माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Monday, March 09, 2020

आमचं गाव आमची परंपरा - जिरग्याळ

          आमचं गाव आमची परंपरा - जिरग्याळ


             जिरग्याळ , हे गाव जत तालुक्यात,नैऋत्येला साधारण 25 किमी आहे. गावाची लोकसंख्या साधारण   तीन हजार आहे. गावातील बहुतेक लोक कन्नड आणि मराठी भाषा बोलतात. गावात सातवी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे . तर आठवी ते दहावी हायस्कुल आहे. कन्नडमध्ये जिरीगी म्हणजे  जिरे . हाळ म्हणजे ओढा . पूर्वी जिथं जिरे पिकवणारा भाग,असा त्याचा अर्थ होतो . अशी त्याची शब्द उत्पत्ती होऊ शकते.
              जिरग्याळची  एक मुख्य परंपरा म्हणजे , महालिंगेश्वर ची यात्रा. महालिंगेश्वर हा देव मूळचा मिरवाडचा . जिरग्याळच्या भक्तांना लांब व्हायला  लागले. म्हणून  जिरग्याळच्या भक्तांनी त्या देवाला जिरग्याळला आणले आणि  जिरग्याळमध्ये भक्तांनी महालिंगेश्वरची स्थापना केली .
          गावातील पाटील लोकांनी महालिंगेश्वर देवाची स्थापना केली. जिरग्याळ मधील पाटील लोक हे धनगर समाजाचे आहेत.  हे धनगर लोक शुद्ध शाकाहारी आहेत. इतर गावची मुलगी सून म्हणून करायची झाली तर,साखरपुड्याच्या वेळी तोंडात विभूती घालतात.  त्यावेळी ती मुलगी त्या दिवसापासून लिंगायत झाली असे मानतात .
                जिरग्याळ ही पांढरी महालिंगेश्वर ची आहे, आणि  जो चांगलं वागतो त्याचं चांगलं होतंय,असे मानतात. मिरवाड महालिंगेश्वर ची यात्रा महाशिवरात्री ला भरते.  जिरग्याळ महालिंगेश्वरची पालखी महाशिवरात्री दिवशी  मिरावडला येते.  महाशिवरात्री च्या आदल्या दिवशी मिरवाड  आणि जिरग्याळचे भक्त बैलगाड्या घेऊन नदीला जातात. हे लोक हल्लाळ दरूर ता.अथणी जि. बेळगाव येथे कृष्णा नदीवर जातात. नदीवर मुक्काम करतात . महाशिवरात्री दिवशी सकाळी नदीचे पाणी घागरी भरून घेतात. देवाला नदीच्या पाण्याने आंघोळ घालतात. त्याला ते गंगास्नान म्हणतात. महाशिवरात्री दिवशी नदीवरून परत आल्यानंतर  गंगा जलची संततधार अभिषेक चालू असतो. महाशिवरात्री च्या दुसऱ्या दिवशी  पहाटे पासून  दंडवत घालतात. दंडवत म्हणजे आंघोळ केल्यापासू  ओल्या कपड्यानीशी  त्या ठिकाणापासून पालथे जमिनीवर झोपून नमस्कार करतात . असं करत देवाच्या गाभाऱ्यापर्यंत तर कुणी पायरीपर्यंत येतात. तिथं पै पाहुणे, सगे सोयरे दंडवतग्राही व्यक्तीला ऐपतीप्रमाणे पोषाख आहेर म्हणून घेतला जातो ,तो त्या व्यक्तीला नेसवतात. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मिरवाड गावची यात्रा असते .दहा वाजेपर्यंत सगळे लोक आवरतात .जिरग्याळ च्या महालिंगेश्वर ची पालखी मिरवाड ला येते. तेव्हा  मिरवाडला यात्रा भरते .

             जिरग्याळ ची यात्रा अक्षय तृतीया झाल्यानंनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी  असते, तेव्हा मात्र मिरवाडची महालिंगेश्वरची पालखी  जिरग्याळ ला येते. त्यावेळी देवाच्या दोन्ही मूर्ती गाभाऱ्यात एकाच गादीवर ठेऊन पूजा करतात.
महाशिवरात्री च्या वेळी देखील दोन्ही मूर्ती एकत्र ठेऊन पूजा करतात.

