माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Friday, April 15, 2022

आमचं गाव आमच्या परंपरा - उमराणी

 


जतच्या दक्षिणेला  कर्नाटक सीमेवर प्रतापराव गुजर यांच्या लढाईने प्रसिद्धीस आलेले  उमराणी गाव आहे.  प्राचीन इतिहास असलेल्या या गावाला अनेक राजसत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प्राचीन मंदिरात इ.स. ११ व १२ व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात. यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते. पण शिवकाळात उमराणी प्रसिद्धीस आले ते येथे घडलेल्या प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे.  १५ एप्रिल इ.स. १६७३ साली राज्याभिषेकापूर्वी काही महिने  महाराज पन्हाळगडावर असताना अदिलशाही सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चाल करुन आला. ही वार्ता  समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस खानावर रवाना केले. त्यांना आज्ञा दिली की “खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. महाराजांच्या आज्ञेनुसार  प्रतापराव बहलोलखानावर चालून गेले. यावेळी बहलोलखानाचा मुक्काम कर्नाटक सीमेवर असलेल्या उमराणी गावाजवळील डोण नदीकिनारी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम खानाचे पाणी तोडले व दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला केला. पाण्याशिवाय कासावीस झालेल्या खानाला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. बेहलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. शरण आलेला बहलोलखान मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला.  हि बातमी महाराजांना कळल्यावर ते चिडले. महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परत येईल अशी शंका त्यांना होती. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून “सला काय निमित्य केला?  असा जाब विचारला व तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. खानाला धुळीस मिळवल्याखेरीज रायगडी तोंड दाखवू नये ...... या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले आणि यानंतरच नेसरी खिंडीत प्रतापराव यांचे बलीदान नाट्य घडले.

 याशिवाय उमराणी गावास असलेला इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास. डफळापूरचे  पाटील सटवाजी चव्हाण यांनी  १६८० च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर  डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले.  संभाजीराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईत आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे  स्वतंत्र कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता. १८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. 

        उमराणी गाव सांगली शहरापासुन ८३ कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून  २० कि.मी. अंतरावर दक्षिणेला आहे. जत संस्थाना अंतर्गत उमराणी हे एक महत्वाचे ठिकाण असल्याने डफळे घराण्याचे येथे अनेकदा वास्तव्य असे. उमराणी गावात आजही राजे डफळे यांची गढी असुन त्यांचे वंशज तेथे वास्तव्य करून आहेत.  सटवाजीराजे चव्हाण यांच्या नंतरच्या काळात  हि गढी बांधली गेली असावी. साधारण अर्धा एकर परिसरात पसरलेली हि गढी चौकोनी आकाराची असुन गढीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. सध्या या गढीचा वापर डफळे यांचे वंशज करत असुन त्यांनी या गढीला तिच्या मूळ स्वरुपात कायम ठेवले आहे. गढीबाहेर दरवाजा शेजारी आपल्याला गजलक्ष्मी  शिल्प पहायला मिळते. गढीची तटबंदी काही प्रमाणात ढासळली असुन या गढीच्या  चार टोकाला असलेले चार बुरुज व गढीचा दरवाजा आजही पहायला मिळतो. गढीच्या आवारात दगडात बांधलेली  खोल विहीर असुन डफळे यांचा चौसोपी वाडा आहे.  गढीतील या वाड्याचे बांधकाम आजही मूळ  स्थितीत बांधकामातील लाकडावर अतिशय सुंदर कोरीवकाम केले आहे. वाड्यात राजे डफळे यांचे वास्तव्य असल्याने मर्यादित भागात प्रवेश दिला जातो.  गावात फेरी मारताना काही प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. उमराणी गढी व आसपासचा परिसर  पहाण्यास दोन तास पुरेसे होतात. उमराणीला २७० वर्षांचा वैभवशाली इतिहास, हजारो वर्षांचा धार्मिक वारसा आहे. येथे डफळे घराण्यातील अनेक पराक्रमी राजे झाले. भव्य राजवाडा, बुलंद तटबंदी,    बुरुजवरील निशान, चिनगीबाबांच्या घोंगड्याच्या दशा हे आजही साक्ष देतात.

उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या डफळे राजघराण्यांची एक स्वतंत्र गादी आहे. डफळे घराण्याचे संस्थापक महापराक्रमी श्रीमंत सटवाजीराजे यांच्या मृत्यूपुर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे यांचे निधन झाले होते. श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सुनबाई राणी येसुबाई यांनी १७०६ ते १७३८ सालापर्यंत डफळे संस्थानाचा एकसुत्री राज्य कारभार सांभाळला.१७३८ साली राणी येसुबाई यांनी आपले सावत्र दीर खानाजीराव यांच्या चारही मुलांना दत्तक घेतले. दत्तकानंतर यशवंतराव, रामराव, भगवंतराव व मुकुंदराव हे डफळे संस्थानचे वारस झाले. या चारही मुलांना राणी येसुबाई यांनी आपली जहागिरी वाटून दिली. थोरले यशवंतराव यांना जत, दूसरे रामराव यांना डफळापूर, तिसरे भगवंतराव यांना उमराणी तर सर्वात लहान असलेले मुकुंदराव यांना सध्या सोलापूर जिल्ह्यात असलेल्या हुलजंतीची जहागिरी देवू केली.

भगवंतराव हे स्वतंत्र उमराणी गादीचे संस्थापक ठरले. राणी येसुबाई या अत्यंत धार्मिक होत्या. उमराणी शेजारच्या रामतीर्थ येथील उमा- रामेश्वराच्या त्या निस्सीम भक्त होत्या.. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांचे वास्तव उमराणी येथेच होते. १७५४ साली राणी येसुबाई यांचे निधन उमराणी येथेच झाले. डफळे घराण्याच्या या कर्तबगार राणीची उमराणी येथे समाधी आहे.

१७३८ साली भगवंतराव डफळे उमराणी संस्थानचे स्वतंत्र जहागिरदार म्हणून नियुक्त केल्यानंतर निजाम उल्मुक उर्फ असफसा बादशाहने त्यांना स्वतंत्र जहागिरीची सनद बहाल केली. त्यानंतर उमराणी संस्थान साताराच्या छत्रपतीच्या अधिपत्याखाली आले. नंतरच्या काळात छत्रपती घराणे नाममात्र ठरले व पेशवाईचे युग आले.

१७६८ साली पेशवाईने भगवंतरावांना जहागिरीची सनद बहाल केली. भगवंतराव यांना बुवाजीराव, यशवंतराव व राणोजीराव हे तीन पुत्र होते. भगवंतराव यांच्यानंतर थोरले पुत्र बुवाजीराव गादीचे वारस झाले. त्यांना परशुराम व भगवंतराव ही दोन मुले होती. पेशवाईचा अंत होताच शनिवार वाडयात ईस्ट इंडिया कंपनीचा युनियन जॅक फडकला. बुवाजीरावनंतर त्यांचे थोरले पुत्र परशुराम उमराणीचे राजे बनले.

१८५७ साली ब्रिटीश सरकारने दत्तक वारस नामंजूर केला. नागपूरचे भोसले, लखनोचे नबाब ऑफ अवध, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, साताऱ्याचे छत्रपती यांचे दत्तक वारस ब्रिटीशांनी नामंजूर केले. यावेळी १८५७ चे बंड झाले. या राष्ट्रीय उठावामध्ये उमराणी संस्थानने भाग घेतला व इंग्रजी सत्तेविरूध्द बंड पुकारले. ब्रिटीशांच्या सत्तेविरूध्द लढण्यासाठी उमराणीची मोठी फौज साताऱ्याच्या छत्रपतीच्या मदतीस धावून गेली. पण यश आले नाही. ब्रिटीशांनी साताऱ्यांची गादी जप्त केली व उमराणी संस्थानला ब्रिटीशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

राजे परशुराम यांच्या नंतर नारायणराव उमराणीच्या गादीवर आले. नारायणराव यांच्यानंतर त्यांचे पुत्र परशुराम दुसरे गादीवर दोन पुत्र आले. त्यांनी १९२१ पर्यंत उमराणीचा राज्य कारभार कुशलपणे चालविला. २ नोव्हेंबर १९२१ रोजी त्यांचे निधन झाले. दुसरे परशुराम महाराज यांना बुवाजीराव व अमृतराव होते. संस्थानाच्या प्रथेनुसार श्रीमंत बुवाजीराव गादीवर आले. श्रीमंत बुवाजीराजे हे प्रखर देशभक्त होते. या देशावरील इंग्रजी सत्ता हटली पाहिजे यासाठीच त्यांनी जोरदार प्रयत्न केले... देशात स्वातंत्र्याचा लढा जोर धरला होता. स्वातंत्र्य लढयातील देशभक्तांना हत्यारे तसेच अन्न, धान्य पुरविण्याचे बहुमोल कार्य बुवाजीराव यांनी केले.

क्रांतीकारकांच्या अनेक शिबिराचा खर्च बुवासाहेब यांनी केला. पत्री सरकार नाना पाटील, रत्नाप्पा कुंभार, वसंतदादा पाटील या क्रांती कारकांना बुवासाहेब महाराजांनी फार मोठे सहकार्य केले. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच मार्च १९५६ रोजी देशभक्त राजे अनंतात विलीन झाले. श्रीमंत बुवाजीराव यांच्यानंतर त्यांचे पुत्र बाबासाहेब महाराज उमराणी गादीचे वारस बनले.

श्रीमंत बाबासाहेब हे १० वर्ष सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. पाच जानेवारी १९८३ साली त्यांचे निधन झाले. वंशपरंपरेप्रमाणे त्यांचे ज्येठ सुपुत्र कर्नल अजयसिंह उमराणीच्या गादीवर बसले. ते मराठा बटालियनमध्ये कर्नल या पदावर होते. १९६२ साली झालेल्या भारत- पाकिस्तान, १९६५ साली झालेल्या भारत-चीन व १९७१ च्या बांगला देशात पराक्रम गाजविला.

        १४ जानेवारी १९९३ साली कर्नल अजयसिंह यांचे निधन झाले. त्यांना  मुलबाळ नव्हते. त्यामुळे बंधु अमरसिंह गादीवर आले. वंशपरंपरेने त्यांचा शाही राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना अदिराजसिंह नावाचे सुपुत्र आहेत. बुवाजीराव यांचे दुसरे बंधू अमृतराव यांनी विजयसिंह यांना आपले दत्तक वारस म्हणून घेतले.

विजयसिंह डफळे उमराणीकर हे राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदही त्यांची वर्णी लागलेली आहे. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात नावाजलेली पदे भूषविली आहेत. त्यांना दत्तराजसिंह नावाचे सुपुत्र आहेत. बुवाजीराव यांचे तिसरे बंधू दादासाहेब यांना फत्तेसिंह, धैर्यशील, दिलीपसिंह व रणजितसिंह अशी चार मुले आहेत.

श्रीमंत अमरसिंह डफळे यांचे पणजोबा श्रीमंत परशुराम महाराज हे सीजी हेडर्सन यांचे जवळचे मित्र होते. हेडर्सन यांना भारतीय प्रशासनाचे पितामह म्हटले जाते. विजापूर भागातील पोलिटिकल एजंट म्हणून कामकाज पहात असताना हेडर्सन उमराणीच्या राजवाड्यात येवून गेले होते.

उमराणीचे डफळे अतिशय प्रजादक्ष राजे म्हणून ओळखले जात होते. गावातील दीनदलितांपासून कोणच्याही घरी पाहुणे आले तर पाहुण्यांच्या भोजनाचे सर्व साहित्य राजवाडयातून दिले जात होते.

उमराणी संस्थानच्या अनेक परंपरा आजही पाळल्या जातात. त्यामध्ये दसरा उत्सवाचा विशेष समावेश आहे. विजयादशमीच्या दिवशी संस्थानचे वारसदार राजेशाही पोशाख परिधान करतात. सरदार व मानकरी आपला पारंपारिक पोषाख घालतात व ज्या पध्दतीने संस्थानकाळी सीम्मोलंघन केले जात असे तसेच सीम्मोलंघन आजही केले जाते हे विशेष !

चिनगीबाबा हे डफळे घराण्याचे दैवत असून उमराणी येथे दरवर्षी बाबांचा ऊरूस केला जातो. ईदच्या दिवशी नमाज पठणानंतर सर्व मुस्लिम समाज आजही राजवाड्यात येतात व तेथे दरबार भरविला जातो. दरबारात सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात.

