बीज अंकुरे अंकुरे ,ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे ,माळरानी खडकात
बिजा हवी निगराणी हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर
मधुकर आरकडे यांच्या या ओळीचा खऱ्या अर्थाने जीवन अनुभवणाऱ्या बीजमाता राहीबाई. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या माथ्यावर काही विस्तीर्ण पठारं पसरलेली आहेत. त्यांपैकी असलेल्या एका पठारावर, दुर्गम भागात वसलेलं मौजे कोंभाळणे,तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर ,हे लहानसं आदिवासी खेडं. खडकाळ माळावर उभ्या असलेल्या या दुर्लक्षित गावाकडं जगाचं लक्ष वेधलं गेलं ते राहीबाईंच्या सीड बँकेमुळं!
बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री सन्मान जाहीर झाला. आदिवासी समाजातली लाजरीबुजरी, सामान्य शेतकरी महिला ते ‘बीजमाता पद्मश्री राहीबाई’ असा त्यांचा अथक मेहनतीचा आणि जिद्दीचा प्रवास अत्यंत वेधक आणि रोचक आहे.
साधारणपणे तीस पस्तीस पूर्वी शेतकरी कुटुंबात घरोघरी आवश्यक तेवढी बियाणं असायची. भाजीपाला, कडधान्ये, परसबागेतला भाजीपाला याची बियाणं शेतकरी बाजारातून विकत घेत नसत. पारंपारिक अनुभवातून विकसित झालेल्या विशिष्ट पद्धतीनं हे बियाणं तयार केलं जाई. यात प्रामुख्याने घराघरांतील महिलांचा पुढाकार असायचा. नव्वदच्या दशकानंतर जागतिकीकरण आल्याने ग्रामीण संस्कृतीचा चेहरा झपाट्यानं बदलत गेला. जीवन शैली बदलली. या काळात अनेक गोष्टी नष्ट झाल्या. वर्षानुवर्षे जतन, संवर्धन केलेली गावोगावची घराघरातली बियाणं नष्ट होत चालली होती. राहीबाईंचं घरदेखील याला अपवाद नव्हतं. मुलं कर्तीधर्ती झाली. अनेक वर्षांच्या अनुभवातून आलेला पारंपारिक दृष्टीकोन बाजूला सारुन आधुनिक बियाणं, औषधं, रासायनिक खतं वापरून त्यांनी शेती सुरु केली. हे बघून राहीबाई अस्वस्थ होत होत्या. मात्र पुरुषसत्ताक समाजात कुटुंबातल्या सासुरवाशीण महिलेचं म्हणणं कोण ऐकणार?
संकरीत वाणांचं अन्न खाताना घास राहिबाईंच्या जिभेवर फिरायचा. ‘घरापुरतं तरी आपलं बियाणं वापरू’ हे पटवून द्यायचा व्यर्थ प्रयत्न त्यांनी अनेकदा करून पाहिला. ‘सारी दुनिया हेच वापरतीय, समाज कुठं चाललाय अन हीचं आपलं भलतंच!’ असं उलटं ऐकावं लागलं. राहीबाई खचल्या नाहीत. त्यांनी निर्धार केला .त्यांनी आग्रह आणि हट्ट सोडला नाही. गोठा आणि कौलारू घराभोवती वेलवर्गीय भाज्या, फळभाज्या लावल्या. शेताच्या कडेला, बांधांवरही लागवड करत राहिल्या. घरातले, नात्यातले लोक, गावातल्या बचत गटाच्या महिला त्यांना टाकून बोलायच्या, हिणवायच्या. अनेकदा तर राहीबाईंना शेतातच रडू कोसळायचं. रात्री झोपताना डोळे गच्च भरुन यायचे. अपशब्द, अपमान त्यांनी गिळले. सगळं हलाहल पचवलं.
मीठ-मिरची घालून केलेली पारंपारिक बियाणांची भाजी किती चवदार होते, हे घरातल्यांना उशिरा का होईना पटलं. हळूहळू विरोध मावळला. राहिबाईंचा उत्साह वाढला. बियाणांची आवड होती, ती जोपासायला बळ मिळालं. शाळेत गेलेल्या नसल्या, लिहिता-वाचता येत नसलं म्हणून काय झालं? वडिलांच्या सहवासात लहानची मोठी होताना जगायला उपयुक्त माहिती-कौशल्याची भरपूर शिदोरी त्यांनी सोबत घेतली होती.
