विटा ते जत - व्हाया करगणी
( तळेवाडी )
मी श्री भाऊसाहेब दत्तू महानोर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काराजनगी, तालुका - जत, जिल्हा - सांगली.
दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी देविखिंडी तालुका- खानापूर जिल्हा - सांगली या ठिकाणी द अम्युचर खो खो असोसिएशन सांगली आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मा.श्री. अमोल (भैया) बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवीखिंडी ता - खानापूर या शाळेच्या विकास कामाच्या आणि खो खो क्रीडांगणाच्या उद्घाटन समारंभ बद्दल या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
14 वर्षे वयोगटाखालील किशोरी गटातील मुलींच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी सुळकाई प्रतिष्ठान विटा या संघातून आम्ही जत तालुक्यातून सहा मुलींचा समावेश केला होता. सांगली जिल्ह्यात प्रथमच सहा पाट्यामध्ये हा खो खो चा खेळ रंगणार होता. त्यामुळे आयोजक खेळाडू आणि संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक या सर्वांनाच उत्सुकता होती. अलटीमेट पद्धतीने हे सामने प्रथमच होत होते. ह्या स्पर्धेसाठी मागील वर्षाच्या जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी मध्ये असलेल्या क्रमवारीतील संघांनाच निमंत्रित केले होते. या निमंत्रित संघांमध्ये किशोरी गटाच्या सामना हा देवीखिंडीमध्ये मा. सुहास (भैया) बाबर , खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आमदार यांच्या शुभहस्ते उद्घाटनाने झाला.
पहिला सलामीचा सामना राजमाता अहिल्यादेवी क्रीडा मंडळ भिकवडी आणि सुळकाई प्रतिष्ठान विटा यांच्यामध्ये हा सामना झाला. मा. सुहास (भैया) बाबर आमदार यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करून या खो-खो च्या सामन्याची सुरुवात झाली.
राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी च्या मुली सहजच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या असल्यामुळे त्यांना सामान्य संघा बरोबर खेळणे फार कठीण जात नव्हतं. तरी देखील जतच्या काराजनगी शाळेतून दुष्काळी भागातून आम्ही सुळकाई प्रतिष्ठान विटा या संघामार्फत खेळलो.
सुळकाई संघाने प्रथम आक्रमण करत राजमाता संघाचे चार संरक्षक बाद केले.दुसऱ्या पाळीत राजमाता संघाने आक्रमण करत 14 गुण मिळवले. दुसऱ्या आक्रमणाच्या पाळीत सुळकाई संघाने सहा गुण मिळवले.
हा सामना राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी यांनी एक डाव चार गुणांनी जिंकला.
सुळकाई प्रतिष्ठान विटाने संघाने हा सामना जरी हरला असला तरी देखील खेळाडूंनी चांगली चिकाटी दाखवली. आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. मी माझ्या खेळाडूंवर खुश होतो. माझे मित्र श्री .अशोक काळे आणि लक्ष्मण बोत्रे उर्फ टायसन भैय्या यांनी देखील खेळाडूंचे कौतुक केले. खेळामध्ये झालेली प्रगती ,आणि कमी फाऊल्स याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यानंतर पुढील सामने सुरू झाले. परंतु राजमाता क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक माननीय समीर माने सर जेव्हा पुन्हा आम्हाला भेटल्यावर म्हणाले की सुळकाई बरोबर झालेल्या सामन्याप्रमाणे आम्हाला पुढचा कोणताही सामना कठीण गेला नाही. यावरून सुळकाई प्रतिष्ठान संघाच्या मुलींची जिद्द, चिकाटी आणि सातत्य हे लक्षात येते.