'म्यानातून उसळे तलवारीची पात,

 येडात मराठे वीर दौडले सात'

हे कवी कुसुमाग्रजांचे गीत असो की शंकर वैद्य यांचे

'सात दौडती... सात दौडती... अधीर वेडे सात दौडती'

हे पराक्रम गीतबध्द करणारे गीत असो. हे गीत कानावर पडले की आठवण होते ती सरसेनापती प्रतापराव गुजर यांची! आपल्या शौर्याने पराक्रमाची उंची गाठणाऱ्या या विरांची नाळ जुळली आहे ती जत तालुक्यातील उमराणीशी!

स्वामिनिष्ठा, पराक्रमाच्या बळावर मोगल साम्राज्याला सतत हादरा देणाऱ्या या विराने मोगलांच्या १२ हजार सैन्यांना उमराणीत धूळ चारली. एवढेच नव्हे तर त्यांना शरण येण्यास भाग पाडले. जगात कुठेही झाली नसेल अशी सात सैनिक विरूध्द पंधरा हजार सैन्यांची लढाई मराठ्यांच्या इतिहासात झाली. या लढाईची सुरूवात जत तालुक्यातील उमराणी येथे झाली तर शेवट कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथे सहा जून १६७४ रोजी झाला.

प्रतापराव गुजर यांचे मूळ नाव कुडतोजी होते. सुरूवातीला राजे शिवछत्रपतीच्या सैन्यात घोडदळात गुप्तहेर म्हणून कार्यरत असणारे कुडतोजी यांना राजेंनी घोडदळातील तुकडीचा प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली.१६५९ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा सेनापती मोहकमसिंह याचा पराभव केला. त्याचबरोबर मोगलास जावून मिळालेल्या संभाजी कावजी कोंढाळकराला २४ एप्रिल १६६० रोजी द्वंद्वयुध्दात यमसदनी पाठविले. पाच एप्रिल १६६३ रोजी शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंहगडावर हल्ला करणाऱ्या मोगली फौजेला कुडतोजीने हुसकावून लावले होते. त्याच्या या अतुलनीय कार्याची दखल घेवून प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरानंतर सेनापतीपद देवून छत्रपती शिवरायांनी कुडतोजी गुजर यांना १६६६ झोली 'प्रतापराव' ही पदवी बहाल करण्यात आली व १६६७ मध्ये सुरवातीला सरनौबतीचा हुद्दा देण्यात आला होता. शौर्य, पराक्रम आणि वेगवान हालचालींनी महाराजाबरोबर फौजेची दुसरी आघाडी प्रतापरावांनी समर्थपणे पेलली.

प्रतापरावांनी १६७० मध्ये वऱ्हाडातील कारंजे शहर लुटले व एक कोटीची संपत्ती स्वराज्याच्या खजिन्यात जमा केली. सुरतेची  लूट करताना 17 ऑक्टोबर 1670 रोजी     वणी दिंडोरीजवळ कांचनबारीच्या घाटात त्यांनी मोठा पराक्रम गाजविला होता. १६७३ मध्ये हुबळीची समृध्द पेठ प्रतापरावांनी लुटली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सहा मार्च १६७३ ला पन्हाळा किल्ला जिंकल्यानंतर चिडलेल्या विजापूरच्या आदिलशाहने प्रचंड फौज, शस्त्रे, हत्ती, घोडदळ आदी १२ हजार लवाजम्यासह सरदार अब्दुल करीम  बहलोल खानला पन्हाळ्याच्या मोहिमेवर पाठविले. बेहलोल खानचा बंदोबस्त करण्यासाठी व स्वराज्यावर आलेले संकट परतावून लावण्यासाठी शिवरायांनी प्रतापराव गुजर यांना मोहिमेवर पाठविले.

विजापूर- तिकोटामार्गे बहलोल खान उमराणीत पोहोचला होता. त्याला तेथून पुढे मोगलांची मदत मिळणार असल्याची माहिती प्रतापराव गुजर यांना मिळाली. मोगलांचे सैन्य मिळण्याअगोदरच बहलोल खानाला गाठले पाहिजे ही बाब लक्षात आल्यानंतर प्रतापराव व त्यांच्या सैन्यांनी सलग दोन रात्री कूच करून नऊ मार्च १६७३ रोजी खानाला उमराणीतच गाठले. जतचा हा भाग दुष्काळी भाग. पिण्याच्या पाण्यासाठी खानाच्या सैन्याला पायपीट करावी लागत असल्याचे लक्षात येताच प्रतापराव गुजर यांनी एक रणनिती आखली व या रणनितीनुसार उमराणीतील एकमेव असलेल्या जलाशयाची चोहोबाजूनी नाकाबंदी केली व खानाच्या फौजेला गराडा घातला. पिण्यासाठी पाणी, रसद मिळत नसल्याने खानाचे सैन्य, हत्ती, घोडे व्याकूळ झाले व सैरभैर पळू लागले.

उमराणीत खान व प्रतापराव गुजर यांच्यात तुंबळ लढाई झाली. या लढाईत मराठे सैन्यांनी खानाच्या सैन्याचा सपशेल पराभव केला. मरणाच्या भितीने बहलोल खान व त्याचे सैन्य सात एप्रिल १६७३ रोजी प्रतापराव गुजर यांना शरण आले व जीवदानाची याचना केली. शरण आल्याने प्रतापराव गुजरानी बेहलोल खान यास माफ करून त्यास सोडून दिले व आपला पराक्रम महाराजांना कळविला.

स्वराज्यास लुटण्यास आलेल्या बहलोल खान याला प्रतापराव गुजर यांनी सोडून दिल्याची वार्ता कळताच राजे संतापले व त्यांनी प्रतापरावांना पत्र पाठवून तुम्ही अधिकाराचे उल्लंघन केल्याचे कळविले. 'शत्रुला माफ करण्याचा अधिकार तुमचा नाही, बहलोल खान यास गर्दीस मिळवल्याशिवाय रायगडावर तोंड दाखवू नये' असा आदेश महाराजांनी प्रतापराव गुजर यांना दिला.

फेब्रुवारी १६७४ मध्ये पुन्हा संपूर्ण तयारीनीशी बहलोल खान स्वराज्यावर चालून आला. बहलोल खान तिकोटा, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज मार्गे स्वराजात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रतापराव गुजर यांना मिळाली. ती माहिती मिळताच बहलोल खानला जेरबंद करण्यासाठी लढाईसाठी आतुर झालेल्या प्रतापराव यांनी मोजक्या अन्य सहा अंगरक्षकांना सोबत घेवून बहलोल खानावर चढाई करण्याचा निर्णय घेतला. पण नियतीने वेगळेच मांडून ठेवले होते. नेसरीजवळील खिंडीत अचानकपणे या सात वीरांचा सामना मोगल सैन्यांशी झाला. त्यावेळी या सात सैन्यांनी पळून न जाता मोगल सैन्यावर जोरदार हल्ला केला. तुंबळ लढाई जुंपली हया लढाईत सातही वीरांनी हौतात्म पत्करले. धन्याचा शब्द खरा करण्यासाठी ह्या महान विराने २४ फेब्रुवारी १६७४ रोजी देहत्याग करून शिवरूपात विलीन झाला.

प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे इतिहासाच्या पानात उमराणीचे नाव सोनेरी अक्षरांनी कोरले गेले. त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्या यासाठी उमराणी येथे सांगली जिल्हा परिषदेने स्मारकांचे काम हाती घेतले आहे पण ते काम गेली अनेक  वर्षे उलटून गेले तरी अर्धवट व निकृष्ट आहे.


उमराणीच्या लढाईमध्ये धनगर सरदारांची मोठी कामगिरी. 

ही लढाई 9 मार्च ते 7 एप्रिल 1673 च्या दरम्यान सेनापती कुडतोजी गुजर प्रतापराव व आदिलशाही सरदार बेहलोल खान यांच्या मध्ये झाली. 

बेहलोल खान स्वराज्यावर चालून येत आहे ही हकीकत शिवाजी राजेंना कळताच त्यांनी प्रतापराव गुजर व आनंदराव या आपल्या सेनापतींशी गुप्त मसलत करून बहलोलखानाला इतर मोगल सरदार मिळण्यापुर्वीच हल्ला चढवावा अशी रणनीती आखण्यात आली. 

ठरल्या प्रमाणे प्रतापराव व साथीदारांनी विजापूर पासून जवळच असणाऱ्या बहलोल खानाच्या छावणीला वेढा घालण्याचे नियोजन केले. 