बियाणांविषयी त्यांना बारीकसारीक माहिती होती. बियाणांचं जतन कसं करायचं, याचं ज्ञान होते. शेतात, परसबागेत जी पिकं, भाजीपाला यायचा त्यातूनच बियाणं तयार केलं जायचं. पीक काढलं की त्यातून शेलक्या शेंगा, ओंब्या त्या बाजूला करत. टपोरे दाणे बियाणाला आणि बारके दाणे खायला अशी प्रतवारी त्या करत. सुपडायचं, पाखडायचं, निवडायचं, वाळवायचं असं त्यांचं काम अथकपणानं सुरु असतं. बियांना ऊन दिलं की ते साठवताना विशेष काळजी घ्यायला लागते. कोणत्या बियाणांत किती राख मिसळायची, राख मिसळताना ती व्यवस्थित चाळूण घ्यायची. (ही राख त्या जपून ठेवतात.) त्यात कारल्याच्या फोडी, कडूनिंबाची पानं मिसळतात. फांगुळणा नावाच्या अत्यंत गुणकारी, औषधी वनस्पतीचा पाला आणि बोंडं काही बियाणात त्या घालतात. हे तयार झालेलं बियाणं गाडग्यांत, मडक्यांत, बॉक्समध्ये साठवतात. काहीही झालं तरी साठवून ठेवलेल्या बियाणाला चैत्र महिन्याचं ऊन द्यायचंच असतं. हे ऊन दिलं की बियाणं जास्त काळ म्हणजे तीन वर्षांपर्यंत टिकतं, हे पुन्हा त्यांच्या ठायी असलेलं ग्रामीण शहाणपण. काकडी, वाळूक खाऊन झालं की यांच्या बिया उभ्या भिंतीला सारवून ठेवलेल्या असत. आपल्या नादात राहीबाई हे सारं करत आल्या.
‘बायफ’ ही स्वयंसेवी संस्था आहे. अकोले तालुक्यातल्या आदिवासी खेड्यांच्या विकासासाठी काम करते. संस्थेत कार्यरत अधिकारी जितीन साठे असेच एकदा बचत गटात काम करणाऱ्या राहीबाईंच्या घरी भेटीसाठी गेले. राहीबाई आपलं काम करत बसल्या होत्या. इतक्या प्रकारची बियाणं बघून, साठे आश्चर्यचकित झाले नसते तरच नवल. तिथल्या तिथे दोघांनी मिळून लांबलचक यादी तयार केली. राहीबाईंकडे १७ पिकांचे तब्बल ४८ वाण होते. उडदाचा निराळा प्रकार असलेला ‘उडदीन’ आणि काळा वाटाणा हे दोन अत्यंत दुर्मिळ वाण साठे पहिल्यांदा बघत होते. हा उडदीन आहे, हा पहिलवानांना खाऊ घालतात. हा पताड्या वाल, तो बोंबल्या घेवडा असं राहीबाई एकामागून एक सांगत होत्या. एका बियाणेतज्ज्ञाचे ते अनुभवसिद्ध बोल ऐकून साठे थक्क होऊन गेले. शेती क्षेत्रातले जाणकार असल्यानं या कामाचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं. खरं म्हणजे त्या दिवशी अचानकपणे त्यांच्या हाताला मोठं ‘घबाड’ लागलं होतं!
महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोग आणि ‘बायफ’ यांनी संयुक्तपणे महाराष्ट्र जनुक कोश हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. साठे यांनी राहीबाईंच्या बियाणांच्या संग्रहाविषयी वरिष्ठांना सांगितलं. ‘बायफ’चे अध्यक्ष गिरीश सोहनी खास राहीबाईंचं काम बघायला आले. संजय पाटील, डॉ. जयंत खडसे, डॉ. राजश्री जोशी, सुधीर वागळे असे अधिकारी त्यांच्या सोबत होते. राहीबाई एकेका पिकाच्या विविध वाणांविषयी तपशीलवार माहिती सांगत होत्या. अमुक बियाणं कोठून आणलं? त्याचं वय किती वर्षे आहे? त्यात कोणते औषधी गुणधर्म आहेत? ते कशासाठी गुणकारी आहे? एक दिवसही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या राहीबाई देशी वाणांच्या गुणवैशिष्ट्यांसह खडानखडा माहिती सांगत होत्या. अध्यक्ष सोहनी यांनी तिथंच या बियाणेसंग्रहाचं नामकरण ‘बियाणे बँक’ केलं. लाकडी फळ्यांनी सांधलेला, शेणामातीच्या घराला बिलगुन असलेल्या पडवीचा दरवाजा उघडला, तेव्हाच या देशी वाणांच्या अनोख्या ‘बियाणे बँके’चं उदघाटन झालं होतं. ही गोष्ट आहे एप्रिल २०१४ मधली.
बायफ संस्थेच्या मार्गदर्शनामुळं राहीबाई यांच्या कामाला शिस्त आणि दिशा मिळाली. तृणधान्य, तेलबिया, कडधान्य, भाजीपाल्यामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, रानभाज्या असं व्यवस्थित वर्गीकरण केलं. बियाणांमध्ये त्या भर घालत राहिल्या. आज राहीबाईंच्या बियाणे बँकेत ५३ पिकांचे ११४ वाण आहेत. कडधान्यांमधील घेवडा, वाल, उडीद, वाटाणा, तूर, हरभरा, हुलगा आदी १० पिकांचे ३५ वाण, भात, बाजरी, गहू, नागली आदी तृणधान्यांच्या सहा पिकांचे ३४ वाण, गळीत धान्यांमध्ये म्हणजे तेलबियांमध्ये तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस, खुरासणी या ५ पिकांचे ११वाण, विविध प्रकारच्या भाजीपाल्यातील २६ पिकांचे ३२ वाण, रानभाज्यांमध्ये ६ प्रकारचे कंदांचे १२ वाण शिवाय त्यांचं कौलारू घर आणि गोठ्याभोवती त्यांनी विविध प्रकारची निवडक झाडं लावून ती जगवली आहेत. झाडं वाढवताना बैलगाडीतून किंवा प्रसंगी डोक्यावरुन पाणी आणून झाडांना घातलं. रानावनात हिंडून दगड गोळा गारगोटीच्या दगडांचं अच्छादन केलं. त्यामुळं झाडांभोवती गारवा टिकून राहतो. गवत उगवत नाही. झाडाला कीड लागत नाही. अशा अनेक गोष्टींची समज राहीबाईंकडे आहे. झाडवेलींची उपजत ओढ, आवड राहीबाईंच्या रक्तात आहे. त्यांनी ती अत्यंत निष्ठापूर्वक जोपासली आहे. माध्यम ऊंची, काटक शरीर, नाकात भलीमोठी नथ, काठापदराचं नऊवारी पातळ अशी वेशभूषा असलेलं त्यांचं मुलखावेगळं व्यक्तिमत्त्व. आपल्या परिसर भाषेचा लहेजा सांभाळत, न्यूनगंडावर मात करत आत्मविश्वासानं ही महिला पन्नाशी ओलांडल्यावर आता कुठं समाजात वावरू लागलीय. अनेक वर्षे तालुक्याचं गाव न बघितलेली, सासरच्या धाकात वाढलेली, लाजरीबुजरी, समाजात न मिसळणारी, गरिबी चटके आणि बाईपणामुळं वाटयाला येणारे दुःख निमुटपणे सोसणारी, राहीबाई आता मंचावर उभी राहून आपले अनुभव ठामपणानं सांगू लागलीय. बचत गटांमध्ये सहभागी असलेल्या महिलांच्या माध्यमातून परसबागेसाठीच्या बियाणांचा प्रसार करु लागली. भीमथडी जत्रा, मोशी अशा निरनिराळ्या ठिकाणच्या प्रदर्शनात बियाणांचा स्टॉल मांडून देशी वाणांचं महत्त्व सांगत बियाणं विकू लागली. आजवर लाखावर बियाणांच्या पुडया तिनं विकल्या आहेत. काळाच्या ओघात पूर्णपणाने आधुनिकतेच्या आहारी गेल्यानं आपण किती, काय गमावून बसलोत, याचा हिशेब मांडून प्रश्न विचारु लागलीय. देशी बियाणांचा प्रसार-प्रचार हेच जणू तिचं जीवनध्येय बनलंय. राहीबाईंची बियाणे बँक आता राज्याच्या शेती क्षेत्रातील लोकांच्या औत्सुक्याचा विषय बनलीय. माध्यमांना या विषयाची नवलाई वाटू लागली होती. मुद्रित माध्यमांसह दूरचित्रवाणी वाहिन्यांवर बातम्या झळकल्या. लेख प्रसिद्ध झाले. समाजमाध्यमांत चर्चा सुरु झाली. राहीबाई चर्चेत आल्या, त्यांना अनेक मानसन्मान, पुरस्कार मिळाले.