सामन्याच्या ठिकाणी आयोजकाकडून सर्व खेळाडूंना आणि कोच यांना खेळाचे किट देण्यात आले होते. त्यामुळे सामन्याची दिखावट (लूक) उत्कृष्ट झाली होती. शाळेचे क्रीडांगण एकदम सुंदर रित्या तयार केले होते. शिवाय शाळेत या व्यतिरिक्त बाला पेंटिंग (BALA PAINTING) आणि वर्गातील फर्निचर हे देणगीदारांकडून केले होते. अमोल शेठ माने यांच्या दातृत्वाने शाळेच्या विकासाचा हा पाया चांगल्या पद्धतीने रचला होता. शाळेचे मुख्याध्यापक श्री धनाजी घाटगे यांच्या प्रत्नातून साकार झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये किट वाटून झाले. सर्व सहभागी खेळाडूंना आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना देखील किटचे वाटप करण्यात आले होते. दुपारी विद्यार्थ्यांना जेवणाची सोय देखील केली होती. त्याचबरोबर स्वीट म्हणून बर्फी वाटप केले होते.
पुरी , भात आणि भाजी असं रुचकर जेवणाचा हे आनंद विद्यार्थिनींनी घेतला.
सुळकाई प्रतिष्ठान विटाच्या संघामध्ये आम्ही जतहून सहभागी झालेल्या खेळाडूंना परत जतला यायचे असल्यामुळे आम्ही दुपारी तीन वाजताच पुढचे सामने पाहणे सोडून आम्ही जतला निघण्यासाठी निघालो.
प्रियांका माने आणि राजेश निकम सर यांनी आम्हाला विटेपर्यंत येण्यासाठी सहकार्य केले. त्याचबरोबर मंडले सर आणि मंडले मॅडम यांनी आमच्या खेळाडुंना विटा स्टॅन्ड पर्यंत लवकर पोहोचवण्यास मदत केली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. मंडले मॅडमनी सर्व मुलींना कॅडबरी दिली. आम्हाला विटा मधून साडेचार वाजताची सातारा विजापूर ही बस मिळाली आणि आम्ही बसमध्ये बसलो. बस साताराहून फुल्ल आली होती. त्यामुळे बसमध्ये चढल्यानंतर आमच्या खेळाडूंना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. मी खेळाडूंना बोललेलो की जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही ऍडजेस्ट व्हा. मी सर्वप्रथम चढून एक शीट पकडली आणि इतर मुलीला एक जागा, एवढी जागा आम्हाला मिळाली. बाकीच्या पाच उभे राहिल्या. मी माझ्या सीटवर बसल्यानंतर जेव्हा बस सुरू झाली तेव्हा आमच्या खेळाडूंना जवळ बोलावलं आणि तीन मुलींना माझ्या सीटवर बसवून मी उभा राहिलो. माझ्या शेजारी बसलेल्या गृहस्थांनी विचारले " कुठे गेला होता?" आम्ही सविस्तर सांगितले. त्यांना आनंद झाला. "तुम्ही जतहून आलात का , खो खो खेळायला ?" कसं काय ? या प्रश्नाचे उत्तर मी स्पष्टपणे देऊ शकलो नाही. परंतु त्यांना विशेष वाटलं.
जत मधून खानापूर तालुक्यात या मुली खेळायला येतात. आणि माघारी जातात याचं त्यांना विशेष कौतुक वाटलं असावं. त्यानंतर त्या गृहस्थांनी उठून उरलेल्या दोन मुलींसाठी जागा दिली. आम्ही दोघेही उभे राहिलो. चार मुली त्या सीटवर बसल्या. पुढे दोन मुली एका ठिकाणी ऍडजेस्ट झाल्या. माझे पाय दुखत असल्यामुळे मी एका मुलीला उठवलं आणि सीटवर बसलो. चौथ्या मुलीला पुन्हा मी मांडीवर घेऊन बसलो. सफिया नदाफ चॉकलेट खात होती. मी तिला म्हटलं की , या साहेबांनी आपणाला जागा दिलेली आहे. तर यांच्यासाठी एक चॉकलेट दे. सफियाने त्या साहेबांना एक चॉकलेट दिले.
सफिया मला म्हणाली, " सर तुम्हाला देऊ का?"
मी म्हणालो, "नको, तेही त्यांनाच दे."
ते दुसरेही चॉकलेट त्या साहेबांना दिले. इतके होईपर्यंत विट्यातून बस रेणावी पार करून खानापूर बस स्थानकावर आली.
