाचा सांभाळ हा मोठा भाऊच करायचा . त्याचं ते कर्तव्य समजलं जायचं . तेव्हा त्याला मोठा भाऊ , सगळ्यांचा सांभाळ कर्ता, म्हणू जेठी वाटणी ठेवायची . एक दोन एकर जमीन त्याला जेठी वाटणी म्हणून ठेवायची . काहीजण बैल ,गायी, म्हैस, शेळ्या ,मेंढ्या ठेवायची .
आज काळ बदलला आहे. एका बापाला दोन किंवा एकच मूल असतं. तेव्हा ती दोन्ही मुलं एकदाच म्हणजे संगसंग मोठी होतात .कोण कुणाचा सांभाळ करायचा प्रश्न येत नाही .तेव्हा जेठ्या वाटणीचा तर प्रश्न कुठं येतोय ? पण तरीही अजून काही ठिकाणी जेठ्या वाटणीचा हट्ट धरला जातो .
माझे मित्र , वीस वर्षे नोकरी केली .वाटपाच्या वेळी विषय निघाला .मोठा भाऊ म्हणाला मला जेठी वाटणी पाहिजे . लहान भावांनी विचारले की , "का द्यायची तुला जेठी वाटणी ? " तर मोठे भाऊ म्हणाले मी मोठा आहे म्हणून द्यायची . लहान भाऊ म्हणाले , तू काय माझं कर्ज फेडलं का काय ? माझ्या पगारातून कर्ज फिटत गेलं. पगार कमी यायला लागला . घरात पगार द्यायचं कमी झाल्यावर तू वाटून मागायला लागलास. गेली दहा वर्षे घर, विहीर आणि आणि पाईप लाईनच कर्ज अजून फेडतोय .अन् वर म्हणताय तू नोकरीला हायस . राहिली किती वर्षे माझ्या नोकरीची .अन् रिटायर झाल्यावर मी किती शेती करून मिळवणार आहे ? बरं यानं काय उसतोडी करून पैसे दिले नाहीत ,की कुठं कामाला जाऊन दिले नाहीत .उलट हिंडून फिरून जमलं तर बा बरोबर काम करायचा नाहीतर बोंबलत हिंडायचा . पाच किमी चालत जाऊन शाळा शिकलो मी. दहावी झाली तवा हाच म्हणाला हुता बस कर शाळा . भरपूर शात हाय .करून खाऊ .अकरावी बारावीत एक टायमाला ताजे आन खाऊन शाळा शिकलो . आई म्हणाली, तुला शाळा शिकवायची होत नसेल तर त्याच्या वाटणीची जमीन इकून शाळा शिकवती . तवापासून तुझ्या पोटात दुखतंय . मग याला कशाला पाहिजे जेठी वाटणी ? ज्या दिवशी बापाचं दहावा दिवस होता त्या दिवशी चार माणसात म्हणाला की मिळून राहू दे नाहीतर त्याचा त्याला वाटून घेऊ दे . म्हणजे त्याला वाटूनच द्यायचं होतं. उगाच म्हणाला मिळून खाऊ दे, पण वरच्या मनानं .
ज्या महिन्यात पगार कमी यायला लागला .त्या दिवसापासून याची भाषा अशी बदलून यायला लागली . जसा बाप मेला त्या दिवसांपासुन आईनं त्याच्या बायकोच्या हाताचा एक घास खाल्ला नाही . आईला त्याच्या लुगड्याची नव्हे तर चोळीची देखील वळख न्हाय. दवाखान्यातून सोड ,मेडिकल मधून देखील एक गोळी आणली नाहीस .एक सोडून तीन बहिणी आहेत .कुठल्या बहिणीला मोठा भाऊ माहीत आहे का ? बहिणींना आठ दहा वर्षात माहेरची साडी चोळी माहीत नाही. बहिणींना आहेर माहेर केलाय का कधी ? आज बरोबर दहा वर्षे झाली बाप मरून. त्यानं दिलंय तिथं मी करून खातोय . बघू वाटायच्या वेळी असंम्हणून मी गप्प आहे .कुठं आपण रोज शेतात राबतोय ? करून खातोय आपला भाऊ तर खाऊ दे म्हंटलं .आज मी माझ्या हिश्या प्रमाणे वाटून दी, म्हंटलं तर ह्याला जेठी वाटणी पाहिजे ! मी दिली असती जेठी वाटणी .पण कोणत्या कारणाने द्यायची जेठी वाटणी ?
पंच देखील जेठ्या वाटणीचा बाऊ करतात .की जसं मोठ्या भावनेच लहानाला सांभाळला . जसे की त्याचे आई वडील नव्हतेच.पण जेव्हा दोन्ही भाऊ एक दोन वर्षाच्या फरकाने असतात तेव्हा कुणाला द्यायची जेठी वाटणी ?
आज कायद्याने अधिकार नाही .समजुतीने दिली घेतली जाते .पण आज तितकंसं संयुक्तिक वाटत नाही . तरीही अजून काही लोक जेठ्या वाटणीला असून बसतात. गेले कित्येक दिवस जेठ्या वाटणीचा प्रश्न अजून मला सुटला नाही .
( हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ आज पर्यंत समाजात आलेला अनुभव याविषयी मत मांडलेले आहे . या लेखात शेतकरी अगर नोकरदार कुणाच्याही बाजूने हे मत मांडलेले नाही. लेखातील नावे व पात्रे काल्पनिक आहेत.साम्य वाटल्यास केवळ योगायोग समजावा . या लेखात लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत . धन्यवाद ! )
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
छानच....।।।
ReplyDeleteछान ,. वास्तविक...माहिती..।
ReplyDeleteजेठी वाटणीविषयी छान माहिती दिली आहे
ReplyDeleteखूपच छान...
ReplyDeleteमस्तच आहे माहिती
ReplyDelete