उमराणी जवळच्या ओढ्याजवळ पाण्याची सोय पाहून बेहलोल खान डेरा टाकून बसला असता रात्रीत मराठ्यांनी उमराणीतील तलावाला वेढा टाकला. जेंव्हा शत्रूचे हत्ती काही विरांच्या रक्षणाखाली पाणी पिण्यासाठी बाहेर पडले तेंव्हा तेंव्हा प्रतापरावाने एक हजार घोडे स्वारानिशी त्यांच्या वर हल्ला चढवून धांदल उडवली. या लढाईत बहलोल खानाची पूर्णतः पराभव होऊन देखील प्रतापरावांनी त्याला अभय दिले. 

या लढाईची जेधे शकावली मधील नोंद अशी , शके 1595 प्रमादी संवत्सरे चैत्र शुध्द प्रतिपदेला राजश्री राहिरिहून (रायरी) पनाल्यास (पन्हाळ्यास ) गेले तेच मासी बहलोलखान यांसी प्रतापराव व आनंदराव यांसी लढाई जाहाली विज्या पुरा जवळ फत्ते जाली येक हाती पाडाव झाला. तर सभासद बखर खालील प्रमाणे नोंद देते . 

"प्रतापराव यास हुकूम करून आणविले आणि हुकूम केला की, विजापूरचा बेलोलखान येवढा वळवळ बहुत करीत आहे. त्यास मारून फते करणे. म्हणोन आज्ञा करून लष्कर नवाबा वरी रवाना केले. त्यांनी जाऊन उमराणीस नवाबास गाठिले. चौतर्फा राजीयाचे फौजेने कोंडून उभा केला. युध्द ही थोर जाहले. 

या लढाई मधील काही धनगर सरदार

नाईकजी राजे पांढरे:-

उमराणीच्या लढाई मध्ये नाईक जी राजे पांढरे यांनी  मोठी भूमिका बजावली होती. आपले सोबती खराडे नाईक यांना सोबत घेऊन भाईर खान तरीन या पठाण या सेनापतीवर मोठी चढाई करून त्याला नेस्तनाबूत केले.  

विठोजी शिंदे :-

मराठ्यांनी उमराणीच्या लढाईत बेहलोल खानास एका तलावानजिक. वेधले होते. त्यावेळी सिद्दी हिलाल हा आघाडी वर होता तर मागे एक कोसावर  विठोजी शिंदे उभा होते. तसेच विठ्ठल पीलदेव याच्यासह शत्रूवर एका बाजूने भारी चाल करून शत्रूस जेरीस आणले. पुढे पन्हाळा जवळ सर्जा खानाशी लढताना विठोजी शिंदे ना वीरमरण आले.

दीपाजी राऊतराय:-

दीपाजी राऊतराय यांनी उमराणीच्या लढाईत प्रतापराव गुजर यांच्या समवेत समवेत सहभाग घेतला. बेहलोलखान चा सरदार सिद्दी महम्मद बर्की हा ऐन युध्दाच्या मध्येच रण सोडून निघाला असता, दीपाजी राऊतराय याने त्याचा पाठलाग करून त्याच्या खांद्यावर वार केले. बर्की च्या अंगातील चिलखताचे तुकडे तुकडे झाले इतका हा वार जहरी होता. बर्की ने धनुष्यबाण सोडून दीपाजी यांच्या घोड्यास मारले तेंव्हा दीपाजी यांनी दुसऱ्या घोड्यावरून निकराची झुंज दिली.याही घोड्यास बर्की ने जखमी केले. परंतु अश्या ही अवस्थेत दीपाजी यांनी बर्की यांच्या खांद्यावर जबरी वार करत त्यास ठार मारले.  

अशा या स्वराज्यातील थोर धनगर सरदारांना विनम्र अभिवादन............

संदर्भ :-

पर्णालपर्वतग्रहणआख्यान श्लोक  83, 99 ते 103 

औरंगजेबकालीन मराठा आमीर वर्ग की  भूमिका श्रीराम तिवारी. 

सरंजामी मरहट्टे. प्रा. संतोष पिंगळे पहा राजे शिंदे,  राजे पांढरे व शेळके राऊतराय प्रकरण. 

धन्यवाद 

मधुकर सर्जेराव हाक्के 

( मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ.)











No comments:

Post a Comment