ग्रामीण भागातील पालकांचे मत
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक कामकाज सुरळीतपणे पार पडू शकलेले नाही. शासन धोरणानुसार गत वर्षभरात इ. १ ली ते ४ थी चे वर्ग असलेल्या शाळा पूर्णतः बंद होत्या आणि इ. ५ वी ते ८ वी अंशतः तर इ. ९ वी ते १२ वी चे वर्ग अल्प कालावधीसाठी सुरु करणेत आले होते.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दि. १५ जून, २०२१ पासून सुरु झाले खरे. पण शासन धोरणानुसार अद्यापही शाळा प्रत्यक्ष सुरु करणेबाबत निर्देश प्राप्त झालेले नाहीत. पुन्हा कडक निर्बंध लागू केले जात आहेत . तथापि गतवर्षाप्रमाणेच चालू शैक्षणिक वर्षातही मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने शाळा नव्या उमेदीने म्हणजे उसने अवसान आणून शाळा सुरु झाल्या . पण गुणवत्तेचा हा संभ्रम शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना पडलेला आहे.
जूनच्या सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समितीच्या सभा ऑनलाईन पद्धतीने झाल्या . ज्या शाळा कोविड अलगीकरण कक्षासाठी घेणेत आलेल्या होत्या , अशा शाळांमध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने सर्व परिसर व शाळा यांचे निर्जंतुकीकरण करतांना शिक्षकांचीच दमछाक झाली.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन सुरु केली. गुगल फॉर्म द्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांना दाखल करण्याचे काम जून अखेर चालू राहते. इ. १ ली च्या वर्गशिक्षकांसोबत संपूर्ण शाळेने सहकार्य करून १००% पटनोंदणी करण्याचे काम चालू आहे.
शाळागृहास आकर्षक करण्यात येत आहे, शाळेचा नामफलक, सूचनाफलक, वर्गफलक इ. रंगवून अथवा निटनेटके स्वच्छ केला जातोय. फुलझाडे , मागीलवर्षी लावलेली झाडे, फुलझाडांच्या कुंडया निटनेटक्या व व्यवस्थीत ठेऊन जेणेकरुन शाळेचा परिसर निर्मळ व प्रसन्न केला जात आहे. शाळेतील सतरंज्या, चटई इ. झाडून झटकून, धुऊन स्वच्छ केल्या जात आहेत. शाळेतील बेंच, खुर्ची, टेबल दुरुस्त व स्वच्छ केले जात आहेत. तसेच नादुरुस्त असलेले संगणक संच सुव्यवस्थित करुन वापरात आणले जात आहेत .
मुख्याध्यापकांनी कोविड पार्श्वभूमीवर शाळेत पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, साबण, मास्क, स्प्रे-पंप, सोडियम हायपोक्लोराईड, थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर इ. स्थानिक प्राधिकरणाच्या व शालेय अनुदानातून उपलब्ध करुन घेतले आहेत, पण प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होणार याची अधीरता पालक , विद्यार्थी आणि शिक्षक यांना लागलेली आहे.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अध्ययन अध्यापनाकरीता ज्या उपक्रमांचे आयोजन केले, ते उपक्रम पुनःश्च चालू वर्षीही योजले जात आहेत. उदा. झूम मिटींग, गुगल मीट, व्हॉटस अप, PDF निर्मिती, दीक्षा अॅप, युटयुब चॅनेल, प्रत्यक्ष गृहभेटी, स्वाध्यायपुस्तिका, गल्ली मित्र, पालक मित्र, स्वयंसेवकांच्या मदतीने शिक्षण, बालरक्षक भेटी इत्यादी उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे.
वरिष्ठांच्या सूचनांनुसार शाळा सुरू झाल्या. दोन आठवडे होऊन गेले . मोफत पाठयपुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत. तरी मागील वर्षी वाटप केलेली चांगल्या स्थितीतील पुस्तके विद्यार्थ्यांकडून जमा करुन वर्ग निहाय वाटप करताना अनेक अडचणी येत आहेत. तरीही पाठयपुस्तके जमा करून घेऊन पुढच्या वर्गात जाण्याऱ्या विद्यार्थ्यांना वाटप केली जात आहेत. गेली वर्षभर कोरोनाचे सावट असताना स्थलांतरित झालेली कुटुंब ,त्यासोबत त्यांचे पाल्य देखील आहेत. त्यामुळे पाठ्यपुस्तक अपुरी पडत आहेत.