एका कार्यक्रमात ज्येष्ठ शास्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी राहीबाईंचं वर्णन ‘मदर ऑफ सीडस’ असं अत्यंत चपखल शब्दांत केलं. तेव्हापासून राहीबाईंच्या नावाआधी 'बीजमाता' हे बिरुद जोडलं जाऊ लागलं. 'बीबीसी'नं जगभरातील प्रतिभावंत महिलांच्या यादीत राहीबाईंना स्थान देत त्यांचं काम विशेष असल्याचं जणू जगाला मोठ्या आवाजात सांगितलं. अच्युतानंद द्विवेदी यांनी राहीबाईंच्या कामाविषयी बनवलेल्या लघुपटाला फ्रान्समधील प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात तिसरे पारितोषिक मिळालं. मानाचे समजले जाणारे अनेक सन्मान मिळाले असले तरी स्मृतिचिन्हं ठेवायला घरात धड जागा नव्हती. पावसाळ्यात बियाणांना ओलाव्यापासून वाचवणं दिव्य काम असायचं. एका वृत्तवाहिनीनं आयोजित केलल्या कार्यक्रमात ही खंत त्यांनी बोलून दाखवली. तिकडं उपस्थित असलेले तत्कालिन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दगडातलं पक्कं घर बांधून दिलं. बियाणांना नीट निवारा मिळाला. राहीबाई आजही जून्याच घरात राहतात. मात्र जागा मिळाल्यानं बियाणांचं वर्गीकरण आणि मांडणी आता नीट केलीय. जितीन साठे यांच्यासह रोहिदास भरीतकर, योगेश नवले यांची त्यांना यासाठी मदत झाली.
२०१९मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राहीबाईंना नारी सन्मान सन्मानानं गौरवण्यात आलं. तेव्हा त्या पहिल्यांदा विमानात बसल्या. त्याविषयी विचारलं असता “इशेष वाटलं नाही. भारी बी नाय आन भीती नाय वाटली.” असं त्यांचं उत्तर. “विमानाला घाट नाही, वळण नाही. ते सरळ चालतं...” हे त्यांचं एखाद्या निरागस लहान मुलासारखं ‘निरीक्षण’ ऐकून आपल्याला हसू फुटतं. एका वृत्तवाहिनीचा अत्यंत मानाचा पुरस्कार घेऊन त्या घरी परतल्या. गाडीतून उतरल्या आणि घरात न जाता ते कलात्मक सन्मानचिन्ह ठेवलेली पिशवी नातवाच्या हाती दिली आणि तरातराचालत राहीबाई म्हैस आणायला रानात गेल्या. नातवंडं ते सन्मानचिन्ह खेळणं समजून खेळत राहिली. त्यांना मिळालेली काही सन्मानचिन्हं जून्या घरातून उंदरांनी पळवून नेल्याचे त्या सहज सांगतात. ना खेद ना खंत. त्याविषयी विचारलं तर ‘आपलं काम मानपानासाठी नव्हतं.’ असं त्यांचं आपल्यालाच निरुत्तर करणारं उत्तर. नुकताच त्यांना पद्मश्री जाहीर झालाय. त्याविषयी त्यांना काय वाटतं? असं विचारलं. “हा काळ्या मातीचा, काळ्या मातीत राबणाऱ्या सगळ्या मायमावल्यांचा अन माझ्या बियाणांचाही मान झाला आहे. मी जन्म झाल्यापासून काळ्या आईची सेवा करत आले. मरेपर्यंत करीत राहीन,” अशा त्यांच्या हृदयस्थ भावना. राहीबाई बियाणांना जीवापाड जपत आल्यात. त्यांच्या कामामुळं आता कुटुंबाला प्रतिष्ठा मिळाल्यानं कुटुंबातले लोक, नातेवाईक आणि गावकऱ्यांचा बघायचा दृष्टीकोन बदलला आहे. आता सगळं कुटुंब बियाणांचं काम करायला मदत करतंय.