  जिरग्याळची आणखी एक परंपरा म्हणजे मोहरम हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन साजरा करतात. पूर्वी मोठ्या प्रमाणात मोहरम साजरा केला जायचा.मोहरमच्या  देवासाठी विजापुरहून गंध आणतात.  समारोप करताना ताबूत ओढ्या मध्ये नेतात .जाताना गाणी म्हणतात . केवळ पुरुषच पाठवणी करतात. स्त्रिया ताबूत पाठवायला जात नाहीत . ताबूत उतरतात. सजावट केलेले कागद फाडून टाकतात. ताबुत फ्रेम  माघारी घेऊन येतात. त्या मध्ये देवता म्हणजे देवी असतात म्हणे. पूर्वी सर्व उत्सव यात्रा जत्रा गावातील सारी मंडळी एकत्र येऊन करायचे .आता पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. 
नवीन पिढीतील पँटवाले लोक जास्त सहभागी होताना दिसत नाहीत. धोतर  वाले लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात . पूर्वी हिंदू लोक मुस्लिमांना आपल्यापैकी एक असे मानत होते.  आज पूर्वी प्रमाणे दिसत नाही.  तरीही गावातील  मुस्लिम लोक महालिंगेश्वर , हनुमान ला दर्शनासाठी येतात. सोमवारी आणि शनिवारी मंदिरासमोर गर्दी असते. जुने लोक देवाला नित्य नियमाने येतात, शिकलेली पिढी देवाकडे यायची कमी झालेली आहे. जिरग्याळची गाव पांढरी पूर्वी लय गुण्या गोविंदाने नांदयाची. आधुनिकतेचे वारे म्हणजे काय कुणास ठाऊक ? पण एकंदरीत सामाजिक सलोखा आज पूर्वी प्रमाणे  राहिला नाही.
                      महालिंगेश्वरचे मंदीर जुन्या धाटणीचे आहे.  अलीकडे त्यावर शिखर बांधलेले आहे.  मंदिराचे पूर्ण बांधकाम दगडी आहे. आतून कमानी आणि दगडी खांब आहेत.  छत पूर्ण दगडी आहे .छताच्या आतून  नक्षी कोरलेली आहे.  मंदिर किमान सातशे आठशे वर्षा पूर्वीचे असावे.असा अंदाज आहे.