तसेच यापुर्वी शाळेत जमा केलेली चांगली म्हणता येणार नाहीत पण बऱ्यापैकी असणारी व शिल्लक पुस्तके वाटप करताना पालक पुनःपुन्हा विचारतात , नवी पाठ्यपुस्तके कधी मिळणार ?
या कालावधीत इ.६ वी ते १२ वी ची मुले स्थलांतरीत मजुरांची मुले, शाळाबाहय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा मुलांच्या गृहभेटी देऊन, त्यांची शाळेत येण्याची मानसिकता तयार केली जात आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन आता संपेल मग संपेल असं सांगत आम्ही मग पुन्हा माघारी नोकरीला ,कामावर जाणार आहोत.असं म्हणून मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनातील अनामिक भिती दूर करण्यासाठी तर शिक्षक आहेत , पण विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची प्रत्यक्षात भेटच होत नाही. दिक्षा अँपचा प्रचार आणि प्रसार तसेच ई-कन्टेन्टची निर्मिती अनेक शिक्षकांकडून झाली आहे. पण त्याचा उपयोग कितपत झाला हे कधी आणि कसं ठरवायचं?
शिक्षक आता आपापल्या वर्गातील विद्यार्थी व पालकांशी संपर्क करुन आगामी वर्षातील कामकाजाची माहिती देत आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन अध्ययन अध्यापनाच्या नियोजनाची तयारी केली जात आहे . पुन्हा अॅन्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध असणाऱ्या पालकांचे / विद्यार्थ्यांचे नव्याने Whats app ग्रुप तयार करून घेतले जात आहेत.पण ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची पर्यायी व्यवस्था करताना खरंच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.उदाहरणदाखल
केवळ मोबाईल मित्र, गल्ली मित्र , सह्याद्री वहिनी कार्यक्रम इ. द्वारा खरे शिक्षण होईल का ? ही शंका आहे .
आणि याच्यावर कडी म्हणजे मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९. या नियमान्वये ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश देऊन एकही मूल शाळाबाहय राहणार नाही याची दक्षता मात्र प्रत्येकजण घेताना दिसत आहेत.
प्रत्येकजण आपापल्या अधिनस्त शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय शिक्षक , साधनव्यक्ती, विशेषतज्ञ व विशेष शिक्षक यांनी प्रत्येकांकडून आपापले काम आपल्या स्तरावरुन चोख केले जात आहे, मात्र गुणवत्तेचे काय ?
नवे शैक्षणिक वर्ष उजाडणार असल्याने ऑनलाईन अध्ययन - अध्यापन आणि ऑनलाईन परीक्षा एवढेच पर्याय उरतात. त्यातही कोरोनाचा या शैक्षणिक वर्षात (ऑगस्टअखेर) अंत होणार असे अनुमान करत असताना तिसऱ्या लाटेची भीती शास्त्रज्ञ सांगत आहेत.
कोरोना काळात सर्वच शाळांनी घेतलेल्या बहुतेक परीक्षा ऑनलाईन झाल्या. निकालही चांगले लागले. जास्तीत जास्त मुले शाळेत टिकवण्याचा प्रयत्न चालू आहे.
तथापि या ऑनलाईन शिक्षणासाठी शासनाने वेगळी आर्थिक तरतूद करायला हवी. ग्रामीण भागातील पालक, विद्यार्थी आणि शाळा यांच्याकडे आजही अद्यावत यंत्रणा, पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
ज्या घरात दोन मुले शाळा शिकतात त्या एका एका घरात तीन तीन मोबाईल घेणे पालकांना शक्य नाही. घेतले तर पालक त्याच्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत.
नेटवर्क अभावी सिग्नल मिळण्यासाठी झाडाखाली बसून शिकावे लागते. डोंगराळ भागात सिग्नलच मिळत नाही. त्यातही सातत्य राहत नाही. अनेक विद्यार्थ्याकडे स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल नाही आणि पालकांनाही तो परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आर्थिक तरतूद होणे आवश्यक आहे, असे वाटते.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment