मी देवानाळ शाळेत होतो. इयत्ता दुसरीच्या वर्गाचे मराठी माझ्याकडे होते. त्या वर्गात कष्टाचंच खावं हा पाठ शिकवत होतो. पाठामध्ये ' सरूची आई शाळेजवळच्या चौकात लिंबे विकायला बसते .थोडेफार पैसे मिळवते, त्या पैशावर घर चालवते.' हा भाग आला. मी मुलांना प्रश्न केला,'घर चालवते म्हणजे नेमके काय करते सरूची आई? हुशार एक दोन विद्यार्थ्यांनी नी योग्य उत्तर दिलं. पण काहीजणांच्या चेह-यावर अजूनही प्रश्न चिन्ह होतं.
तेव्हा मी आणखी वेगळ्या उत्तरच्या अपेक्षेने इतर मुलांकडे पाहून प्रश्न विचारले .उत्तराच्या आसपास असणाऱ्या मुलांना आणखी काही उदाहरणे देऊन मी त्या वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करत होतो . इतक्यात माझी नजर एका अवधान नसलेल्या मुलाकडे गेली . तेव्हा मी पटकन त्याला प्रश्न केला, सांग बघू तुझं घर कसं चालतंय ? लक्ष नव्हतं त्याचं माझ्याकडे .अचानक प्रश्न केल्यामुळे ते गांगरून गेलं. पोरगं घाबरलं. इकडं तिकडं बघू लागलं . कांवरं बावरं झालं . त्याला रडू आलं. त्याला कदाचित वाटलं भलताच प्रश्न आहे हा . ते उत्तर आठवण्याच्या तयारीत असताना मी पुन्हा म्हणालो, सांग सांग पटकन सांग , तुझं घर कसं चालतंय ? पोरगं रडायला लागलं आणि म्हणलं, सर आमच्या घराला चाकं न्हायती . वर्गात एकदम हशा झाला. तोवर दुसऱ्या कोपऱ्यात, मुलं कशानं हसली म्हणून बेसावध असलेलं पोरगं माझ्या नजरेतून सुटलं नाही. मी त्याला उठवले अन् विवारलं, हे सांग बघू त्याच्या घराला चाक न्हयाती . त्याचं घर चालत न्हाय , मग मला सांग आता , तुझ्या घराला किती चाकं आहेत?
त्याला वाटलं घर चाललंय म्हटल्यावर त्याला चाक असल्याशिवाय चालणार नाही, तेव्हा ते लगेच म्हणाले 'चार'.पून्हा वर्गात जोराचा हशा झाला. सावध मुलं हसाय लागली, म्हणाली, ये बाबा ! घराला कुणाच्या चाकं तर असत्याती का?
त्याच वर्गात मी एकदा दोन अंकी दोन संख्यांची बिन हातच्याची बेरीज शिकवत होतो. उदाहरणासाठी दोन संख्या सांगितल्या.विद्यार्थ्यांनी लिहून घेतल्या. मुलं गणित सोडवू लागली .काहींनी बरोबर बेरीज केली. काही मुलांची बेरीज चुकली . चुकलेल्या विदयार्थ्यांना पुन्हा व्यवस्थित कळावं म्हणून मी स्पष्टीकरण देत होतो. प्रथम एककमध्ये एकक मिळवावा आणि एककाच्या खाली त्यांची बेरीज लिहावी. नंतर दशकात दशक मिळवावा अन बेरीज दशकाच्या खाली लिहावी. हे सांगत असताना बेसावध मुलाकडे माझे लक्ष गेले . मी चटकन त्याला उठवलं आणि प्रश्न केला . एककात एकक मिळवून आलेलं उत्तर कुठं लिहायचं ? तर ते लाल्या (धीरज सुभाष सुतार ) होता. चांगला घाबरला. अभ्यासात कच्चा. आधीच बोबडा. मुलं कोण खुणावून उत्तर सांगतात काय हे पाहण्यासाठी इकडं तिकडं बघत होतं . इतक्यात त्याच्या शेजारच्या मुलाने , सर मारतील तिकडं बघ , असं खुणावले . मी म्हणालो , अरे सांग ना लवकर ! तर ते लाल्या 'म्हणतंय कसं ? ' फल्यावल.' मी पुनः पुन्हा पाचवेळा प्रश्न विचारला .तरीही पाचव्यांदा लाल्या म्हणलं 'फल्यावल.'
पुढे लाल्याला मुलं महिनाभर, फल्यावल इतकच चिडवायचे . अशा गंमती जमती करत शिकवायला फार मजा यायची .
माझे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री विष्णू ओमसे सर यांची बदली रामपूर शाळेवर झाली . वर्ग सात आणि शिक्षक चार अशी अवस्था .पहिलीच्या मॅडम एकदा रजेवर होत्या तेव्हा त्यांनी पाहिलेला एक ऱ्हाईम शिकवली .
Tall ears
Twinkly nose
Tiny tail and
Hop he goes ......
पूर्ण ऱ्हाईम सरांनी अकॅशन करून शिकवली .सलग तीन दिवस त्यांचे प्रॅक्टिस घेतले . Tiny tail ची action शिकवताना सरांनी पाठीमागे कमरेवर हात ठेवून हाताच्या बोटांनी शेपटी हलवल्याची action केली होती . एक आठवड्यानंतर सरांना वाटले, मुलांना ऱ्हाईम लक्षात आहे का पाहू या .सरांनी ऱ्हाईम मुलांना म्हणायला सांगितली .मुलांनी म्हंटली देखील छान .सरांना वाटले यांना किती समजलं हे पाहावे म्हणून प्रश्न विचारला .
Tiny tail म्हणजे काय रे ?
सगळी मुलं चिडीचूप .कोणीहि उत्तर द्यायला बोट वर केले नाही .सरांना राग आला .सर म्हणाले मी तुम्हाला इतकी छान ऱ्हाईम शिकवली आणि तुम्ही म्हंटली देखील छान .आता तुम्हाला सध्या शब्दाचा अर्थ येत नाही ?
तरीही वर्ग शांतच .............................!
कोपऱ्यात हळूच एक बोट वर येताना सरांना दिसले .सरांनी सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितल्या . मुलांनी कडकडाडून टाळ्या वाजवल्या . सरांना खूपच आनंद झाला. कुणीतरी अर्थ सांगायला तयार आहे.अभिमान वाटला .
सरांनी त्या मुलाला उभा केलं. सांग रे tiny tail म्हणजे काय ?
क्षणाचाही विलंब न करता ते पोरगं मोठ्यानं चिरक्या आवाजात म्हणालं ढुंगा s s ण .
सरांनी कपाळावर हात मारून घेतला .
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
No comments:
Post a Comment