 महालिंग छत्राप्पा लंगोटे सर यांनी मिरावडला नोकरीला आल्यावर विचारले की , मिरवाड आणि जिरग्याळ येथे महालिंगेश्वर देवाची दोन देवस्थान एकसारखी कशी काय ? तेव्हा गावकाऱ्यांकडून वरील  हिस्ट्री त्यांना  समजला.
                     जिरग्याळ चा महालिंगेश्वर हा शंकराचा अवतार मानला जातो. जसे की त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर इत्यादी.
 जिरग्याळच्या महालिंगेश्वर देवाची जमीन होती.  मिरवाड गावाचा गिरमल पुजारी जिरग्याळ गावातील महालिंगेश्वर देवाची पूजा करायचा. गिरमल पुजाऱ्यांची जमीन  आता जिरग्याळ मध्ये आता नाही. मिरवाड मधील  जमीन अजून त्यांच्याकडे आहे.  गुगवाड ता.जत येथील नेमिनाथ पुजारी यांचेकडे सन 1988/ 89 पासून जिरग्याळ महालिंगेश्वर ची पूजा आहे. वर्षाखरीस शेतकरी देवाचा वाटा आधी बाजूला काढून ठेवतात. रास करतात .जेव्हा पुजारी घरी येईल तेव्हा तो वाटा पुजाऱ्याला देतात. गावातील हनुमान मंदिराची पूजा देखील नेमिनाथ पूजारी यांचेकडेच आहे. प्रत्येक श्रावण महिन्यात शेवटच्या आठवड्यात वीणा उभा करून सप्ताह साजरा  केला जातो . मिरवाड आणि  जिरग्याळ मधील सर्व जाती धर्माचे लोक महालिंगेश्वर देवाचे भक्त आहेत.  मुख्य पाटील म्हणजे धनगर समाजाचे  हे देवस्थान आहे. मिरवाड आणि जिरग्याळ दोन्ही गावच्या मंदिराचे बांधकाम अगदी जवळ जवळ एकसारखे आहे.  पूर्वी भिंती चुन्याने रंगवल्या जायच्या . आता ऑइल पेंट ने रंगवतात.
             प्रत्येक सोमवारी 80 ते 90 टक्के लोक महालिंगेश्वर च्या दर्शनासाठी येतात .  अंघोळ झाली की तांब्याभर पाणी, दोन फुले, दोन उदकाड्या  घेऊन देवाला येऊन , पाया पडून पुढच्या कामाला निघून जातात.
                 जिरग्याळ गावची आणखी एक परंपरा सुंदर आहे. आजमितीला जिरग्याळ गावचा  कोरे समाज घटस्थापना झाली की दसऱ्या पर्यंत दूध खात नाही. दुधाचा चहा देखील पीत नाहीत.  त्याला कारण असं की एकवर्षी  दसऱ्याला भरपूर पाऊस  झाला म्हणे.  गावातील सारे ओढे दुथडी भरून वाहायला लागले.  किती वेळ झाला तरीही महापूर ओसरत नव्हता.  पलीकडची जनावरं ,माणसं पलीकडे आणि अलीकडची अलीकडे अशी अवस्था झाली.   दिवसभर चरायला गेलेली दुभती जनावरं ओढ्याच्या एका बाजूला आणि त्यांची वासरं दुसऱ्या बाजूला. दोन्ही बाजूंनी जनावरं आणि वासरांचा  हंबारडा सुरु झाला. त्यावेळी कोरे समाजात सतोबा आजा नावाचा एक सत्पुरुष होऊन गेला. ते  सातोबा आजा  महालिंगेश्वरचे निस्सीम भक्त होते.  त्यांनी देवाला हात जोडले आणि  विनंती केली .  अरे देवा!  हा मायलेकरांचा विरह मला बघवत नाही. माझं हृदय पिळवटून जातंय .  या हंबरणाऱ्या मायलेकरांची भेट आत्ताच्या आत्ता घडव.  प्रत्येक दसऱ्याच्या दिवसात आम्ही दूध खाणार नाही.पण आता या वासरांना पोटभर दूध प्यायला मिळू दे. त्यानंतर ओढ्याचं पाणी ओसरलं . गायी दड्डी कडे आल्या.  मायलेकरांचा भेट झाली. हंबरून घसा कोरडा करून घेतलेली  वासरं गायींना मिळाली.  तेव्हा पासून कोरे( माळी )समाज दसऱ्याच्या दिवसात (नवरात्रात) दूध खात नाही. चहा मध्ये देखील दूध घालत नाहीत , तेव्हा कोरा चहा पितात.  घरी दहा म्हैशी असू दे .घागरींनं दूध निघू दे.पण ते दूध त्यावेळी विकत नाहीत.  किंवा बाहेर खायला देत नाहीत. वासरांना पाजतात . अधिकचं दूध काढून तापवतात . विरजण लावून दही करतात . ताक करतात.   ज्याला ताक पाहिजे त्याला  मुबलक आणि हवं तेवढं देतात. ताक तांब्यानं नेऊ दे नाहीतर घागरींन.  शाळेत या दिवसात मुलं पाण्याऐवजी ताक  बाटली भरून आणतात.   या दिवसात दूध खायचं पण नाही, विकायचं पण नाही ,वासरांना पाजून उरलेलं ताक करून वाटायचं.  लोणी काढून जे तूप होईल ते देवाच्या आरतीला द्यायचं.
                       आता आधुनिक लोक देशी गाय आणि म्हैशी च्या दुधाचे पारंपरिक पालन करतात. जर्सी गायीचे दूध डेअरीला घालतात. त्याचा पैसा करतात.
  आजही सतोबा आजा यांची समाधी तळ्याच्या काठी आहे.  सतोबा आजा विंचू,सर्पदंश यावर औषध देत असत.  प्रत्येक सोमवारी महालिंगेश्वर देवाला जसे लोक जातात तसे सतोबा आजाच्या समाधीचे दर्शनही प्रत्येक सोमवारी घेतात. श्रावणाच्या शेवटच्या  सोमवारी सतोबा आजोबा ला प्रसाद घालतात.
                गावात मरीमाता म्हणजेच मरगुबाई चे मंदिर आहे . आषाढात शेवटच्या मंगळवारी अथवा शुक्रवारी मरगुबाई ची यात्रा असते.  शेवटचे पाच दिवस अख्ख गाव आषाढी पाळते. या पाच दिवसात कोणतंही चाक फिरवायचं नाही. मग ते बैलगाडी चं असू दे नाहीतर जातं किंवा मोटेच असो.  शेवटच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी कोंबडा अथवा बोकड बळी देऊन यात्रा संपन्न होते. हुच्चाप्पा मुत्याची यात्रा देखील गावकरी करतात. लोकवर्गणी मधून हुच्चाप्पा मुत्याची यात्रा करतात. सलग तीन दिवस कीच पडतो . कीचातुन बाहेर आल्यानंतर भाकणूक होते.