कंडक्टरने येथे बस 25 मिनिटे थांबेल अशी सर्व प्रवाशांना सूचना दिली. काही प्रवासी चहा नाश्ता साठी खाली उतरले. तेव्हा आम्हाला जागा दिलेले प्रवासी त्यांची बॅग त्यांनी घेतली आणि उतरून ते खाली गेले. बस सुरू झाली.
आम्ही सर्वजण आमच्या सीटवर आणि मोकळ्या झालेल्या सीटवर जागा पकडून मुली निवांत बसल्या होत्या.
बेणापूर सुलतानगादे आले तेव्हा ते गृहस्थ पुन्हा बस मध्ये आम्हाला दिसले. ते आले तेव्हा त्या ग्रहस्थानी मुलींच्या हातात एकेक पाकीट दिले. त्यामध्ये वडापाव होता. शिवाय चार पाण्याच्या बॉटल ही होत्या. त्यांनी प्रत्येक मुलींच्या हातामध्ये एक एक पाकीट दिले आणि दोन मुलींमध्ये एक पाण्याची बॉटल दिली.
आम्ही "हे कशासाठी ? का असं?" विचारपर्यंत पुढे भिवघाट हा स्टॉप आला. ते म्हणाले, मी इथं उतरणार आहे. आम्हाला इतकंच कळले की, ते इंजिनियर होते. आखाती देशामध्ये की सौदीमध्ये इंजिनिअरचं काम करतात. त्यांचं मूळ गाव तळेवाडी. करगणी जवळ आहे. त्यांचे वडील घरी एकटेच असतात. वय वर्ष 80 वर्षे. प्रत्येक दोन महिन्यातून पंधरा दिवसांची रजा काढून ते आपल्या वडिलांकडे भेटायला येतात. ते स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करतात. त्यांना मुलींच्या आणि खेळाडूंच्या बद्दल आस्था वाटली म्हणून त्यांना एक फुलाची पाकळी किंवा एक सहानुभूतीची जाणीव म्हणून त्यांनी खेळणाऱ्या मुलींचे साठी एक नाष्टा आणि पाण्याची बॉटल हे मनापासून मुलींना दिले. परंतु आम्ही या गदारोळामध्ये त्यांचं नाव विचारायचं विसरून गेलो. इतक्यात स्टॉप आला. कंडक्टरने बस थांबण्याची बेल वाजवली. ते ग्रहस्थ आधीच उभे राहिले असल्यामुळे पटकन बसमधून खाली उतरले आणि निघून गेले.
पुन्हा बस सुरू झाली आणि माझ्या डोक्यामध्ये विचार चक्र सुरू झाले. माझ्या नजरेमध्ये फक्त त्यांचा पिवळा शर्ट आणि जीन पॅन्ट, स्वच्छ चेहरा आणि पाठीला अडकवलेली सॅक इतकच मी त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे बघत राहिलो. मी विचारात मग्न झालो. त्या गृहस्थाला असं का वाटलं असेल? त्यांनी आमची किरकोळ चौकशी केली. फक्त जत मध्ये कोणत्या शाळेच्या आहात इतकच विचारलं. कधीपासून खेळता ? कसं खेळता? तुम्हाला कोण शिकवतं? ह्या गोष्टींची आम्हाला कोणतीही चौकशी न करता त्यांनी सर्व मुलींना नाष्टा आणि पाण्याची सोय त्यांच्या मनापासून केली. का केले असेल? आणि पुन्हा मनाला वाटलं की अशा अनेक दानशूर व्यक्तींच्या मुळे असे अनेक विविध खेळ जिवंत आहेत. आपली ही काला देखील जिवंत आहे. मी त्यांचा फोन नंबर घेऊ शकलो नाही . त्यांचं नावही विचारू शकलो नाही ही माझ्या मनामध्ये खंत अजूनही कायम राहून गेली आहे. या लेखाच्या द्वारे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा आणि त्यांच्या भावनिक बंधनातून मुक्त व्हावं ही माझी इच्छा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