कृषी विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी राहीबाईकडं केस स्टडीसाठी येतात. “तुमच्याकडं शिकायला आलोय" असं नम्रपणानं सांगतात. तेव्हा “मी आपली अंगठे बहाद्दर, शाळेत कधी गेले नाही, काही शिकले नाही. मी तुम्हांला काय शिकवणार?” असं राहीबाई त्यांना उलट विचारत. “आम्ही पुस्तकांत शिकलो, शिकतोय, त्यापेक्षा तुमच्याकडं बियांणांचं जास्त ज्ञान आहे, ते समजून सांगा,” असं विद्यार्थी विचारतात. मग हा सहज संवाद अधिक रंगत जातो. राहीबईंचं व्यक्तीमत्त्व आणि त्यांच्या बियाणे बँकेचा इतिहास त्यातून उलगडत जातो. जाताना विद्यार्थी आणि प्राध्यापक राहीबाईंकडून बियाणं घेऊन जातात. अनेक कृषी महाविद्यालये आणि विद्यापीठांची अंगणं राहीबाईंच्या वेलींनी फुलली, सजली आहेत! अनुभवातून आलेल्या शहाणपणाला कृषी विद्यापीठांनी एकप्रकारे दिलेली ती दाद आहे. पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना नुकताच जाहिर झालाय. एक प्रकारे राहीबाईंच्या ज्ञानसाधनेवर विद्यापीठानं मोहोर उमटवलीय!
विश्वसुंदरी युक्ता मुखीनं राहीबाईंकडून देशी वाणांविषयी जाणून घेतलं. देशाच्या संसदेत नुकत्याच केंद्रीय अर्थसंकल्पात पारंपारिक बियाणांच्या जतन, संवर्धनासाठी सरकारनं विशेष तरतूद केलीय. कृषी क्षेत्रात जागतिक पातळीवर चारसहा बियाणे उत्पादक बड्या भांडवलदार कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झालेली असताना राहीबाईंच्या कामात सरकारला धोरणाची संकल्पना दिसते, हे महत्त्वाचं आहे. राहीबाईंनंतर त्यांचं काम त्यांचा सध्या बारावीत शिकत असलेला नातू तेजस पुढं घेऊन जाईल, असा त्यांना विश्वास वाटतो. बियाणांची चळवळ आता अकोले तालुक्याच्या आदिवासी भागात चांगली मूळ धरू लागली आहे. राहीबाई यांना जाहीर झालेल्या सन्मानानं या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांच्या कामाला मोठं बळ मिळालं आहे. नष्ट होत चाललेल्या बियाणांचं जतन, संवर्धनासाठी सरकार प्रयत्नशील असलं तरी हवामानात होणाऱ्या बदलांमुळं या वाणांना रोगांची बाधा निर्माण होत आहे. कीड पीक फस्त करताय. जैविक पद्धतीनं कीड नियंत्रण कसं करता येईल, यासाठी सरकारनं पुढाकार घ्यायची आवश्यकता आहे.
पठारावरचं एक दुर्लक्षित गाव एका सामान्य आदिवासी महिलेच्या लख्ख कार्यकर्तृत्वामुळं जगाच्या नकाशावर आलं आहे. परसबाग आणि घरच्यापुरतं पीक घेणं, त्यातून कुटुंबाचं आरोग्य संवर्धन नक्की होईल. मात्र राहीबाईंच्या कामाकडं डोळसपणानं बघायला हवं.
Nice article
ReplyDelete