           याशिवाय गावात भजनी मंडळ, धनगरी ओविकार मंडळ, वालुग मंडळ देखील आहेत. आसपासच्या गावात ही मंडळ सेवा देतात. गावात चिंचली मायक्का देवीचे तळ्या काठी एक छोटेखानी मंदिर आहे. माघ पौर्णिमेला चिंचाली ची यात्रा झाली  की  पुढील पौर्णिमेला जिरग्याळ मायक्का ची यात्रा भरते. शालाबाई पाटील देवीची देखभाल करतात . गावात कोणाच्याही घरी सवाष्णी असल्या तरी शालाबाई पाटील यांना घेऊन सवाष्णी जेऊ घालाव्या लागतात.
गावात इरळे, लंगोटे,कोरे ढाले ,म्हेत्रे , गुडडोडगी ,तोडकर हे लिंगायत समाजातील  आहेत. कोरे समाज कोकळेच्या रेणूकाला जातो.  घरातील नित्य शुभकार्यात  म्हणजे वास्तुशांत ,द्राक्ष बाग उतरणीला रेणुकाचा झग घरी आणतात.
  सरकारची गावामध्ये कामात मध्ये  जमीन होती.  गावात शेळके , बंडगर हे परंपरेने मेंढी पालन करतात. दिवाळी पाडव्यादिवशी मेंढरं रंगवून गल्ली गल्लीने   पळवतात. 26 जानेवारी , 15 ऑगस्ट प्रमाणे प्रभात फेरी  काढल्या सारखे , गल्लीगल्लीत मेंढरं  पळवतात . गावात  पूर्वी कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहाने साजरा  करत होते. गावाच्या पाटलाचा एक  बैल आणि कोरे समाजाचा एक .असे  दोन बैल वाजत गाजत वेशीपर्यंत आणले जायचे . भोगणा ,पिपाणी ,हलगी, ताशा ढोल, झांज , लेझीम असा सारा लवाजमा लावून आणायचे . त्यात अंगाऱ्या व मुंगाऱ्या  अशी  नावे ठेवतात. खरीप आणि रब्बी असा त्याचा अर्थ असतो .कोणता बैल पुढे येईल म्हणजे प्रथम येईल, तो चांगला हंगाम होईल असे मानतात. आता शास्त्र मार्ग म्हणून कर तोडतात.
                           याचबरोबर गावात शिवजयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गावातील तरुण वर्ग मोठ्याउत्साहाने साजरी करतात.



(या लेखाचा उद्देश अंधश्रद्धा पसरविणे किंवा कोणत्याही जाती अगर धर्माचा प्रसार करणे तसेच विशिष्ट लोकांप्रती आकस नसून , आज मितीच्या गावच्या परंपरा समाजासमोर ठेवणे हा आहे.)

butoons
🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏



2 comments: